चला तर मग बचतीकडे वळूया ( money saving tips for travel in Marathi ) :
रोज रोज तोच ठरलेला दिनक्रम ! नवरोबांची ऑफिसची घाई , मुलांची शाळा , बायकांचे तर स्वतःचे ऑफिस सोबत घर आणि मुलं यांना संभाळून सगळे करायचे ! हे रुटीन कुठेतरी थांबावं आणि जरा 8 -10 दिवस कुठेतरी भटकून यावं असं नाही म्हटलं तरी मनात येऊन जातच ! हो ना ?
सहलीला जाणे आणि मनसोक्त फिरणे हा खरतर सगळ्यांचा आवडीचा विषय आहे . स्वतःच्या व्यस्त कामामधून दूर जाव , मग थंड हवेचे ठिकाण असो किंवा बर्फाचे डोंगर असो , समुद्र किनारा असो किंवा अगदी जंगलात प्राण्यांच्या शोधात रात्र रात्र जागून काढायची असो कुठेतरी जिथे ऑफिस चे काम नको , मुलांचा अभ्यास नको आणि सकाळ – रात्रीच्या स्वयंपाकाचा प्रश्न नको ! बरोबर ना ? पण या सहलीला जायच तर प्लॅनिंग नको का ? कसलं म्हणजे अर्थात आधी पैशाचं ! आजच्या लेखामध्ये या सहलीला जाण्यासाठी पैशाचे गणित कसे मांडायचे ते बघू .

ट्रीप च्या खर्चाचे एकूण नियोजन : ( Plan a budget for trip )
ट्रीपला जाण्याचे बरेचदा मनात असते पण ठिकाण , ट्रीप किती दिवसांची असेल , तिथला राहण्याचा खर्च , खाण्याचा खर्च , खरेदीचा आनंद घेताना येणारा खर्च , विविध ठिकाण पाहताना लागणारा टिकीटांचा खर्च या सगळ्याचा विचार केला तर आकडा मोठा होत जातो.
आणि मग लक्षात येत अरे सध्या अमुक ठिकाणी जाणे जरा अशक्य आहे ! आपण ठिकाण थोड अलिकडचे शोधायचे का ?
ट्रीप चे नियोजन ( How to do a travel planning ?)
- सर्वात आधी तुमचे ट्रीपचे ठिकाण ठरवा . या ड्रीम डेस्टिनेशन ला जाताना किती दिवस रहायला आवडेल हे पक्के करा .
- प्रवासाचा आनंद विमान , रेल्वे नी घ्यायचा हे ठरवणे गरजेचे आहे कारण त्याचा आणि ट्रिपच्या खर्चाचा थेट संबंध येतो . त्यावरून खर्चाचे गणित चांगलेच वर – खाली होऊ शकते. ( plane or railway fare )
- आता जी काय खर्चाची रक्कम असेल ती एक झटक्यात बाजूला काढून ठेवणे शक्य नाही. तेव्हा किमान काही महिने आधीपासूनच यावर काम करायला सुरू करा.
ट्रीप च्या नियोजनासाठी पैसे बाजूला काढायला या टिप्स नक्की उपयोगी पडतील.
चला तर मग बचतीकडे वळूया ( money saving tips for travel in Marathi ) :
- सर्वात पहिले एक छोटा बचत बॉक्स ( small saving box ) तयार करा , खास ट्रीप साठी . त्यात किमान सहा महीने तरी पैसे वाचवून टाकत चला .
- दिवसभरात किती पैसे गरज नसताना खर्च केले याचा अंदाज घ्या . मग आठवडाभराचा आणि मग महिन्याचा . हा अवाजावी खर्च पाहता आपण किती पैसे वाचवू शकतो याचा एकूण हिशोब तुम्हाला लागेल.
- गरज नसताना केलेली शॉपिंग : अगदी गरज नसताना फक्त आवडला म्हणून घेतलेला ड्रेस असू शकतो . एक वर दोन फ्री अशी ऑफर सुरू होती म्हणून घेतलेले शर्टस् असू शकतात . याचे पैसे खर्च केले नसते तर कदाचित 5 ते 6 हजार तर आरामात वाचवू शकलो असतो. असा विचार केला तर ?
