विज्ञानकथा -प्रतिपृथ्वी,अवकाशातील अंतरंग
नभाला नेहमीच आकाश , चंद्र , तारे , ग्रह यांचे आकर्षण वाटायचे. चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळण्यात तर ती तासन् तास गुंग होऊन जायची. पौर्णिमेचा चंद्र तर तिला भलताच आकर्षित करायचा. तिथे कोणी राहत असेल का ? आणि जर कोणी राहत असेल तर तेही आपल्या पृथ्वीला असेच पाहत असतील का ? मला जसे चंद्रावर जावेसे वाटते तसे तिथून कोणाला पृथ्वीवर यावेसे वाटत असेल का ? असे एक ना अनेक प्रश्न नभाला पडत असायचे पण उत्तर मात्र एकाही प्रश्नाचे मिळत नव्हते.
सातवीच्या वर्गात शिकणारी नभा गुणी मुलगी होती. वर्गात प्रथम क्रमांकाने पास होणाऱ्या नभाचे एकच स्वप्न होते अवकाश संशोधक बनून नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करायची. आपल्याला जे प्रश्न पडत आहेत त्या साऱ्या प्रश्नांची उकल करायची.
बघता बघता दिवसा मागून दिवस आणि वर्षा मागून वर्षे सरत गेली. आज नभाच्या एका हातात अभियांत्रिकीची पदवी होती आणि एका हातात अंतराळ संशोधन संस्थेचे पत्र. नभा संशोधन संस्थेत रुजू झाली आणि थोड्याच कालावधीत तिने स्वतःची हुशारी सिद्ध केली.
संशोधन संस्थेत चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा अभ्यास जोमाने सुरू होता. या ग्रहांशी संबंधित नवनवीन प्रकल्प राबवण्यात येत होते. त्यांच्या बद्दल माहिती एकत्रित करून ती अभ्यासली जात होती आणि त्याची नोंद करण्यात येत होती.
सगळ्या गोष्टी अभ्यासता अभ्यासता नभाचा स्वतःचाही ग्रह ताऱ्यांचा अभ्यास सुरु होता. सतत तिच्या डोक्यात पृथ्वी बाहेरची दुनिया आणि त्या दुनियेतील रहस्यांबद्दल विचार चालू असायचे. पृथ्वी बाहेर आपल्या सारखेच जीव आहेत आणि एक दिवस ते आपल्याला नक्की भेटतील अशी तिला पक्की खात्री होती .
आज नभाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस होता. नभा ज्या संधीच्या प्रतिक्षेत होती ती संधी तिला आज मिळाली होती. आज अवकाश यान पृथ्वीवरुन अवकाशाकडे झेपावणार होते. नभा आणि इतर काही अंतराळ संशोधक पूर्ण तयार होते त्या यानातून अवकाशात झेपावण्यासाठी. सगळी तयारी झाली आणि ठरलेल्या वेळेनुसार यान अवकाशात झेपावले. सुरक्षित प्रवास करत यान अवकाशात इच्छित स्थळी पोहोचले आणि सर्व शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला.
यान आणि अंतराळ संशोधक दोघेही आपापले काम सुरळीत पार पाडत होते. तिथे मिळणारी माहिती पृथ्वीवर पाठवत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते . आज यान मोहीम यशस्वी करून पृथ्वीच्या दिशेने झेपावणार होते पण ; अचानक यानात काही बिघाड झाला आणि त्याच्या दुरुस्ती साठी सर्व अवकाश संशोधकांना यानातून बाहेर यावे लागले. यानाची दुरुस्ती करण्यात सगळे गुंतले असता अचानक नभाच्या कमरेला असणारा स्टील बेल्ट तुटला आणि नभा यानापासून विलग झाली. सगळेच अचानक घडलेल्या या घटनेने गोंधळून गेले आणि नभाला वाचवण्यासाठी पुढे सरसावले पण ; नभा अंतराळात हेलकावे खात होती. तिच्या नियंत्रणात काहीच नाही हे तिला कळून चुकले. बाकी अंतराळ वीरांनी तिच्या पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ; दुर्दैवाने नभा सगळ्या अंतराळ वीरांसमोरच अंतराळात गुडूप झाली. सगळे स्तब्ध झाले होते. कोणाला काहीच सुचत नव्हते.
