आपल्या किरणांचा पसारा आवरता घेऊन तो हिरण्यगर्भ, अस्ताला जातानाही तितक्याच दिमाखात चालला होता.
जाता-जाता त्या सागराला प्रदान केलेली नारिंगी झिलई, आदित्य भान हरपून बघत होता. त्याच्या हातात हात गुंफून उभ्या असलेल्या त्याच्या पत्नीचं, प्राजक्ताचं, सूर्यास्ताच्या त्या मनोहारी दृश्यातलं नावीन्य आता मात्र संपलं होतं. किती वेळ तेच बघत रहाणार ना? आदित्यचा निकटचा सहवास तिला त्या सूर्यास्तापेक्षा जास्ती प्रिय वाटत होता.
ती दोघंही मुळची पुण्याची होती आणि सध्या वास्तव्यही पुण्यालाच होतं. त्यामुळे समुद्राचं अप्रूप होतंच. श्रीवर्धनचा तो शांत, स्वच्छ, सुट्टीचा सीझन सोडल्यास तुरळक गर्दी असलेला सागरकिनारा तिलाही खूप आवडला होता.
पण आदित्यसारखं, पूर्ण जगाचं भान विसरुन तासनतास समुद्राकडे पहात बसणं, तिला कधीच शक्य झालं नसतं.
आदित्य एक अतिशय नावाजलेला चित्रकार होता. अगदी हाडाचा कलावंत म्हणावा असा आणि प्राजक्ता, पुण्याच्या एका नामवंत चार्टर्ड अकाउंटिंग फर्ममध्ये कार्यरत होती. तो…अगदी अवलिया, अतरंगी. या तथाकथित शहाण्या माणसांच्या दुनियेत, वेडाच्या काठाकाठावर वावरणाराच म्हणा ना.
ती…आकडेमोडीच्या रुक्ष व्यवहारी जगात एकदम चपखल बसणारी. तरीही दोघांच्या मनाच्या तारा झकास जुळल्या होत्या. त्या दोघांचंही, एकमेकांवर अगदी निरातिशय प्रेम होतं.
दोन वर्षांपूर्वी, आदित्यच्या एका आर्ट एक्झिबिशनमध्ये दोघांची ओळख झाली होती. त्या दिवशी, तिच्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर ती हे चित्रप्रदर्शन बघायला गेली होती. तिला स्वतःला त्यात फारसा रस नव्हता आणि चित्रकलेची समजही नव्हती. पण तिथली चित्रं तिला खूपच आवडली. इतकी सुंदर चित्रं काढणारा कलाकार कसा आहे हे पाहण्याची उत्सुकता तिला वाटायला लागली. कोपऱ्यात एका खुर्चीवर बसलेल्या माणसाभोवती, खूप लोकांचा घोळका जमला होता, तिथे ती गेली.
ते त्याचं पहिलं दर्शन. कोणालातरी चित्राचे बारकावे तो सांगत होता. अस्ताव्यस्त झालेले केस त्याच्या अतिशय देखण्या चेहऱ्याला शोभून दिसत होते. लुकलुकणारे डोळे, चेहऱ्यावरचे निरागस भाव, बोलताना मानेला झटका देऊन बोलण्याची लकब, त्यावेळेस त्याच्या कपाळावर झेपावणारी त्याची झुलपं…प्राजक्ता पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडली होती. तिथे जमलेल्या लोकांपैकीं एकाने त्याची चार पेंटिंग्ज विकत घेतली होती. ती त्याला अहमदाबादला न्यायची होती. आदित्य ती पेंटिंग्ज कुरिअर करु शकेल का? पेंटिंग्जवर किती टॅक्स बसेल? त्याची रिसिट मिळेल का? रिसिट घेतली नाही तरी टॅक्स द्यावा लागेल का? अश्या त्या ग्राहकाच्या प्रश्नांच्या भडीमाराने, बिचारा आदित्य इतका गोंधळून गेला होता की त्याला नीट काही सांगताच येईना.
प्राजक्ताच मग त्याच्या मदतीला पुढे सरसावली. हे असले प्रश्न तिच्या दृष्टीने फारच मामुली होते. तिच्या उत्तरांनी त्या ग्राहकाचं समाधान झालेलं दिसलं.
