चेहऱ्या मागचे चेहरे…!
सोन्या मारुती रोडवरील ‘निरागस’ अनाथालयामध्ये आज सकाळपासून लगबग चालली होती. आज संस्थेमध्ये बक्षीस वितरण आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमात शहरातील बडी असामी श्री. गिरीश इनामदार हे येणार होते .अत्यंत दानशूर, यशस्वी व्यापारी व्यक्ती म्हणून त्यांचा शहरात परिचय होता .संस्थेचे अध्यक्ष श्री.काकासाहेब थोरात ही अतिशय सुप्रसिद्ध समाजसेवक आणि संस्थाचालक होते .त्यांनी आपल्या संवेदनशील मनाने आणि कार्यक्षमतेने संस्थेचे डोलारा सांभाळला होता. अनेक मोठे राजकारणी आणि व्यापारी यांच्या वर्तुळामध्ये त्यांची ऊठबस होती..त्यामुळे त्या सर्वांच्या सहयोगाने त्यांनी संस्थेचा विकास करून नावारूपास आणली होती .खरोखर त्यांच्या कार्याने संस्थेमधून अनेक सक्षम ,स्वतंत्र आणि जबाबदार मुलांची पिढी बाहेर पडली होती. आणि हे सर्व प्रत्यक्ष शहराच्या डोळ्यासमोर घडले होते .त्यामुळे त्यांना अतिशय समाजात अतिशय मान होता.
अध्यक्ष ,,कर्मचारी ,मुले यांची यांनाही लगबग आणि उत्सुकता होतीच. संपूर्ण संस्था सजावटीने सुंदर दिसत होती. तसेच स्वच्छता आणि शिस्त आधीपासून संस्थेत होतीच .पण आज जरा सगळ्या गोष्टी अगदी कसोशीने पाळल्या जात होत्या. कारण आता संस्थेचा कारभार काका साहेबांचा मुलगा नितीन दादा पहात होते..त्यांची व काकासाहेबांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे निराळी होती..त्यांच्या कार्यशैलीचा वेग ही भन्नाट होता..केवळ मुलांचा आहार ,आश्रय आणि प्राथमिक शिक्षण एवढाच निराधार मुलांचा पाया असावा हा उद्देशच मुळात त्यांना मान्य नव्हता. पिढी बदलत आहे, विचार, जीवनशैली वेगाने आपली कुस बदलत आहे. त्याला सामोरे जाणारी मुले आपल्या संस्थेतून बाहेर पडावीत असा नितीन दादांचा मानस असायचा. त्यासाठी ते कर्मचारी,संस्थेचे अधिकारी ,कार्यकारी मंडळ, मुले यांना सतत प्रेरित करायचे. त्यांना नवी दिशा देण्याचा ते प्रयत्न करायचे. दरवेळेस नवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न करायचे. जर दोन पिढी मध्ये असतो तसा काका साहेब आणि नितीन यांच्यात ही दरी होतीच ..पण नितीनच्या प्रयत्नांना येणारे यश पाहून काकासाहेब शांत बसत असत ..कर्मचारी वर्ग ही नितीन दादांना चांगले सहकार्य करत होता..एकूण काय..तर संस्थेवर आता नितीन नितीन दादांनी चांगलीच पकड घेतली होती आणि हळूहळू काकासाहेब बाजूला पडत होते..
“मी काय म्हणत आहे नितीन…तू आज गिरीश इनामदारांना आमंत्रित केलेस ..बडी असामी आहे..त्यांच्या मानमराताबाप्रमाणे केलेस ना सगळं नियोजन..? “
“होय बाबा .तुम्ही काही काळजी करू नका. संस्थेच्या कामाचा आढावाही ते घेणार आहेत. संस्थेची प्रगती कौतुकास्पद असेल तर ते कौतुक करतीलच पण त्यांनी योग्य असे सहकार्य करण्याचाही शब्द दिलेला आहे “
“चांगले आहे मुला…त्याच निरागस मुलांचा आशीर्वाद म्हणायचा ..कुणाचं नशीब कुठे घेऊन येत हे काही कळत नाही बघ ..! कुण्या आई बापाच्या पोटची लेकर केवळ दोन घासाचे लागेबंधे जोडत आपल्या आश्रयाला येतात..इथेच मोठी होतात आणि जगामध्ये झेपवायला सज्ज होतात. .परमेश्वराची इच्छाच आपल्याकडून हे सारे करून घेत आहे। “
“पण खरं सांगू बाबा ..तुम्ही आयुष्यभर त्यांच्या पोटाचाच विचार करत बसलात…त्यांचा भविष्यही इथे घडू शकतो त्या दृष्टीने विचार करायला हवा..”
