कॉलेजची सहल कोकणात निघाली.वळणावळणाच्या घाटाने कॉलेजची बस वेगाने चालली होती.बसमध्ये मुलांचा दंगा,गाण्यांच्या भेंड्या मस्तीने चालल्या होत्या.घाटाचा बोगदा आला.सगळीकडे अंधार पसरला.अचानक सगळ्यांचा आवाज शांत झाला.बराच वेळ बस बोगद्यातून चालली होती.बोगद्यातून बस पुढे सरकली. सगळ्यांच्या जीवात जीव आला . फक्त डोंगर आणि घाट बाकी काही दिसत नव्हते.
” प्रिया तुला काही जाणवलं का? जसा कोकणचा भाग चालू झाला आहे.तशी हवा फिरली आहे.हवेत एक वेगळाच जडपणा आला आहे .” सुषमा प्रश्नार्थक नजरेने म्हणाली.
“हो ना मी ही अनुभवलं .त्या बोगद्यात तर मला कोणी खेचत आहे असे वाटले .” प्रियाही घाबरून म्हणाली.
“काय चाललंय तुमचं ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.आणि असं बोलू नका .उगाच बाकीचे घाबरतील. काय तुम्ही पण मुली ? कोणत्या शतकात वावरत आहे? . नुसता बालिशपणा…”सोनवणे सर रागावून बोलले.
किती वेळ झाला ; पण बस घाटानेच चालली होती.कुणालाच काही कळेना . पुन्हा पुन्हा तोच घाट आणि तोच बोगदा . बस ड्रायवरही कंटाळून गेला होता. कसेबसे रात्रीच्या आकरा वाजता बस कोकणात पोहचली. सगळे आता निवांत झाले.
“आपल्याला कोकणातले रस्ते एवढे परिचयाचे नाही ना.? त्यामुळे त्यातील बारकावे माहित नसावे .” असे शिक्षक म्हणाले.
ज्या फार्महाऊस मध्ये सगळे थांबले होते.ते गावाच्या बरेच आतमध्ये होते. सगळीकडून झाडे झुडपे आणि डोंगर .जागा तशी निसर्गरम्य होती.परंतु जरा विचित्रच भासत होती.जणू बरेच वर्ष कोणी तेथे वास्तव्य करत नसावे.भयाण आणि भकास वाटत होती . तेथे कोणतीही मनुष्य वस्ती नव्हती . पण कॉलेजची भरपूर मुले असल्यामुळे माणसांची काही उणीव भासत नव्हती. सुषमा आणि प्रिया जरा घाबरूनच होत्या. कारण की त्यांना भयानक गोष्टी सांगितल्या की त्या दोन चार दिवस काय त्यातून बाहेर येत नव्हत्या.
फार्महाऊस जवळच पाठीमागच्या बाजूला समुद्र किनारा होता.त्याचे खारे वारे फार्महाऊसला येऊन धडकत होते. दिवसा फार्महाऊस आणि त्याचा आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य ,मन वेधून घेणारा होता.पण तोच परिसर रात्रीचं एकदम अक्राविक्राळ भासे.जणू जास्त वेळ जागे राहिले तर ही रात्र खाऊन टाकते की काय. सगळेजण आपापली तयारी करत होते. समुद्रकिनाऱ्यालगत असणारा फार्म हाऊस आणि आजूबाजूचा असलेला रम्य देखावा सर्वांना मोहून टाकत होता. सगळ्यांनी मिळून आलेल्या सहलीचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती झळकत होते. सर्वांची तयारी झाली, शिक्षक लोकं जमा झाले, सर्व मुले एकत्र आले.