इकडे तिला बघून आदित्यचीही तिच्यासारखीच अवस्था झाली होती. हळूहळू दोघांच्या गाठीभेटी वाढायला लागल्या. प्रेमाची कबुली देऊन झाली. आदित्यला वडील नव्हते. त्याची आई, आदित्यच्या मोठ्या भावाकडे, लंडनला रहात होती. आदित्य इथे पुण्याला एकटाच होता. प्राजक्ताचे आईवडील आणि आदित्यची आई, भाऊ यांची संमती मिळाल्यावर अगदी साधेपणाने दोघांचं लग्न झालं. थोडे दिवस आदित्यबरोबर राहून, त्याची आई आणि भाऊ लंडनला परत गेले.
या दोघांचा संसार अगदी मजेत चालला होता. पाहता-पाहता लग्नाचा दुसरा वाढदिवस आला. तो वाढदिवस, प्राजक्ताला कुठेतरी बाहेरगावी जाऊन साजरा करावा असं वाटत होतं. खरंतर आत्ता कुठे गावाला वगैरे जायची आदित्यची अजिबात इच्छा नव्हती. पुढच्याच महिन्यात, पुण्यात एक खूप मोठी पेंटिंग कॉम्पिटिशन होणार होती. भारताबाहेरच्यापण एन्ट्रीज् होत्या त्या स्पर्धेसाठी. एका महिन्यात चित्र काढायचं म्हणजे मोठंच आव्हान होतं. पण आदित्यला प्राजक्ताचं मन दुखवायचं नव्हतं. मग त्या दोघांनी दोन-तीन दिवस, जवळचं ठिकाण म्हणून श्रीवर्धनला जाऊन यायचं ठरवलं.
त्याप्रमाणे ती दोघं इथे आली होती.इथलं वातावरण, इथला समुद्र बघून आदित्य प्रचंड भारावून गेला होता. कधी पायाला अलगद बिलगणाऱ्या हळुवार लाटा, कधी रौद्र रुप धारण करुन येणारी, छातीत धडकी भरवणारी महाकाय लाट, दुपारच्या उन्हात चमचमणाऱ्या लाटा आणि रात्री फक्त कानांना जाणवणारी सागराची मंद गाज..या सगळ्या देखाव्यात आदित्य जणू विरघळून गेला होता. बरोबर प्राजक्ता आहे, हे तो मधूनच विसरुन जात होता.
प्राजक्ता त्याचं हे झपाटलेपण गेली दोन वर्षं अगदी जवळून बघत होतीच. ती हेसुद्धा जाणून होती की, असा ध्यास असेल तेव्हाच फक्त महान कलाकृती बनू शकतात. पण कुठेतरी आतमध्ये ती थोडीशी दुखावली गेली होती. लग्नाच्या वाढदिवशी तिच्याकडे होणारं त्याचं दुर्लक्ष, तसं थोडं खटकलंच तिला. पण ती समजूतदार होती, त्यामुळे तिने ते फारसं मनावर घेतलं नाही.त्याची ती समाधी जेव्हा काही केल्या संपेना
तेव्हा मात्र तिने त्याला खांद्याला धरुन हलवलं आणि म्हणाली, “आदी, आता जाऊया का आपण? गावात एखादी चक्कर मारुन येऊ. खूप डेव्हलप झालंय आता श्रीवर्धन. मी आठवीत असताना आमची शाळेची ट्रिप इथे आली होती. त्यानंतर इतके वर्षांनी इथे यायचा योग आला.”
“मी तर पहिल्यांदाच येतोय. बाकी कोकण तसा बऱ्यापैकी फिरलोय, पण इथे कधी आलो नव्हतो. आता मला पश्चात्ताप होतोय, मी आधी का आलो नाही इथे?
अक्षरशः प्रेमात पडावं असा सागरकिनारा आहे. चल, जरा लांबवर जाऊन पाहून येऊ. प्राजक्ताला नकार देता आला नाही. बोलण्याच्या नादात, दोघंही चालत चालत खूप पुढे गेली होती.
अचानक एका ठिकाणी, ब्रेक लावल्यासारखी दोघं थांबली. समोरचा देखावा अक्षरशः वेड लावणारा होता.