- अति हॉटेलिंग टाळण्याचा प्रयत्न करा :
हॉटेलिंग किंवा आजकालच्या मोबाइल ॲप मुळे एक तासात पाहिजे तो खाण्याचा पदार्थ हातात मिळतो. हा खाण्यावर होणारा खर्च एकदा तपासून बघा . आठवड्यातून 4 वेळा बाहेरचे खाणे होते का ? तसे असेल तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ही बाब काळजीची आहे. गरज नसेल तर घरगुती जेवणावर भर द्या. थोडा बदल हवा म्हणून एखादेवेळी हॉटेलमध्ये जाऊन जेवणे हे साहजिक आहे. मात्र काही आठवड्याचे आणि महिन्याचे हॉटेलचे बिल 7 ते 8 हजार होत असेल तर ट्रीप आणि ट्रीपचा छोटा बॉक्स आठवा .
- अनावश्यक खर्च कमी करा :
वीकेंड चे मल्टीप्लेक्स मधील सिनेमे दर आठवड्याला पाहणे होत असतील तर यातही दर महिन्यात होणारा खर्च तुम्ही नक्की वाचवू शकता . शिवाय मल्टीप्लेक्स चे सिनेमे म्हणजे पॉपकॉर्न तर आलेच . म्हणजे एकाला लागून एक खर्च वाढतच जाणार . शिवाय हे सगळं होऊन , सिनेमा काही विशेष नव्हता असं म्हटलं म्हणजे झालंच ! गमतीचा भाग सोडला तर खरच या सर्वात होणारा खर्च देखील ट्रीप साठी सहा महीने प्रयत्न म्हणून टाळून पाहू शकता .
- क्रेडिट कार्ड ही सुविधा म्हणून वापरा , सवय म्हणून नाही ( use credit card as a facility , don’t make it habit )
क्रेडिट कार्ड असल्याचा फायदा कमी करून पहा. खरेदी साठी आजकाल क्रेडिट कार्ड आहे म्हणून मागे पुढे न पाहता मोकळ्या हाताने खरेदी केली जाते. क्रेडिट कार्ड वर असणाऱ्या ऑफर चा फायदा मिळतोय मग कशाला विचार करायचा , दोन पैसे वाचताय असा बघून खरेदी केली जाते . मात्र याचा नीट विचार करून ठरवून क्रेडिट कार्ड कमी वापरायचा आणि अगदी गरज असेल अशाच ठिकाणी वापरायचे असे मनाशी पक्के करा. कदाचित महिनाभरात बरीच रक्कम वाचली असे वाटू शकेल.
- गरज नसताना वस्तूंची साठवणूक करू नका.
किरकोळ खर्च वगळता , गरजेच्या खाण्या – पिण्याच्या गोष्टी सोडल्या तर उगाच वस्तूंची साठवणूक करून ठेवतोय का याचा एकदा विचार करा . कालांतराने याच गोष्टी एक्स्पयरी डेट निघून गेली म्हणून फेकण्याची वेळ येते तेव्हा पैसे ही वाया जातात याचे दु:ख होते आणि खाण्याच्या वस्तु फेकल्याचे ही दुःख होते. तसंही आज काल 15 मिनिटांच्या आत किराणा घरपोच आणून देणारी बरीच मोबाइल ॲप उपलब्ध आहेत तेव्हा गरजेप्रमाणे साठवणूक करणे केव्हाही योग्य .
- महागड्या भेटवस्तू पेक्षा कलात्मक पण तुलनेने स्वस्त वस्तु शोधा, पर्यायाने छोट्या उद्योगांना आर्थिक हातभार लागेल.
दरवेळेस महागडे – ब्रॅंड चे भेटवस्तू देण्याऐवजी होम मेड किंवा हाताच्या कला – कुसरी चा वापर करून बनवलेली भेटवस्तू देऊन पहा ,यामुळे कदाचित तुम्हाला काही तरी अद्वितीय कलाकुसर अनपेक्षितपणे मिळून जाईल. त्यामुळे नकळतपणे आजूबाजूच्या माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळेल, छोट्या उद्योगांना आर्थिक हातभार लागेल. अर्थात तुमच्या पैशाची बचत होईल.
