लेखिका -सौ.आरती वामन जठार.
अगदी काकुळतीला येऊन गौरी बोलत होती.
” सोहम, फक्त एकदा फेरविचार कर आणि बायको म्हणून माझा हा शेवटचा हट्ट समज प्लीज,यापुढे मी तुझ्याकडे कुठलाही हट्ट करणार नाही”
तिला तिने केलेल्या सर्व चुका मान्य होत्या. किंबहुना आता तिला त्याचा खूप पश्चात्तापही होत होता. दरवेळी मनमानी करुन, हट्टाने सर्व गोष्टी करायच्या ,रागावर ताबा न ठेवता अविचाराने बोलायचे.फक्त स्वतःच विचार करायचा, तिला कोणी समजावले तरी ऐकायचे नाही. अगदी स्वतःच्या आई बाबांचे सुद्धा नाहीं. स्वभावाला औषध नाही म्हणून सोहम तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचा. घर व्यवस्थित सांभाळते, जयचे सारं काही करते ना ?त्यात तो समाधानी रहायचा.पण त्याला तिच्या वागण्याचा खूप त्रास व्हायचा. अगदी तन- मन- धन या सगळ्या पातळ्यांवर त्याने आजपर्यंत खूप सहन केले होते.त्याचा समजूतपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांना गौरीने नेहमीच गृहीत धरायची किंवा हा त्याचा कमकुवतपणा समजायची.अलिकडे मात्र त्याने गौरीच्या रागाचा, बोलण्याचा, कृतीचा, रडण्याचा कशाचाच आपल्यावर परिणाम करुन घ्यायचा नाही असे ठरविलेच होते.
” माझा निर्णय झाला आहे. ठरले आहे त्याप्रमाणेच होईल.उद्या सकाळी आपण निघू.” सोहम म्हणाला.
“अरे एकदा ऐक ना! मी तुझ्या आईशी वागले ते चूकीचेच होते हे मला पटलंय. पण तूसुद्धा तेव्हा तुला जे पटलं तेच केलंस ना? झाले तर मग आता सोडून देवूया. तुला सांगते आज तुझी आई असती ना तरी त्यांनी माझीच बाजू घेतली असती”तिचा समजावण्याचा प्रयत्न चालू होता.
” हो, तिने केलेल्या संस्कारांमुळे आणि शिकवणीमुळे मी नेहमीच तुझ्याशी जुळवून घेतले. तिच्यामुळे घटस्फोट घ्यायचा मी विचारसुद्धा कधी केला नाही. तिची शिस्त, धडाडी आणि कष्ट यामुळेच मी उच्च शिक्षित होवून आज चांगल्या पगाराची नोकरी करतोय.माझे बाबा गेले तेव्हा मी लहान होतो गं. पण त्या माऊलीने माझे जीवन सावरले” बोलताना सोहम खूपच भावनाशील झाला होता.
“आपले लग्न झाल्यापासूनच माझी आई तुला नको होती. आपण तिच्याच घरात राहत होतो आणि तीच तुला नको होती. किती क्षुल्लक कारणांवरून तू वाद घालायचीस, आठव जरा. आपल्या लग्नानंतरचे सारे सणवार किती हौशीने केले होते तिने? पण दरवेळी तुझे काहीतरी खुसपट असायचेच.जयच्यावेळी तुझी किती काळजी घेतली तिने? नंतर जयला छान सांभाळायची. पण एकदा काय ती साधी आजारी पडली तर तिची सेवा करायला तुला जमणार नव्हते.तेव्हा माझी आई म्हणजे माझी जबाबदारी हे तुझे ठामपणे सांगितले;नाही का? खऱ्या अर्थाने तुला मी तिथे ओळखले. मला माझ्या आईचे स्वत्व आणि स्वाभिमान माझ्या जीवापाड जपायचे होते, कारण तिच्यामुळेच मी ही स्वाभिमानाने जगतो आहे; ही मला जाण होती. तितकेच तुझ्याप्रति असलेले माझे कर्तव्य आणि जबाबदारीचीही जाणिव होती. म्हणूनच मी दुसरं घर थाटलं.पण दोन्ही घरं आणि नोकरी सांभाळताना मी जी तारेवरची कसरत केली आहे ना! ती मला आणि देवालाच माहीत.आईला ती कसरत जाणवायची,
ती म्हणायची सुद्धा,”‘नको ओढाताण करु, मला गरज असेल तेव्हा मी बोलावीन तुला, इथे जवळच तर राहतोस.’पण मलाच ते मान्य नव्हते.तुलाही मी माझ्या परीने न्याय दिला आहे. तुझ्या हौशी, गरजा सारं काही भागवलं आहे. जयला आजीच्या प्रेमाची कमी नको,आणि तुझ्या विषयी त्याच्या मनात कटुता निर्माण व्हायला नको म्हणून मी नेहमीच समतोल साधला. आईला जावूनही एवढे दिवस झाले, मी कधीही कोणाला दोष दिला नाही की तक्रारींचा कधी पाढा वाचला नाही. आई सुखासमाधानाने गेली आणि मी एका ऋणातून मुक्त झालो असंच मला वाटलं.” तो झोपायला बेडवर आडवा झाला.