पृथ्वी वर संशोधन संस्थेत भयाण शांतता पसरली होती. आपली एक हुशार शास्त्रज्ञ अशा पद्धतीने आपल्या पासून वेगळी होत दूर निघून जाते हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता. सगळीकडे एकच बातमी होती. सगळेच घडलेल्या घटनेने शोकसागरात बुडाले होते.
डोळ्यांवर सूर्याच्या किरणांचा कोवळा प्रकाश पडताच नभा डोळे किलकिले करत पाहू लागली. हळूहळू उठून बसत तिने इकडे तिकडे पाहीले तर काही छोटी मुले तिच्या भोवती गोल करून बसली होती. तिने डोळे चोळत परत इकडे तिकडे पाहीले आणि ती जोरात किंचाळली तशी सगळी लहान मुले घाबरून पळाली आणि दूर झाडामागे लपून नभाला पाहू लागली.
नभा गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. तिला ती जागा अनोळखी वाटत होती. तिने डोक्याला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न केला आणि तिला तिचा बेल्ट तुटलेला क्षण आठवला. ती स्वतःशीच दचकली. तिने आजूबाजूला नजर फिरवली तर ती एका घरासमोर उभी होती. बाजूला झाडांनी व्यापलेला परीसर होता. सकाळची वेळ होती. एकूणच आल्हाददायक वातावरण होते. नभाला लक्षात आले की ती तर पृथ्वीवर उभी आहे.
“म्हणजे मी परत पृथ्वी वर आले तर. माझे सहकारी संशोधक आणि माझे यान कोठे आहे ? बापरे! म्हणजे… मी… मी अवकाशातून सरळ पृथ्वी वर पडले ? ” नभा स्वतःशीच बोलत होती इतक्यात तिच्या पाठीमागून आवाज ऐकू आला.
” पृथ्वीवर नाही नभा तू प्रतिपृथ्वीवर आली आहेस. तुझ्या पृथ्वीवर नाही ” . आवाज ऐकून नभा दचकली पण त्याहून जास्त आश्चर्य तर समोरच्या मुलीचे बोलणे ऐकून तिला वाटले.
“काय? प्रतिपृथ्वी ? म्हणजे ? ” नभाला अजूनही समजत नव्हते की समोर काय घडत आहे .
“हो , प्रतिपृथ्वी . तू तुझ्या आकाशगंगेच्या बाहेर आहेस नभा. दुसऱ्या आकाशगंगेत, परग्रहावर आहेस तू “. हे ऐकताच नभा घाबरून चार पावले पाठीमागे सरकली. तिच्या डोक्यात विचारांनी गर्दी केली. ती घाबरून सैरावैरा पळत सुटली पण ; धावून थकलेली नभा शेवटी एका दगडावर जाऊन बसली आणि फुललेला श्वास नियंत्रणात आणू लागली.
” नभा, अशी घाबरून जाऊ नको. तू ज्या ग्रहावर आली आहेस ती प्रतिपृथ्वी आहे . अगदी हुबेहूब तुझ्या पृथ्वी सारखीच. जसे वातावरण तुझ्या पृथ्वीवर आहे तसेच वातावरण या पृथ्वीवर आहे” . त्या मुलीकडे नभा साशंक नजरेने पाहू लागली.
“मी विभा. मी या प्रतिपृथ्वीची रहिवासी आहे. ही मुले अचानक पळत येऊन मला तुझ्या बद्दल सांगू लागली तशी मी लगबगीने इथे आले. तुला घाबरण्याचे काही कारण नाही नभा. मला तुझी मैत्रीण समज “. एवढे बोलून विभाने आपला हात पुढे केला आणि दचकतच नभाने विभाच्या हातात हात दिला.