संमोहित झाल्यासारखे ते आजूबाजूला पहात होते. सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे आकाशात इतक्या विलोभनीय, विविध रंगांची उधळण झाली होती की, आदित्यमधला चित्रकार भान हरवून बसला नसता तरच नवल होतं. कोणीतरी घड्या घालून ठेवाव्या, तसं चमचमणाऱ्या वाळूचं वस्त्र जमिनीवर पसरलं होतं. समुद्राचं पाणी थोडंसं मध्ये-मध्ये साठून त्या पाण्यात पडलेल्या आकाशाच्या छोट्याशा तुकड्यांच्या प्रतिबिंबामुळे आकाश आणि धरती एकरुप झाले होते. एक छोटासा तलाव त्या वालुकामय प्रदेशातून मधूनच वहात होता. त्याच्या मध्यभागी एक रिकामी होडी, कुठेही जायची घाई नसल्यासारखी नुसतीच उभी होती. सगळीकडे निरव शांतता होती.
आदित्य या जागेचे वेड्यासारखे फोटो घेत होता. व्हिडिओ शूटिंग करत होता.
एकदम प्राजक्ताला जाणवलं, इथे समुद्र इतका जवळ असून त्याचा अगदी पुसटसा आवाज येत होता, तोही अगदी कान देऊन ऐकला तर. पक्षी या जागेच्या आधीच्या टापूतूनच मागे फिरत होते. कोणी माणसं तर दृष्टीपथात येत नव्हतीच, पण किनाऱ्यावर असलेली भटकी कुत्रीसुद्धा या भागात दिसत नव्हती.
एकाएकी ह्या शांततेचं अनामिक दडपण प्राजक्ताला जाणवायला लागलं. या जागेत तिला मोकळा श्वासच घेता येईना. आपल्या विचारांवर, हालचालींवर आपलंच नियंत्रण राहिलं नाहीये, अशी काहीशी चमत्कारिक भावना तिच्या मनात निर्माण झाली. हे सगळं मिनिटभर वाटलं असेल नसेल, मग पुन्हा सगळं पूर्ववत झालं. पण आता तिला तिथे थांबावसं वाटेना. आदित्य अजूनही वेगवेगळ्या कोनातून तिथले फोटो घेत होता.ती मग त्याला जवळपास ओढूनच तिथून घेऊन गेली.
रिसॉर्टवर आल्यावर तिने आपला अनुभव सांगितला. यावर तो हसतंच म्हणाला, “तुला कसलातरी भास झाला असेल. आपल्यासारख्या शहरी माणसांना निसर्गाचं एवढं भव्य, शुद्ध रुप इतकं जवळून पहायची सवय नसते ना, त्यामुळे मनाचा तोल जरा डगमगतो. बाकी काही नाही गं. मला तर भुरळ घातली आहे या जागेने.
बस्स! याच जागेचं चित्र, कॉम्पिटिशनसाठी काढायचं मी ठरवलं आहे. एकाच कॅनव्हासवर उगवत्या सूर्यापासून, मावळतीच्या सूर्यापर्यंत या ठिकाणी होत जाणारे बदल, तिथून डोळ्यांना अस्पष्ट दिसणारा समुद्र, त्या छोट्याशा तलावात, निश्चल उभी असलेली रिकामी होडी, घड्या पडलेली, चोहीकडे पसरलेली मऊशार वाळू..वाळू कसली,रेतीच ती. हे सगळं रेखाटणार आहे माझ्या चित्रामध्ये. प्राजक्ता, उद्या आपण परत पुण्याला चाललोय. पण मी असं ठरवलंय, माझं ड्रॉईंगचं सगळं सामान घेऊन मी परत इथे येणार आहे. इथेच किनाऱ्यावर बसून, प्रत्यक्ष बघून चित्र काढलं तर ते केव्हाही जास्त परिणामकारक होईल. आपण उद्या परत जायच्या आधी, बीचच्या अगदी जवळ जे दोन-तीन रिसॉर्ट्स आहेत, तिथे चौकशी करुन ऍडव्हान्स भरुन ठेवू. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे, त्यामुळे तीन आठवडयात मला चित्र पूर्ण करावंच लागेल.”
प्राजक्ताला हे ऐकून धक्काच बसला. आत्तापर्यंत ती दोघं एकत्र विचारविनिमय करुन अश्या गोष्टी ठरवत होते. आता आदित्य सगळं ठरवून मोकळाही झाला होता.
