छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पाच मराठी चित्रपट l Movies on Shivaji Maharaj

WhatsApp Group Join Now

      Movies on Shivaji Maharaj 2024:  मराठी अभिनेते चंद्रकांत मांढरे एका मराठी चित्रपटात काम करत होते. छत्रपती शिवाजी या चित्रपटात ते दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महारांजांची भूमिका साकारत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर. घोड्यावरच्या एका प्रसंगाचं पन्हाळा परिसरात चित्रीकरण सुरू होतं. अभिनेते चंद्रकांत यांना घोड्यावर बसण्याची सवय होती, चित्रीकरणासाठी जो घोडा वापरण्यात आला होता तो ही त्यांच्या सवयीचा होता. तर प्रसंग असा होता की घोड्यावरून शिवाजी महाराज दौडत येतात,आणि कड्याच्या टोकावर घोडा पाय वर करुन थांबतो. चित्रीकरण सुरू असताना चंद्रकांत यांच्या चेहऱ्यावर भालजींना हवे ते भाव येत नव्हते. “जरा चूक झाली तर घोडा आणि घोड्यावरचा मी दरीत कोसळेन अशी भीती चंद्रकांत यांच्या मनात होतीच, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसे भाव काही त्यांच्या चेह-यावर उमटत नव्हते. अभिनेते चंद्रकांत यांच्या मनातली भीती ओळखून भालजी गरजले “अरे चुकून असं घडलच, तर मृत्यू शिवाजी महाराज म्हणून येणार आहे हे लक्षात ठेव !” पुढचाच टेक व्यवस्थित जमून आला हे वेगळं सांगायलाच नको.

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

Movies on Shivaji Maharaj
Movies on Shivaji Maharaj

       असे हे छत्रपती शिवाजी महाराज,उभ्या महाराष्ट्राचं दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. महाराज आणि त्यांच्या पराक्रमावर मराठी नाटकं गाजली. जिथे गवताला भाले फुटतात,रायगडाला जेंव्हा जाग येते, अशी नाटकं मराठी प्रेक्षकांना आवडली. वीर शिवाजी,राजा शिवछत्रपती अशा शिवरायांवरच्या मालिका गाजल्या. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. सध्या आपण पहातो आहोत की मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेका पराक्रमावर एकेक चित्रपट निघतो आहे, इतकंच नव्हे तर काही दिग्दर्शक त्यावर चित्रपटांची मालिका करत आहेत. शिवराय आणि त्यांचे मावळे यांचा पराक्रम रुपेरी पडद्यावर पहाताना छत्रपतींची भूमिका कुणी केली आहे यावर चर्चा होते.

      पावनखिंड (१९५२) , पावनखिंड (२०२३) तानाजी, रावरंभा, हिरकणी, सरसेनापती हंबीरराव, फर्जंद, ,सिंहगड (मूकपट) नेताजी पालकर,मराठा तितुका मेळवावा, गनिमी कावा, राजमाता जिजाऊ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपल्याला झालं आहे. बालशिवाजी द प्राइड ऑफ भारत, वेडात मराठे वीर दौडले सात,१७०१ पन्हाळा, वीर मुरारबाजी हे काही आगामी चित्रपट आहेत,ज्यात शिवचरित्रातील काही भाग पहायला मिळणार आहे.

     चंद्रकांत मांढरे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, प्रसाद ओक, महेश मांजरेकर अशा कितीतरी कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या आगामी चित्रपटात नेसरी खिंडीतला संग्राम आहे,आणि यात प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार यांना शिवाजी महाराज साकारण्याचा मोह झाला आहे.

        पण छत्रपती शिवाजी महाराज यांना मध्यवर्ती ठेवून किती चित्रपट तयार झाले? तुम्हांला माहिती आहेत का ? मराठीतले पाच चित्रपट जे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर तयार झाले , किंवा शिवाजी महाराज हे त्या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे, ज्यांचं नावच शिवरायांवर आधारित आहे त्या चित्रपटांविषयी आज माहिती घेऊया.

हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश

दाहीं दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष

      गुरु ठाकूर यांनी सांगितलेलं मराठी निर्मात्यांनी आज लक्षात घेतलं असलं तरी मूकपटांच्या जमान्यापासून चित्रपटसृष्टीला शिवचरित्राची भूल पडलेली आहे. पाहूया शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हे पाच चित्रपट.shivaji maharaj jayanti 2024

१) उदयकाल (१९३०)

२)छत्रपती शिवाजी (१९५२)

३)राजा शिवछत्रपती (१९७४)

४) बालशिवाजी (१९८१)

५) शेर शिवराय

छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पाच मराठी चित्रपटl Shivaji Maharaj Marathi Movies

१) उदयकाल

      भारतीय चित्रपट सृष्टीला कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बहाल करणा-या बाबुराव पेंटर यांचा सिंहगड हा एक महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला. रात्रीच्या लढाईचे प्रकाशझोतात केलेले चित्रीकरण विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला, बाह्यचित्रीकरण केलेला आणि करमणूक कर बसवलेला पहिला चित्रपट , म्हणून शिवचरित्रावर आधारित असणा-या सिंहगड या चित्रपटाचं नाव घेता येईल. शिवचरित्रावर नेताजी पालकर (१९२८) हा मूकचित्रपट बाबुराव पेंटर यांनी काढला तर दुसरा चित्रपट होता स्वराज -तोरण हा चित्रपट जो १९३० साली आला. हा ही मूकचित्रपट होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी मोहिमांची कथा यात चित्रीत करण्यात आली होती. सेन्सॉरने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरीत्रावर आधारित या चित्रपटाचं नाव उदयकाल ठेवण्यात आलं.