” तुला माझी भिती नाही वाटली विभा ? एक परग्रहवासी अचानक तुमच्या ग्रहावर येतो आणि तुम्ही इतक्या सहज ही गोष्ट स्वीकारता म्हणजे नवलच आहे ” . नभाने मनातील शंका बोलून दाखवली आणि विभा हसायला लागली. नभाने हात धरून तिला तिथून घेऊन जाऊ लागली.
“चल माझ्या बरोबर. मी तुला माझी प्रतिपृथ्वी दाखवते”. विभा हसत म्हणाली आणि नभा तिच्या बरोबर चालू लागली. सगळीकडे हिरवाईने नटलेला प्रदेश दिसत होता. रस्ते स्वच्छ होते. रस्त्याच्या दुतर्फा उंच झाडे होती. प्रचंड मोठा आणि पक्का रस्ता होता पण एकही वाहन धावताना दिसत नव्हते. थोडे पुढे आल्यावर नभाला नदी दिसली. नदीचे पाणी देखील नितळ, स्वच्छ होते. निसर्गाचे अतिशय सुंदर आणि विलोभनीय दृश्य नभा अनुभवत होती. पक्षांच्या कानी पडणाऱ्या किलबिलाटाने तर तिची जणू तंद्रीच लागली होती.
चालत चालत दोघीही एका इमारती समोर येऊन उभ्या राहिल्या आणि नभाने उत्सुकतेने आत डोकावले. विभा तिला घेऊन आत आली आणि आत येताच तिचे डोळे विस्फारले. समोर आधुनिक, सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभी होती. अशी प्रयोगशाळा नभाने आजवर कधीही पाहीली नव्हती. तिथे असणारी उपकरणे पाहून तिला समजून गेली की प्रतिपृथ्वीवर राहणारे लोक आपल्या पेक्षा प्रगत आहेत.
विभाने समोर येऊन एका छोट्या यंत्रावरील कळ दाबली आणि नभाला समोरील काचेवर पृथ्वीवरील अंतराळ संशोधन संस्था दिसू लागली. तिच्या सोबत यानातून अवकाशात आलेले सगळे सहकारी पृथ्वीवर परतलेले दिसत होते पण; सर्वांचे चेहरे नाराज दिसत होते. नभासमोरुन सविस्तर वृत्त फिरु लागले आणि ती जागीच कोसळली.
“मला माझ्या पृथ्वीवर परत जायचे आहे. विभा मला परत कसे जाता येईल ? ” नभा हतबल होऊन विचारत होती. विभाने एक दीर्घ श्वास घेतला आणि नभाकडे पाहीले.
“नभा, तू कधीही तुझ्या पृथ्वीवर परत जाऊ शकत नाही. कारण तुझी पृथ्वी इथून खूप दूर आहे. पृथ्वीच काय तुझी संपूर्ण आकाशगंगाच इथून खूप दूर आहे . त्यामुळे तुला परत पाठवणे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे ” . विभा सुस्कारा टाकत म्हणाली. नभाला मात्र रडू कोसळले.
आज दोन महीने होत आले होते. या काळात अंतराळ संशोधन संस्थेला नभा बद्दल काहीही धागा दोरा मिळाला नव्हता तर इकडे नभा, विभा आणि विभाची संपूर्ण टीम नभाला पृथ्वीवर पाठवण्यासाठी मार्ग शोधत होती. नभाची विभा आणि तिच्या टीमसोबत छान मैत्री झाली होती पण ; प्रयोगशाळेत येऊन नभा काचेवर पृथ्वीला पाहत बसायची. विभालाही वाईट वाटत होते . प्रयत्न करूनही मार्ग सापडत नव्हता.
