विनोदी कथा -सोनामाय  

WhatsApp Group Join Now

“सोना माय गेलीsssssss

सर्वांना पटापट कामे आटोपून, तुळजा माता मंदिराजवळ जमायला सांगितलंय पाटलांनी,चला लवकsssss र”,

असा सर्व गावाला निरोप देत जाधवचा गणू गावभर फिरत होता.

“मायsssss,ह्या म्हातारीला आजच म*राचं व्हतं काय, आमवस्या हाय ना आज, अन ते भी सांच्याला मेली, हिला ना गनगोत ना कोनी, आता आपल्यालेच जा लागन..”, शांता चूल पेटवताना स्वतःशीच बोलली.

“आजारी व्हती वं , जाणारच व्हती पर माये दुसऱ्या दिशी जाती आजच मुहूरत देला व्हता काय हिले वरून!”, भाकरी थापत सुनंदाचं चालू.

“आवं कधी नाही तो चेव आल्ता ह्यांना, म्हणलं लेकरं लवकर झोपीव जाऊ वावरात, कुठलं काय वं? आता हितच जातंय सारा चेव ना फेव”, जनावराला पाणी पाजत कुंदा शेवंताला सांगत होती.

“माय आमवस्या ले वावरात कायले जात वं, घर नाय का तुले?”,शेवंता.

“हमं,हाय नं घर हाय, पर जरा जरी खुट्ट झालं तरी बी कानाचे एनतीने लगेच उभे व्हतात ना समद्याईचे, त्याचं काय?”,कुंदा जीवावर आल्यासारखं बोलत होती.

“तुझं माय कायतरीच”,असं म्हणत दोघीही हसल्या.

“ माय लिंबाच्या फोडी कापून ठीवल्या व्हत्या वं लोनच्यासाठी, आता कुठलं माय, जातेत खराब हून, या म्हातारीचा मु*ड*दा बशीवला, जरा बी दम नाय निघाला हिला ”,भांडी लावत शकू ताई म्हणाल्या, तसंच त्यांच्या सासूने आतून सूर लावला, “मी मेल्यावर बी असच बोलशीन काय?”.

“तुम्मी मरता व्हय ! तुमी तर आमाले आडवं करान आंदी”, असं स्वगत बोलून शकू ताई सासूबाईंजवळ जाऊन म्हणाल्या, “ कशापायी असलं बोलताव? ते बी भर आमवसायला, ऱ्हा की चांगल्या 100 वरीस”.

“ हम मं असं फकस्त मला म्हनतीस; पर मनात कवा खपती म्हातारी असच चाललं असन, तुले चांगली वळखून हाय मी”,असं म्हणून शकू ताईच्या सासूबाई पलंगावर आडव्या झाल्या.

“ काय वं काय झालतं म्हातारीले?”, चुलीवरची भाकर पलटत महानंदा बोलली.

“इचारून येतो म्हातारीले , काय झालंत म्हनून; आली मोठी काय झालं इचारनारी, भाकर दे अगुदर, जा लागन तिकडे, म्हातारी कवाच्यान मेली म्हन्तेत. त्यात आज आमवस्या हाय, लायटीचा अत्ता पत्ता न्हाय मसणवाटी कडं. पाटील निस्तच बोंबलते लाईट लावतो म्हनून ; पण करत काहीच न्हाय, अटुप तू बी लवकर अन ये तिकडं”,असं म्हणून सदा पटापट जेवू लागला.

“ अगं ए भवाने, दे की लवकर पिठलं भाकर तुकडा काय असन त्ये, हातातल्या बांगड्या सारं मागं, कितीयेला सांगितलं एवढ्या लवाजमा घालीत जाऊ नगं म्हनून, ऐकायचं तर शिकवलच नाय तुया बा नं ”, बसकर ओढत महादू बायकोला बोलत होता.

“ बा चं नाव काढाची गरजच हाय!”,नाक मुरडत कांची बोलली.