२) छत्रपती शिवाजी (१९५२)

भालजी पेंढारकर हे मराठी चित्रपटातील एक महत्त्वाचं नाव. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि युगंधर श्रीकृष्ण ही त्यांची आराध्य दैवतं होती. देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती ही त्यांच्या स्वतःच्या जीवनाची त्रिसुत्री होती. ९६ व्या वर्षापर्यत त्यांनी अखंडपणे चित्रपट निर्मिती केलीच पण, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद गीतं यातून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य ही केलं. ऐतिहासिक चित्रपटातून आपला संदेश समाजापर्यंत पोचविला. जय भवानी (१९४७ ), शिलंगणाचे सोने (१९४९), छत्रपती शिवाजी (१९५२), महाराणी येसूबाई (१९५४), पावनखिंड (१९५६) मोहित्यांची मंजुळा (१९६३), थोरातांची कमळा (१९६३), मराठा तितुका मेळवावा (१९६४),बालशिवाजी आणि गनिमी कावा (१९८१) अशा कितीतरी चित्रपटातून त्यांनी शिवचरित्र चित्रीत केलं. १९५२ साली भालजींनी छत्रपती शिवाजी या नावाने चित्रपट निर्मिती केली.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चंद्रकांत मांढरे, त्यांच्या बरोबर गजानन जहागीरदार, ललिता पवार असे दिग्गज कलाकार होते.

३)राजा शिवछत्रपती(१९७४)

या चित्रपटात स्मिता पाटील यांनी सईबाईंचं काम केलं होतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होते श्रीराम गोजमगुंडे. रीमा लागू,सुमती गुप्ते,विजू खोटे,कानन कौशल अशा कसदार कलाकारांनी साकारलेला हा चित्रपट चंद्रवदन यांनी दिग्दर्शित केला होता तर, प्रदीप दीक्षित यांनी कथालेखन केलं होतं.

४) बाल शिवाजी (१९८२)

      सैराट फेम आकाश ठोसर आगामी बालशिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार असल्याची चर्चा आहे.पण १९८२ साली भालजी पेंढारकर यांच्या बाल शिवाजी या चित्रपटाने प्रेक्षकांची मनौ जिंकलीं. शाळाशाळांतून हा चित्रपट दाखवला गेला होता.

५) शेर शिवराय (२०२२)

      लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ऐतिहासिक चित्रपटांची चित्रमालिका सुरु केली. यात ते शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आठ चित्रपट तयार करणार आहेत. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटाने एक इतिहास रचला. फर्जद चित्रपट कोंडाजी फर्जंद आणि त्यांच्या ६० मावळ्यांनी महाराजांच्या राज्याभिषेका आधी पन्हाळा किल्ला कसा मिळवला यावर आधारित आहे. ‘फत्तेशिकस्त चित्रपटात गनिमी काव्याचा वापर करत शाहिस्तेखानावर मात करुन लाल महाल पुन्हा मिळवण्याचा इतिहास चित्रीत करण्यात आला आहे. आणि पावनखिंड अर्थातच खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी केवळ ३०० मावळ्यांसह ३००० संख्या असणाऱ्या शत्रुचा मात कशी दिली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहचू कसं दिलं यांचं हे चित्रण आहे.

’या चित्रपटांनंतर शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराय’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला. कवि भूषण यांच्या कवितेतल्या शेर शिवराज है या ओळीवर आधारित या चित्रपटाचं नाव आहे. परदेशात अमेरिका ऑस्ट्रेलिया, आर्यलॅंड, इंग्लंड, फिनलॅंड, घाना, नायजेरिया, सौदी अरेबिया, कुवेत, ओमेन, बहारीन, कतार, इथल्या चित्रपटगृहांमध्येही हा चित्रपट पोचला आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी राजेंची भूमिका निभावली तर मृणाल कुलकर्णी यांनी जिजाबाई आणि रविन्द्र मंकणी शहाजी राजेंच्या भूमिकेत दिसले. मुकेश ॠषी, मृण्मयी देशपांडे हे कलाकार ही या चित्रपटात आहेत. या चित्रपटानंतर सुभेदार चित्रपटात तानाजी मालुसरे आणि त्यांचा संघर्ष चित्रीत करण्यात आला आहे.

        या चित्रपटांखेरीज मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या युगात सामिल करून घेतलं होतं. महेश मांजरेकर यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली,या चित्रपटातला पोवाडा गाजला.

शिवाजी महाराजांवर तामीळ भाषेत ही कृष्ण धवल म्हणजे black and white जमान्यात चित्रपट निघाला आहे.

तुझ्या मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे 

मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजूदे 

तुझ्या नजरेची ज्वाला पेटूदे माझ्या मनात 

हीच रयत करील तुझ्या गडाची राखण

क्षितिज पटवर्धन यांच्या या ओळी लक्षात ठेवल्या तरच छत्रपती शिवाजी महाराजांना आपण ओळखलं असं म्हणता येईल. वेगवेगळ्या नावांनी प्रदर्शित होणा-या चित्रपटातील छत्रपतींचा इतिहास आपण नव्या पिढीला सोप्या पद्धतीने समजावून देऊ शकतो.

तुम्हांला छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता चित्रपट आवडतो ? कमेंट करुन आम्हांला नक्की सांगा.

तुम्हाला ही माहिती Movies on Shivaji Maharaj कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top