अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत खेडोपाड्यांमधील पालक आपला पाल्य मोबाईल किती सहजपणे वापरतो, याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असत. नव्याची नवलाई संपली आणि आता तेच पालक मुलांच्या अति मोबाईल वापराविषयी बोलू लागले आहेत. मोबाईल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी हीच तक्रार मुलांच्या अति टीव्ही पाहण्याबद्दल केली जात होती.
टीव्ही, स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा व्हिडिओ गेम यांसारख्या डिजिटल माध्यमामध्ये मुले दिवसातील जो वेळ व्यथित करतात, या वेळेलाच मुलांचा स्क्रीन टाईम असे म्हटले जाते. या स्किन टाईमचे दुष्परिणाम काय आहेत? तो का वाढत जातो? आणि तो कसा कमी करावा? याबाबत घेतलेला हा आढावा आहे.
मुलांचा स्क्रीन टाईम एक वाढती समस्या
दूरदर्शनच्या अविष्कारानंतर मनोरंजनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाने क्रांतिकारक बदल घडवून आणला. १ मे १९९५ रोजी कार्टून नेटवर्क हे देशातील पहिले खास मुलांसाठीचे चॅनल सुरू झाले. सध्या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ३३ चॅनल्स फक्त मुलांसाठी सुरू आहेत. त्यामुळे मुले आपला बराचसा वेळ टीव्ही समोर बसून घालवत आहेत.
आता घरोघरी स्मार्टफोन आल्यापासून मुलांसाठी आणखी वेगळा पर्याय निर्माण झाला. टीव्ही नसेल तर स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा व्हिडिओ गेम असे पर्याय मुले शोधून काढत आहेत. यातून त्यांचा स्क्रीन टाईम वाढतच आहे.
दी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) यांच्या सर्वेनुसार ८ ते १० वर्षापर्यंतची मुले दिवसातून ६ तास स्क्रीन समोर असतात. ११ ते १४ वयोगटातील मुले ९ तास स्क्रीन समोर असतात. १५ ते १८ वयोगटातील मुले ७.५ तास स्क्रीन समोर स्पेंड करतात.
पाच वर्षाखालील मुलांचा स्क्रीन टाईम ही देखील एक मोठीच गंभीर समस्या आहे. डॉ. केरोल विल्किन्सन यांच्या मतानुसार, बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी त्याचा सभोवतालच्या पर्यावरणाशी परस्पर संवाद घडला पाहिजे. त्याचा स्क्रीन टाईम हा वास्तविक जगातील परस्पर संवादाच्या संधी कमी करू शकतो.
मुलांसाठी स्क्रीन टाईम किती असावा?
मुलांसाठी स्क्रीन टाईम किती असावा याबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO), अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्स (AAP) यासारख्या संस्थांनी काही मार्गदर्शक तत्वे सांगितले आहेत ती पुढील प्रमाणे.
*२ वर्षांच्या आतील मुलांसाठी स्क्रीन टाईम शून्य असला पाहिजे.
*२ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी हा वेळ १ तासापुरता मर्यादित असावा.
*दोन वर्षांच्या मुलांसाठी हा वेळ एक तासापर्यंत चालू शकतो. मात्र हा वेळ पालकांच्या निरीक्षणाखाली असावा आणि तो शक्य तितका कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी, निरीक्षण आणि परस्पर संवाद या गोष्टींना अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.
जास्त स्क्रीन टाईम असण्याचे दुष्परिणाम
*स्क्रीन मधून बाहेर पडणारे ब्लू लाईट्स (निळसर प्रकाश) मुलांच्या झोपेवर परिणाम करतात. त्यांना मिळणारी झोप ही पुरेशी गुणवत्ता पूर्ण राहत नाही. त्यामुळे अर्धवट झोपेतून जागे होणे, चिडचिडेपणा निर्माण होणे असे प्रकार घडतात.
लहान मुलांना आवश्यक असलेली झोप ही प्रौढांपेक्षा जास्त असते. त्यामुळे काही वेळेस पालकांना आपले मूल पुरेशी झोप घेते, की नाही ते लक्षात येत नाही. मुलांना ३ वर्षे पूर्ण होईपर्यंत ११ ते १४ तासांची झोप आवश्यक असते.
