रंजल्या गांजल्या जीवांची व्यथा मांडणारी हृदयस्पर्शी कथा
रामवाडीच्या बस स्टॅन्ड पासून १०० मीटर अंतरावर उजव्या अंगाला शहरातल्या चाळीप्रमाणे पत्राच्या दहा खोल्या होत्या. जवळच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. त्या काही खोल्यांमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षक राहत होते. त्या खोल्यांच्या बाजूलाच खोली मालकाचा एक छोटासा बंगला होता. खोल्यांच्या खिडक्यांमधून प्राथमिक शाळा दिसत होती. शाळेच्या उजव्या बाजूला मोठे गार्डन होते. ते गार्डनही त्या खोल्यांच्या खिडक्यांमधून दिसायचे. त्या खोल्यांमध्ये काही शिक्षक आपल्या कुटुंबांसोबत राहत होते. तर काहीजण एकटेच राहत होते. तेही सर्वजण वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या स्वभावांचे ! पहिल्या खोलीमध्ये साळुंखे शिक्षक त्यांच्या पत्नीसह राहत. ते साठी ओलांडलेले शिक्षक जवळजवळ निवृत्त होण्याच्या मार्गावर होते. ते हुशार आणि अनुभवी असल्यामुळे त्या चाळीमध्ये त्यांना विशेष मान दिला जायचा. त्यांच्या शेजारच्या खोलीमध्ये कुलकर्णी काका आणि काकू हे वयोवृद्ध जोडपं राहत होतं. खरंतर ते मूळचे पुण्याचे परंतु पोटी आपत्य नसल्यामुळे ते निवृत्त झाल्यानंतरही येथेच राहायचे. येथे असलेली माणसांची वर्दळ सोडून त्यांना पुण्याला राहणं कधीही आवडलं नाही.
अमावस्येची रात्र ! सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. साळुंखे सरांची पत्नी विमलाताई या घरातली सगळी कामे उरकून शिवणकाम करत होत्या. बाहेर चांगलाच वारा सुटला होता. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्यांचा आवाज घरात येत होता .फांद्यांच्या आवाजाबरोबर पानांचा सळसळणारा आवाजही त्यात मिसळत होता . खिडक्याही कुरकुरत होत्या.बाहेरून येणारा कर – कर आवाज इतर आवाजाला कापत होता.आता विमला ताईंच्या कामात अडथळा येऊ लागला. त्यांनी खिडकी व्यवस्थित बंद केली. आणि पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. आता वारा बराच वेळ शांत झाला होता. परंतु कर – कर येणारा आवाज थांबला नाही. विमलाताईंनी न राहून खिडकी उघडून पाहिली. तर त्यांना धक्का बसला. त्यांनी साळुंखे सरांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु दिवसभराच्या थकव्यामुळे साळुंखे सरांना गाढ झोप लागली असावी त्यामुळे ते उठले नाही. विमलाताईंनी पुन्हा आवाज दिला. “अहो उठा की”, साळुंखे सरांनी नकळत डोळे उघडून विचारले काय झालं ग ? विमलाताई थोड्या भेदरलेल्या पाहून साळुंखे सर पटकन उठून बसले. विमलाताई खिडकीकडे बोट दाखवून म्हणाल्या ; खिडकी उघडून बघा. सरांनी खिडकी उघडली. तर त्यांना काहीही दिसले नाही. कुठे काय आहे ? ते खिडकीतून बाहेर डोकावत म्हणाले. विमलाताईंनी हळूच खिडकीच्या बाहेर पाहिले. तर त्यांनाही कोणी दिसले नाही. काय होतं ? सरांनी विचारलं. विमलाताई म्हणाल्या. मला कर – कर आवाज आला; तेव्हा मी खिडकीच्या बाहेर डोकावले. गार्डन मधल्या झोपाळ्यावर एक छोटा मुलगा झोके घेत होता. आणि एक मुलगी त्याला झोका देत होती. एवढ्या अंधाऱ्या रात्री ती दोन छोटी मुले तिथे कशी काय? अगं !पण आता ती नाहीत तिथे. तुला भास झाला असेल. अस कसं?मी तर स्पष्ट पाहिले होते.नको विचार करू. झोप आता.अंगावरती चादर ओढत सर म्हणाले.दोघेही झोपले. परंतु विमलाताईंच्या नजरेतून ते दृश्य काही केल्या जाईना.
