आयुष्याचा प्रत्येक दिवस जगतांना आपल्याला असंख्य नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो. कधी अपयशाचं शल्य असतं तर कधी अपमानाचा दु:ख सुध्दा असतं. अशा वेळी मनात सतत काहीना काही विचार सुरू असतात. तर कधी बराचसा वेळ आपण टिव्ही बघण्यात, मोबाईल मध्ये, कधी कधी उगीच बडबड करण्यात घालवत असतो. कोणाच्या मनाला लागेल असं बोलत असतो, तुमच्या अशा वागण्याने आयुष्यात दु:ख निर्माण होतात. विनाकारण बडबड केल्यास घरात कलह निर्माण होतात. मन अस्वस्थ राहून मनात विचारांचा सारखा कलकलाट सुरू असतो. या गोंगाटाच्या मागे न लागता आपण मौन पाळून आपला अंतर्गत आवाज ऐकला तर? मन शांत व्हायला वेळ लागणार नाही. मौनामुळे विचारांमध्ये एकाग्रता येऊन मानसीक शांती वाढते. त्यामुळे तुमच्यातली उर्जा वाढायला मदत होते. मौन आणि मौनाची शक्ती तुम्हाला माहित आहे का? याच मौना विषयी आपण या लेखात महत्वाची माहिती पहाणार आहोत.
मौन म्हणजे काय?-
तास दोन तास तोंडाने न बोलता शांत रहाणे म्हणजे मौन नव्हे. ते झालं मौनाचं बाह्यरूप! ते मौनाचं अंतरंग किंवा गाभा नव्हे. मौनाचा बोलण्या आणि न बोलण्याशी संबंध नाही. त्याचं मर्म बोलण्यापलीकडे आहे. मनुष्यप्राणी आपली शक्ती बोलण्यात जास्त खर्च करतो. अग्नितत्व आणि वायुतत्व ही दोन तत्वं विशेष करून बोलण्यात खर्च होतात. त्यामुळे तुम्ही दिवसभरातील जेवढे तास बोलण्यात खर्च कराल तेवढी तुमची उष्णता वाढून तुमची शक्ती विनाकारण खर्च होते. मौन ही एक साधना आहे आणि ही पाळायची असेल तर अचूक आणि आवश्यक तेवढेच बोला. जोराने बोलणं, कर्कश्शपणे बोलणं, उच्चार शुध्द नसणं ही आपल्यातली अशुध्दी काढावी. भूतकाळाच्या घटनांमध्ये आपण अडकून पडलेलो असतो. आपलं मन भूतकाळात जाऊन तिथलं संभाषण सुरू ठेवतं. हे जे स्वत:शीच बोलणं असतं ते आधी थांबवायला हवं. मनातल्या मनात सुरू असलेल्या बोलण्यानेही पुष्कळ शक्ती खर्च होते. आपल्या मनात विचार-भावना-कल्पना यांचं तांडव असतं. परस्परविरोधी इच्छांच व्दंव्द चालू असतं. यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर मौन आवश्यक आहे.
मौनाची शक्ती म्हणजे काय? –
मानवी प्रवृत्तीनुसार दुसऱ्या व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या गोष्टी इतरांना कथन करण्याचे काम आवडीने केले जाते. एकटे असतांना तुमच्या मनात याच गोष्टी वारंवार पिंगा घालतात. अश्या गोष्टी सांगण्याची व ऐकण्याची क्रिया आयुष्यभर चालूच राहीली तर तुमचा वेळ, तुमचं आयुष्य, तुमची विचारसरणी, तुमची समज व तुमचे मौल्यवान क्षण तुम्ही गमावून बसाल. तेव्हा अशा नकारात्मक वातावरणातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. कुटुंबातले कलह, पती-पत्नीमधील वाद, जगात होणारे दुष्कृत्य या सर्व गोष्टी विचार न करता बोलण्यामुळे घडतात. जोवर आपण व्यर्थ बोलत राहू तोवर मन अशांत राहील. पण जेव्हा आपण मनाने शांत होऊ तेव्हा तोंडातून जे निघेल ते मोजके व चांगलेच असेल. मौनामुळे आपली उर्जा वाढते. संकटांना शांतपणे सामोरे जाण्याची तसेच स्पष्टपणे विचार करण्याची वृत्ती वाढते. हेतुपरस्पर शांतता देखील आपल्यामध्ये जास्त जागरूकता निर्माण करते.
मौन वापरण्याचे मार्ग
प्रभावी संबंध निर्माण करणे – तुम्ही कमी बोलून जास्त ऐकले तर नात्यांमध्ये विश्वास वाढून प्रभावी नातेसंबंध निर्माण होतील.
एका बिंदूवर जोर देणे – जास्त शब्द वापरल्याने तुमचा मुद्दा तुम्ही गमाऊ शकता. उलट मौन असल्यास किंवा कमी बोलल्यास तुमचा आवाज अधिक सामर्थ्यवान असेल.
