लेखिका -संध्या गावंडे , नागपूर
“आई तुम्हाला हे शोभातं का हो, हे असले थेरं करणं ! तेही ह्या वयात. पन्नाशी गाठलेल् वय तुमचं , मी जावई ,ही तुमची मुलगी, एक नात आहे आपल्याला, ह्यांचाही विचार करावासा नाही वाटला तुम्हाला! जग थुंकेल आमच्यावर हे ही भान नाही राहिलं, लाज वाटते आहे. लोकांचं बोलणं ऐकल की अस वाटतं आपण बहिरे असतो तर बर झालं असत!”अस बोलून विजयराव पाय आपटत ताडताड बाहेर पडले. हॉलमधे केवळ सुमन व प्रमिलाताई दोघीच होत्या.
सुमन,प्रमिलाताईंची मुलगी ,त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, “ आई कस सांगू तुला आता समजावून!हे किती चिडलेत,माझ्या सासरच्या नातेवाईकांना माहित झालं तर काय म्हणतील? माझा तरी विचार करायचास न!…मी कशी लोकांना तोंड देऊ अन् काय उत्तर देऊ?…अग, मी तुझ्यासोबत बोलतेय तुझ लक्ष कुठे आहे..अशक्य आहेस अगदी! अस म्हणून सुमन आत मधील खोलीत निघून गेली.
प्रमीलाताई निर्विकारपणे एकटक समोर असलेल्या राधाकृष्णाच्या मूर्तीकडे बघत होत्या. जणू त्या कृष्णाला जाब विचारत होत्या…मैत्री,प्रेम, ओढ,ह्या गोष्टींचीही गफलत होऊ शकते!.. वयाच्या बंधनात न अडकणारी जाणीव म्हणजे ‘मैत्री’, ‘प्रेम! ‘
सुमनचे बाबा असतांना त्यांची असलेली दहशत, सासूबाईंचा धाक,सतत दडपणात वावरण . कधी बसणारा मार,शरीराचे लचके तुटेपर्यंत होणारा छळ ,मायेचा हात देणार कुणी नाही.त्यानंतर वयाच्या ऐन पस्तीशीत आलेलं वैधव्य…त्यावरून बसणारे टोमणे..घराची जवाबदारी, सुमनच शिक्षण व तिच्या सासरच्या लोकांना साजेस लग्न ह्या सगळ्या जवाबदाऱ्या पार पडल्यावर आलेलं… एकटेपण! चार खोल्यांच्या घरात मी एकटी. कोलाहलात असतांना त्या निरव शांततेचा जो हव्यास असतो न…तोच ह्या भकास शांततेत व एकटेपणात रंगीबिरंगी आवाजांची पोकळी निर्माण करतो. त्या एकांताला विचारावी सहवासाची किंमत! आणि अशातच त्यांच येणं!
सकाळची वेळ, घराच्यासमोरील आवार झाडत होती.अचानक फाटकसमोर कुणीतरी उभं असल्याची चाहूल लागली. वर बघितलं तर साधारणतः ५०-५२ वयातील माणूस, धडधाकट, बराच सुस्थितीत. माझ्यासोबत बोलण्याच्या प्रयत्नात…..
मग मीच विचारलं,” काही हवं आहे का तुम्हाला?” तसे ते म्हणाले,” मी उत्तम, इथे नव्याने राहायला आलोय. तुमचं एक घर सोडून जे घर आहे ते मी विकत घेतलंय. काल रात्रीच शिफ्ट झालोय..पण फारस कुणी ओळखीचं नसल्याने कुणाला विचारावं तर तुम्ही दिसलात.”
“काय विचारायचं होत?” मी प्रश्न केला.
“ इथे दूधवाला आहे का कुणी जो घरपोच दूध आणून देईल? ” त्यांचा प्रतिप्रश्न.
थोडा विचार करून मी माझ्याच दूधवाल्याला सांगून ठेवेल अस सांगितलं…तरीही त्यांच तिथेच घुटमळन माझ्या लक्षात आलं. कसं विचारावं ह्या संभ्रमात असलेला त्यांचा केविलवाणा चेहरा! मग मीच विचारलं,” अजून काही हवं आहे का?”
तर आढेवेढे घेत म्हणाले,” कस सांगू ,अहो मला सकाळी सकाळी चहा लागतो. पण इथे चहाची कुठे सोय दिसत नाही आहे!”
मी विचारलं ,” ताई नाही आहेत का?
तर म्हणालेत, “ गेली सोडून ,कंटाळली मला अन् म्हणाली पुढल्या जन्मी तुमच्याहीपेक्षा स्मार्ट पार्टनर शोधेल म्हणून!”
