त्याने न वाचलेलं तिचं पत्र
आज पुजा फार हळव्या, प्रेमळ, हृदयाजवळच्या विषयावर बोलणार होती. पुजा आपल्या शो मध्ये आठवड्यातून एक दिवस एक पत्र वाचते. ते पत्र कुणीही कुणालाही लिहावं. पुजा ते पत्र वाचून दाखवते. ह्यामध्ये पुजा दोन गोष्टी साध्य करते. एक म्हणजे ज्याला जे सांगायचे आहे ते त्याच्यापर्यंत ती पोहोचवते आणि दुसरं म्हणजे लुप्त होत असलेलं पत्रलेखन जीवंत ठेवते. स्टुडिओ मध्ये आल्यावर आपला शो सुरू करण्याआधी तिने ते पत्र परत एकदा वाचलं आणि शो सुरू केला.
“हाय. गुडमॉर्निंग ऑल. माझ्या लाडक्या, प्रेमळ रसिकांनो डोन्ट वरी, बी हॅपी. ते तर तुम्ही असणारच. कारण तुमच्यासोबत आहे तुमची लाडकी, प्रेमळ, मिश्कील पुजा और नही कोई दुजा. आज आपण आपल्या हृदयाजवळच्या विषयावर बोलणार आहोत. प्रेम. प्रेम म्हणजे काय? नक्कीच आपण ऐकणार आहोत त्याआधी पहिल्या प्रेमासाठी हे गाणं.
‘पहला नशा, पहिला खुमार
नया प्यार है नया इंतजार.’
पुजाचा शो असाच पुढे सुरू होता. प्रेमाची अनेक वळणं ती रसिकांबरोबर चालत राहिली आणि येऊन पोहोचली विरहाच्या वळणावर. “रसिक हो, आपण प्रेमात सगळेच धुंद होतो. सगळंच खूप छान, हवहवसं वाटू लागतं. फक्त नको असतो तो दुरावा. पण आज मी एक असं पत्र तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्यात दुरावा लिहिला आहे. ज्याच्यासाठी लिहीला आहे त्याने तो नक्कीच ऐकावा. हे पत्र ऐकल्यानंतर तुम्हाला ही वाटेल प्रेमात दुरावा फक्त शरीराने असतो, मनाने नाही. कुठल्यातरी स्वरूपात खरं प्रेम हे जीवंत रहातंच.
आज तिचं प्रेम ह्या त्याने न वाचलेल्या पत्रात जीवंत आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने तिचं हे पत्र मी त्याला वाचायला लावणार. हो वाचायलाच. कारण हे पत्र इथे ऐकल्यानंतर तो तिचं न वाचलेलं प्रत्येक पत्र वाचणार आहे. तिला तिचा आनंद मिळणार आहे. चला तर मग वाचू या त्याने न वाचलेलं तिचं पत्र. “
“प्रिय,
हो प्रियच. तू मला आधीही प्रिय होतास आणि आजही. नंतरही प्रियच असशील. आज तुझा वाढदिवस आहे. तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज पत्रातून तुला शुभेच्छा देत आहे. ह्या आधीही तुला बरीच पत्र लिहीली आहेत. अशी कागदावर नाही. पण डिजीटल. आज सुद्धा डिजीटल आहे. पण तू आधीची ही पत्र वाचली नाहीस. नुसतीच बघितलीस. ह्या पत्रांवरून, त्यातील अक्षरांवरून हाथ फिरवशील तर तुला माझं अस्तित्व जाणवेल. हे माझं अस्तित्व तू जपून ठेवू शकतोस. म्हणून नेहमी हा पत्रप्रपंच करते. खरंतर प्रत्येक वेळेस कागदावर पत्र लिहीणार होते . कारण हे डिजीटल पत्र तू डिलीट केलेस तर माझं अस्तित्व तुझ्यापूरेसे संपून जाईल. पण जर कागदावर लिहीलेलं पत्र तुला दिले असते आणि तू ते फाडून टाकले असतेस तरी त्या तुकड्यात माझे अस्तित्व कागदावर राहिले असते. तुला माझं अस्तित्व पाहिजे की नाही हे अजूनपर्यंत मला कळलंच नाही. म्हणून हे डिजीटल पत्र पाठवत आहे.