गौरीसुद्धा झोपली.सकाळी गजरामुळे जाग आली. जय शाळेच्या सहलीला गेला होता.सोहम आणि तिची आई तयार झाले होते. चहा नाश्ता करून ते तिघेही निघाले.सोहम गाडी चालवत होता , तिघेही छान गाणी ऐकत होते.गौरीला मात्र तिथे अजिबात जायचे नव्हते. तोच त्यांचे उतरायचे ठिकाण आले.आईने सुस्कारा सोडला, गाडीतून उतरली,गाडीचे दार लावून मोठ्या आवाजात नावाची पाटी वाचली,
“आश्रय वृध्दाश्रम”
गौरी अवाक् झाली,आई एवढं तटस्थपणे कसे स्विकारु शकते? ते तिघेही वृध्दाश्रमाच्या कार्यालयात आले. तेथील जुजबी बोलणी झाल्यावर सगळा वृध्दाश्रम त्यांनी बघितला. एकेका वृध्दाला बघताना, गौरीच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते, त्यांच्यात ती आईला पाहत होती.आणि तिची अस्वस्थता अधिकाधिक वाढत होती. एकदा रागाच्याभरात ती सोहमला म्हणाली होती की त्याच्या आईला वृध्दाश्रमात ठेवायला काय हरकत आहे? आणि आज तिच्याच आईला तिथे ठेवायची वेळ आली होती. आई मात्र तिला स्थितप्रज्ञ भासत होती , जणू आई विचार करत असावी,
*”पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा……”*
नंतर तिथेच जेवणानंतर थोड्यावेळ एका खोलीमध्ये त्या दोघी बसल्या होत्या. सोहम कदाचित आईची रुम बघायला आणि गाडीतले सामान आणायला म्हणून बाहेर होता.
गौरीला भरुन आले आणि ती आईच्या गळ्यात पडली.
“आई मला माफ कर , मनात असूनही मी यावेळी सोहमचे मन वळवू शकले नाही. बाबा गेल्यावर, दादा- वहिनी तुला तिकडे न्यायला तयार नाहीत, तुलाही देश सोडून जायचं नाही, म्हणून मी तुला माझ्याकडे नेलं तर जावयाच्या घरी मी का राहू?हा तुझा अट्टाहास आणि दादाने सोहमला हा वृध्दाश्रमाचा पर्याय सूचवला तूही तो पर्याय अगदी आनंदाने स्विकारला. काय आहे हे? तेव्हाच नाही म्हणायचं होतं ना! ही वेळच आली नसती.”
आईने अलगद गौरीला बाजूला केले आणि म्हणाली,
” तसे करुन मी आजचं मरण उद्यावर ढकलले असते. आयुष्य किती आहे? माहित नाही, उद्या मला आजारपण आले आणि तुला करायला जमले नाही तर मी कोणाची जबाबदारी असेल? त्यापेक्षा इथे व्यावहारिक का होईना माझी काळजी घेतील. मी काही तुम्हा भावंडावर अवलंबून नाही. तुझ्या बह्याच्यामुळे मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे माझी काळजी करू नकोस. सोहमरांवांची काळजी घे त्यांना दुखावू नकोस “
“अगं आई तू सोहमवर रागाव ; मी विनवण्या करूनसुद्धा त्याने माझे ऐकले नाही. म्हणून आपण इथे आलो आणि तरीही तुला त्याचीच काळजी.नवल आहे,” गौरी चिडून बोलत होती.
” गौरी, अगं जिथे माझा मुलगा मला परक्यासारखा वागवतो, मुलगी सासरी तिच्या कर्तव्यात कमी पडली यांची माझ्या मनात सल असताना , जावयाकडून मी काय अपेक्षा ठेवू?” आई अगदी संयमाने बोलत होती.
तेवढ्यात सोहम आत आला,
“चला निघूया”, म्हणू लागला.
” चल आई, निघतो आम्ही. काळजी घे. फोन करत जा” सारख्या सूचना देवून गौरी रडत रडतच गाडीजवळ जावून उभी राहिली. तिच्यामागे सोहम आईंशी बोलत गाडी जवळ आला, गाडीची चावी लावून तो बाहेर आला तोच गौरी गाडीत बसली आणि आपल्या ओंजळीत चेहरा लपवून रडत होती. तिला आईला आता निरोप देणं शक्य नव्हते.तीचा भावनाकल्लोळ उडाला होता.आजूबाजूला काय चालू आहे? ते तिला कळलेच नाही. सोहम ने गाडी सुरू केली.