मला काही कळलं नाही.माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून मिश्कीलपणे उत्तरले,” बघता काय अशा ! देवाघरी गेली आहे ती. आणि मुलगा व सून त्याच्या फिरस्तीच्या नोकरीवर. मी आपला एकटा..मीच माझा सोबती!”अस म्हणून खळखळून हसायला लागले.
एकटेपणातही आनंदी दिसणारी व्यक्ती मी प्रथमच बघत होते. ना कुठली तक्रार न कुठला हव्यास!
मी त्यांना चहासाठी आतमध्ये बोलावलं. चहाचं आंधन मांडण्यापूर्वी माझा लाडका सोबती रेडिओ लावला तर गाणं सुरू होतं…
” सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा अंगणी तुझ्या स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…”
“ वाह, काय जादू आहे न शब्दात!” सुरेश भट म्हणजे विचारायलाच नको….आणि चहा पितापिता त्यांच येवढं भरभरून बोलण सुरू होत…कित्येक गाण्यांच्या ओळी अगदी सुरात आळवण सुरू होत..एवढा उत्साही, आनंदी, बोलका पुरुष मी प्रथमच बघत होते..बघत होते काय! प्रथमच येवढ्या वर्षात एका पुरूषासोबत मीही मोकळेपणाने बोलायला लागले होते. काय होत हे? कदाचित त्या विधात्यालाही वाटल असावं, धूसर होत चाललेल्या माझ्या आयुष्यात रंग भरुयात म्हणून! माझच मला हसू आलं.
उत्तमराव गेल्यानंतर स्वतःला आरशात न्याहाळलं.चेहऱ्यावर टवटवी आली होती ,मनात प्रसन्नतेचा केवळ एक अभास होता, की कुण्या जादूगाराने केलेली जादू!
दिवसागणिक आमच्यातील नातं एक एक रूप घेत मैत्रीपर्यंत येऊन पोहोचलं…रोज बोलायचो, जुनी गाणी आमच्यातील एकच आवड,रेडिओ ऐकण, फुलंझाड लावण, कधी एकत्र चहाही व्हायचा…. अहो, काहो वरून अग काग वर वाटचाल करायला लागणारे उत्तमराव आता मला नावाने हाक मारू लागलेत. मला जिवंत झाल्यासारखं वाटतं होत. माझ्या आयुष्याने मळभलेली कात टाकलेली होती. किंबहुना आता मोकळा श्वास घ्यायला लागली होती. मैत्रीची परिभाषा समजायला लागले होते..मात्र कसं असत न..एकटेपणाची भूमिका वठवतांना जशी चहूबाजूने सांत्वनेच,आपुलकीच पाठबळ असतं तसच, अचानक भेटलेल्या सहवासाला शंकांच्या नजरेच गालबोट लाभतं..त्यातन आमची मैत्री थोडीच सुटणार होती..
एकमेकांसोबत बोलत असताना मागून कुणी शीळ वाजवी, तर कुणी… ये लैला मजनू !अशी आरोळी ठोकून पळ काढी. बायकांची कुजबुज सुरू असायची. शेजारी टोमणेही मारत .लोकांच्या नजरेत कधी तुच्छ तर कधी मिश्किल भाव असायचे..पण आम्हाला काही पडल नव्हत कारण आता मनाचा आनंद महत्वाचा वाटायला लागला होता,जगण्याला अर्थही आला होता. शिवाय आम्हाला आमच्या मैत्रीच्या मर्यादेबरोबर, कर्तव्याची जाणही होती…दृष्टी खराब झाली असेल तर ती ठीक करता येईल पण ‘दृष्टिकोनाच’ काय?
त्यात कुणीतरी विजयरावांजवळ कागाळी केलीच. म्हणून आज एवढे बोल ऐकावे लागलेत, सगळ जग बोलल तरीही चालत पण पोटचा गोळा जर शंका घेऊ लागला तर!
सायंकाळ झाली, विजयराव आलेत, मी देवाजवळ दिवा लावत होती. सुमन आतमध्ये तिच्या मुलीला भरवत होती.तेवढ्यात उत्तमराव आलेत. त्यांना बघताच विजयरावांनी एक जळजळीत कटाक्ष त्यांच्याकडे टाकला. तसे उत्तमराव पुढे झाले आणि “ काय म्हणता जावईबापू ! आज प्रथमच भेटतोय आपण “ अस म्हणून त्यांच्या शेजारी जाऊन बसले. तसे विजयराव त्यांच्यावर चिडलेत ,” का आलात इथे? आईनी आणि तुम्ही मिळून केलेली शोभा पुरेशी नाही झाली वाटत!”