“म्हणजे ..माझ्या लक्षात नाही आलं नितीन”
“बाबा म्हणजे असं बघा की चौदा वर्षापर्यंत आपल्या निरागस मध्ये मुलं राहतात ..नंतर त्यांना आपण बाहेर म्हणजे वेगळ्या कुमारवयीन संस्थांमध्ये किंवा रिमांडहोम मध्येच पाठवतो..मला वाटतं की ती मुलं सज्ञान होईपर्यंत म्हणजे किमान अठरा वर्षापर्यंत येथेच राहावे ..म्हणजे त्यांच्या किमान बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय व्हावी आणि व्यावसायिक शिक्षण हे इथेच घेऊ द्यावं म्हणजे आयुष्यच ठरवण्यासाठी त्यांना मदत होईल आणि व्यावसायिक शिक्षणामुळे त्यांची रोजगाराची ही चिंताही मिटेल.! “
“अरे नितीन..यात किती आर्थिक ,शासकीय अडचणी आहेत माहित आहे ना तुला .? आणि हा विस्तार आपल्याला पेलणार आहे का.? “
“होय बाबा…म्हणूनच मी गिरीश इनामदार यांना आमंत्रित केले ..त्यांच्याकडून आर्थिक मदत झाली तर किमान चार वर्षात हा विस्तार शक्य होऊ शकतो..!! “
“होय .तुझी कल्पना चांगली आहे पण कोणताही स्वार्थ मनात आणू नकोस ..त्या आश्राप जीवांवर आपली नव्हे तर दैवाची कृपा आहे असे समजून हे कार्य कर..! “
” होय बाबा ..!” म्हणून नितीन शांत बसला ..पण त्याच्या नजरेतील महत्वकांक्षा काका साहेबांच्या नजरेतून सुटली नाही ..पण आजपर्यंत आपण भल्या मनाने काम केले त्याची वाट नितीन चालतोय हा विश्वास त्यांना कुठेतरी धीर देत होता.!
अखेर ती घटिका आलीच..संध्याकाळी ठीक चार वाजता गिरीश इनामदारांची गाडी संस्थेच्या प्रांगणात आली ..काकासाहेब, नितीन दादा ,कर्मचारी मंडळी आणि अनेक मान्यवर मंडळींनी त्यांचे स्वागत केले. परिचय ..सत्कार पार पाडला .वर्षभरात संस्थेतील मुलांनी विविध स्पर्धेमध्ये, आव्हानांमध्ये ,गुणवत्तेमध्ये यश मिळवले होते…त्यांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. नितीनने आपल्या मनोगतांमध्ये संस्थेच्या कार्याच्या वाटचालीचा आढावा घेतला ..त्याच्यातील आत्मविश्वास आणि भविष्यातील वस्तुनिष्ठ योजना आतापर्यंत सर्व श्रोत्यांनी अनुभवल्या होत्या. संस्थेची इमारत दाखवताना इनामदारांना इत्थंभूत माहिती दिली होती . ते ऐकून इनामदार यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटत होते …नितीनचे बोलणे झाल्यावर संयोजकांकांनी इनामदार साहेबांना बोलण्याची विनंती केली ..उंच ,मध्यम अंगकाठीचे, इनामदार खरोखर अनुभवी व्यक्तिमत्व होते ।बारीक सोन्याच्या फ्रेंमचा चष्मा, मागे वळलेले ,काळसर, रंगवलेले केस ,शुभ्र पेहराव आणि दमदार धीर गंभीर आवाजांचे इनामदार उठून बोलू लागले..
“श्रोते हो… खरं तर मला इथे आमंत्रण मिळाले हा मी माझाच गौरव समजतो. गेल्या 40 वर्षापासून काका साहेबांच्या निरपेक्ष मनाने केलेल्या कार्याची ही
यथायोग्य पोचपावतीच आहे …मी खरे तर नितीनला मनापासून शुभेच्छा देतो ..कारण त्याच्या भविष्यातील योजना आणि मनसुबे खरोखर काळावर स्वार होणाऱ्या आहेत …त्याच्या या कार्याला माझा मनापासून आणि खंबीर पाठिंबा आहे …या संस्थेसाठी कोणत्याही कार्याची मदत लागली तर पूर्ण क्षमतेने मी तयार आहे,,असा मी सर्वांनी तुमच्या सर्वांच्या साक्षीने शब्द देतो आणि थांबतो..! “
टाळ्यांच्या कडकडाटातच इनामदार साहेब बसले..त्यांच्यामध्ये आणि नितीन मध्ये एक स्मित हास्याचा कटाक्ष जुळला…कार्यक्रम समाप्ती ची घोषणा झाल्यानंतर इनामदार साहेब आणि नितीन दादा दोघेही कार्यालयात आले ..व्यत्यय आणू नका..असे शिपायाला स्पष्टपणे बजावले.