इतरांना सक्षम करणे – जेव्हा तुम्ही एखादी नवीन कल्पना सगळ्यांसमोर मांडता तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब न करता तुमच्या टीमच्या सदस्यांना त्या कल्पनेवर त्यांचे विचार मांडायला सांगा. त्यामुळे तुम्हाला आदर मिळेल आणि तुमची शक्ती वाढेल.
उत्तर मिळणे – प्रश्न विचारा व उत्तरासाठी थांबा. स्पष्टीकरण किंवा सबब पुढे चालू ठेवू नका. त्यामुळे तुमच्या संदेशाची ताकद कमी होते.
तुमच्या मनावर लक्ष केंद्रित करा – मौन रहाण्यासाठी वेळ काढा. सकाळी उठल्यावर काही वेळासाठी मौन पाळा.
मौनाचे फायदे
1. उत्तम संभाषण – जेव्हा तुम्ही स्वत: शांत राहून समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देता तेव्हा लोकांना तुमच्याशी बोलणे सोपे जाते. अशा प्रकारचे संभाषण नातेसंबध दृढ करणारे असते.
2. उत्तम प्रतिसाद – तुम्ही मौनाचा सराव केल्यास समोरच्याला काहीही प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही बोलण्यावर लक्ष केंद्रीत करू शकता. आणि अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकता.
3. माइंडफुलनेस आणि आत्मकरुणा –इतरांशी व्यवहार करतानाच मौन प्रभावी किंवा फायदेशीर नसते तर तुमच्या सर्वांगीण कल्याणासाठी सुध्दा ते उत्तम आहे. शांततेमुळे तुमच्या सजगतेला चालना मिळते. याचाच अर्थ सहानुभूती, दयाळूपणा, व समजूतदारपणाने विविध परिस्थिती हाताळणे होय.
4. शारीरिक आरोग्यासाठी – रक्तदाब पातळी कमी करण्यासाठी आणि एड्रेनालाईन व कोर्टिसोल पातळी नियंत्रित करून तणाव कमी करण्यासाठी शांतता उत्तम आहे. यामुळे नवीन पेशी वाढून मेंदूचे रसायनशास्त्र सुधारते. शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
5. सुधारित सर्जनशीलता- मौन हा सर्जनशीलता सुधारण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण या वेळी तुम्ही सद्गुणांचा अभ्यास करता. अशा वेळी शांततेची उपचार शक्ती तुम्हाला तुमचे विचार एकत्रित करण्यात मदत करते.
मौनाची शक्ती कशी अंगीकारायची –
मौन हे नैसर्गिकरित्या येत नाही. विशेषत: जेव्हा बाह्य गोष्टी मन विचलीत करण्याऱ्या असतात तेव्हा मन अस्वस्थ असतं. पण जर तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर तुम्ही स्वत:मध्ये शांतता निर्माण करू शकता. यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत.
1. ध्यान– मौन अंगीकारायचे असेल तर त्यासाठी सर्वात प्रभावी व सोपा मार्ग म्हणजे “ध्यानाचा” सराव करणे. या साठी तशी सकाळची वेळ उत्तम असते. पण सकाळी नाही जमल्यास दिवसभरात कधीही तुम्ही थोडासा वेळ काढून ध्यानाचा सराव करू शकता.
2. कमी बोलून जास्त ऐका– लोकं ऐकण्यासाठी नाही तर बोलण्यासाठी संभाषण करतात. जेव्हा मनात असंख्य विचार भरलेले असतात तेव्हा मौन पाळणे कठीण होतं. परंतु जर तुम्ही चांगले श्रोता झालात, आणि तुम्ही संभाषणात गुंतत नसाल तर तुम्हाला मौनाचा फायदा होऊ शकतो.
3. आजूबाजूचा आवाज कमी करा – जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तेव्हा आजूबाजूचे आवाज कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेलच परंतु तुमची क्षमता सुध्दा वाढेल.
4. आपल्या दिवसाची सुरवात मौनाने करा – उठल्याउठल्या मोबाईल बघणे, टिव्ही बघणे, चहाचा कप घेऊन पेपर वाचणे हे सर्व करण्याऐवजी तुम्ही निवांत आणि शांत बसायला हवं. त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.
पुर्वीच्या काळी ऋषीमुनी एकांतवासात राहून ध्यान करत. महावीरांनी 12 वर्ष व महात्मा बुध्दांनी 10 वर्ष मौन धारण करून ज्ञान प्राप्त केलं. पण आवश्यक तेच बोलून तुमच्यतली उर्जा तुम्ही वाचवू शकता. याच साठी मौनाचा सराव करून या जगात राहूनही तुम्ही मौनाचे फायदे मिळवू शकता.
लेखिका – सोनाली करमरकर
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
Nice information
Very nicely written
खूप सुंदर लिहिले आहे….
अभिनंदन….
Well written
Khup chan mahiti purn lekh…
Chaaan khup chaan
खूप छान. अप्रतिम लेख 👌🏻👌🏻
खूपच छान