“तोंडाचा पट्टा कसा चालते वं वचावचा आss, तसा हात बी चालीव की जरा, झोपा काढती काय मी एपर्यंत! आता घेतलंय कराया, बा चं नाव घेतलं की कशी झोंबते ; तसा कामाचा उरक ठीव की जरा , दे काय असाल ते जा लागन लवकर. तू पन ये लवकर, नाहीतर बसशीन नट्टा फट्टा करीत, वाजवीन च चांगला नटून बिटून आली तर”,महादू चं चालूच होतं.

“ हमम, कयते म्हनलं तेवढं, कुठे कस जा लागते तर”, कढईतलं पिठलं जोरजोरात पळीने हलवत कांची रागाने बोलली.

“व्हय माहित हाय कितीक शायनी हाय तर, म्हनून तर कांता वहिनीच्या मातीले लिपिष्टिक लावून आल्ती नाय का! असं वाटे तिथच वाजवाव पन आवरलं स्वतःले, आता येच तशी मंग सांगतो”, महादू जेवायला बसला आणि रागाने कांची कडे बघत बोलला.

“ मायावाल्या बहिनी नं देल्ल मले लिपिष्टिक, कुटं म्हनून नेत नाय का काय नाय, मंग लावू कूटं म्हनून लावलं, तर एवढं कायले चिडा लागते”, कांची रडवेल्या आवाजात बोलली.

महादू ने फक्त तिच्याकडे रागाने पाहिलं तशी ती गप्प बसली.

गावात सोनामाय च्या मृत्युची बातमी पसरताच गावातल्या वेगवेगळ्या घराघरातून वेगवेगळ्या माणसांचे असे संभाषण सुरु झाले होते. सर्व जण जेवण, कामे उरकून मंदिराजवळ जमू लागले. खरंतर अश्यावेळी कोणी जेवत नाही, पण सोना माय गेली हे सर्वांना कळेपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि तिच्या मातीला आता उशीर लागणार, घरी येईपर्यंत मोठी आमवस्या डोक्यावर येणार होती, मग कसं जेवायचं आणि दिवसभर शेतात काम करून सर्व मंडळी थकलेली असतात म्हणून सगळ्यांनी जेवण उरकून जायचं ठरवलं.

सोना माय बराच वेळ थंडीत मंदिराजवळ बसून होती आणि त्यातच तिचा जीव गेला होता, पण कोणाला याची कल्पना नव्हती. शेतातून घरी जाणारा आबा मंदिरात दर्शनाला जाताना सोना मायला बोलला. एरवी सोना माय ला आवाज दिला तर ती “कोन हाऊ ?”, अशी उत्तर द्यायची कारण ती अंध होती आणि कानाने पण कमी ऐकू यायचं तिला. पण सोना मायनं उत्तर दिलं नाही म्हणून तो बघायला गेला तर ती बसलेलीच खाली पडली आणि मग त्याने गावांत बोंब ठोकली सोना माय गेली म्हणून..

सोनाबाई सरवदे, गावातली एक चांगल्या घरची गृहिणी होती. तिचं राहणं, वापर स्वच्छ होता. तिला एक मुलगा होता. सासू सासरे नवरा असा तिचा परिवार. दोघे शेतात काम करायचे, मुलगा गावातल्या शाळेत शिकत होता आणि सर्व कुटुंब आनंदाने राहायचं. सगळं काही व्यवस्थित सुरु होतं, मुलगा मोठा होत होता. त्याने तालुक्याला जाऊन शिक्षण घेतलं, म्हातारपणामुळे सासू सासरे काही वर्षात वारले. सोना माय च्या नवऱ्याचं पण कालांतराने निधन झालं, आता सोना माय लेकराकडे बघून जगत होती. पण तरीही ती शेतात काम करून खायची. कसल्या तरी आजाराने सोना माय ला धरलं आणि त्यात तिची दृष्टी गेली, इलाज नं केल्यामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे काही दिवसांनी त्यांना ऐकू येणं पण बंद झालं. अश्या वेळी मुलाने साथ द्यावी तर त्यानेही अंग काढून घेतलं.