चाळीतल्या आवाजाने विमला ताईंना जाग आली. त्यांनी उठून पाहिले तर दिवस चांगला वर आला होता. आजूबाजूला पाहिले तर सरही कुठे दिसेना. साळुंखे सर त्यांच्या चाळीतल्या सहकाऱ्यांसोबत सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेले होते. विमलाताईंनी घड्याळात पाहिले तर सकाळच्या आठ वाजले होते. दररोज लवकर उठणाऱ्या विमला ताईंना रात्रीच्या जागरणामुळे उठायला उशीर झाला होता. सूर्याच्या पिवळ्या तांबूस किरणांनी आता घरात प्रवेश केला होता. दरवाजा वरती थाप ऐकू आली.” अहो विमलाताई येऊ का घरात ? तीन नंबरच्या खोलीत राहणाऱ्या जोशी काकूंनी आवाज दिला. दरवाजा अर्धा उघडाच असल्यामुळे त्या घरात आल्या. “काय ओ ताई बरं नाही वाटत का ? जोशी काकूंनी काळजीने विचारले. बरं आहे असं म्हणून विमलाताई उठून बसल्या. दररोज सगळ्यांच्या लवकर उठणाऱ्या तुम्ही आज मात्र एवढा उशीर का झाला ? जोशी काकू म्हणाल्या. रात्रीचा घडलेला प्रकार विमलाताईंनी जोशी काकूंना सविस्तर सांगितला. अहो पण एवढ्या रात्रीचं, वाऱ्याचं एवढी छोटी मुले कशासाठी येतील. जोशी काकूंनी आश्चर्यानेच विचारले. मलाही काही समजले नाही असे विमलाताई म्हणाल्या. तेवढ्यात साळुंखे सर घरी आले. त्यांनी दोघींचे बोलणे ऐकले. नका एवढा विचार करू. ते कपाटातून टॉवेल काढत बोलले. जोशी काकूंनी विमलाताईंना आधार दिला .आणि त्या तेथून निघून गेल्या.
सकाळची कामे आटोपून सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले. दिवस कामात भराभर निघून गेला. संध्याकाळ झाली. चाळीतला गलबला पुन्हा वाढू लागला . चाळीतले सर्वजण एकंदरीत अकरा ते बाराच्या सुमारास झोपत . सर्वांच्या घरचे दिवे विझले. विमलाताई अजूनही जाग्याच होत्या. पुन्हा एकदा तोच आवाज येऊ लागला. आता मात्र विमलाताईंना घाम फुटला. आज तर साळुंखे सरही घरी नव्हते. खिडकी न उघडताच विमलाताईंनी शेजारच्या जोशी काकूंना फोन केला. कालचा आवाज पुन्हा येतोय असं त्यांना सांगितले. जोशी काकूंनी जोशी काकांना उठवले. बघता बघता संपूर्ण चाळीमध्ये ही बातमी पसरली. सगळ्यांनी आपापल्या खिडक्या उघडून बाहेर डोकावले. आता बाहेरच्या ओसरीमध्ये सर्वजण जमा झाले. पाहिलं का तुम्ही सर्वांनी ? विमलाताईंनी घाबऱ्या आवाजातच विचारले . मी खिडकी उघडली तेव्हा फक्त झोपाळा हालत होता . असे सात नंबरच्या खोलीत राहणारा नितीश बोलला. बाकीच्यांनीही त्याच्या बोलण्याला मान्यता देऊन होकारार्थी मान हलवली.
” मी तर त्या झोक्यावर एक लहान मुलगा आणि मुलगी पाहिली होती.”विमलाताईंची भीती मात्र अजूनही तशीच होती . जानेवारी महिना चालू होता तरीही विमलाताईंना दरदरून घाम आला होता. मला तर हा भु*ता*टकीचाच प्रकार वाटतो .विमलाताई घाबरूनच बोलल्या. असं म्हटल्यावर चाळीतील लहान मुले आपल्या आई – बाबांना चिटकून उभे राहिले. साळुंखे सर आले की बोलूया आपण या विषयावर. असे कुलकर्णी काका बोलले. प्रत्येक जण आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले.
