म्रराठी कथा – कदर

WhatsApp Group Join Now

                 “भाई! इस बातपे एक गरमागरम फक्कड आल्याचा चहा होऊन जाऊदे.” सुशीलरावांचे मित्र श्यामराव म्हणाले.

                 सुशीलरावांनी एक नजर त्यांच्या बायकोकडे म्हणजेच सुमेधा ताईंकडे टाकली. खरंतर सुमेधा ताईंना उठून चहा करणे जीवावर आले होते; पण नाईलाजास्तव त्या उठल्या आणि किचनमध्ये चहा करायला गेल्या. 

                 “बाकी काही म्हण सुशील, चहा प्यावा तर सुमा वहिनींच्याचं हातचा.” निशिकांत म्हणाले.

                   “अग! चहाबरोबर वेफर्स आणि बिस्किटे पण आण ग.” सुशीलरावांनी फर्मान सोडले. 

                    सुमेधाताई किचनमध्ये उभ्या होत्या. एका बाजूला चहा उकळत होता तर मनामध्ये खूप काही खदखदत होते. वयाची साठी व्हायला आली तरी आपल्या नवऱ्याचे हे मित्रांना घेऊन येणे, त्यांच्याबरोबर तासनतास रमी खेळणे मग त्यानंतर नवरा तर दुरचीच गोष्ट पण त्यांच्या मित्रांनी सुद्धा चहाकॉफीची फर्माईश करणे ह्या सगळ्या गोष्टींचा आता सुमाताईंना उबग आला होता. 

                   चहाचे पाच कप त्याबरोबर डिशमध्ये वेफर्स, चिवडा आणि बिस्किटे सुमाताईंनी सुशीलरावांच्या पुढ्यात नेऊन दिली. 

                    “अहो! माझे डोके दुखत आहे तर मी जरावेळ पडते.” असे सांगून सुमाताई आपल्या बेडरूममध्ये गेल्या. बेडरूममध्ये गेल्यावर मात्र त्यांनी थोपवलेला मनाचा बांध फुटला आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांचे मन नकळतच भूतकाळात गेले.

                    “अग ऐकलस का? आपल्या सुमाला किशोरदादाने एक स्थळ आणले आहे. मुलगा दिसायला सुंदर आहे, निर्व्यसनी आहे, शिकलेला आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे. त्यात मुलाचे आईवडील गावाला असतात. हा इथे एकटाच शहरात नोकरी करतो. आपली सुमा राजाराणीचा संसार करेल. मग सांगू का त्यांना आपल्या घरी सुमाला पाहायला यायला?” सुमाताईंचे वडील दिनकरराव आपल्या पत्नीला म्हणजेच ताराबाईंना विचारत होते.

                    “इतकं चांगलं स्थळ असेल तर पाहायला काय हरकत आहे? आजच आपल्या घरी बोलवायची तारीख ठरवून टाका. उगीच हातचं चांगलं स्थळ जायला नको.” ताराबाई म्हणाल्या.

                  सुमा आपल्या आईवडिलांचे बोलणे दाराआडून ऐकत होती. तिने मनातल्या मनात आपल्या भावी नवऱ्याचा चेहरा कल्पना करून डोळ्यांसमोर आणला. तिच्या मनात असंख्य गुदगुल्या झाल्या. सुमेधाला आपल्या स्वप्नातला राजकुमार कधी पाहायला येईल याची उत्कंठा लागून राहिली होती. एव्हाना आपल्या ताईला बघायला एक मुलगा येणार आहे ह्याची खबर तिच्या लहान बहीण-भावाला लागली आणि त्या दोघांनी तिला चिडवायला सुरुवात केली. सुमेधाला त्यांचे चिडवणे आवडत होते पण उगीचच लटक्या रागाने तिने आपल्या भावंडांना दम भरला.

                    सुमा दिसायला अतिशय देखणी होती आणि तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. सुमाच्या वडिलांना खरंतर सुमाला शिकवायचे होते पण घरच्या परिस्थितीने ते तिला पुढे शिकवू शकत नव्हते. पुन्हा तिच्या पाठची दोन लहान मुले शिकणारी होती. त्यामुळे चांगले स्थळ सांगून आल्यामुळे त्यांनी सुमाच्या लग्नाचा विचार केला. नुकतेच तारुण्यात प्रवेश केल्यामुळे सुमाला देखील आता आपल्या आयुष्यात कोणीतरी हक्काचे हवे असे वाटू लागले होते त्यामुळे आपल्याला पाहायला एक मुलगा येणार आहे ह्या कल्पनेनेच ती हरखून गेली होती.