ती त्याला म्हणाली, “अरे, इतक्या घाईने निर्णय घेऊन पण टाकलास? आणि माझं काय? मला इतके दिवस कोण सुट्टी देणार आहे? ऑनलाईन काम करायचं म्हंटलं, तरी इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. तू इथले एवढे फोटो, व्हिडिओज् घेतले आहेस, प्रत्यक्ष इथे थांबून बघायची काय गरज आहे? तुझ्यासारख्या जिनिअस आर्टिस्टला हे चित्र काढणं अजिबात अवघड नाहीये.”
“हे बघ प्राजू, परफेक्ट रंगसंगती हाच या चित्राचा प्राण असणार आहे. बाकी समुद्र, वाळू, होडी, हे फारसं महत्त्वाचं नाहीच. फोटोमध्ये रंगसंगतीचं पर्स्पेक्टिव्ह बदलतं. मला जे चित्र अभिप्रेत आहे ते इथे प्रत्यक्ष बघून काढलं तरंच शक्य आहे. तसंही तुला इथे कंटाळाच येईल. तुला माहितीये, मी एकदा रंगांच्या दुनियेत शिरलो की मला कसलंही भान रहात नाही. तू तुझ्या सुट्टीच्या दिवशी इथे येऊ शकतेस की. चार तासांचं जेमतेम अंतर आहे. तसंही पंधरा-वीस दिवसांचा तर प्रश्न आहे. तो ‘व्हॅन गॉग’ तर म्हणे सूर्यफुलाचं चित्र काढत असताना बरोब्बर तसा रंग येण्यासाठी तळपत्या उन्हात उभा राहिला होता. असा ध्यास असावाच लागतो.”
प्राजक्ताला नेहमीप्रमाणेच त्याचे मुद्दे खोडून काढता आले नाहीत.
दुसऱ्या दिवशी ते पुण्याला परत आले. इझेलसकट सगळं सामान पॅक करुन आदित्य पुढच्या दिवशीच परत श्रीवर्धनला गेला. समुद्रकिनाऱ्यावरचंच एक रिसॉर्ट त्याने बुक केलं होतं. अर्थातच रिसॉर्टमध्ये तो फक्त झोपण्यापुरताच असणार होता. पुढचे चार दिवस प्राजक्ताला मात्र कठीण गेले. मोबाईल रेंज क्वचित असायची. तेव्हा आदित्यबरोबर बोलणं व्हायचं. पण तेव्हा तिला जाणवायचं की तो त्याच्या विश्वात रममाण झालाय. ती मात्र फार बेचैन झाली होती आणि त्याचं कारण तिला समजत नव्हतं. तसा तो कामानिमित्त गावाला जात होता. तेव्हा ती इथे एकटीच असायची. पण ही वेळ काही वेगळीच होती. पाचव्या दिवशी तर तिची अस्वस्थता इतकी शिगेला पोचली की ऑफिसमधून दोन दिवसांची रजा घेऊन ती परस्पर दुपारच्या श्रीवर्धनच्या बसमध्ये बसली.
ती पोचली तेव्हा सात वाजायला आले होते. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून बऱ्यापैकी उजेड होता. रिसॉर्टमध्ये आदित्य नव्हताच. मग ती तशीच बीचवर गेली. भराभर चालत ‘त्या’ जागी जाऊन पोचली. लांबूनच तिला आदित्य दिसला, समोरच्या देखाव्याशी एकरुप झालेला. त्याला बघून तिला चांगलाच धक्का बसला. चार दिवसांतच जाणवण्याएवढं त्याचं वजन कमी झालेलं दिसत होतं. तिच्या मनात आलं, दिवसरात्र तहानभूक विसरुन याने फक्त चित्राचाच ध्यास घेतलेला दिसतोय. आपलं चुकलंच, त्याच्याबरोबर इथे यायला हवं होतं.
ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला हाक मारली, “आदी, मी आले आहे.”
त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिलं आणि ती चरकली. त्याच्या नजरेत अजिबात ओळख दिसत नव्हती. तिने परत-परत त्याला हाका मारल्यावर हळूहळू त्याच्या नजरेत ओळख आली. एकदम आवेगाने तिला मिठी मारुन तो म्हणाला, “प्राजक्ता..कुठे गेली होतीस तू? तुला सोडून कुठेही जायचं नाहीये मला, कुठेही नाही.”
“काय झालं आदी? चारच दिवसांत काय अवस्था करुन घेतली आहेस स्वतःची? दिवसरात्र समुद्रावरच ठाण मांडलं आहेस की काय?”