सकाळची वेळ ! सगळीकडे चाळीमध्ये ती चर्चा चालू होती . काय असेल खरंच हे ? एवढ्या रात्री कशासाठी येत असतील ती मुले तिथे खेळायला ? चाळीतील काहीजण बोलू लागले. एवढ्या रात्री ती दोन मुले सोडली तर त्यांच्यासोबत कोणीही मोठं माणूस नव्हते. मग त्यांना भीती वाटत नसेल का ? कुलकर्णी काकू बोलल्या. “अहो पण मोठा माणूस असतं तर ठीक आहे ; परंतु त्यांच्यासोबत कुणीही नव्हतं . ते छोटे दोनच मुले होती . म्हणूनच मला याच्यामध्ये काहीतरी गडबड वाटत आहे. पण बघू आपण संध्याकाळी आमचे ‘हे ‘ आले की आपण या विषयावरती मीटिंग घेऊया .असं विमलाताई बोलल्या. संध्याकाळी नऊ वाजता आपण सर्वजण एकत्र येऊ.
संध्याकाळी नऊ वाजता सर्वजण एकत्र जमली. भू*त वगैरे काही नसतं. हा सगळा सर्व अंधश्रद्धेचा भाग आहे. आम्ही मुलांना शाळेत हेच तर शिकवत असतो. आणि तूच मला सांगते की भु*ता*टकीचा प्रकार आहे. असे साळुंखे सर विमलाताईंना बोलले. कोणीही घाबरून जायचं काहीही कारण नाही. आपण बघूया आज रात्री काय होतं ते. फक्त मी जे सांगेल तेच तुम्ही सर्वांनी करायचं. कुणीही संध्याकाळी दिवे चालू करायचे नाही. फक्त लक्ष ठेवायचं. रात्रीच्या अकराच्या सुमारास सर्वांनी आपले दिवे विझवले. आणि पंधरा-वीस मिनिटातच कर – कर असा आवाज येऊ लागला . सगळ्या जणांचे लक्ष मात्र खिडकी उघडण्याकडेच होतं . सगळेजण एकाच खोली जमले होते. साळुंखे सर पुढे गेले आणि हळूच त्यांनी खिडकी उघडली. चाळीतील लहान मुले आता घाबरली होती . खिडकीतून साळुंखे सरांनी पाहिलं. एक सात – आठ वर्षाची मुलगी एका छोट्या मुलाला झोपाळ्यावर बसून झोका देत होती. परंतु तिचे सर्व लक्ष हे चाळीवर होते. त्या मुलीची नजर फक्त कोणी आपल्याला पाहत तर नाही ना याकडेच होते . आता साळुंखे सरांनी लाईट लावण्यास सुचवले. जसा खोलीत उजेड पडला तशी ती मुलगी आणि तो छोटा मुलगा तिथून पळून गेले. त्यांच्याकडे पाहून ते तर खूप गरीब घरातली वाटत आहेत. असे साळुंखे सर बोलले. ‘ नाही नाही ती तर भु*ता*टकीच आहे ‘ असे विमलाताई बोलल्या . आता ते निघून गेले आहे पाहू आपण. उद्या सर्वजणांनी घरातच थांबा फक्त दोघे तिघेजण माझ्यासोबत येतील. असे सांगितल्यावर पुन्हा सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले .
हळूहळू ही बातमी शाळेतही पसरली. मुलांमध्ये भीतीचं वातावरण तयार झाले. त्या दिवशी त्याच विषयावर सगळीकडे चर्चा सुरू होती. सगळ्यांच्या डोक्यात तोच विचार चालू होता. बघता बघता सूर्य अस्ताला गेला. सगळ्यांच्या नजरा त्याचं झोपाळ्यावर होत्या . ही बातमी कळल्यापासून कोणीही त्या झोपाळ्याकडे फिरकले नाही. घराघरात हनुमान चालीसा पठण चालू झाले. साळुंखे सरांना हे काही पटत नव्हते. साळुंखे सर अजून दोघांना घेऊन झोपाळ्याच्या जवळ असलेल्या वडाच्या झाडामागे जाऊन बसले. रात्रीचे बारा वाजले होते.सगळीकडे शांतता पसरली होती.तेवढ्यात कर – कर आवाज चालू झाला. चाळीतले लोक खिडक्यांमधून नजर एकवटून पाहू लागले. साळुंखे सर त्यांच्या अजून दोन सहकाऱ्यांसोबत तेथे पोहचले. आणि त्या मुलांना घेरले.कोण आहात तुम्ही ?सरांनी विचारले. ते दोघेही कावरे बावरे झाले. छोटा मुलगा त्या मुलीच्या पाठीमागे लपून बसला. त्या मुलीला नाव विचारले. ती जरा वेळ गप्प राहिली. काही जण त्यांना ओरडले. मग तर ते अजून घाबरले. सरांनी बाकीच्यांना शांत राहण्यास सांगितले .अरे ! त्यांच्या वयाचा तरी विचार करा.मी बोलतो आहे ना…
काय रे बाळांनो ! काय नाव तुमचं ? म्या बायडी…. आण ह्यो माव्हा भाऊ भावड्या….. आता ती जरा धिरानी म्हणाली .बायडी रंगांनी तशी निमगोरी , नाकी डोळी नीटस,अंगावर कुर्ता घातलेला ,तो ही सतरा ठिकाणी फाटलेला,केस वाऱ्यावर उडत होते. भुरके आणि निस्तेज झालेले . ऊन , वारा ,थंडीचा मारा झेललेली काळवंडलेली त्वचा !असा बायडीचा अवतार ! आणि भावड्या देखील जेमतेम तसाच.. पॅट घातलेली परंतु शर्टच नाही. दोघांच्याही पायात चप्पल नव्हती. :तुम्ही एवढ्या रात्रीचं काय करता येथे ? तुम्हाला भीती नाही वाटत का ? रात्रीचं जनावरे ,भुते असतात ” बरोबर आलेल्या नितीशने विचारले. “जनावरं , भुताचं नाय भ्या वाटत… आम्हास्नी माणसांचं भ्या वाटतं….”
असं का? साळुंखे सर बोलले. आता सगळे चाळकरी तेथे आले.सगळे त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते.
” माह्या भावड्यासंनी कारगावातल्या लोकांनी लई मा*रलं .”आजुन बी त्याचं पाठीचं वण गेलं न्हाय. पण का मारलं ? सर बोलले.
“भावड्या झोका खेळला म्हणून “… त्याला लई झोका आवडतय. तो सारखा त्यांचा झोका खेळत व्हता म्हणून…आम्हाला इकडं बी तेच भ्या वाटायचं .बरोबर आही सगळे चाळतली माणसं झोपली का मंग यायचो.आम्हाला भ्या वाटायचं. कोण मारलं म्हणून…
आगं पण तुझे आई – बाबा कुठे आहेत ? ते कसे येऊन देतात तुम्हाला ?आणि तुम्ही कोठे राहता ? विमलाताई बोलल्या.
“आमी माळावरच्या पालावर राहतू….तुम्ही बाजा लोहाराची पोरं का ? व्हय.. . बायडी म्हणाली.
अगं पण तुमचा अवतार बघून घाबरले ना सगळे … कशी केसं केलेत.आई केसांना तेल नाही लावत का ?
आता बायडी रडू लागली. रडत आवाजातच म्हणाली.”आम्हाला ‘आय ‘ न्हाय “. बा म्हणतो तूच भावड्याची आय …आण तूच ताई… म्हणून त्याला जे आवडतं ते म्या करते .
तिचं बोलणं ऐकून आता मात्र सगळ्यांचे डोळे पाणावले. विमला ताईंनी तिला धीर दिला.
तुझे बाबा कुठे आहेत ? जोशी काकू म्हणाल्या. ते दिसभर काम करत्यात . न रातच्याला संनग (लोखंडाच्या वस्तू ) द्यायला जात्यात लोकांचं . सगळे आता त्यांना चाळीत घेऊन गेले. साळुंखे सर म्हणाले ; मला वाटतं या मुलांचे आपल्या प्राथमिक शाळेत नाव घालूया . खर्च मी करतो… त्यांचं जीवन बदलेल . चाळीतल्या सर्व लोकांना पुन्हा एकदा साळुंखे सरांचा अभिमान वाटला.
दुसऱ्या दिवशी बाजाच्या संमतीने बायडी आणि भावड्याला शाळेत भरती केलं. आता कोणतीही भीती मनात न ठेवता बायडी आणि भावड्या इतर मुलांसोबत झोपाळा खेळू लागले…….
धन्यवाद !
तुम्हाला ही कथा कशी वाटली.ते नक्की कळवा.आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ” लेखकमित्र ‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा ‘whatsapp’ ग्रुपही जॉईन करा.
लेखिका – शितल औटी , जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
छानच आहे
Thank you