कथेचे नाव – अंतिम इच्छा

WhatsApp Group Join Now

कथेचे नाव – अंतिम इच्छा

                  पहाटे चार वाजता बाबा गेल्याचा फोन वृद्धाश्रमातून आला तेव्हापासून साहजिकच आकाशला खूपचं अपराधी वाटू लागले होते. खरंतर त्याला आपल्या बाबांना वृद्धाश्रमात पाठवायचे नव्हते; पण अक्षिताच्या हट्टापुढे त्याचा नाईलाज झाला होता. अक्षिता आपल्याबरोबर येईल नाही येईल पण आपल्याला तर जावेच लागेल असा विचार करून तो निघायची तयारी करु लागला.

                 “आकाश! एवढ्या पहाटेच कुठे निघालास मला न सांगता?” आकाश काही न सांगता कुठे जाण्याची तयारी करतो आहे हे विचारण्यासाठी अक्षिता अर्धवट झोपेतून उठून म्हणाली.

                 “बाबा गेले. मघाशी वृद्धाश्रमामधून फोन आला होता.” आकाशचे डोळे पाण्याने डबडबले होते.

                  “ओह! ठीक आहे. जा तू.” अक्षिता खजील झाली होती त्यामुळे आकाश सोबत जावे की ना जावे या संभ्रमात ती पडली होती.

                   आकाशने मनोजला तसा फोन केल्यामुळे मनोज तातडीने आला होता. आकाश तर आज गाडी चालवूचं शकणार नव्हता त्यामुळे त्याने त्याच्या ओळखीच्या ड्रायव्हरला बोलावले होते. गाडीत बसल्यावर बाबांच्या आठवणीने आकाशचे अश्रू अनावर झाले होते. त्या आठवणीत तो भूतकाळात शिरला.

                  आकाशचे वडील सूर्यकांत चव्हाण हे म्युनिसिपालटी मध्ये कारकूनची नोकरी करत होते आणि आई कांचन गृहिणी होत्या; पण घराला हातभार लावण्यासाठी लोणची, पापड, मसाले, दिवाळीचे पदार्थ बनवून त्यांची विक्री करत असत. त्या उभयंतांनी मुद्दामहून आकाशच्या पाठी दुसरे मूल होऊ दिले नव्हते. एकुलत्या एक मुलाला चांगले शिक्षण त्यांनी दिले. त्यांनी आकाशला कधीही कशाचीही कमी पडू दिली नाही. आकाशने इंजिनिअरिंगची पदवी घेतली तेव्हा त्याच्या आईवडिलांना आपल्या कष्टांचे चीज झाले असे वाटले होते. 

                  आकाशचा नोकरीधंद्यात जम बसल्यावर साहजिकच त्याच्या आईवडिलांना त्याच्या लग्नाचे वेध लागले होते. आकाश त्याच्या कॉलेजमधली मैत्रीण अक्षितावर प्रेम करत होता. अक्षिता देखील त्याच्यावर प्रेम करत होती; पण आकाशने तिला सांगितले होते की, “जेव्हा मी व्यवस्थित सेटल होईन तेव्हाचं तुझ्या घरी मी मागणी घालायला येईन.” 

                   आकाश सेटल झाल्यावर त्याने त्याच्या आईवडिलांना अक्षिताबद्दल सांगितले. आकाशच्या आईवडिलांना मुलाच्या सुखापेक्षा दुसरे काही नको असल्याने त्यांनी ताबडतोब लग्नाची संमती दिली.

                  अक्षिता श्रीमंत घराण्यातली मुलगी होती. एकुलती एक असल्याने हट्टी देखील होती. जेव्हा आकाश तिच्या आईवडिलांना भेटायला गेला तेव्हा त्यांना आकाश पसंत पडला; पण आपली मुलगी मध्यमवर्गीय घरात ऍडजस्ट करेल की नाही याची त्यांना खात्री वाटत नव्हती त्यामुळे ते थोडे नाराज होते. अक्षिता आधीच भयंकर हट्टी असल्याने तिने तिच्या आईवडिलांचा लग्नासाठी होकार मिळवला.

