रावसाहेब पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. बाबू त्यांचा विश्वासू साथीदार अदबीने बाजूला उभा होता.”विजयचा मृत्यू संशयास्पद वाटतो आहे त्याची संपूर्ण चौकशी करून दोषींना शिक्षा होईपर्यंत माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही”रावसाहेब त्यांचा हट्ट सोडत नव्हते. काही वर्षांपूर्वी अगदी अशाच पद्धतीने रावसाहेबांची पत्नी पण गेली होती व तेव्हा पण नैसर्गिक मृत्यू म्हणूनच पोलिसांनी नोंद केली होती. या खेपेला रावसाहेबांना खरे जाणून घ्यायचेच होते.
इन्स्पेक्टर शेटेच्या मते हा नैसर्गिक मृत्यू होता, तसा पोस्टमार्टेम रिपोर्ट त्यांनी रावसाहेबांच्या समोर दाखवला.रावसाहेब ही कोणी छोटी मोठी असामी नव्हती. एक भले मोठे उद्योगपती म्हणून त्यांनी त्यांचा ठसा उमटवला होता. गेल्या दोन पिढ्यांपासून त्यांचा “सिलिकॉन वाळू” खोदाईचा व्यवसाय होता. भारतात व एशियामध्ये त्यांचा चांगलाच दबदबा होता.‘जय’ हा २७ तर ‘विजय’ व ‘विजया’ २५ वर्षाची अशी त्यांना तीन अपत्ये होती. जय पावणेदोन वर्षाचा असताना रावसाहेबांना जुळी अपत्ये झाली ‘विजय’ व ‘विजया’. तीनही मुले लहान असताना रावसाहेबांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले.

तीन अपत्यांचा सांभाळ नीट व्हावा म्हणून रावसाहेबांनी पुनश्च लग्न केले नाही. त्यांच्यापेक्षा वयाने बारा वर्षे लहान असलेल्या त्यांच्या अविवाहित बहिणीने तिन्ही भाच्यांचा खूप प्रेमाने व मायेने सांभाळ केला.चारच महिन्यापूर्वी दोन्ही चिरंजीवाची लग्न करून रावसाहेब आता मुलीला सुयोग्य वर शोधत होते. योगायोगाने जय व विजय यांच्या पत्नी सख्ख्या चुलत बहिणीच होत्या.‘गुरुजी’ जनसेवा पार्टीचे सर्वेसर्वा होते .त्यांची कन्या ‘हेमा’ ही रावसाहेबांचे मोठे चिरंजीव ‘जय’ यांची पत्नी होती . विजयची पत्नी ‘राखी’ ही गुरुजींच्या धाकट्या भावाची मुलगी होती.रावसाहेब गुरुजींच्या पार्टीला भरपूर देणगी देत असत आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांची सर्व कामे बिना रोकटोक होत असत. एक धूर्त राजकारणी व एक पक्का उद्योगपती आता एका नात्यात एकत्र आले होते ,अर्थात हा दोघांचा फायदेशीर व्यवहारच होता.
हेमाला विजय अधिक पसंत होता, पण धूर्त गुरुजींच्या मते दोघेही भावांची कद, अंगकाठी, बोलण्याची लकब सारखीच होती, फक्त विजय धाकटा मुलगा होता. पुढच्या कारकिर्दीच्या दृष्टीने पूर्ण उद्योगधंद्याची सूत्रे रावसाहेबांनी त्यांच्या मोठ्या चिरंजीवांना म्हणजे जयला सुपूर्त केली तर घरातली मोठी सून म्हणून हेमाचे प्रस्थ वाढेल व उद्योगधंद्यांची सर्व सूत्रे अनायसे तिच्या हातात येतील. हेमा पण बापासारखीच मतलबी, चाणाक्ष व धूर्त होती. तिने पण प्रेमापेक्षा या लग्नात व्यवहार बघितला.
रावसाहेबांनी गुरुजींना फोन केला,”इन्स्पेक्टर शेटे बदलून विजयच्या केस वर नवीन इन्स्पेक्टर ताबडतोब रुजू करा, विनंती वजा आज्ञा होती ती.” आता व्याह्यांनी सांगितले म्हणल्यावर गुरुजींचा नाईलाज झाला व नवीन इन्स्पेक्टर २४ तासात रुजू झाला.विजयची केस इन्स्पेक्टर ‘कबीर कुकडे’ बघणार म्हणल्यावर सर्व थरातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या, राखी व कबीर एकत्र होते अशी अटकळ होती .KK हे याचे टोपण नाव होते. बरेचदा लोक त्याला KKK म्हणजे कबीर कुकडे कमीना म्हणत. साधारण चाळिशीकडे झुकलेला हा टॉल,डार्क हँडसम, अनेक जीवांना घायाळ करत होता. बऱ्याच वेळा त्याच्या ठरलेल्या कॉफी शॉप मध्ये नवनवीन तरुणींबरोबर गप्पा मारताना अनेकांनी त्याला पाहिले होते. KK साठी बरेच खबरी काम करायचे.
