भविष्यासाठी पैसे राखून ठेवायचा विचार करताय ? मग या काही टिप्स तुमच्यासाठी ! l Money Saving Tips in Marathi 

WhatsApp Group Join Now

आर्थिकदृष्ट्या भविष्याचा विचार करताना समाजात दोन मतप्रवाह दिसून येतात . त्यापैकी एक म्हणजे कमी कालावधीचा विचार करून गरजा आणि इच्छा पूर्ण करणारे , दुसरे म्हणजे दीर्घ कालावधीचा विचार करून गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी पैशाचे नियोजन करणारे ! अर्थात कोविड नंतर लोकांची विचार करण्याची दिशा आणि दृष्टिकोण बदलला आहे. पैसे खर्च करण्याच्या वृत्तीकडे लोकांचा ओढा वाढत चालला आहे. मात्र पैसा खर्च करण्यासाठी तुमच्याकडे पैसे असणे आणि मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे . तेव्हा या लेखामधून  “सेव युवर मनी अँड मनी विल सेव यू ! ” अर्थात भविष्यासाठी पैसे राखून ठेवायचे हे कसे साधता येईल या बद्दल आजच्या लेखामधून जाणून घेऊ . 

  1. उत्पन्न आणि खर्च याचे समीकरण : 
  • घरातील पैसे कमावणाऱ्या व्यक्ती आणि मासिक घर खर्च याचा हिशोब सरळ सरळ असतो. 
  • पैसे येणार म्हटल्यावर खर्चाची यादी तयार असते . मात्र बरेचदा मासिक पगार संपला तरी यादीमधले काही मुद्दे राहून जातात. असे का होते ? 
  • यामागचे कारण काही अवास्तव खर्च असतो किंवा अचानक काही गोष्टी समोर आल्यामुळे न टाळता येणारा पण आवश्यक खर्च म्हणू शकतो.
  • उत्पन्न जितके आहे त्याप्रमाणे गरज आणि इच्छा यांची प्राधान्यता लक्षात घेऊन क्रमवारी केली तर आवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठी पैसे काढून ठेवणे सोपे होईल. वयोमानानुसार शिक्षण , आरोग्य , लग्नकार्य , नवीन घर , गाडी अशा अनेक जाबबदारी साठी प्राधान्यता देऊन आर्थिक निर्णय घ्या. 
  • शिवाय मानसिक स्वास्थ्य ही महत्वाचे आहे. अमुक एक खर्चाचा अध्याय पूर्ण झाल्यानंतर कुटुंबासाठी गरजेची वस्तु किंवा कुटुंबाच्या हौसे मोजे साठी केलेला खर्च हा मानसिक समाधान देऊन जातो.
  • तेव्हा उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवता आला तर बचतीकडे वळता येऊ शकेल. 
  1. बचतीची सवय आणि महत्व : 
  • बचत करणे आणि बचतीची सवय लागणे याचे महत्व जितक्या लवकर समजेल तितके उत्तम ! कमी वयात लागलेली ही सवय आयुष्यात पुढे जाऊन मोठ्या मोठ्या गोष्टी सहजपणे हाताळायला मदत करू शकते. 
  • अगदी पॉकेटमनी मधून मिळालेले ₹ 50  पैकी  ₹ 20 जरी बाजूला काढायला लहान मुलांना शिकवले तर पैसे हाताळणे आणि योग्य कारणासाठी वापरणे या सोप्या पण महत्वपूर्ण गोष्टी शिकवू शकतो. तसेच बचत केलेल्या पैशाचा वापर तशाच काही अति महत्वाच्या वेळी वापरायला शिकवून बचतीचे महत्व सांगू शकतो.
  • आजकाल मोठ्या पगाराची नोकरी हा कुतूहलाचा विषय राहीला नाही कारण मिळणारा पगार तरीही पुरत नाही असे म्हणणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. मग बचत कशी करणार ?  तेव्हा  ₹ 100 मधून टक्केवारीने पैसे खर्च करत गेला तर कदाचित हातात ₹ 30 ते ₹ 35 % उरतील .
  • हे बचत केलेले पैसे आज ना उद्या तुम्हाला गरज पडेल तेव्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचे बळ देतील. 
  1. गुंतवणूक आणि परतावा :

अ . गुंतवणूक

  • बचत तर करायची ठरली आता गुंतवणूक कशी आणि कुठे करणार ? 
  • तुम्ही साठवलेले पैसे आहे तसे राहणे आणि वाढविणे ही गुंतवणुकीची पहिली पायरी !
  • गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट , म्युचुअल फंड , बँकेत एफ. डी . , जीवन विमा , जमीन , मालमत्ता , गोल्ड असे अनेक पर्याय आहेत. 
  • तुमचे गुंतवणुकीचे ध्येय हे किती कालावधीसाठी आहे हे ठरवून थोडे पैसे , कमी कालावधी असणाऱ्या पर्यायामध्ये गुंतवा , मोठी रक्कम असेल तर थोडे थोडे करून शेअर मार्केट आणि म्युचुअल फंड आणि गोल्ड मध्ये  गुंतवणूक करा. जेणेकरून मुलांचे शिक्षण , परदेशी उच्च शिक्षण आणि लग्नकार्य यासाठी वेळोवेळी पैसे हाताशी येत राहतील. 
  • सर्वात महत्वाचे म्हणजे निवृत्तीनंतरचे आयुष्य समाधानाने आणि कुठल्याही आर्थिक विवंचणे शिवाय जगता यावे यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम सारख्या सरकारी योजनेचा लाभ घ्या.
  • आरोग्यविमा सारख्या योजनांचा लाभ हा तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे . सध्याच्या धावपळीच्या जीवन शैलीमुळे वाढलेल्या समस्या ,त्यामुळे होणारे आजारपण या  सगळ्याचा ताण तुमच्या खिशावर पडतो. हा ताण हलका करायला विमा मदतीला येतो.
  • आरोग्यविमा काढणे म्हणजे गुंतवणूक नव्हे परंतु पैशाची इतर ठिकाणी गुंतवणूक करताना , शारीरिक स्वास्थ्य याचा विचार करणे आणि त्यासाठी पैसे बाजूला काढणे गरजेचे आहे . 