                   आकाश आणि अक्षिताचे खूप थाटामाटात लग्न पार पडले. आकाशच्या आईवडिलांना तर आपल्या सुनेला कुठे ठेऊ आणि कुठे नाही असे झाले होते. ते दोघेही तिला फुलासारखे जपत होते तरीदेखील अक्षिता वन बी.एच.के च्या घरात राहायला खुश नव्हती त्यामुळे ती आता मोठे घर घेण्यासाठी आकाशच्या मागे लागली होती म्हणून साहजिकच आकाशने आपल्या बाबांसमोर एक प्रस्ताव मांडला.

                 “बाबा! आपण हे घर विकुया आणि मोठा फ्लॅट घेऊया. अक्षिताला मोठ्या घरात राहण्याची सवय आहे तर तिचे वडील देखील मदत करणार आहेत घर घेण्यासाठी. मला खरंतर त्यांची मदत नको आहे. मी पप्पांना सांगितले की मी तुम्हाला थोडे थोडे करून तुमचे पैसे परत देईन. ते तर माझ्याकडून पैसे घ्यायला तयार होणार नाहीत कारण ते म्हणतात की, अक्षिता शिवाय आम्हाला दुसरे कोणी नाही. जे काही आहे ते अक्षिताचे आहे; पण मला त्यांच्याकडून घरासाठी संपूर्ण पैसा घ्यावयास पटत नाही त्यामुळे आपण आपले हे घर विकुया आणि त्यांच्याकडून थोडीफार मदत घेऊया.”

                  आकाशचा प्रस्ताव त्याच्या आईवडिलांनी मान्य केला आणि राहते घर विकून त्यांनी आकाशला मोठे घर घेण्यासाठी सगळे पैसे दिले. त्याच्या सासऱ्यांनी त्याला मदत केली. अशारितीने पैसा गोळा करून तब्बल फोर बी.एच.के. चा फ्लॅट आकाशने घेतला. घरामध्ये साऱ्या आधुनिक वस्तू आल्या. आकाशच्या आईवडिलांना अक्षिताने त्यांचे एकही सामान नवीन घरात आणू दिले नाही. मुलाच्या सुखासाठी त्यांनी हे देखील मान्य केले. 

                   नवीन घरात गेल्यापासून अक्षिताच्या वागण्यात भयंकर फरक दिसू लागला. आकाशच्या आईवडिलांशी ती फटकून वागू लागली होती. अक्षिताच्या वडिलांनी घर घेण्यासाठी मदत केली आहे याची जाणीव ती आकाश आणि त्याच्या आईवडिलांना सतत करून देऊ लागली होती. तिला तिच्या घरात आता तिचे सासुसासरे नकोसे वाटू लागले आणि ह्या गोष्टीवरून तिचे आणि आकाशचे वारंवार खटके उडू लागले. एके दिवशी तर तिने इतका आकांडतांडव केला की तिचे बोलणे बेडरूमबाहेर आकाशच्या आईवडिलांना ऐकायला गेले.

                  “आकाश! मी शेवटचं सांगते. मला माझ्या घरात तुझे आईवडील नको आहेत. तू जर त्यांची सोय दुसरीकडे केली नाहीस तर मी माझ्या माहेरी कायमची निघून जाईन.” दोघांमध्ये वाद होत असताना अक्षिताचे वाक्य ऐकून आकाशच्या आईच्या छातीत जोरदार कळ आली आणि ती उभ्या उभ्या खाली कोसळली. 

                  आईचे दिवसकार्य पार पडेपर्यंत सुद्धा आकाशचे बाबा आकाशच्या घरी थांबले नाहीत. ताबडतोब ते एका वृद्धाश्रमात चालू पडले. बाबा घरातून निघताना आकाश खूप रडला; पण अक्षिताने त्यांना अडवण्याचा प्रयत्न तर केला नाहीच आणि त्याहूनही ते घराबाहेर पडताना ती बेडरूमबाहेर देखील आली नाही. 

                    आकाशला आपल्या आईबाबांचे दुःख झाले होते तरीदेखील लग्न केले आहे म्हणून अक्षितासोबत त्याचा संसार सुरू झाला. दरम्यान दोघांना मुलगा झाला. मुलगा झाल्यावर त्याच्या बारशाच्या दिवशी आकाशने बाबांना घरी येण्याची विनंती केली पण बाबा आता कुठल्याही आमिषाला भुलून परत आकाशकडे येणार नव्हते. आकाश मधे मधे आपल्या बाबांना भेटण्यासाठी जात असे. बाबांनी स्वतःचे मन इतके कठोर केले होते की, आकाश आपल्या लेकाला सोबत घेऊन बाबांना भेटायला गेला तरी त्यांनी स्वतःला नातवाच्या मोहपाशात गुरफटून घेतले नाही. एक अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटायला आली आहे असे ते वर्तन करत असत.