सर्वांनी आपला मोर्चा सर्वात आधी समुद्रकिनाऱ्याकडे वळवला. भर दुपारी उन्ह तापलेली असतानाही समुद्राच्या लाटेंमधून येणारी थंड वाऱ्याची झुळूक मनाला शांत करत होती. सगळेजण समुद्रकिनाऱ्याचा आणि लाटांचा आनंद मनमुराद लुटत होते. परंतु सुषमा आणि प्रिया वेगळ्याच दिशेने चालल्या होत्या. त्या वातावरणामध्ये काय जादू होती काय माहित परंतु सुषमा आणि प्रियाला कोणीही थांबवले नाही. त्या विरुद्ध दिशेला जाताने दिसत होत्या; तरीही त्यांना कोणीही आवाज दिला नाही जे ते आपल्या आपल्या बोलण्यात, गप्पांमध्ये दंग होते.
सुषमा आणि प्रिया समुद्रकिनाऱ्यापासून साठ मीटर अंतरावर चालत आल्या होत्या. त्या जणू भान हरपून चालल्या होत्या. जेव्हा त्या भानावर आल्या तेव्हा त्या वेगळ्याच जागेवर उभ्या होत्या. दोघीही तंद्रीतून बाहेर आल्या. त्या एकमेकींकडे पाहू लागल्या, आजूबाजूला पाहू लागल्या. सगळेजण आपल्याला सोडून कुठे गेले. म्हणून इकडे तिकडे जाऊ लागल्या. त्यांना कोणी सोडून गेले नव्हते तर त्याच सगळ्यांना सोडून लांब अंतरावर आल्या होत्या.त्यांनी पाठीमागे पाहिले तर झाडाच्या पलीकडे कोणीतरी असल्याचा भास त्यांना झाला. त्यांना वाटलं आपली कोणीतरी गंमत करत आहे. म्हणून त्या दोघीही झाडाच्या दिशेने चालू लागल्या. तिकडे कोणीही नव्हतं पण जवळच एक स्मशानभूमी होती. आणि त्याच स्मशानभूमीमध्ये एक बाई रडत बसली होती. परंतु तिला रडण्यासारखं त्या स्मशानभूमीत काहीही नव्हतं.
मुळात कितीतरी दिवस त्या स्मशानभूमी मध्ये काहीही विधी झाले नसावेत. काळे पडलेले पत्रे, काळी जागा आणि लोंबलेली जळमटे अशी तिची अवस्था होती. स्मशानभूमी पाहून पहिल्या दोघीही घाबरल्या. नंतर त्या बाईला पाहून दोघीही शांत झाल्या. त्या तिच्या जवळ गेल्या . तिला रडण्याचे कारण विचारले. कितीतरी वेळ तिने वरती पाहिले नाही. सुषमा आणि प्रियाला जरा विचित्रच वाटले. म्हणून त्या काहीही न बोलता परत येण्यासाठी निघाल्या. आणि सहज दोघींच्याही मनात विचार आला म्हणून त्याने मागे डोकावून पाहिले. तर ती बाई त्यांच्याकडे पाहून विचित्र हसत होती. सुषमा आणि प्रियाच्या काळजात धडधड होऊ लागलं. त्यांचे पाय जड झाले. त्यांना नीट पळताही येईना. कशातरी त्या समुद्रकिनारी आल्या .
” कुठे गेल्या होत्या तुम्ही ? सांगून जाता येत नाही का ? मुळात आम्हाला सोडून जाण्याचे कारणच काय ? तुम्हाला काही झाले तर याला जबाबदार कोण ? घरून निघाल्यापासून तुमचे वागणे पाहतोय.” जोरजोरात ओरडुन सोनवणे सरांचा चेहरा लालबुंद झाला होता. सरांना एवढं रागवलेलं पाहून त्या दोघीही गप्प बसल्या. घडलेला प्रकार त्यांना सांगायची हिंमत झाली नाही. आता जर आपण हे सर्व सांगितलं तर आपल्याला सर्वजण वेड्यात काढतील. दोघींनीही स्वतःच्या मनाची समजूत काढून शांत बसल्या.सगळी मित्रमंडळी त्या दोघींकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले.