                  ठरलेल्या दिवशी सुशीलराव सुमेधाला पहायला गेले. सुमेधा त्यांना लगेचच पसंत पडली. सुमेधाला देखील रुबाबदार सुशीलराव खूप आवडले. दोन्हीकडून पसंती झाल्यावर लगेचच लग्नाची तारीख काढली आणि सुमेधा सुशीलरावांची पत्नी म्हणून तिने त्यांच्या घराचे माप ओलांडले. सुशीलरावांच्या लग्नामध्ये त्यांच्या मित्रांनी भरपूर मदत केली होती. आता देखील गृहप्रवेशाच्या वेळी सुशीलरावांचे नातेवाईक तर होतेच त्याचबरोबर दहा-बारा मित्र देखील होते. ते सगळेजण सुमेधाला ‘वहिनी वहिनी’ करत होते त्यामुळे सुमेधा एकदम अवघडून गेली होती. 

                  दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली तेव्हा देखील सगळ्या मित्रांनीचं पूजेची व्यवस्था पाहिली. सुशीलराव आणि सुमाच्या पहिल्या रात्रीसाठी त्यांनी त्यांची रूम फुलांनी सजवून ठेवली. फुलांच्या मनमोहक सुवासाने मोहरून सुशीलरावांच्या बाहुपाशात सुमा एकरूप होऊन गेली.

                  लग्नानंतर दोन-चार दिवसांत लग्नासाठी आलेले नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. सुमा आणि सुशीलराव हनिमूनवरून आल्यावर सुमाचे सासुसासरे आपल्या गावी निघून गेले. आता त्या दोघांचा राजाराणीचा संसार सुरू होईल ह्या कल्पनेनेच सुमा हरखून गेली होती. संध्याकाळी ऑफिसमधून येणाऱ्या आपल्या नवऱ्याची ती वाट पहात होती. सुशीलराव आले पण त्यांच्याबरोबर त्यांचे पाच मित्र आले. आल्याआल्या त्यांनी सगळ्यांसाठी सुमाला चहा आणि पोहे करायला सांगितले आणि स्वतः मित्रांबरोबर त्यांनी रमीचा डाव मांडला. सुमाने आनंदाने पोहे केले आणि मस्त आले, वेलची, जायफळ, गवती चहा पात घालून चहा बनवला. सुशीलरावांचे मित्र सुमाच्या पोहे आणि चहाची तारीफ करत करतचं दोन-तीन तासांनी आपापल्या घरी गेले.

                 आठवड्यातून चार-पाच वेळा तरी मित्रांची मैफल सजायची. रमी खेळता खेळता मग सुमाकडे कधी शिरा, कधी पोहे तर कधी उपमा, साबुदाणा वडा, बटाटा वडा, बाहेर पाऊस पडत असेल तर कांदा भजी यांची फर्माईश होऊ लागली. सुमा अतिशय आवडीने सगळ्यांना खाऊ घालायची पण नंतर नंतर ती ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळली. सुमा आणि सुशील यांच्यामध्ये ह्या गोष्टींवरून वादविवाद व्हायला लागले.

                  “तुमच्या मित्रांना आपलंच घर मिळतं का? त्यांच्या घरी तुम्ही का जात नाहीत? त्यांच्या बायका रोजरोज इतकं करतील का सगळ्यांसाठी?” सुमाने त्रासिकपणाने विचारले.

                   “हे बघ, प्रत्येकाचे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे त्यांच्या घरात जागा नसते का प्रायव्हसी नसते आणि आम्ही मित्र फक्त पत्ते तर खेळतो. दारूच्या बाटल्या आणून नशा तर करत नाहीत ना?” सुशीलराव म्हणाले. सुशीलरावांच्या उत्तराने सुमा गप्प बसली.

                  पुढे सुमाला दिवस गेले तेव्हा देखील आठवड्यातून दोन-तीन वेळा सुशीलराव आणि त्यांच्या मित्रांचे चोचले सुमाला पुरवावे लागतच होते. सुमा नवव्या महिन्यात माहेरी गेली. सुमाला पहिला मुलगा झाला. मुलगा दोन महिन्यांचा झाल्यावर सुशीलरावांनी सुमाला घरी आणले. एक महिना जाऊ दिल्यावर सुशीलरावांनी पुन्हा आपल्या मित्रांबरोबर पत्त्यांचे डाव मांडायला सुरुवात केली. लहान बाळाला सांभाळून पुन्हा नवऱ्यासाठी आणि त्याच्या मित्रांसाठी चहा, नाश्ता सुमा करू लागली. 