शेवटी  “ हेल्थ इज वेल्थ  ” !

  • जीवनविमा मधील काही पॉलिसी मध्ये केलेली गुंतवणूक देखील तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी उत्तम पर्याय असू शकतो.पॉलिसीच्या मुदतीच्या नियमानुसार आणि परिस्थितीनुसार तुम्हाला पैसे मिळू शकतात.  

 ब . परतावा 

  • गुंतवणुकीमधून मिळणारा परतावा तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायला मदतगार ठरतो. शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. म्युचुअल फंड मध्ये त्या मानाने कमी जोखीम असते.
  • मात्र शेअर मार्केटचे योग्य ज्ञान , बारकाईने केलेला अभ्यास , योग्य ठिकाणी – योग्य वेळी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. यासाठी तज्ञ व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडू शकतो. अधिक कालावधीसाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला तुलनेने चांगला परतावा देऊ शकते.
  • म्युचुअल फंड मधील गुंतवणूक ही एकाच प्रकारच्या कंपनीच्या समभागात पैसे न गुंतवता विविध कंपन्यांच्या समभागामध्ये पैशाची गुंतवणूक करत असल्यामुळे यातील जोखीम कमी होते . यातही तुम्ही तीन वर्षे , पाच किंवा दहा वर्षे अशी जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता जेणेकरून तुमच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण होत राहतील.
  • यासाठी तुम्ही म्युचुअल फंड बद्दल जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता. 
  • गोल्ड अर्थात सोने मधील गुंतवणूक याला तर आपल्या संस्कृती आणि परंपरा याचा आधार आहे. वर्षानुवर्षे सांभाळत आलेले सोन्याचे दागिने आणि लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी ही गुंतवणूक योग्यच आहे आणि वाढत्या सोन्याच्या किमती मुळे हे सिद्ध ही होताना दिसते. त्यामुळे गोल्ड मधून मिळणारा परतावा पाहता हा देखील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असू शकतो.
  1. आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करायला पैसा राखून ठेवलाच पाहिजे !
  • आपत्कालीन गोष्टींचा विचार केला तर कुठल्याही आणीबाणीच्या वेळेस तुमच्या हातात पैसे असणे गरजेचे आहे. 
  • शारीरिक व्याधी – आजार हे न टाळता येणारे ! इतर गोष्टीसाठी राखून ठेवलेली बचत या कारणासाठी  संपण्याची धास्ती वाटू शकते. यासाठी आपत्कालीन खर्चामध्ये काही वाटा आजारपण आणि औषधोपचार यासाठी आवश्यक आहे. 
  • घराचे हप्ते भरत असाल तर येणाऱ्या सहा महिन्यांचे हप्ते भरता येतील इतके पैसे तुमच्याकडे तयार असणे गरजेचे आहे. हे कशासाठी ?  तर नोकरी बदल किंवा नोकरी मध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास आर्थिक आणि पर्यायाने मानसिक संतुलन बिघडू नये यासाठी हातात काही वेळ मिळावा आणि हप्ते न थकता भरले जावे हे या मागचे कारण आहे.
  • यासोबतच इतर विमाचे हप्ते आणि घरखर्च यात कमी पडू नये हा विचार करून आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करायला पैसा राखून ठेवलाच पाहिजे !
  • शेवटी काय तर उठता-बसता पैसे लागणाऱ्या आजच्या जीवनशैलीत फक्त पैसे कमावणे याला महत्व नसून ते सांभाळणे आणि वाढवणे यालाही तेवढेच महत्व आहे.  

तेव्हा या महिन्यात अमुक एक खर्च इच्छेखातर (अवास्तव खर्च ) झाला म्हणून दर महिन्याला तो होईलच असे नाही, प्रत्येक महिन्याला होणारा अवास्तव खर्च टाळता येऊ शकतो

म्हणूनच  “ सेव युवर मनी अँड मनी विल सेव यू ” हे तुम्हाला पण योग्यच वाटतय ना ? 

तुम्ही यातील कोणते नियम पाळता आणि कोणते नियम पाळणार आहे  ते ठरवा (Money Saving Tips in Marathi )आणि आजपासूनच भविष्यासाठी पैसे राखून ठेवयला सुरुवात करा. असे अनेक आर्थिक विषयाशी निगडीत लेख सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी वाचत रहा. पुढचा आणखी एक विषय घेऊन लवकरच येत आहे.   आमच्या watsapp ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा.

6 thoughts on “भविष्यासाठी पैसे राखून ठेवायचा विचार करताय ? मग या काही टिप्स तुमच्यासाठी ! l Money Saving Tips in Marathi ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top