सोना मायचं घरदार शेती विकून हा तालुक्याला राहायला गेला आणि सोना मायला वाऱ्यावर सोडून दिलं. तेव्हापासून ती गावात कुठेही राहायची आणि कोणी दिलेल्या भाकर तुकड्यावर जगायची. पण तरीही तिने स्वच्छता सोडली नाही. कोणी काही खायला दिलं तर आधी तिच्या जवळचे भांडे ती धूऊन घ्यायची आणि मगच जेवायची. कोणी सोना माय म्हटलं तर, “कोण हाऊ?”, असं म्हणायची. कुठेही राहिली तरी काही दिवसांनी का होईना पण, गावांत एक सुमन ताई राहायच्या त्यांच्या घरी सोडून मागायची. ‘वकीलीन बाई कडे सोडा’, असं म्हणायची. सुमन ताई सोनामायला जपायच्या. सणा सुदीला तिला आवर्जून बोलावून जेवायला द्यायच्या. तेवढी दयामाया गावात सहसा कोणी सोनामायला जास्त दाखवायचं नाही. अशी हि सोना बाई सर्व गावाची सोना माय झाली.

तिच्या मुलाला तिच्या निधनाचा निरोप दिला होता, तो येतो बोलला तसा सगळ्यांच्या जिवात जीव आला. कारण मुलाने जरी सोडलं होतं तरी सोनामायचा जीव होता लेकरात.

सगळे जण मंदिराजवळ जमू लागले. तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले. पटकन विधी सुरु करावे तर तेवढ्यात महादु पाटलाला म्हणाला , ‘दोन शबुद बोला पाटील’.

पाटील बोलणार म्हणून काही जणांनी डोक्यालाच हात लावला आणि महादू ला खाऊ का गिळू लुक दिला. “ झालं, बसा बोंबलत, या महादुला सापडू दे, पाटलाचा चमचा, कुटतो च याला, कायले त्या पाटलाले बोल म्हनलं! बसा घंटाभर आता”, असं म्हणत सदा महादुच्या नावाने बोटं मोडू लागला.

बोला म्हणताच पाटलाचा आनंद गगनात मावेना. कारण एक तर सोनामायच्या विधींच याला क्रेडिट लाटायचं होतं आणि एवढ्या संख्येत परत गावकरी मिळायचे नाहीत या दुहेरी संधीचा लाभ घेत पाटलाने बोलणं सुरु केलं, 

“तर मंडळी, आज गावावर मोठा बिकट परसंग आला हाय, माझी च न्हाय, तर समद्या गावाची लाडकी आपली माय सोना माय आज आपल्यात न्हाई.. ( रडतो ) ल्लाई दुख झालं मले काय सांगू? म्या तर जेवलो बी नाय ”, असं पाटलाने म्हणताच पाटलाला चांगली एक मोठी ढेकर आली की सगळ्या जणांना हसू आलं पण हसावं कसं म्हणून सर्वांनी तोंडाला हात लावला.

“दुख झालं म्हने याले, त्वँड बगा दुख होनाऱ्याचं. आव, दारात उभी कऱीत न्हवता का भाकर तुकडा देल्ला न्हायी कवा यानं म्हातारीले, अन याले दुख झालं म्हण ”, भाषण सुरु असताना एक बाई हळूच म्हणाली.

पाटील पुढचं बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात,

“आता गे माय कशी गेलीsssssss व तू मले सोडून, आता मी कोनाच्या तोंडाकडं पाहूssssss ? माय कोणाले म्हनू?, परत ये गं तुले पुरनाची पोळी बी खाऊ घातली नाय, कालच चिन्याच्या बाबाले म्हनलं सोनामाय ले पोळी करून देते म्हनून अन आजच जा लागत व्हतं काय वं तुले, अरे देवा तिले पोळी तं खा लागू द्याची व्हती ”, पुळका आल्यासारखी बायजा कुठून तरी पळत येऊन सोना माय जवळ येऊन रडायला लागली. तसंच एकीने टोमणा मारला, “ व्हय माय, ऐका हिचं सोंगाडीचं. सोना माय पुढच्या वर्षी बी गेली असती ना तरीबी हिची पोळी काय तिले भेटली नसती, कशालेच नाटक करती तर काय म्हाईत!”.