                  सुमाला तीन वर्षांनी दुसऱ्यांदा दिवस गेले. नेमके सुमाच्या सासऱ्यांचे पाय फ्रॅक्चर झाल्याने तिचे सासुसासरे गावावरून येऊ शकत नव्हते आणि सुमाच्या बहिणीची दहावीची परीक्षा म्हणून सुमाची आई येऊ शकत नव्हती. सुमाला दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी अतिशय त्रास झाला तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये पोचवायला, धावाधाव करायला सुशीलरावांच्या मित्रांनी खूप मदत केली. सुमाचे सीझर करावे लागले. सुशीलरावांकडे हॉस्पिटलमध्ये भरायला पुरेसे पैसे नव्हते तेव्हा पैशांची सोय सगळ्या मित्रांनी मिळून केली. सुमाला दुसरी मुलगी झाली. सुशीलरावांच्या मित्रांच्या बायकांनी जणू सुमाचे बाळंतपण केले. डिंकमेथीचे लाडू, रोज जेवण, नाश्ता सुशीलरावांचे मित्र घरी आणून देत असत. मुलीच्या बारशाच्या वेळी देखील मित्र मदतीला उभे राहिले होते. 

                    आता दोन मुलांची जबाबदारी सुशीलरावांवर वाढली तरी त्यांचे मित्रांबरोबर पत्ते खेळणे कमी झाले नाही. मुलांचा वाढता अभ्यास, त्यांच्या मागण्या पुरवता पुरवता सुमा थकून जायची त्यात भरीस भर म्हणजे हे नवऱ्याचे पत्त्यांचे व्यसन. सुमा काही बोलायला गेली तर सुशीलराव तिला मित्रांनी केलेल्या मदतींची जाणीव करून द्यायचे. सुमाला गप्प बसण्याशिवाय काही पर्याय नसायचा.

                     कालांतराने सुमाची दोन्ही मुले शिकली. लेकीने लव्हमॅरेज केले. ती तिच्या सासरी गेली. मोठा लेक आपल्या वडिलांच्या सवयींना वैतागला होता त्यामुळे त्याचे लग्न झाल्यावर त्याने वेगळीकडे चूल मांडली. आता घरात सुमा आणि सुशीलराव दोघेच उरले. वयाच्या साठीनंतर सुशीलराव रिटायर्ड झाले. सुमा देखील साठीकडे झुकलेली होती तरीही सुशीलरावांनी आपल्या मित्रांना घेऊन पत्त्यांचे डाव खेळायचे सोडले नाही. आता तर सुमाताईंचे हातपाय दुखायचे, गुढघे कुरकुरायचे पण सुशीलरावांना त्याची कदरच नव्हती. ते आपल्या मित्रांसोबत पत्त्यांमध्ये मश्गुल असायचे. 

                    सुमाने वेगळा विचार केला होता की, नवरा रिटायर्ड झाला की आपण तिर्थक्षेत्रांना भेटी देऊ, भारतभर भ्रमंती करू, जे आयुष्यात केले नाही ते आता दोघे मिळून जीवनाचा आनंद लुटू पण ह्या सगळ्या त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या उलट आता जास्तच प्रमाणात सुशीलराव आणि त्यांच्या मित्रांचे पत्त्यांचे डाव रंगत होते. तरुणपणी सुमा आपल्या सासुसासऱ्यांकडे तक्रार करत असे. तेव्हा ते दोघेही आपल्या लेकाला ह्या गोष्टींवरून दम भरत असत पण आता सासुसासरे देखील राहिले नव्हते तर सुमाताई तक्रार तरी कोणाकडे करणार होती? सुमाताईंना लग्नानंतर माहेरपणाला देखील सुशीलरावांनी फक्त पहिल्या बाळंतपणात सोडले होते त्यावर सुमा माहेरी कधीच राहायला म्हणून गेली नव्हती. 

                   दोन्ही मुले देखील सुशीलरावांना बोलत असत की, आईला घेऊन कुठेतरी फिरायला जा, ती आयुष्यभर कुठेही गेली नाही केवळ संसार करत बसली आणि तुम्हाला सांभाळत बसली तर तिचा जरातरी विचार करा. मुलांनी जीव तोडून सांगून सुद्धा सुशीलरावांनी कधीच आपल्या बायकोचा विचार केला नाही. परिणामी सुमाताई मनाने खचत गेल्या. आपली आई अजून खचून जाऊ नये म्हणून सुमाताईंच्या लेकीने तिच्या सासूबाईंची मदत घेऊन एक प्लॅन केला. तिने त्या दोघींना चारधामला पाठवले. सुमाताई आपल्या विहिणीबरोबर एक महिनाभर चारधामला जाऊन देवदर्शन करून आल्या. सुमाताईंना जाताना एक दडपण होतं कारण त्या घराबाहेर कधी पडल्याचं नव्हत्या आणि घरी येताना त्यांच्यातील आत्मविश्वास दुणावला होता.