आज तुझा वाढदिवस आहे. काय देऊ मी तुला? सांग ना. तुला काय पाहिजे? आता म्हणशील, ‘अगं काहीही नकोय गं येडू. फक्त तू मला भेटायला ये.’ हे गिफ्ट तर मी तुला नाही ना देऊ शकत. अरे थांब. मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंच आहे. आता लगेच म्हणून नकोस की, ‘काहीही दे.’ हे सुद्धा मी तुला देऊ शकत नाही. कारण तुझ्या ह्या काहीही साठी मी खूप दुकानं पालथी घातली. कित्येक वेबसाईट चेक केल्या पण तुझे हे काहीही मला कधीच मिळालं नाही.
ए तुला आठवतं आपली ओळख झाल्यानंतरचा तुझा पहिला वाढदिवस. मी तुला न सांगताच एक ट्रेकिंग बॅग पाठवली होती. तुला फिरायची खूप आवड आहे ना म्हणून बॅग गिफ्ट केली होती. ते अनपेक्षित गिफ्ट बघून तुला खूप आनंद झाला होता. तू मला विचारलं होतं, “तुला कसं कळलं मला ही बॅग पाहिजे होती?” त्यावेळेस मी तुला सांगितलं नाही. पण तुझ्या त्या गिफ्टसाठी दोन दिवसरात्र मी खर्ची घातले होते. तुझ्या सोशल साईटवर जाऊन तुझी प्रत्येक पोस्ट बारकाईने परत परत बघितली. जे तुझ्यासारखे फिरणारे होते त्यांच्या पोस्ट बघितल्या. त्यानंतर कळालं की तुझ्याकडे त्यांच्यासारखी फिरायला मोठी बॅग नाही. म्हणूनच मग वेगवेगळ्या साईटवर जाऊन कुठली बॅग चांगली आहे ते बघितलं. मग एक बॅग आवडली पण ती काही तुझ्यापर्यंत पोहचू शकली नव्हती. मग नाईलाजास्तव दुसरी बॅग ऑनलाईन ऑर्डर करून पाठवली होती. तुला ती बॅग खूप आवडली होती. तू इतका आनंदी झालास कि त्यात मला सुद्धा माझा आनंद मिळाला.
पण त्यानंतर मात्र मी कधीही तुला सरप्राईज गिफ्ट नाही देऊ शकले; कारण त्यानंतर तुला आवडेल का? तुला काय पाहिजे? तुला राग तर येणार नाही ना? ह्याचाच विचार करून तुला जे पाहिजे ते तुलाच विचारून दिले. माझी आवड निवड मात्र एकच राहिली ती म्हणजे तू.
आता ह्यापुढे तुला मी विचारू शकत नाही तुला काय पाहिजे. कारण ते तू तुझ्या वाढदिवसाच्या आधीच माझ्याकडून मागितलं आहेस. ते मी तुला दिलं. तुझं गिफ्ट म्हणून तू ते मागून घेतलं आहेस असं मी समजते; पण निदान ते मागण्याआधी मला जरा कल्पना दिली असतीस तर बरं झालं असतं. तू खूप किंमतीचं गिफ्ट मागितलंस. आधी सांगितलं असतं तर तुझ्या ह्या आजच्या दिवसात मी तुझ्याबरोबर राहून तुला ते दिलं असतं.
माहित आहे आता तू म्हणशील “मी तुला आधीच सांगितलं होतं, हे कधी ना कधी तरी होणार होतचं, आपण एकत्र येण्यासाठी नाहीच आहोत, माझं प्रॉमीस मी पाळलं आहे” वैगरे. पण हे सगळं आजच्यानंतर सुद्धा होऊ शकलं असतं. तुझ्यापासून लांब रहाण्याचं गिफ्ट तू एका क्षणात मागितलंसं. एका छान हसऱ्या क्षणी थांबूया, भांडून वेगळं नाही व्हायचं असं म्हणाला होतास. पण तो हसरा क्षण तू ठरवणार आहेस आणि निवडणार आहेस हे नव्हतं तू सांगितलंस. तरीही तू मागितलंस आणि मी ते दिलं. कारण तुला काय पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तू मागितल्यावर तुला ते लगेच देणं हे ही महत्वाचेच.
बघ असं बोलल्यावर लगेच तोंड पाडून नकोस. आज तू असं नाराज झालेलं मला आवडणार नाही. बरं एक सांग तुला मी दरवर्षी देते तसं भारी गिफ्ट कुणी दिलं का? नसणारच. कारण मी तुला वस्तू कधीच दिल्या नाहीत. दिले ते शब्द जे फक्त माझेच आहेत, मी रचलेले तुझ्यासाठी. तू वाचलेस का? ह्याआधीही तुला बरेच शब्द पाठवले होते. ते सुद्धा तू फक्त बघितलेस. वाचले नाहीस, समजले नाहीत. जमल्यास नक्की वाच. गिफ्ट आहेत ते तुझ्यासाठी.
तुझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना. तुझं हे प्रेम जपणारी व्यक्ती तुला आवडते ना. पण कधीतरी तुझं प्रेम जपणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करून बघ. तुझं तुझ्यावरचं प्रेम वाढतच जाईल. तुझं आयुष्य आनंदमय होईल.
आता आपण ह्यापुढे कधी ही भेटणार नाही, बोलणार नाही. पण ह्या पत्रातून मी बोलत राहिन आधीसारखीच. तू ते शब्द वाच अगर नको वाचूस, पण मी ह्या शब्दांतून माझा आनंद शोधत रहाणार. कधीतरी आधीसारखाच थोड्या वेळासाठी तो मला मिळेलच. तो आधीसुद्धा कायमचा माझा नव्हता आणि नंतरही कायमचा नसेल हे मला माहित आहे. पण अजूनही तो मला पाहिजे आहे थोड्या वेळासाठी आयुष्यभर. मिळेल का रे मला?
तू म्हणतोस ते अगदी खरं आहे बघ. मी येडू, पागल, मंद आहे. मला माझा आनंद ह्यापुढे मिळणार नाही हे तू मला आधीच सांगितलं आहेस तरीही वेड्यासारखी तुला विचारते आहे. पण तरीही मी माझी पत्र लिहीत रहाणार आणि पाठवत रहाणार. माझ्या तू न वाचलेल्या पत्रात कृष्णसखी बनून रहाणार आहे. माफ कर आज मी तुझ्या मनाविरुद्ध वागते आहे. पण तुझ्याप्रमाणेच मी सुद्धा आता माझ्या मनाप्रमाणे माझ्या आनंदासाठी मी जे ठरवलं आहे तेच करणार आहे.
अजून एक गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध करणार आहे. ह्याबद्दल मी तुझी माफी मागणार नाही. तुला मी ह्यापुढे सरप्राईज गिफ्ट पाठवणार आहे. मला जे तुला द्यायचं आहे ते मी तुला देणार आहे. हा माझा हक्क आहे आणि हा हक्क मी हक्काने गाजणार आहे. तू अडवू शकत नाहीस, नाकारू शकत नाहीस.माझं गिफ्ट परत पाठवण्याची हिंमत सुद्धा करू नकोस. कारण त्याने माझं मन दुखावले जाईल आणि तुला ते नक्कीच आवडणार नाही. गोड धमकी समज हवंतर. इतका हक्क देशील ना? इतक्या दिवसात छोटूसा हक्क निर्माण केला आहे ना मी? तुला मी दिलेली गिफ्ट लगेच समजतील अशीच गिफ्ट मी पाठवेन. आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुझ्याकडून जबरदस्तीने घेतलेली रिटर्न गिफ्ट आहेत असं समज.
ऊरलं नाही काही आता
म्हणून पुढे चालत राहिले
जाण्याआधी मात्र एकदा
भरल्या नयनांनी पाहिले
मागे राहिलेल्या सुखाला
डोळ्यात साठवून घेतले
ऊरलं सुरलं करून गोळा
आनंद आठवणीत रमून गेले…
चल खूप वेळानंतर खूप बोलले तुझ्याशी. कंटाळा नाही ना आला तुला? मला तुझा खूप वेळ दिलास त्यासाठी थँक्यू. परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुला परत पत्र पाठवेनच तू न वाचलेली माझी पत्रं. भेटू पत्रातून. काळजी घे स्वतःची माझ्यासाठी.
तुझी कधीही न होऊ शकणारी
तुझी आनंदमय सखी. “
पुजाला आलेलं पत्र पुजाने त्याच हृदय पिळवटून टाकणाऱ्या भावनेने वाचले. पुढे ती रसिकांबरोबर बोलू लागली. “कधीही त्याची होऊ शकणार नाही हे माहित असूनही जीवापाड प्रेम करणाऱ्या ह्या कृष्ण सखीचे पत्र मी वाचले. एक जाणवलं अश्या ह्या त्याने न वाचलेल्या पत्रातूनही ती त्याच्या जवळ राहिलीच आहे. म्हणूनच त्याच्यासाठी, आनंदासाठी पत्र लिहायचीच. ती त्याने न वाचलेली असली तरीही. भेटू लवकरच असंच आणखी एक त्याने न वाचलेलं तिचं पत्र वाचण्यासाठी. ” असं म्हणत पुजाने आपला शो संपवला.
__पुजा सारंग, मुंबई.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
khup chhan…
धन्यवाद मॅडम 🙏🏻
Very nice and unique concept.
Congratulations Pooja madam.