- मुलांचे अवाजवी हट्ट पुरवत असाल तर थोड विचार करा. ( think before fulfilling child’s excessive demand ) :
मुलांचे अवाजवी हट्ट पुरवत असाल तर महिन्याचे त्याचे ही गणित तपासून बघा . लहान मुलांच्या अनेक मागण्या घरातून अगदी सहजपणे मान्य केल्या जातात. कधी कधी केवळ हट्ट पुरवण्यासाठी आई वडील पैशाचा विचार न करता वस्तु खरेदी करून देतात. मुलाना त्या वस्तूची किमत ही नसते अस वय असते मात्र ही वस्तुस्थिती पालक म्हणून मोठ्याना समजणे आवश्यक आहे . अशा महागड्या आणि हट्ट पुरवायचा म्हणून अनेक वेळा पैसा पाण्यासारखा उडवला जातो.
- इतर यूटिलिटि बिलाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा ( try to spend less money on utility bills ) :
फोन , इंटरनेट , विविध ॲप चे दरमहा येणारे बिल यावर होणारा खर्च जितका कमी करू शकाल तितका करण्याचा प्रयत्न करा.
- चुकीच्या सवयी वर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. ( spend less money on wrong habits )
काही चुकीच्या सवयीवर जर महिन्याचा खर्च अधिक होत असेल तर त्या सवयी टाळणे आवश्यक ठरेल. बऱ्याच जणांचा धूम्रपान आणि इतर गोष्टीवर खर्च होत असतो . या सवयी मुळे पैसा खर्च होतोच शिवाय प्रकृतीवर देखील दुष्परिणाम जाणवतात. या गोष्टीसाठी दिवसाचा खर्च , आठवड्याचा खर्च हा तपासल्यास प्रकृतीला त्रासदायक अशा गोष्टीवर आपण किती पैसे खर्च करतो याचा अंदाज येईल.
तेव्हा हे सगळे मुद्दे आणि खर्च एका कागदावर लिहून घेतल्यास कदाचित बऱ्याच गोष्टी मधून पैशाची बचत करता येऊ शकते हे लक्षात येईल. यातील काही खर्च कमी झाल्यामुळे तर तब्येतीच्या तक्रारी देखील कमी होतील आणि महिना अखेर वाचविलेल्या पैशाची एकूण रक्कम बघता पुढच्या पाच महिन्याच्या रकमेचा अंदाज ही येईल.
ही बचत नक्कीच तुम्हाला ट्रीप च्या आर्थिक नियोजनाच्या समिकरणामध्ये मदत करेल .सोबतच बचतीच्या सवयी ची सुरुवात देखील होईल. ड्रीम डेस्टिनेशन भारतामधील असो किंवा भारताबाहेरील असो .आर्थिक नियोजन हे बचतीच्या पायरी पासूनच सुरू होते . दरमहा काही पैसे बाजूला ठेवत गेलात तर , बचत करत गेलात तर करमणुकीचा हा फंड (छोटा बॉक्स ) ट्रीप चा आनंद द्विगुणित करेल . शिवाय इतरत्र कुठेही अत्यावश्यक कारणासाठी जमवलेला पैसा (इमर्जन्सी फंड) बचत म्हणून बाजूला राहील आणि खऱ्या अर्थाने इमर्जन्सी साठीच वापरला जाईल , ट्रीप साठी नाही !
आजचा लेख money saving tips for travel in Marathi कसा वाटला नक्की कळवा . असेच काही नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू. माहितीपर असेच अनेक लेख आणि कथा वाचण्यासाठी “लेखक मित्र “ ला नक्की भेट द्या आणि व्हॉटस् ॲप चॅनल ला जॉइन व्हा.
धन्यवाद.
लेखिका – सौ. वैशाली जोशी पाठक, पुणे