मज सुख गवसले
मेघनाला आज परत उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. अतिशय झगमगाटी सोहळ्यात तिला हा पुरस्कार स्वीकारताना आज काहीतरी कमी जाणवत होती. आज तिला मनापासून आनंद झाला नाही की समाधान वाटले नाही. लहानपणापासून प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली मेघना आता मात्र या चकाकणाऱ्या दुनियेला कंटाळली होती. सतत मेकअप चेहऱ्यावर थोपून सुंदर आणि नीटनेटके दिसण्याची कसरत करणे तिला आता कंटाळवाणे वाटू लागले होते.
घरी पोहोचताच मेघनाला रडू कोसळले कारण नेहमीप्रमाणे तिच्या यशाचे कौतुक करणारी आजही ती एकटीच होती. आई आणि वडील दोघेही अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वे होती पण ; आईवडील म्हणून मेघनासाठी त्यांच्याकडे नेहमीच वेळेचा अभाव राहीला. आजही आई आणि वडील दोघेही शुभेच्छा स्वीकारण्यात व्यस्त होते . मेघनाचे कौतुक करण्यास मात्र ते साफ विसरले.
मेघनाला आता सगळ्याची सवय झाली होती पण ; तिला या सगळ्यापासून मुक्तता हवी होती. एक स्वच्छंद आयुष्य हवे होते आणि म्हणूनच तिने एक निर्णय घेतला. मनाशी पक्के ठरवले आणि निर्णय अंमलात आणण्यासाठी उपाययोजना आखायला सुरुवात केली.
” काय बोलत आहेस तू मेघना ? तू हा निर्णय घेताना जराही विचार केला नाहीस का ? ” मेघनाची आई रागाने विचारत होती ; पण मेघना वरती त्याचा काडीमात्र फरक पडला नाही.
” पूर्ण विचाराअंती निर्णय घेतला आहे मी आणि हा माझा अंतिम निर्णय आहे “. मेघना ठामपणे म्हणाली आणि तिची आई अजूनच चिडली.
” मेघना , अगं कालच तर तुला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे आणि आज सकाळपासून सहा चित्रपट निर्मात्यांचे फोन येऊन गेले. त्यांना काय उत्तर देणार आहोत आपण ? ” मेघनाची आई रागाने लालबुंद झाली होती.
” कोणालाही काहीही उत्तर द्यायची गरज नाही. माझा निर्णय झालाय. मला आता थोडा वेळ आराम हवाय आणि म्हणूनच पुढचे काही दिवस तरी नवीन चित्रपटाची ऑफर मी स्वीकारु शकत नाही “. मेघनाचे म्हणणे ऐकताच तिच्या बाबांनी हातातील चहाचा कप रागात फेकून दिला आणि तिथून काहीही न बोलता उठून निघून गेले.
मेघनाला थोडे वाईट वाटले ; पण तिचा निर्णय पक्का होता. मेघनाने बॅग भरली आणि एकटीच गाडी घेऊन बाहेर पडली. डोळ्यातून पाणी येत होते आणि मेघना ते कसोशीने अडवायचा प्रयत्न करत होती. मेघनाला घेतलेला निर्णय अंमलात आणायचा होता. झगमगाटी दुनिया आणि ते वलय बाजूला ठेवून मेघना काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात जाऊ पाहत होती. एकटीला रहायचे होते तिला आणि तेही स्वतःची ओळख लपवून !
मेघनाने मुंबई शहर पाठीमागे सोडले आणि आता तिच्या गाडीने कोकणचा रस्ता धरला. काही दिवसांपूर्वीच तिने कोकणात एक टुमदार घर खरेदी केले होते. कोकणी पद्धतीच्या खूप सुंदर असणाऱ्या या घराच्या भोवती आंब्याच्या आणि काजूच्या झाडांचे वेढे होते. घराच्या पाठीमागे बरीच मोठी नारळाची बाग होती. या बागेत नारळाच्या दोन झाडांमध्ये बांधलेले झोके लक्ष वेधून घेत होते. एक जुनाट ; पण पक्के बांधकाम असणारी विहीर होती. घराकडे लक्ष ठेवण्यासाठी विमला आणि सदानंद हे पती पत्नी त्याच घरात राहत होते.
मेघनाची गाडी घराच्या फाटकातून आत शिरल्यावर सदानंद हातातले काम सोडून धावत आला. मेघनाला नमस्ते करत त्याने सामान उचलले. विमलाही पाठोपाठ धावत आली. मेघनाला अदबीने दोघेही घरात घेऊन आले. मेघना एव्हाना तिथल्या शांततेने सुखावली होती.
” ताई , जेवण तयार हाय. आवरुन या. जेवाय वाडते म्या ” . कमला अतिशय नम्रपणे म्हणाली आणि मेघना हसत हसत उठली.
” दादा , मी जे सांगितले ते लक्षात असू द्या. माझी खरी ओळख इथे कोणालाही कळता कामा नये “. सदानंदने होकारार्थी मान हलवली आणि मेघना निघून गेली.