तशी ती भानावर आली. बघते तर आई मागील सीटवर बसली होती. तिला आश्चर्य वाटले.
“आई,तू कशी?” म्हणून जवळजवळ ओरडलीच, तिच्यासाठी हा सुखद धक्का होता.
“अहो, सोहम राव काय झाले? अहो माझी तिथं रहायला काहीच हरकत नाही , मी स्वखुशीने राहणार आहे. पुन्हा तुम्ही विचार करा. अहो माझं सामान?……”आई बोलतच होती.
गौरीलाही काही समजत नव्हते. सोहम शांतपणे ड्रायव्हिंग करत होता.
गाडी रस्त्याच्या कडेला लावून,दोघींना पाणी देवून शांत केले आणि तो बोलू लागला,
” गौरी, तुझी आई आणि माझी आई वेगळ्या आहेत का? मी एका आईला गमावले आहे.दुसरी आई मला गमवायची नाही. आई, ही सहानुभूती अथवा दया नाही. उपकार तर नाहीच नाही. मी अगदी शपथेवर सांगतो, मी असताना तुम्ही वृध्दाश्रमात रहावे , हेच मनाला पटत नाही.” सोहम अगदी मनापासून बोलत होता.
“हेच मी तुला काल समजावत होते ना,सोहम? का नाही ऐकलंस माझं? गौरी म्हणाली.
“अगं वृध्दाश्रम म्हणजे काय असतं? हे दाखविण्यासाठी तुला आणले. तू पुन्हा रागातही आईंना इथे पाठविण्याचा विचार करायला नकोना म्हणून.त्या भावना काय असतात त्यांची अनुभूती देण्यासाठी तुला इथं आणणं गरजेचं होतं.” सोहम बोलला.
“सोहम, मी खरंच चुकले. जमलं तर मला माफ कर.” गौरी
खरंखुरं बोलत होती.
“काल तू म्हणाली होतीस ना गौरी, माझ्या आईने याप्रकरणात तुझी बाजू घेतली असती, अगदी खरं आहे ते. हे मी जाणतो. आज मी आईंना तिथे ठेवले असते ना! तर माझ्या आईची शिकवण आणि संस्कार कवडीमोल ठरले असते.”
” यापुढे आईंना जप, त्यांचे म्हातारपण सुखद कसे होईल? ते बघं.त्याचा विचार कर.”
“सोहमराव,तुमचा चांगुलपणा पाहून गौरी मुळे तुम्हाला झालेला त्रास आठवतो, तेव्हा वरमल्यासारखे होते. गौरीला तेव्हा आम्ही दोघेही खूप समजवायचो.पण ती समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसायची.जमलं तर मलाही माफ करा” आई हळूच म्हणाली.
“खरं सांगू का आई? रागावू नका पण तुम्ही गौरीच्या रागाला, बोलण्याला घाबरून ती म्हणेल तसं करत गेलात आणि माझ्या आईसाठी मी ॲडजस्ट करत राहीलो.ते आपलं दोघांचही चुकलं. तेव्हाच आपण ऐकले नसते तर कदाचित आजची घटना घडलीच नसती.गौरीला समज देताना तुमचीही फरपट झाली,यांचे मला वाईट वाटते आहे.आईंना वृध्दश्रमात ठेवायला म्हणून आपण आलोच नव्हतो, तर भेट देण्यासाठी आलो होतो.सामान घेतल्याशिवाय तुमची खात्री झाली नसती, म्हणून ते बरोबर घेतले,ते डिकीतच आहे .समजलं मॅडम.”
सोहम बोलला.
“पण सोहमराव.,..मला वाटते की मला खरंच तुमची गरज असेल तेव्हा मी हक्काने येईन ना? आतापासून नको. काय वाटतं.” आई अवघडूनच बोलली.
आईचं बोलणं मध्येच तोडत सोहम म्हणाला,
“आई, तुम्ही मनात कुठलेही अवघडलेपण न ठेवता आमच्याकडे रहायचं. अगदी हक्काने,सकाळी तुम्ही मुलीच्या घरातून निघाला होतात ना?आता तुमच्या मुलाच्या घरी चला. मला,गौरीला आणि जयला तुमच्या प्रेमाची गरज आहे.”
हे ऐकून आई निशब्द झाली, शब्द मुके होतात तिथे अश्रू शब्दांची जागा घेतात. तसे आईचे झाले होते.
लेखिका – सौ.आरती वामन जठार.डोंबिवली.
(कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत, कोणीही परवानगीशिवाय कथेचा वापर करू नये )