” बस झाला तमाशा चला सर्वजण आता फार्म हाऊसला. आपण आलो कशासाठी? आपण करतोय काय ?” सोनवणे सर रागावून स्वतःशीच पुटपुटत होते.सर्वजण फार्म हाऊसवर पोहचले. सर्वजण वेळ मजेत घालवत होते. परंतु सुषमा आणि प्रियाच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. त्या अजूनही त्या भीतीतून सावरल्या नव्हत्या. रात्रीचे जेवण आवरले. सर्व मित्र-मैत्रिणींनी आज आपण रात्रीचं जागूया आणि गप्पा मारूया असे ठरवले. फार्महाऊसला दोन प्रशस्त खोल्या होत्या. एका खोलीमध्ये सर्व मुले व एका खोलीमध्ये सर्व मुली अशी झोपण्याची त्यांची व्यवस्था होती. आपण सर्वांनी गाण्यांच्या भेंड्या खेळूया असे मुलं – मुली म्हणू लागले. ग्रुप वगैरे काहीही बनवायचा नाही . प्रत्येकाने वेगळ वेगळ खेळायचं. आणि जो हारेल त्याने फार्महाऊस मागे असणाऱ्या झाडाला हात लावून यायचा. कारण की ते झाड फार्म हाऊसच्या चाळीस मीटर अंतरावर होते. आणि रात्रीच्या अंधारात ते एखाद्या भयानक राक्षसाप्रमाणे भासत होते. सर्वजण तयार झाले. सुषमाच्या काळजात विज चमकून गेली.
खेळ चांगला रंगात येऊ लागला. जो हारेल तो त्या झाडाला हात लावून येत होता. आता नंबर प्रियावर आला. ती घाबरतच तेथून उठली. तिचा घाबरलेला चेहरा पाहतच सोनावणे सर म्हणाले.
” जा जा आता का घाबरलीस? तुम्हाला नाही त्या ठिकाणी फिरण्याची खूप हौस आहे ना ?”
सुषमाने तिला नजरेने आधार दिला.धाडस करून प्रिया पाठीमागे गेली.एवढा मिट्ट अंधार पाहून प्रियाला काही सुचेचना ? की नेमकं ते झाड कुठे आहे . ? तिने मागे वळून पाहिले तर सर्वजण खिडकीतून तिच्याकडेचं पाहत होते.त्यामुळे तिला पुढे जावेच लागले.तिच्या तोंडात देवाचे नाव येऊ लागले.ती जशी जशी पुढे जात होती .तसे ते झाड पुढे पुढेच दिसत होते.तिला एक आकृती पुसटशी दिसू लागली.तशी ती किंचाळून पळत सुटली. प्रिया तू तर फारच भित्री निघाली. सर्वजण तिची चेष्टा करू लागले. आता नंबर सुषमा वर आला. तिचीही अवस्था प्रियासारखीचं झाली होती. “पण आता घाबरायचं नाही. असेल तो येईल समोर मग बघू ?”सुषमा धाडसाने पाठीमागे गेली.
तेव्हा तिला ते झाड स्पष्ट दिसत होते. जेव्हा ती झाडापाशी गेली.तेव्हा तिला कोणत्यातरी वेगळ्याच शक्तीचा भास झाला. पण तिने मन घट्ट केले होते. झाडाला हात लावून ती परत माघारी फिरली.तर तिला कोणीतरी पकडले.ती मोठमोठ्याने ओरडू लागली.परंतु तिची वाचा फुटेना.मागे पाहिले तर तिचा ड्रेस झाडाला अडकला होता.तेव्हा तिला कुठे बरं वाटलं.ती तेथून सटकली.आणि थेट फार्म हाऊसवर येऊन पोहचली.सर्व कॉलेजच्या मुलामुलींनी त्या दोघींना वेड्यातच काढले.प्रिया आणि सुषमा मात्र मुकाट्याने सर्व ऐकून घेत होते.
“जाऊद्या नका त्रास देऊ दोघींना .असतो एखाद्याचा स्वभाव भित्रा.”सोनवणे सरांनीच त्या दोघींना समजावून घेतले.आणि प्रेमाने बोलले.