लग्नाविषयी विचारल्यावर,”दिल की घंटी अभी बजी नाही”म्हणून हा प्रश्न टाळत असे. कुठल्याही सोशल मीडियावर त्याच्याविषयी काहीही माहिती उपलब्ध नव्हती. पाचगणीच्या बोर्डिंग स्कूल मधून शिक्षण घेऊन पुढे पुण्याच्या कॉलेजमधून त्याने डिग्री घेतली होती, मग यूपीएससी करून तो इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाला होता. त्याच्या शाळेतले, कॉलेजमधले व इतर मित्र परिवारांना त्याचे एक काका सोडले तर कोणीही नातेवाईक माहीत नव्हते. KK म्हणजे एक गुढ होते. त्याची कामाची पद्धत खूपच निराळी होती.
रावसाहेबांची जुजबी बोलून कबीरनी सर्व सूत्रे इन्स्पेक्टर शेटेंकडून हातात घेतली. तशी ही केस hi profile असल्यामुळे त्याने त्याच्या खबऱ्यांना कामाला लावले होते. तो आता घरातल्या प्रत्येकाची कसून चौकशी करणार होता. रावसाहेबांना प्रथम त्याने त्यांचा कोणावर संशय आहे का म्हणून विचारणा केली “असे सांगू शकत नाही. माझ्या धंद्यात मित्र कमी व शत्रूच जास्त असतात. मागच्या आठवड्यात मी माझी सर्व सूत्रे विजयच्या हातात दिली होती. माझ्या कंपनीत त्याला मॅनेजिंग डायरेक्टर (MD)बनवले होते. काही निर्णय त्यांने स्वतःचे स्वतः घेतले होते, त्यामुळे कदाचित कॉम्पिटिशन मधल्या कोणी हा घातपात केला असेल तर माहित नाही.
KK म्हणाला,”तुमचा संशय कोणावर आहे ते फक्त सांगा बाकी नको. तुम्ही जेवढी खरी माहिती द्याल तपासाच्या दृष्टीने लवकरात लवकर मला पावले उचलता येतील. आधीच पोस्टमार्टेम रिपोर्ट बरोबर कोणीतरी फेरफार केल्याचा मला दाट संशय येतो आहे. जेवढा वेळ जास्त जाईल तेवढी आपली केस कमजोर होत जाईल व खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणे अशक्य होईल” आता त्याने बाबुला चौकशीसाठी बोलावले.
“काय सांगू साहेब विजयबाबा खूपच चांगले होते. पण दोन दिवस आधी भावा भावांचा लई मोठा राडा झाला होता. रावसाहेबांनी मोठ्या चिरंजीवांना डावलून धाकट्याला सर्व उद्योगधंदा दिला म्हणून घरात खूपच मोठे भांडण झाले. पण एवढा टोकाचा कोणी निर्णय घेईल असे वाटत नाही”ठीक आहे असे म्हणून त्याने बाबुला जायला सांगितले.
तो आता आत्यासाहेबांकडे चौकशीला आला होता. टिपं गाळत आत्यासाहेब म्हणाल्या,”संशय कसला खात्रीच आहे माझी हे कारस्थान त्या गुरुजींनीच केल असेल. कशावरून काय विचारता आमचा वडिलोपार्जित धंदा त्याला हाडपायचा असेल रावसाहेबांनी विजयला MD केलंना,जय झाला असता तर आपसूक सगळी सूत्र त्याच्या हातात आली असती, त्याचा तो जावई ना?” आत्यासाहेबांचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. बर बर ठीक आहे म्हणून कबीरने काढता पाय घेतला. हेमा साळसूद होऊन ,”खूपच वाईट झाले. मला राखीची चिंता वाटते. आत्ता कुठे चार महिने झाले होते आमच्या दोघींच्या लग्नाला आणि काय हा अभद्र प्रसंग आला तिच्यावर.”
कबीरने तिला थांबवत विचारले,”मला बाकी काही सांगू नका तुमचा कोणावर संशय आहे तेवढे सांगा.”