*मुलांच्या दृष्टीवर जास्त स्क्रीन टाईमचा दुष्परिणाम होतो.
*एकाग्रता कमी होऊन त्याचा शैक्षणिक यशावर परिणाम होतो.
*मुले एकाच जागी बसून राहतात. परिणामी शारीरिक हालचाली अभावी लठ्ठपणा वाढतो. स्क्रीन समोर बसून फास्टफूड खायची सवय लागून लठ्ठपणासाठी अधिकच पोषक वातावरण निर्माण होते.
*वास्तविक जगापेक्षा मुले खोट्या काल्पनिक जगात रमू लागतात. कालांतराने टीव्ही, मोबाईल शिवाय अस्वस्थ वाटू लागते.
*मुलांचा भाषा विकास व सामाजिक कौशल्यांचा विकास होण्यास विलंब होतो.
*स्मार्टफोन मधील रेडिएशनचा देखील मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
*मुले अधिक चंचल होतात काही वेळा ती हिंसक बनण्याचे देखील प्रकार घडले आहेत.
जास्त स्क्रीन टाईमची कारणे आणि त्यावरील उपाय
बऱ्याच वेळा काही गोष्टींची कारणे आणि त्यावरील उपाय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कारणांची बाजू पलटी केली, की उपाय दिसू लागतात. थोडक्यात कोणत्याही गोष्टीची कारणे शोधून ती दूर करणे, हा देखील एक उपाय ठरतो.
मुलांचा स्क्रीन टाईम वाढण्याचे सर्वात मोठे कारण, म्हणजे आई वडील दोघांनाही मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नसणे होय. बऱ्याच वेळा पालक मूल गुंतून राहते, म्हणून त्याच्या हाती मोबाईल देतात किंवा टीव्ही समोर बसवितात.
काही पालकांचा असाही गैरसमज असतो की मुलांच्या हाती स्मार्टफोन दिल्याने त्याच्या ज्ञानात वाढ होईल उदा. मुलांना टीव्ही किंवा मोबाईलच्या मदतीने अंक किंवा अक्षरे ओळखायला मदत होते. खरे तर हा फक्त पुनरावृत्तीने होणाऱ्या स्मृतीचा (Rote memory) विकास असतो. वास्तविकता मुलांना सभोवतालच्या पर्यावरणातून ज्ञान घेणे अधिक उपयुक्त असते.
काही वेळा पालकांना आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही याची सल देखील असते. परिणामी ते ही उणीव डिजिटल माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय मुलांकडून आपल्याला हवे ते काम करून घेण्यासाठी देखील प्रलोभन म्हणून या गोष्टींचा वापर केला जातो.
एकंदरीत स्क्रीन टाईम वाढण्याची कारणे आणि त्याचे दुष्परिणाम पाहिले असता, दुष्परिणामच अधिक गंभीर असल्याचे लक्षात येते. त्यामूळे यावर उपाय करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक ठरतात यासाठी आपण पुढील प्रमाणे प्रयत्न करू शकतो.
पहिल्यांदा सवयी न लावणे
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मुलांना अगदी पहिल्यांदा स्क्रीन आपणच दाखविलेली असते. याच्या पुनरावृत्तीनेच नंतर मुलांना त्याची सवय लागते. त्यामुळे आपणच सुरुवातीला या गोष्टींसाठी त्यांना प्रवृत्त करु नये.
निक बिल्टन नावाच्या एका पत्रकाराने जेंव्हा स्टीव्ह जॉब यांना विचारले, की तुमच्या मुलांना आय पॅड जास्त आवडत असेल ना? तेव्हा स्टीव्ह जॉब यांनी सांगितले, की आम्ही आमच्या लहान मुलांना आयपॅड वापरू देत नाही.
ॲपलचे संस्थापक असलेले स्टीव्ह जॉब देखील जर आपल्या मुलांना स्क्रीन पासून दूर ठेवणे पसंत करत असतील, तर आपणही यातून बोध घेतला पाहिजे.