“ जावईबापू काय बोलताय तुम्ही हे! आलं माझ्या लक्षात.लोकांच्या बोलण्यात आलात वाटत.तुमचा काही दोष नाही म्हणा!” असं म्हणत उत्तमरावांनी एक सुस्कारा सोडला व पुढे म्हणालेत,” त्या राधाकृष्णाची मूर्ती बघून काय वाटत तुम्हाला! राधा ना त्याची बायको ना कुणी,आहे केवळ एक ‘सखी’! तरीही आपण त्यांना पुजतो , त्यांच्या मंदिराला आपणच नाव दिलाय न ‘प्रेंमंदिर’ म्हणून.. मग? तेव्हा त्या कृष्णाला का विचारले नाहीत प्रश्न? राधा तर विवाहित होती शिवाय कृष्णापेक्षा वयान मोठी ! तोही विवाहित मग का खर प्रेम असल की ह्या दोघांचे दाखले दिले जातात? अहो जावईबापू, मैत्रीला , प्रेमाला, भावनेला… वयाच, कुणाच्या परवानगीच बंधन नसत! ती निस्सीम, निःस्वार्थ,निरागस व सहज भावना असते, काय समजलात?” तसे विजयराव वरमलेत व निरुत्तर झालेत.
उत्तमराव सुमनच्या पुढ्यात आलेत व म्हणालेत,” बाळा तू तरी कशी भुल्लीस ग लोकांच्या बोलण्याला! अग तू तरी कधी प्रमिलेची मैत्रीण बनून तिचा विचार केलास का? आपली आई कुठल्या परिस्थितीत होती किंवा आहे?अग घरट्यातली पाखरं उडून गेल्यावर पक्षीसुध्दा घरट मोडून उडून जातात.मात्र घरातील माणसं निघून गेल्यावरही एकटेपणाच्या वेदना सोसत आपल घर टिकवून ठेवते ती असते केवळ ‘आई!’… ह्या आशेने की एक दिवस माझी माणसं इथेच विसावा घेतील! ती विचार करते ग सगळ्यांचा! मात्र तिला कोण समजून घेईल? काय सुमन, तू घेशील का समजून?”
सुमनच्या डोळ्यातनं आसव गळायला लागली तशी ती मला बिलगली म्हणाली, “ आई मला माफ कर एक मुलगी म्हणून कमी पडले मी.”
विजयराव पुढ्यात आलेत व म्हणाले “ चुकलो काका आम्ही, तुमच्यातील नातं समजून घेण्यात. माफ करा आम्हाला.”
“ जावईबापू , प्रमिलेचं साधं बोट जरी धरलं तर, आमची ही स्वप्नात येऊन काय करेल सांगता नाही येत..अजूनही धाक असतो मला तिचा ” . उत्तमराव अस म्हणताच सर्वचजण हसायला लागलेत.
“ बर प्रमिले उदयाला लेकाकडे जायला निघत आहे. सकाळची ट्रेन आहे तेव्हा ७ ला निघेल. परत कधी येईल हे निश्चित नाही .हेच सांगायला आलो होतो. ” उत्तमराव
“ बर, मी डबा तयार ठेवेल, बाहेरच काहीही खाऊ नका” मी म्हणाले.
विजयराव त्यांना म्हणाले, “ काका उदयाला आमच्यासोबत चला आम्हीही तेव्हाच निघत आहोत. तुम्हाला स्टेशनवर सोडून देऊ”.
“ बरं अस म्हणताय.. तर ठीक आहे “ अस म्हणून उत्तमराव त्यांच्या घरी गेलेत.
रात्र सरतासरता गैरसमजांच मळभ दूर झालं होत…..
सकाळी घरट्यातन पाखरं बाहेर पडली. मागे उरली… पुन्हा मी माझी!….पण नव्याने स्वतःलाच गवसलेली….निखळ, आनंदी…एक आई व एक सखी…. आता कधीच एकटी नसणारी…. पलीकडील घराचं कुलूप उघडण्याची वाट बघणारी… नव्याने गुंफलेल्या नात्याच्या आठवणींसोबत बहरणारी ! रेडिओवर सुरू असलेल्या गाण्याबरोबर गुणगुणणारी…..
“ मी रात टाकली मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली ….
*****
लेखिका – संध्या गावंडे , नागपूर
(कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत, कोणीही परवानगीशिवाय कथेचा वापर करू नये )