इतक्या दिवसांमध्ये नभाने मात्र प्रतिपृथ्वीचा अभ्यास सुरू केला होता. तिथले तंत्रज्ञान आणि निसर्ग यामधला योग्य समतोल तिला भुरळ घालत होता. आपल्या पृथ्वीवर आपण अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकतो का यावर ती चिंतन करायची.
एक दिवस अभ्यासात मग्न असताना विभा धावत आली आणि नभाला पृथ्वीवर परत जायचा मार्ग मिळाल्याचे सांगताच नभाला आपला आनंद लपवता आला नाही. ती आनंदाने उड्या मारू लागली. नभा, विभा आणि टीम कामाला लागली आणि विभाच्या लक्षात आले की नभाला पृथ्वीवर परत पाठवण्याचा मार्ग जोखमीचा आहे. नभाच्या जिवाला धोका होऊ शकतो. नभाला सांगताच नभा हसू लागली आणि ती तयार असल्याचे तिने सांगितले.
नभाला कृष्ण विवरांमधून जावे लागणार होते. जिथे अंधार असणार होता . वाट बिकट असणार होती. नभाला तिथून पाठवताना तिथल्या वातावरणामुळे कदाचित नभाच्या यानाचा स्फोट होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच विभा आणि टीम यासाठी तयार होत नव्हते. नभाला मात्र घरची ओढ लागली होती. तिने सर्वांना तयार केले आणि आता पृथ्वीशी संपर्क साधण्याचे काम सुरू झाले.
अंतराळ संशोधन संस्थेत अचानक संदेश प्राप्त होऊ लागले आणि सगळे सावध झाले. नीट संदेश समजून घेतल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. नभा जिवंत आहे आणि ती परग्रहावर अडकली आहे. आता ती परत येत आहे म्हणून सगळे खुश झाले आणि नभाला पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
नभा सर्वांना भेटून, सर्वांचे मनापासून आभार मानून यानात बसली. जाता जाता विभाचे पाणावलेले डोळे पुसले आणि परतीच्या प्रवासाला लागली. पृथ्वी आणि प्रतिपृथ्वी वरील सर्वांना नभाची काळजी सतावत होती. विभाने नभाच्या हातात एक घड्याळ बांधले.या घड्याळाच्या माध्यमातून विभा नभाच्या संपर्कात राहणार होती.यानाचा संपर्क जरी तुटला तरी घड्याळामुळे नभा संपर्कात राहील. नभाच्या यानाने प्रतिपृथ्वी वरुन उड्डाण भरले आणि ती अवकाशात झेपावली .
कृष्ण विवरांमधून प्रवास करताना परत नभाचा संपर्क तुटला आणि पृथ्वी आणि प्रतिपृथ्वी वर शांतता पसरली. नभाशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू झाले. विभा नभाच्या हातातील घड्याळाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती पण ; संपर्क होत नाही हे पाहून विभा रडू लागली तर इकडे अंतराळ संशोधन संस्थेत देखील नभाचे सहकारी हताश झाले. अर्धा तास गेला आणि परत संदेश येऊ लागला आणि नभाशी संपर्क पूर्ववत झाला तसा पृथ्वी आणि प्रतिपृथ्वीवर एकच जल्लोष सुरू झाला.
एक महिना झाला होता नभाला पृथ्वी वर परतून. आकाशातील ताऱ्यांमध्ये नभा विभाला शोधत होती आणि इकडे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून हातातल्या संगणकावर विभा नभाला पाहत होती.
टीप: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही . असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
विज्ञान कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा .तुमच्या मित्र परिवारासोबत कथा शेअर करा आणि अशा नवनवीन कथा वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाइटला अवश्य भेट द्या. आमच्या what’s up चॅनेलला फाॅलो करा. धन्यवाद.
लेखिका –सौ. मनिषा उदयसिंह पाटील , पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Nice one!
धन्यवाद
छान वाटली काल्पनिक वैज्ञानिक कथा
धन्यवाद