मला काय माहिती? मी तर घरात आत्ताच लग्न होऊन आले आहे. त्याची कोणाबरोबर दुश्मनी असेल किंवा इतर काही मला काहीच माहित नाही. पण विजया त्याची सख्खी जुळी बहीण. पण त्यांचं अजिबातच पटत नव्हतं. तरीही ती असं काही वेडेवाकडे करेल असं मला वाटत नाही.”
कबीरने विजयाकडे त्याचा मोर्चा वळवला.तिच्या मते हे सर्व कारस्थान गुरुजी व हेमा करू शकतात. जय मोठा मुलगा असून त्याला रावसाहेबांनी MD केलं नाही म्हणून हेमानी तावातवाने भांडण केले होते. हेमा राखीचा लहानपणापासूनच खूप द्वेष करते.जय खिन्न होऊन त्याच्या रूममध्ये बसला होता. तो खूपच अस्वस्थ वाटत होता.भाऊ गमावल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आपण आपल्या भावाशी खूपच भांडलो. असे करायला नको होते.
कबीरला तो म्हणाला,” मला तर हे राखीच्या वडिलांचेच कारस्थान वाटते. जावयाला मारून लेकीला त्यांना राजकारणात आणायचे आहे. चार महिन्यात नवरा गेला म्हणून सहानुभूती मिळून ती जिंकून येईल असे काहीतरी असेल. माझ्या धाकट्या भावाचा व आमचा वापर केला गेला आहे.”
बंगल्याच्या गार्डनमध्ये राखी एकटी बसली होती. कबीरला पाहताच ,”बरं झालं तू आलास .मी खूपच एकटी पडली आहे”
कबीरने मुद्द्याला हात घातला,”विजयच्या मृत्यू संदर्भात तुझा कोणावर संशय आहे का?”
“हो! हा मला घातपात वाटतो. गुरुजी,माझे काका अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. लग्न ठरवताना हेमाची पहिली पसंती विजय होता.जयशी लग्न करून मोठी सुन झाली तर सर्व सत्ता हेमा व गुरुजींच्या हातात जाणार होती. पण रावसाहेबांनी विजयला MD करून त्यांचा डाव उलटवला म्हणून त्यांनी असं कृत्य केलं असेल असा माझा संशय आहे. कबीर मला न्याय मिळवून दे.”
कबीरने थेट गुरुजींचे ऑफिस गाठले. “नमस्कार, थोडी चौकशी करायची होती विजयच्या मृत्यूच्या संदर्भात.”
“हो ! विचारा तुम्हाला काय विचारायचे ते माझ्याकडं जेवढं जमेल तेवढं मी सहकार्य करीन” एका मुरलेल्या राजकारण्याने दिलेले उत्तर होते.
संशयाची सुई राहून राहून तुमच्याकडेच येते आहे या बद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे?मी राजकारण नाही समाजकारण करतो.
कोणाला असे वाटते त्यांना माझ्यासमोर उभे करा मी माझी बाजू स्पष्ट करायला तयार आहे. रावसाहेब व माझी आजची ओळख नाहीये अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांबरोबर मित्रत्वाच्या नात्याने राहतो आहे. मैत्रीचे रूपांतर नात्यात हे आत्ता चार महिन्यापूर्वी झाले. त्यांच्या तिन्ही मुलांवर मी अगदी माझ्या मुलीसारखेच प्रेम करतो.
“बरं बरं!! तुमचा संशय कोणावर आहे?” कबीरने थेट प्रश्न केला.
“आमचे धाकटे बंधू, राखीचे वडील नवीन पार्टीमध्ये जात आहेत. विजयला त्यांनी नवीन पार्टीसाठी भरपूर देणगीची रक्कम मागितली होती. जनसेवा व रावसाहेबांचे अनेक वर्षांचे संबंध असल्यामुळे विजयने कदाचित त्याला नकार दिला म्हणून काही रागाच्या भरात झाले असेल तर मला माहित नाही… बाकी सत्याचा शोध व गुन्हेगाराला अटक करायचे काम पोलिसांचे आहे व आमचा पोलीस खात्यावर व न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.”
कबीरने मनातल्या मनात, च्यायला भलताच बनेल दिसतोय म्हातारा म्हणत काढता पाय घेतला.गुरुजींचे धाकटे बंधू राखीच्या वडिलांकडे कबीरने चौकशी केली, तेव्हा त्यांनी असेच काहीसे गोल गोल घुमवून उत्तर दिले. गुरुजीच्या पार्टीला विजयने कशी मोठी देणगी द्यावी व त्याच्या पार्टीला देणगी दिली तर चालणार नाही म्हणून भांडण केल्याचे सांगितले.आता संशयाची सुई गुरुजी ,हेमा, राखीचे वडील, विजया व जय वर येऊन ठेपली.