“सकाळी सोयाबीन काढाले जाचं व्हतं, आता कसं कराव अन काय करावं, ह्यो पाटील तर उरकता उरकना”, सखाराम ला घोर लागला होता.

“मले भाकरीचं पीठ दळून आणाचं व्हतं आज गिरणी बंद म्हनलं उद्या आणाव; तर हीचं मधात आलं. आता उद्या भाकरी न्हाई भेटली तर नवरा पार मलेच बडवू बडवू शेकते बग”,अशी काळजी मंगल ला लागून राहिली होती.

कोणाचं काय तर कोणाला काय अश्या परिस्थितीत पाटलाचं भाषण काही संपता संपेना. गावकरी चुळबुळ करायला लागले. त्यांना अंत्यविधी आटोपून सकाळी शेतावर कामाला जायचं पडलं होतं, तर पाटलाला किती बोलू आणि किती नाही पडलेलं. विषय सोना माय वरून सुरु झालेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर आला; परत गावातल्या भांडणावर गेला; तरी पण पाटील थांबायचं काही नावं घेईना.

शेवटी एक जण म्हणालाच, “पाटील उरकतं घ्या; हवं तर उद्या आजून पायटी येऊन बसतोत हिथं ; न्हायीतर अंथरून पांघरून घेऊन येताव घरून, हितच झोपताव. सोना माय काय जाईन बिचारी पायटी अनंताला, ती बी झोपून घेईन शेवटाची”, असं उपहासाने बोलल्यावर पाटलाला अंदाज आला आणि त्यांनी नाईलाजानी आपले 2 शब्द 2000 शब्दात संपवले.

पाटलाचं भाषण संपताच मनातल्या मनात सर्वांना आनंद झाला आणि त्यांनी अंत्यविधीची घाई करायला सुरुवात केली.

अंत्यविधीची तयारी झाली. साडी चोयी सर्व पाटलानी स्पॉन्सर केली होती. यावेळेस निवडणुकी साठी उभ राहायचं होतं पाटलाला ग्रामपंचायतीच्या. सगळं झालं , तशी एक म्हणते, “ माय! हिले सोन्याचा मनी घाला लागन नं तोंडात”, असं म्हणताच काही जणी हळूच मागे सरकल्या.

“हिचं पोरगं कवा येते काय म्हाईत! काय इमानाने यायलंय काय, हितच तर रहायते तालुक्याले”, काही बायकांचं कुजबुजणं चालू झालं .

सोन्याचा मणी द्यायचा कोणी? असा प्रश्न उभा राहिल्यावर सदा नं खुनशी डोकं चालवलं आणि म्हणाला, “ गावचे पाटील तुम्ही, सोना माय तुमाले माय सारखी व्हती व्हय ना , तुमाले दुख बी झालं तिच्यासाठी काही बी करता आलं नाय म्हनून,मंग खुद्द सोनामाय नं चं तुमाले संधी देल्ली बगा. घ्या पाटील हा मान तुमीच, द्या सोन्यासारख्या सोना मायले मनी तुम्हीच”, असं म्हणताच, हो हो पाटील घ्या पुढाकार असं म्हणून सारा गाव पाटलावर तुटून पडला.

सदा कडे डोळे वटारत पाटलाने हो म्हटलं आणि पाटलीणबाई ला सोन्याचा मणी आणायला सांगितलं. पाटलीण शेवटी पाटलाचीच, निवळ बारक्यात ला बारीक मणी घेऊन आली, मणी चा आकार बघून पाटलाच्या मनात तिच्या बद्दल आदरच वाढला. मणी आणून तिच्या तोंडात टाकला. “ माय, मनी तर ल्लाई च मोठा आणला वं,जवारीचा दाणा तरी मोठा असते”, एक बाई कुचकं बोलली. सर्व झालं आता तिरडी वर प्रेत घ्यायची वेळ झाली. पण तरीही सोनामायचा पोरगा येईना..