                   “दादा! आश्रम आलं.” मनोजच्या बोलण्याने आकाश भूतकाळातून बाहेर आला.

                  आश्रमात गेल्यावर बाबांच्या अचेतन शरीरावर डोके ठेऊन आकाश खूप रडला. भावनांचा वेग ओसरल्यावर वृद्धाश्रमाच्या संयोजकांनी आकाशच्या हातात त्याच्या बाबांनी लिहिलेले पत्र दिले. आकाश पत्र वाचू लागला.

                    प्रिय आकाश,

               पत्र लिहिण्यास कारण की, भूतकाळातल्या कुठल्याही गोष्टी मी ह्या पत्रात उगाळणार नाही की तुला कुठलेही शिव्याशाप देणार नाही. मी आश्रमातील संयोजकांच्या हातात माझे पत्र देणार आहे ते मी गेल्यावर तुझ्या हातात द्यायला त्यांना सांगणार आहे. मी ह्या आश्रमात खूप आनंदाने राहत होतो त्यामुळे खूप आनंदाने मला मरण येईल. 

                 परंतु माझी तुला एक विनंती आहे. विनंतीपेक्षा माझी अंतिम इच्छा आहे असे म्हटले तरी चालेल. मी गेल्यावर माझे कुठलेही अंतिम संस्कार तू करायचे नाही. जिवंतपणी आईवडिलांना सुख देणे महत्त्वाचे असते. मेल्यावर कोणाचा आत्मा बघायला येतो की, आपल्या मुलाने आपले दिवसकार्य केले की नाही. उगाच लोकलज्जेस्तव आणि रितिरिवाजाप्रमाणे किंवा समाजाला घाबरून दाखवण्यासाठी माझ्या दिवसकार्यावर पैसे उधळायचे नाहीत. तू किंवा अन्य कोणीही माझे दिवसकार्य करू नये. मला माझ्या मरणोत्तर नेत्रदान करायचे असल्याने त्यासाठी मी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून ठेवल्या आहेत. माझा मुलगा म्हणून तू माझ्या चितेला अग्नीही द्यायचा नाहीस. माझ्या चितेला अग्नी आमच्या आश्रमातील मी मानलेला मुलगा सदू देईल. सदू अनाथाश्रमात वाढलेला, आईवडिलांच्या प्रेमाचा भुकेलेला मुलगा माझी एखाद्या पोटच्या मुलापेक्षा जास्त काळजी घेतो. माझ्या एफ.डी. मध्ये काही पैसे आहेत ते मी सदूच्या नावे केले आहेत आणि काही रक्कम मी आमच्या आश्रमास देणगी स्वरूपात दिली आहे. 

                   स्वतःची काळजी घे. अक्षिता सोबत सुखाचा संसार कर. देवाकडे एकच मागणं आहे की, लोळतगोळत न पडता पटकन त्याने मला धडधाकट उचलून न्यावे. मी जाण्याआधी तुझी आणि माझी भेट व्हावी असे मला मनापासून वाटत नाही. तुला पाहून मला माझा जीव अडकवून घ्यायचा नाही. आता कुठला मोह नको की कुठलेही पाश नकोत. 

                                            कळावे

      आयुष्यातील प्रसंगामुळे खंबीर झालेला एक बाप

                                          सूर्यकांत चव्हाण

                 बाबांचे पत्र वाचून आकाशने आक्रोश केला. सदूने बाबांच्या चितेला अग्नी दिला. आकाश त्या धगधगणाऱ्या चितेकडे हताश होऊन पाहत राहिला.

( समाप्त )

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

6 thoughts on “कथेचे नाव – अंतिम इच्छा”

  1. सुंदर कथा तितकीच खंबीर भावार्थ देणारी कथा.

  2. संतोष उदमले

    खुप सुंदर आणि प्रबोधनपर लिहिलंय ताई

  3. खूप छान हृदयस्पर्शी वास्तव कथा. कथेची बांधणी उत्तम.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top