रावसाहेबांची परत भेट घेतल्यावर जयला का डावलले या प्रश्नाचे उत्तर मिळेल असे कबीरला वाटले. या लग्नाच्या बदल्यात गुरुजींनी जयला खासदारकी द्यावी असा रावसाहेबांचा हट्ट होता. पार्टीची सत्ता व घरातला उद्योगधंदा दोन्ही घरातच असेल तर “सोने पे सुहागा”.एक मुलगा राजकारण करेल तर दुसरा उद्योगधंदा सांभाळेल म्हणजे रावसाहेबांची ‘पाचही बोटे तुपात’ असे त्यांनी ठरवले होते.
पण राखी खूपच महत्त्वाकांक्षी होती व तिला तिच्या वडिलांबरोबर राजकारणात जायचे होते. त्यांनी ‘लोकसेवा’ पार्टीत प्रवेश केला होता. त्यावरूनच जय व विजयचा घरात वाद झाला होता. पण मला याच्यापेक्षाही आमच्या वाळूतल्या धंद्यातल्या कोणीतरी हे कारस्थान केले असेल असे वाटते.सध्या रस्ते आणि मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी आम्ही बीड केले होते आणि ते आम्हाला मिळेल याची खात्री होती.
विजयचे नेटवर्किंग खूप छान होते. तो खूपच संयमी आणि अभ्यासु होता आणि म्हणूनच त्याच्या या गुणांचा फायदा आमच्या धंद्याला होणार होता आणि केवळ म्हणूनच मी त्याला MD केले होते.जय काहीसा तापट स्वभावाचा आहे. त्याच्याकडे नेतृत्व गुण,भाषेवर प्रभुत्व, लोकांना कामाला लावायचे, समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत सहज पोचायचे व भटकंतीची आवड आहे. एक यशस्वी नेता होण्यासाठी लागणारे सर्व गुण जय मध्ये असल्यामुळे व गुरुजींचा तो जावई आहे या दोन्ही गोष्टीचा फायदा घेऊन मी जयला राजकारणात जाण्याचा सल्ला दिला.
घरच्यांचे व नोकरांचे जबाब घेऊन कबीर त्याच्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये बसला होता. प्रत्येकाच्या चौकशीच्या वेळेस त्याला आजूबाजूला एक व्यक्ती काहीतरी ऐकत आहे असे आढळले होते. गुन्हा केल्यावर गुन्हेगार आपण पकडले तर जाणार नाही ना म्हणून चाचपडत काही चुका करतो. त्याप्रमाणे त्याचे बोलणे चोरून ऐकणाऱ्या वर कबीरने जास्त लक्ष द्यायचे ठरवले.त्यांनी एक एक गुंता हळूहळू सोडवायला सुरुवात केली.
विजयच्या मरणाने सगळ्यात जास्त कोणाला फायदा होईल का धंद्यातले वितुष्ट का घरगुती वाद या विचारात कबीर असताना त्याच्यासमोर एक एक चेहरे दिसू लागले.तीन ब्लॅक कॉफीचे कप रिचवल्यावर त्यांनी कोणालातरी फोन केला”मला ताबडतोब माहिती पाहिजे आहे”
दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन मधून अटक वॉरंट घेऊन तो थेट रावसाहेबांच्या घरी गेला.कबीरला सकाळीच घरी आलेले पाहून रावसाहेबांच्या घरात सगळ्यांना आश्चर्य वाटले. रावसाहेबांबरोबर खाजगीत कबीरने काहीतरी चर्चा केली, मग तो त्यांच्याबरोबर बाहेर सगळ्यांना भेटायला आला. रावसाहेब पुरते कोलमडून गेले होते.प्रत्येकाचे चेहरे न्याहाळत त्याची नजर एका चेहऱ्यावर येऊन थांबली.
विजयचा मृत्यू ज्यूस मधून विष दिल्यामुळे झाला होता. प्रथमदर्शनी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हार्ट अटॅक आहे असेच वाटले.काही वर्षांपूर्वी रावसाहेबांच्या पत्नीचे निधन अशाच पद्धतीने झाले होते.हे विष सहजासहजी भारतात मिळत नाही, कबीरच्या खबऱ्याकडून भारतात हे विष देणारी दोनच एजंट होते. त्याने दोघांची कसून चौकशी केली आणि सत्य त्याच्या समोर आले.म्हणजेच रावसाहेबांच्या घरात कोणीतरी ड्रग्ज घेत होते. कबीरनी पूर्ण माहिती काढल्यावर व रावसाहेबांशी बोलल्यावर त्याची खात्रीच पटली होती आता फक्त गुन्ह्याचा कबुली जवाब हवा होता. कबीरने पूर्ण घराची झडती घेतली. विजयवर ज्या विषाचा प्रयोग झाला होता ते विष कबीरला रावसाहेबांच्या घरात मिळाले होते. याचाच उघड उघड अर्थ होता विजयचा खून कोणी केला .आता फक्त तो का केला हे जाणून घ्यायचे होते.