आदित्य काहीच बोलला नाही. फक्त त्याची मिठी अजून दृढ झाली. तिने पण जास्ती छेडलं नाही. किती दिवसांनी, रंगांच्या दुनियेत हरवून गेलेला तिचा आदी तिला आज सापडला होता. हा हळवा क्षण असाच चिरकाल राहू दे, असं तिला वाटत असतानाच इझेलवरचं चित्र तिला दिसलं आणि अभावितपणे तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, “आहाहा! अप्रतिम! केवळ सुंदर.”
खरंच चित्र अलौकिक दिसत होतं. सूर्योदयापासून रात्रीपर्यंतच्या, सूर्याच्या आणि त्याबरोबर बदलत जाणाऱ्या लाटांच्या छटा, एकाच कॅनव्हासवर बेमालूम मिसळल्या गेल्या होत्या. असं वाटत होतं, आजूबाजूच्या देखाव्यातील गोष्टींनी आपापली जागा सोडली आहे आणि त्या सगळ्या, या कॅनव्हासवर येऊन गोळा झाल्या आहेत.
ती चित्र बघत असताना, आदित्य त्याच्या रंगांच्या दुनियेत परत गेला होता. तो प्राजक्ताला म्हणाला, “चित्र छान झालंय, माझ्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर पूर्णपण झालंय. पण ते अजून अपूर्ण आहे. नक्की कसली कमतरता आहे ते माझ्या लक्षात येत नाहीये, पण काहीतरी राहून गेलंय.”
अंधार वाढायला लागला तशी दोघंही रिसॉर्टवर परतली. प्राजक्ताने मनाशी ठरवलं होतं, चित्र अपूर्ण असो नाहीतर नसो, उद्या आदित्यला घेऊन पुण्याला जायचंच.
पहाटे साडेपाचच्या सुमारास तिला जाग आली. शेजारी आदित्य नव्हता, त्यामुळे ती एकदम ताडकन उठली. इतक्या पहाटे हा समुद्रावर गेला? तिने घाईघाईने त्याला फोन लावला. मोबाईलची रिंग बाहेरच्या खोलीतून ऐकू आली. ती बाहेर आली तेव्हा तिथल्या टेबलवर त्याचा मोबाईल दिसला. तिने पूर्ण रिसॉर्टमध्ये फेरी मारुन तो कुठे आहे का ते चेक केलं. तो कुठेच दिसला नाही. मग ती समुद्रावर आली. त्यांच्या नेहमीच्या जागी लांबून तिला त्याची इझेल दिसली. बाकी साहित्यपण आजूबाजूला विखुरलं होतं. तिने सुटकेचा निश्वास टाकला. इथेच होता तर तो. ती जवळ येऊन तो कुठे दिसतोय का ते पहायला लागली. तेवढ्यात त्या चित्रावर तिची नजर पडली. ते चित्र कालच्यापेक्षा आज जास्ती कमाल दिसत होतं. इतके जिवंत, रसरशीत रंग तिने आधी आदित्यच्या चित्रातसुद्धा पाहिले नव्हते. चित्राला नाव पण होतं, ‘पूर्णत्व’ आणि खाली आदित्यची लफ्फेदार सही आणि आजची तारीख होती. तिच्या मनात आलं,
कदाचित हाच जिवंतपणा आदित्यला अपेक्षित असावा. तो जमेपर्यंत त्याला चित्र अपूर्ण वाटत असावं. पण आहे कुठे तो?
ती अजून पुढे चालत जाऊन बघून आली. तिथे दिसला नाही म्हणून त्या जागेच्या विरुद्ध दिशेच्या किनाऱ्यावर पाहून आली. बहुतेक सगळा किनारा तिने पालथा घातला.
बाहेरच दोन-तीन टपऱ्या उभारल्या होत्या. तिथल्या माणसांना पण तिने आदित्यचं वर्णन सांगून तसा कोणी जवळपास दिसला का ते विचारलं. ड्रॉईंगचं सगळं सामान घेऊन इतकी पायपीट केल्यामुळे ती खूपच दमली होती. शिवाय टेन्शन होतं ते वेगळंच.
कदाचित तो दुसऱ्या बाजूने रिसॉर्टवर गेला असेल असा विचार करत ती तिथे पोचली.