                  इथे बायको एक महिनाभरासाठी बाहेर गेल्यावर सुशीलरावांचे प्रचंड हाल झाले होते. त्यांचे दोन वेळेचे जेवण करायला एक बाई लेकीने ठेवली होती. ती भराभर जेवण करून निघून जाई. ते जेवण सुशीलराव गरम करून घेत असत नाहीतर तसेच थंडगार जेऊन घेत असत. नाही म्हटले तरी त्यांना उठून घेण्याची कधी सवय नव्हती आणि आता गुडघेदुखीच्या कुरबुरीमुळे जास्त उठबस करायला त्यांना होत नसे. एक महिनाभर सुमा नाही म्हणून मित्रांबरोबर पत्त्यांचे डाव देखील बंद झाले होते कारण मित्रांची सरबराई सुशीलराव करू शकत नव्हते. आता मात्र त्यांना आपल्या बायकोची किंमत समजली होती. आपल्या नको त्या व्यसनाने आपल्या बायकोला आपला किती त्रास सहन करावा लागला असेल ह्याची त्यांना पहिल्यांदा जाणीव झाली होती.

                सुमाताई चारधाम वरून घरी आल्यावर सुशीलरावांनी सुमाताईंची माफी मागितली.

                 “सुमा! तू एक महिनाभर नव्हतीस तर मला माझी चूक उमगली आहे. आपल्या लग्नानंतर आतापर्यंत तू माझे हे पत्त्यांचे व्यसन सहन करत आलीस. माझे तसेच माझ्या मित्रांचे चोचले पुरवत आलीस. कुठेही जायला यायला मी तुला कधीच परवानगी दिली नाही त्यामुळे चार भिंतींच्या आत राहून संसार रेटत राहिलीस. तुझ्या सगळ्या इच्छा मारून टाकल्यास आणि त्या बदल्यात मी तुला फक्त नी फक्त त्रासच दिला. वास्तविक आता आपल्या दोघांवर कुठलीही जबाबदारी नाही तर  आपण दोघांनी आता आनंदी जीवन जगावयास हवे होते. मी तुझा विचार कधीच केला नाही. ह्यापुढे माझ्याकडून तुला कुठलाही त्रास होणार नाही हा मी तुला शब्द देतो. आता ह्यापुढे आपण दोघे मिळून उर्वरित आयुष्य आनंदाने जगुया.” सुशीलराव म्हणाले.

                  सुशीलरावांच्या बोलण्यावर सुमाताई केवळ हसल्या आणि मनोमन त्यांनी लेकीचे आभार मानले कारण त्यांच्या पश्चात त्यांच्या लेकीने तिच्या बाबांना भला मोठा उपदेशाचा डोस दिला होता. लेकीच्या मार्मिक बोलण्याने आज त्यांच्या नवऱ्याने त्यांची कदर केली होती.

( समाप्त )

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

3 thoughts on “म्रराठी कथा – कदर”

  1. विषय खूप छान घेतला आहे. करोडो स्त्रियांची आयुष्ये केवळ किचन शी जोडून जातात. किचन मध्ये जावं की नाही हा आपल्या स्वातंत्र्याचा भाग असावा ती आपली आणि केवळ आपलीच जबाबदारी बनली की बाकी गोष्टी आपोआप मागे पडतात किंवा खूप तारांबळ होते. आचार्य प्रशांत यांच्या कडून हे मी पहिल्यांदा ऐकलं होत. या मुद्याबद्दल कुणीतरी सार्वजनिक पातळीवर बोलत आहे याबद्दल बर वाटलं होत. आज त्या विषयाला घेऊनच कथा वाचायला मिळाली. छान वाटले. जसे माझ्या बोलण्यात प्रमाण मराठी आणि बोली भाषिक शब्द एकत्रित येतात जसे की वरती बर वाटलं च्या जागी ‘ बरे वाटले ‘ असे असायला हवे होते. त्याप्रमाणे तुमच्या लिखाणात पण आले आहेत. लेकीच्या मार्मिक बोलण्याने असा उल्लेख आला आहे परंतु त्याचा संदर्भ कथेत न्हवता.बाप लेकीचा काहीतरी तसा संवाद हवा होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top