अतिशय दुर्गम भागात मेघनाने हे घर खरेदी केले होते. घराची उत्तम डागडुजी करून घेतली होती. विमला आणि सदानंदला घराची जबाबदारी सोपवली होती. विमला आणि सदानंद सोडून त्या गावात कोणालाही मेघनाची खरी ओळख माहिती नव्हती.
हळूहळू मेघना तिथे रमू लागली. गावामध्ये फेरफटका मारणे , तळ्याकाठी तासन् तास शांत बसून राहणे. गावातील शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करणे हिच तिची दैनंदिनी झाली. गावातील लोकांबरोबर देखील आता तिची चांगली ओळख झाली होती आणि म्हणूनच या गावातील प्रथांसोबतच गावकऱ्यांच्या व्यथाही तिला समजू लागल्या.
गावात शहरा सारख्या सुविधा नव्हत्या. शहरा सारखा झगमगाट ही नव्हता ; पण तरीही हे गाव सुखी होते. समाधानी होते.
मेघना आता स्थिरावली होती आणि गावातल्या लोकांनाही आत्तापर्यंत मेघना श्रीमंत व्यक्ती आहे इथपर्यंत कळले होते. मेघनाचा लाघवी स्वभाव सर्वांना आपलेसे करून घेण्यात यशस्वी झाला होता. मेघनाने आता ठरवले या गावासाठी काही तरी करायचे आणि त्या दृष्टीने तिने पावले उचलण्यास सुरुवात केली.
गावातील लोकांची सकाळ झाली ती काहीशा गलबलाटानेच. सगळे उठून रस्त्यावर , आपापल्या अंगणात येऊन पाहू लागले. रस्ता तयार करण्यासाठी शहरातून काही माणसे आणि मशीन आल्या होत्या. गावकरी हरखले. खूप खुश झाले. तो दिवस गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता पण त्यांना वाटत होते सरकारने आपल्या गावासाठी ही पावले उचलली आहेत. प्रत्यक्षात मात्र ही मेघनाची किमया होती.
मेघनाने हळूहळू शाळेची डागडुजी , आरोग्य केंद्राची डागडुजी करवून घेतली. शाळेत चांगले शिक्षक आणि आरोग्य केंद्रात चांगले डाॅक्टर नेमले. गाव विकासाच्या वाटेवर निघाले.
बघता बघता सहा महिने झाले. मेघनाची आई वारंवार फोन करून तिला मुंबईला परत येण्यास बजावत होती. मेघनालाही आता परत जायची वेळ आली आहे हे लक्षात येताच तिने विमला आणि सदानंदला कल्पना दिली .
मेघना गावकऱ्यांचा निरोप घेऊन निघून गेली ; पण गावकरी आणि मेघना यांच्या मध्ये मायेचा निर्माण झालेला बंध डोळ्यातून वाहत होता. मेघना जाताच विमला आणि सदानंदने मेघना कोण आहे आणि तिनेच गावचा विकास केला आहे हे गावकऱ्यांना सांगताच गावकरी चक्रावले. मेघनाला एकदा भेटून तिला धन्यवाद द्यावे यासाठी सदानंदला गळ घालू लागले.
मेघनाला मात्र परत मुंबईला आल्याचा पश्चाताप होत होता. तिला कळून चुकले होते की प्रसिद्धी आणि पैसा याशिवाय जग चालतच नाही हा निव्वळ तिचा भ्रम होता. आजवरच्या आयुष्यात प्रसिद्धी आणि पैसाच तिच्या आजूबाजूला फिरत होते. यातून सुटता येतच नाही हा तिचा भ्रम होता आणि आज तिला जाणवले होते की आयुष्यात केवळ पैसा गरजेचा नाही .
गावकरी गावच्या विकासाने खुश तर होते ; पण मेघनाला भेटता न आल्याचे शल्य कुठेतरी खुपत होते. तिने एकदा आपल्या गावात परत यावे अशी तिथल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा होती ; पण दोन महिने उलटले तरी मेघना काही आली नाही. शेवटी गावकऱ्यांनी हार मानली आणि एके दिवशी दुपारी अचानक गावामध्ये मोठमोठ्या गाड्यांचा ताफा हजर झाला. गावकरी हैराण होऊन पाहत राहीले. आपापसांत कुजबुज सुरू झाली आणि अचानक एका गाडीतून त्यांची लाडकी मेघना बाहेर आली. तिला पाहताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. मेघना देखील गावकऱ्यांचे प्रेम पाहून भारावून गेली.
मेघनाने आज परत एक ठाम निर्णय घेतला होता. मेघना मुंबई सोडून कायमची गावची रहिवासी झाली. तिला हेच तर हवे होते.
मेघना शंकराच्या मंदिरात बसून विचार करत होती. मेघनाला आज खऱ्या सौंदर्याची ओळख पटली होती. आज खऱ्या अर्थाने ती आयुष्य जगायला लागली होती. जगण्याचा खरा आनंद तिला गवसला होता.
समाप्त:
कथा कशी वाटली आपला बहुमुल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र वेबसाइटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील.
सुंदर 🎉
सुरेख
छान लिहिली आहे कथा.