कबीरने षडयंत्राच्या मुख्य सूत्रधाराला अटक केली. चौकशीअंती काही धक्कादायक खुलासे बाहेर आले. हा ज्यूस विजय साठी नसून तो राखी साठी होता. राखीचा एवढा टोकाचा मत्सर कोण व कशासाठी करत होते?या सगळ्यात राखीला मारून हेमाला फसवायचा बेत होता.म्हणजे जय व विजयच्या आयुष्यातून या दोन्ही बायका कायमच्या निघून जातील.या घराने कायमच मुलगी म्हणून दिलेली दुय्यम वागणूक हे खरे संतापाचे कारण होते.
वडिलोपार्जित धंद्यामध्ये मुलीला डावलून कायमच मुलगाच वंशज झाला होता व प्रत्येक खेपेला मुलीकडून बलिदानच मागितले होते…मग या घरात सत्ता चालेल ती फक्त मुलींचीच…. बाहेरून आलेल्या मुलींना इथे काही स्थान नाही….. “म्हणजे आमच्या आईला तू मारलं आत्यासाहेब?” विजया किंचाळली……
”हो हो मीच तिला संपवलं , तिला राजकारणात सक्रिय भाग घ्यायचा होता. घर व मुलांची जबाबदारी माझ्यावर सोपवायची हा तीचा बेत होता“ आत्यासाहेब ओरडून म्हणाल्या. हे शापित आयुष्य मी अनेक वर्षे भोगले. रावसाहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी, ऐन उमेदीच्या काळात मला त्याच्या मुलांची व घराची जबाबदारी सांभाळावी लागली.
आता स्वतःच्या मुलीसाठी स्थळ बघत आहे. ती लग्न होऊन सुखी व्हावी म्हणून धडपडत आहे. स्वतःच्या सुनांना त्यांच्या मर्जीप्रमाणे व्यवसाय अथवा राजकारणात जाण्याची मुभा देत आहे आणि मला मात्र घरामध्ये बंदीवासात ठेवले आहे आणि आता सुना आल्यावर माझी जागा अडगळीची खोली …. हे मला कदापी सहन होईना…फक्त माझा नेम चुकला..
कबीरला मिळालेल्या माहितीनुसार, आत्यासाहेब पूर्वी ड्रग्ज घेत होत्या. त्यांच्यावर रावसाहेबांनी उपचार करून त्यांना बरे केले होते. त्यांना ड्रग्ज देणारा एजंट माहीत होता व तो अनेक वर्ष त्यांच्यासाठी काम करत होता.या खेपेला पण त्यांनी एजंटला फोन केला होता व स्वतः जाऊन ड्रग आणले होते. हे सर्व पुरावे व आत्याबाईंचा कबुली जवाब विजयचा खून झाला हे स्पष्ट होत होते.
आत्याबाई हताश होऊन कबीर बरोबर निघाल्या….
लेखिका -सौ.वृषाली पुराणिक,पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
तुम्हाला ही रहस्य कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
खुप छान आहे.
खूप खूप धन्यवाद
खूप छान जमली आहे.. शेवटपर्यंत संशयाची सुई त्यांच्यावर येतं नाही हेच कथेचे यश आहे..
खूप खूप धन्यवाद
उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरणारी अतिशय रोचक गोष्ट
खूप खूप धन्यवाद
उत्कंठावर्धक कथा👌👌
खूप खूप धन्यवाद.
गोष्टीचा विषय चांगला निवडलास. रहस्याचा उलगडा जरा घाईने केल्यासारखे वाटले. कबिरचे कसब थोडे अजून रंगवले असते तर पोलिसी तपासाची वैशिष्ट्ये अधिक दाखवता आली असती.
रहस्य कथा अजून थोडी सजवायला हवी होती.
कथा बीज चांगले आहे. प्रयत्न करत रहा. वेगवेगळे विषय हाताळत रहा. यश येईलच.
खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचा पुढच्या लिखाणात नक्कीच फायदा होईल.
कथा खुप छान आहे परंतु त्यातला सस्पेंस जरा अजून रंगवला तर वाचायला अजून मजा येईल .
खूप खूप धन्यवाद.