पण तिथेही त्याचा पत्ता नव्हता. तिने मग रिसॉर्टच्या ओनरला, चौधरीला, चार दिवस आदित्य किती वेळ तिथे असायचा, ते विचारलं.
त्याने सांगितलं, “साहेब पहाटेच समुद्रावर जायचे. पहिल्या दिवशी, दुपारी जेवायला आले होते. त्यानंतर पुढचे तीन दिवस पहाटे गेले की एकदम रात्रीच परत येत होते. जास्ती कोणाशी बोलत पण नव्हते. मॅडम, मला वाटतं रात्री येतील ते परत.”
“पण असा न सांगता तो मला एकटीला सोडून नाही जाणार कुठे. बरोबर मोबाईल नाही, पैसे तरी घेतले आहेत का माहीत नाही.”
प्राजक्ता स्वतःशीच बोलल्यासारखी बोलत होती. तिला आता फार काळजी वाटायला लागली होती. तिचा चेहरा बघून चौधरीने तिला पोलिसांत तक्रार नोंदवायला सांगितली. त्याने स्वतः तिच्याबरोबर जायची तयारी दर्शवली. तिलाही ते पटलं. त्याला तिथे घेऊन जाण्याचा निर्णय बरोबर ठरला. पोलिसांनी विचारलेल्या आडव्यातिडव्या प्रश्नांची उत्तरं चौधरीने बरोबर दिली. प्राजक्ताची बाजू घेऊन तो बोलला. आदित्यचा मोबाईल पोलिसांनी चेक केला, त्यात त्यांना काही आक्षेपार्ह किंवा प्राजक्तावर संशय घेण्यासारखं काही आढळलं नाही. त्यामुळे त्यांनी खूप सहकार्य केलं. सगळीकडे त्याचा कसून शोध घेतला. तसंही पुण्यामुंबईसारखं अवाढव्य नव्हतंच श्रीवर्धन. त्यामुळे शोधमोहीम लवकर आटपली. अगदी मानवी पाणबुडयांनी जमेल तितका समुद्र घुसळून आदित्यचा शोध घेतला. पण व्यर्थ!
नाईलाजाने प्राजक्ता दोन दिवसांत पुण्याला परतली. तिच्या मनःस्थितीची कल्पनाच कोणाला येणं शक्य नव्हतं. पुण्याला आल्यावर पुन्हा एकदा ते चौकशीचे फेरे, लोकांच्या प्रश्नांचा भडिमार, तिच्याविषयीच्या संशयाचे काळे ढग…
सगळ्यात जास्त ती घायाळ झाली होती, आदित्यच्या आई आणि भावाच्या नजरेतला संशय बघून. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुंजत असतानाच स्पर्धेचा दिवस उजाडला. आदित्यच्या चित्राची एन्ट्री तर असणारच होती. सगळ्या कसोट्या पार करुन, अपेक्षेप्रमाणेच त्याच्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालं. सगळ्या बाजूंनी कौतुकाचा नुसता वर्षाव झाला. या सगळ्या गडबडीत, प्राजक्ताला तिच्या चिंता आणि काळज्यांनी इतकं ग्रासलं होतं, की एक छोटीशी बाब मात्र तिच्या अजिबात लक्षात आली नव्हती.
चित्रातली होडी आता रिकामी नव्हती.
-समाप्त
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.
लेखिका –सौ. राधिका जोशी, पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
निसर्गातील काही गुपितं तशीच अलवार जपावीत. त्यातला मानवाचा हस्तक्षेप निसर्गाचा तोल बिघडवू शकतो आणि काही अनाकलनीय गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं.
ही कथा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. कुठलीही अंधश्रध्दा पसरवण्याचा मानस अजिबात नाही.
धन्यवाद !
अप्रतिम 👌
फारच छान लेखन. वाचताना उत्कंठा शिगेला पोहेचत होती. शेवट मात्र अनाकलनिय, अपेक्षाच नव्हती. पूर्णत्व नाव देखिल मार्मिक ठेवले आहे. आपल्या पुढील सगळ्या कथांसाठी अनेक अनेक शुभेच्छा. ..
निनाद शरद राजोपाध्ये.
कोल्हापूर
धन्यवाद!!
धन्यवाद!!
अप्रतिम कथा .. सुरेख मांडणी… एक गूढ शेवट. तुमच्या कथा म्हणजे वाचकांसाठी एक पर्वणीच असते.
धन्यवाद😊