तिचा मृत्यू बऱ्याच तास आधी झाला असल्यामुळे तिचं शरीर अकडत चाललं होतं. त्यामुळे कसं बसं तिला सरळ केलं पण तरीही ती पूर्णपणे सरळ होतं नव्हती. मग गावकर्यांनी तिला आहे तस तिरडी वर झोपवलं आणि अजून थोडी वाट बघू मुलाची म्हणून थांबले.

“ कसला उलटा काळजाचा असन वं! माय मेली तरी बी पोरगं लवकर येईना झालंय”, कुंदा कुजबुजली.

“तरीबी पोरगं चं पाह्यजेल सारायले , घ्या म्हणावं आता, पोरगी असती तर माय साठी आली तरी असती बिचारी. आता मलेच तर दोन पोरींवर तिसरं पोरगं व्हते, का काय व्हते, माहित नाय”, शेवंता चं तिसरंच चालू.

“पाटील ल्लाई झालं आता उचला सोनामायले, तिचं पोरगं येईन तवा येईन, मले शेतात जायचं हाय पाणी सोडाले”, असं म्हणून हरिभाऊ नं पुढाकार घेतला.

सगळ्यांनी होकार देऊन तिरडी उचलली, सर्व जण सोनामायला निरोप देण्यासाठी स्मशान घाटाकडे निघाले. अमावस्या ची रात्र होती, सगळीकडे काळा कुट्ट अंधार, थंडीचे दिवस, त्यात गावाकडे रानामध्ये जास्तच अंधार असतो. टॉर्च लावून, काहीजण मशाली घेऊन सोनामायला खांद्यावर घेऊन चालले होते, मागून बायकांचा रडण्याचा आवाज रातकीड्यांच्या सुरातल्या आवाजात मिसळून काहीतरी दुसराच राग तयार करत होता, बायकांच्या रडण्याचा कर्कश आवाज ऐकून रातकिडे पण बिचारे काही वेळाने गप्प बसले. कोणी म्हणे,‘राम नाम सत्य है’, तर अंधार पाहून कोणी मनातल्या मनात राम राम म्हणे, कोणी भीतीने मारुतीचं नाव घेत होतं. पाटील, सदा, महादू, सखाराम यांनी खांदा दिला होता. बाकी सर्वजण एकमेकांना खेटून एकमेकांच्या आधाराने चालत होते. तेवढ्यात घाईघाईनी बांधलेल्या तिरडीची हळूच एक गाठ सुटली.

रस्त्यात एका ठिकाणी थांबवून विसावा दिल्या गेला. तिरडीची एक गाठ सोडावी लागते म्हणून एकाने नेमकी जी गाठ सुटली त्याच्या समोरच्या बाजूची दोन गाठ सोडून एक गाठ कापली.

 परत तिरडी उचलून सर्व जण निघाले. स्मशानाकडे जात असताना तिरडी हालत होती आणि ती सुटलेली गाठ हळूहळू सैल होत गेली ज्याची कल्पना गावाकऱ्यांना नव्हती. ती आणि कापलेली गाठ त्यामुळे तिरडीचा खालचा भाग सैल झाला आणि भर रानाच्या मधात ती गाठ निसटून सोनामायचं प्रे*त तिरडीवरून निसटलं आणि अडकून पुढच्या बाजूस झुकल्या गेलं आणि तसंच पाटलाच्या पाठीवर पडलं. पाटील घाबरून तसाच प्रे*त खांद्यावर घेऊन बों*बलत  पळत सुटला आणि त्याच्या मागे काही गावकरी पळत सुटले. बायका आणि माणसं घाबरून दूर पळू लागली. एकच गोंधळ उडाला. सोनामाय चे हात घट्ट पाटलाच्या मानेवर बसले होते. कसं बसं पाटलाने स्वतःला सोडवलं आणि ते प्रे*त मटकन तिथेच खाली पडून तसंच बसलं.

तिला बसलेलं बघून सर्व गावकऱी भितीने ओरडू लागले.