आता सुषमा आणि प्रियाच्या जीवात जीव आला.विश्वासात घेऊन आपण सरांना सर्व प्रकार सांगू ? असं दोघींनी ठरवले.दुसरा दिवस मात्र छान गेला.त्यामुळे त्यांनी कोणाला काहीच सांगितले नाही.त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ लागल्या. आता पुन्हा अशा घटना आपल्या सोबत होणार नाही. असे त्यांना वाटू लागले. परंतु त्यांचा तो आनंद जास्त वेळ टिकला नाही.
रात्र झाली. जेवण झाल्यावर सर्वजण झोपी गेले. प्रिया आणि सुषमा ही गाढ झोपल्या होत्या. त्यातच त्यांना बाहेर कावळ्यांच्या काव काव करण्याचा आवाज आला. प्रियाला जाग आली. प्रियाने सुषमाला हलवले. दोघींनाही तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. रात्रीचे कावळे आले कसे ? दोघींनाही प्रश्न पडला.परंतु त्यांचे बाहेर जाण्याचे धाडस होत नव्हते. परंतु त्या कावळ्यांचा कर्णकर्कश आवाज कानाला सहन होत नव्हता.सगळे मात्र गाढ झोपेत होते .कोणालाच कसा हा आवाज ऐकू येत नाही . दोघींनाही आश्चर्य वाटले .म्हणून हिंमत करून दोघी बाहेर आल्या. तर बाहेर वावटळीने पूर्ण फार्म हाऊसला घेरले होते. सु sssss.. सु sssss..आवाज घुमू लागला. त्या वावटळीमध्ये पालापाचोळा नसून भुंगे उडत होते. सु ssss… आवजानंतर हु ssss.. हू ssss… आवाज येऊ लागला. प्रिया आणि सुषमा दोघीही घाबरून घामाघुम झाल्या.
त्यातून मोठे मोठे हसण्याचे विद्रूप आवाज येऊ लागले. त्या वाळवटीच्या मागे स्मशानभूमीतील तीच बाई उभी होती. ती या दोघींना न्याहाळीत होती. त्या बाईला पाहून प्रिया आणि सुषमाला धक्का बसला. कारण आता तिला चेहराच नव्हता. त्या दोघींच्याही तोंडातून ओरडण्याऐवजी विव्हळण्याचे आवाज येऊ लागले. हळूहळू त्यांची वाचा बंद झाली. त्याच बाईने प्रियाला ओढून नेले. त्या मोठ्या झाडामागे मचाक…. माचाक …..आवाज येऊ लागला .कदाचित त्या बाईने प्रियाला खाल्ले असावे. सुषमाची मात्र खूपच बिकट अवस्था झाली.तिची बोबडीच वळली.आता ती बाई झाडाच्या आडून सुषमाला हाताने खुणावत होती.ती माझ्याकडे ये असे सांगत होती. सुषमाला बरंच काही करायचं होतं परंतु ती पुतळ्यावाणी तिथेच स्तब्ध उभी राहिली. कारण तिच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नव्हती. आता त्या बाईचा हात लांब होऊ लागला आणि तो हळूहळू सुषमाच्या दिशेने येऊ लागला. तो हात सुषमाचा गळा पकडणारच तेवढ्या सुषमाला प्रियाच्या आवाजाने जाग आली.सुषमाने भयानक स्वप्न पाहिले होते.
“अगं सुषमा…आवर की लवकर आपल्याला सहलीला जायचे आहे.”प्रिया उत्साहाने म्हणाली.
” कुठे ? ” सुषमा भेदरूनच बोलली.
“अगं कोकणात .सरांच्या ओळखीचा फार्म हाऊस आहे.”प्रिया म्हणाली.
आता मात्र सुषमाला दरारून घाम फुटला …….
( या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही. कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र ” या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “Whatpp” ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – शितल औटी, जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप छान रहस्यमय
Thank you