सर्व कार्यक्रमाची समाप्ती झाल्यानंतर काकासाहेब सर्वत्र नजर फिरवून ,कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन कार्यालयाजवळ आले ..ते कार्यालयाच्या दरवाजा जवळ आले तर शिपायाने त्यांना नितीन दादांचा निरोप सांगितला..काकासाहेब आश्चर्यचकित झाले ..कारण नितीन कधीही बंद दाराआड कारभार करत नसे.. जरासा शिणवटा वाटला म्हणून त्यांनी शिपायास चहा आणायला सांगितला आणि तेथेच खुर्चीवर बसले. .कार्यालयामधील चर्चा त्यांना आता स्पष्ट ऐकू येत होती..त्याचप्रमाणे त्यांचे चेहऱ्यावरील भाव बदलत होते ..ते भाव काहीसे कष्टदायक , भीतीदायक, दुःखदायक होते ..शिपाई चहा घेऊन आला तेव्हा काकासाहेब खुर्चीवरून खाली पडले होते..शिपायांनी नितीन दादांना हाक मारली..इनामदार साहेब आणि नितिनदादा दोघेही पटकन बाहेर आले..त्यांनी काका साहेबांना शुद्धीवर आणले आणि दवाखान्यात नेले …ते आठ दिवस काकासाहेब दवाखान्यातच राहिले.!
पंधरा दिवसानंतर पुन्हा सुरळीत सुरू झाले..आणि अचानक एक दिवस संस्थेच्या कार्यालयातून काकासाहेब आणि नितीन चा खूप जोरात बोलण्याचा आवाज येऊ लागला ..सारे कर्मचारी, लहान मुले कार्यालया बाहेर गोळा झाली ..इतक्यात अनाहूतपणे तेथे गिरीश इनामदार साहेब आले..नेमकं काय चालले हे कुणालाच काही कळेना ..शेवटी धाडस करून एका ज्येष्ठ कर्मचाऱ्यांने दरवाजा उघडला ..पण ते आश्चर्याने बाहेरच थांबले आणि त्यांना नितीन दादांचा आवाज आला..
“पण बाबा….तुमच्या स्वतःच्या मुलावरच हा अन्याय का करता.. “
नितीन अरे प्रत्यक्ष दैवी कार्य म्हणून मी ही संस्था उभी केली..कुठल्यातरी अश्राप मुलांची आयुष्य उभी राहावीत म्हणून.!! आणि तू इनामदार साहेबांच्या मदतीने हे कार्यच संपवायला निघालास. . ! संस्थेच्या जागी व्यावसायिक मॉल..?? कल्पना तरी या करवते का तुला..? “
“पण बाबा संस्थेसाठी ते एक मजला देत होते ना..मग तुमची संस्था धोक्यात कशी येत होती..? “
” नितीन, भविष्य घडवायला केवळ घर, इमारत आवश्यक नसते…त्यासाठी त्याच जिवंत भावना, आयुष्य ओतावं लागत ..समोर ठेवावं लागतं …तेव्हा कुठे ती आयुष्यं घडली जातात आणि हेच तू विसरलास..??”
नंतर इनामदार साहेब मध्ये पडले, “काकासाहेब, आता नितीन नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे..त्याला त्याच्या वेगाने त्याच्या कल्पनेप्रमाणे जाऊ द्यावे.. “
” इनामदार साहेब ,तंत्रज्ञानाचा वेग कितीही वाढला तरी मानवाची नाळ हे प्राणांशीच गुंतलेली असते..हेच तुम्हाला कळले नाही …पण हा स्वार्थ मी कधीही साधू देणार नाही …मी आत्ताच नितीनला माझ्या संपत्ती मधून बेदखल करीत आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, मी ट्रस्टी बनवून ही संस्था समाजालाच अर्पित करीत आहे…आता मला पुन्हा पुत्र मोहाची सावली सुद्धा नको..!! “”
इनामदार साहेब आणि नितीन दोघेही मटकन खाली बसले …त्यांच्या या अवस्थेची कीव करून काकासाहेब उद्विग्न मनाने बाहेर आले..संस्थेचे कर्मचारी आणि लहान मुले पाहून त्यांना गहिवरून आले..कर्मचाऱ्यांनी पाणावल्या डोळ्यांनी हात जोडले आणि मुले काका साहेबांना येऊन बिलगली…त्यांना काकासाहेबांनी मायेने कुरवाळले आणि काकासाहेब संथपणे बाहेर पडू लागले…एका व्रतस्थ … संन्यस्त.. योगी म्हणून..!!!
लेखिका – गौरी संतोष जंगम,मिरज
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
नावा रुपास आलेल्या संस्था .नव्या पिढीच्या प्रतिनिधींनी अश्या प्रकारे संस्था मोडकळीस आणल्या .छान कथा
Thank you sir..
सुंदर लेख
धावत्या युगात अजूनही माणुसकी जिवंत आहे
Thanks mam
खूप छान ..मांडणी सुरेख
Thank you mam
अप्रतिम कथा 👌👌
Thank you mam
chhan katha