आधीच तिचं शरीर सरळ झालं नव्हतं आणि ते घसरलं तर ते मांडी घालूनच खाली बसलं. असं वाटत होतं अंधारात दुर कोणीतरी शेतात बसलेलं आहे आणि ते दृश्य इतकं  भयानक होतं की कोणाची हिम्मत होईना जवळ जायची. पाटील तर लांब जाऊन झाडाच्या आडोषाला बसला. त्याची तर बोबडीच वळली होती. 

आता काय करायचं, प्रेत तर न्यावच लागणार म्हणून चुळबुळ सुरु झाली. कोणी म्हणे तिची इच्छा अपूर्ण राहिली, काहीतरी कबूल करा तर कोणी म्हणे पोरगं आलं नाही म्हणून वाट बघतेय. पण तिरडी नीट बांधली गेली नाही हे कोणालाच माहित नव्हतं.

कशीतरी हिम्मत करून एकमेकांचा हात धरून चार जण गेले तिला उचलायला. जवळ जाताच हवेने तिचे केस उडू लागले आणि तिच्या नाकातले कापसाचे बोळे खाली पडले तसेच हे धूम ठोकत पळत आले. त्यांना पळत येताना बघून बायका जोरजोरात ओरडायला लागल्या अजून सर्व जण दूर गेले.

सोनामाय ची इच्छा राहिली काहीतरी म्हणून ती अशी करायला लागली यावर शिक्को मार्तब झाले आणि गावकर्यांनी पाटलाला अक्षरशः हातात उचलून आणले.

“पाटील काहीतरी सबुद द्या सोनामायले, तरच ती आडवी व्हईन तिरडीवर”,

असं गावकर्यांनी म्हणताच पाटलाने तिच्या नावाची गावात चावडी बांधतो म्हणून कबूल केल्यावर लोकांच्या जिवात जीव आला. 

परत काहीजण हिम्मत करून सोनामाय जवळ देवाचं नाव घेत घेत गेले आणि घाबरतच तिला तिरडीवर पुन्हा बसवून थरथर कापतच स्मशानाकडे निघाले.

प्रे*त स्मशानात आणल्यावर सर्व विधी आटोपल्यावर मुखाग्नी द्यायची वेळ आली तसंच सर्वांनी पाटलाकडे पाहिलं. पाटील आधीच भेदरलेलं होतं, ते नाहीच म्हणत होतं तरी गावकर्यांनी त्यांच्या हातात टेम्बा दिला. पाटलाने भितभितच सोनामायला मुखाग्नी दिला. तसेच सर्व जण रिलॅक्स झाले.

बराच वेळ थांबून सर्व जण निघायला लागले तर चितेतून कडकन असा आवाज झाला आणि लाकडं जळल्यामुळे बाजूला होऊन सोनामायचा एक हात चितेतून बाहेर आलेला उभा झाल्यासारखा दिसू लागला. तसें पुन्हा सगळे घाबरले. ‘आता हीचं काय राहिलं?’, असं गावकर्यांचं बोलणं सुरु झालं. कोणी म्हणे शेवटचं बाय करते कोणी म्हणे जाऊ नका म्हणते तर कोणी काहिही तर्क काढत होते.

“ काय वं खरंच मेली व्हती काय? नायतर कळलं नसन आबाले”, असा एकीने तर बाउन्सर चं मारला. तसंच तिला कुंदा ने गप्प केलं. सर्व जण आपापल्या घरी जायला निघाले तसा तिचा मुलगा तिथे येताना त्यांना दिसला. तो रडत होता. 

“आता कायले रडते वं हा? सारं झाल्यावर आला. गेली ते साराईले घाबरवून, जाय तुलेच हात दाखवायली तुयी माय , शेवटचा भेटून ये तुया मायले”, असं म्हणून सखाराम सकट सर्व मंडळी घराकडे निघाली आणि तिचा मुलगा एकटाच स्मशानाकडे निघाला.

आणि फायनली सोनामाय अनंतात विलीन झाली…

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

2 thoughts on “विनोदी कथा -सोनामाय  ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top