टप्प्याटप्प्याने वेळ कमी करणे
मुले जर डिजिटल माध्यमांच्या जास्तच आहारी गेली असतील, तर स्क्रीन टाईम एकदम कमी न करता तो टप्प्याटप्प्याने कमी करावा लागेल. यासाठी काही निश्चित नियम बनवावे लागतील. उदा. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहायचा नाही. अमुक वेळेत किंवा अमुक ठिकाणी मोबाईल वापरायचा नाही. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल किंवा टीव्ही पाहायचा नाही. मुलांना प्रेमाने या गोष्टी समजून सांगा.
मुलांना वेळ द्या
आपण आपल्या मुलांसोबत दिवसातील काही वेळ घालविलाच पाहिजे. मुलांना गोष्टी सांगणे, त्यांच्याकडून गोष्टी ऐकणे, त्यांच्यासोबत गाणी म्हणणे, छोटे छोटे खेळ खेळणे यासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. मुलांसोबत असा वेळ घालविल्याने आपलेही मन प्रसन्न होते व आपण देखील स्क्रीन पासून दूर राहतो.
क्रियाशील गोष्टींना प्रोत्साहन देणे/ टॉईजचा वापर करणे
क्रियाशीलते मधूनच मुलांचा विकास होत असतो. त्यामुळे मुलांना अधिकाधिक क्रियाशील बनविण्याचा प्रयत्न करा. चित्रे काढणे, ती रंगविणे, क्ले पासून वस्तू तयार करणे यासारख्या गोष्टींमध्ये त्यांना गुंतवून ठेवा. याशिवाय मुलांना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी द्या. ती देत असताना एकदम सगळी न देता ती अलटून-पालटून द्या.
मित्रांसोबत वेळ घालविणे
मुले समवयीन मुलांसोबत जास्त रमतात. त्यामुळे मुलाच्या मित्राला घरी बोलवा किंवा मित्राच्या घरी त्याला पाठवून द्या. त्यांना एकत्र खेळू द्या. यातून मुलाचा सामाजिक विकास होण्यास देखील मदत होते.
मुलांसोबत बाहेर जाणे
वीकेंडला किंवा इतर दिवशी वेळ भेटेल त्याप्रमाणे मुलांना घराबाहेर, गार्डनमध्ये घेऊन जा. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना रमू द्या. याबरोबरच इन डोअर व आउटडोअर खेळांना प्रोत्साहन द्या.
घरातील कामांमध्ये मदत घ्या
मुलांची घरातील कामांमध्ये मदत घेतल्याने आपण काम करतानाही त्यांच्यासोबत राहू शकतो. यासाठी छोटी छोटी कामे त्यांना सांगता येऊ शकतात. उदा. स्वयंपाक घरामध्ये विविध वस्तू आणून द्यायला सांगणे, झाडू मारायला सांगणे, इत्यादी. मुलांच्या अशा कामाचे कौतुक केल्याने मुले देखील खुश होतात.
प्रलोभन देणे टाळा
मुलांकडून हवे ते काम करून घेण्यासाठी त्यांना स्मार्टफोन किंवा टीव्ही सुरू करून देण्याचे प्रलोभन देणे पूर्णपणे टाळा. मुले खात नाहीत म्हणून मोबाईल हातात देऊ नका. पूर्वीच्या काळी यासाठी ज्या युक्त्या केल्या जात होत्या त्यांचा वापर करा.
या आणि यासारख्या अनेक उपायांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास स्क्रीन टाईम कमी करण्यास निश्चितच मदत होईल. चार्ल्स नेल्सन या न्यूरो सायंटिस्टच्या मते, शाब्दिक भाषा शिकण्यापूर्वी मूल हे परस्पर संवादासाठी समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावावर अवलंबून असते. यावरूनच ते समोरचा व्यक्ती आपल्या सोबत आनंदी आहे, की नाराज आहे याचा अंदाज घेत असते. यामुळेच त्याच्या नजरेसमोर आपण काय ठेवतो हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे शाब्दिक भाषा शिकेपर्यंत मुलांना स्क्रीन पासून पूर्णपणे दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतरही त्याचा वापर मर्यादितच असला पाहिजे.
रविंद्र मिसाळ, कूर ता- भुदरगड.
तुम्हाला लेख कसा वाटला ,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
Nice 👍
Very nice
Good