चित्रपट पुनरावलोकन(रिव्ह्यू) – नाच गं घुमा
कलाकार – मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मायरा वायकुळ.
दिग्दर्शक – परेश मोकाशी
लेखक – मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी
निर्माते – स्वप्नील जोशी, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील.
रेटिंग – ८.७/१०
अगं तुला माहिती आहे का ? आमची कामवाली आज इतकी उशीरा आली…. अशाच असतात ह्या कामवाल्या, एक तर उशीरा यायचं आणि आल्यावर पण अर्धा वेळ फोनवर बोलत राहायचं…. हो ना आणि हल्ली तर त्यांना जरा काही बोलायला नको. आहे ती कामवाली पण गेली तर कसा होणार ? ….” चार बायकांचा गट जमला की सर्रास ऐकू येणारे हे संवाद. आपल्याला काही नवीन नाही. घराघरातली हीच वस्तुस्थिती आहे. हो ना?
१ मे रोजी प्रदर्शित झालेला नाच गा घुमा हा चित्रपट ह्याच विषयावर भाष्य करणारा असला तरी त्यात एक प्रकारे माणुसकीच्या नात्यांची गुंतागुंत खूप छान दाखवली आहे.
विषय तसा साधा असला तरी प्रत्येक माणसाच्या जास्ती करून स्त्रियांच्या मनाला भिडणारा आहे. तोच तोच पणा, एकाच प्रकारचे कथानक मराठी चित्रपटात घेतले जात नाहीत. नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवले जातात. हेच मराठी सिनेसृष्टीचं यश आणि वेगळेपण म्हणायला हवं. आणि म्हणूनच ह्याचा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. वेगवेगळे विषय, हलक्या फुलक्या पद्धतीत मांडलेले चित्रपट हल्ली प्रेक्षकांना जास्ती आवडतात. चला तर मग ह्या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यु पाहुयात. Naach Ga Ghuma Movie Review.
चित्रपटाची कथा मुख्यतः “राणी” (मुक्ता बर्वे Mukta Barve) आणि तिच्या घरी काम करणारी मोलकरीण (Maid) “आशा ताई”(नम्रता संभेराव Namrata Sambherao) ह्या दोन प्रमुख पात्रांभोवती फिरते. सामान्यतः सर्वच घरामध्ये असलेले हे चित्र चित्रपटात सहजरीत्या उलगडलेले दिसते. कामावर जाणाऱ्या (Working Women) राणीची व्यथा, धावपळ, त्यामुळे होणारी दगदग, चिडचिड, पर्यायाने छोट्या छोट्या गोष्टींवरून आशाताईसोबत उडणारे खटके सावरत सावरत त्या दोघी आपापल्या परीने सर्व सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. आशाताई फक्त घराचं काम नाही तर राणी – आनंद च्या मुलीला सांभाळण्याचे कामही मनापासून करत असतात. त्यामुळे राणी आणि आनंद शांततेने आपली कामं करायला जाऊ शकतात. आशाताईंचा ह्यांच्या घराला खूपच मोठा आधार मिळत असतो.
पण एक वेळ अशी येते; की राणीला नाईलाजाने बळेबळेच आशाताईला कामावरून कायमचं काढून टाकावं लागतं. आपलं घर, आपली लहान मुलगी निर्धास्तपणे दिवसभर आशाताईंवर सोपावणारी राणी अखेर असे पाऊल का उचलते? त्यांच्यातला विश्वास इतका तकलादू का झाला? पुढे आशाताईंनी काय केलं? त्यानंतर राणी आणि तिच्या घरच्यांना कशा कशाला सामोरे जावे लागले? आशाताई नसल्यामुळे घरच्यांना अतिरिक्त कामं ही करावी लागली. त्यामुळे त्यांचं ठरलेलं व्यवस्थापन तर बिघडलंच शिवाय ह्या सगळ्यामुळे त्यांची वाढलेली धावपळ, सगळा गोंधळ;
हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. आणि ते ही चित्रपटगृहात जाऊनच बघा. सोबत आपल्या घरच्या “आशाताई”ना घेऊन जायला विसरू नका.
रोजच्या जीवनातल्या छोट्या मोठया गोष्टी अतिशय उत्तम रित्या हलक्या फुलक्या रीतीने मांडल्यामुळे चित्रपट पाहताना हे आपल्या घरातलं वातावरण असल्यासारख वाटतं. तसेच सर्व स्त्रियांसाठी नक्कीच हा जवळचा विषय असल्याने आणि स्त्रीयांवर आधारीत चित्रपटाचं कथानक असल्याने चित्रपटाच्या शीर्षका मध्ये “गं” अक्षरासाठी नथ आणि कुंकवाचा टिळा यांचा केलेला उपयोग अतिशय समर्पक वाटतो.
अभिनेत्री मुक्ता बर्वे ह्यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या सुंदर आणि सहज अभिनयाने “राणीची” भूमिका छान निभावली आहे. तेवढ्याच ताकदीने आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना कायम हसवणारी अभिनेत्री नम्रता संभेराव ही देखील “आशाताईची” एक हळवी भूमिका सगळ्यांच्या मनात बसवायला यशस्वी ठरली आहे असे म्हणता येईल. भाडीपा फेम सारंग साठ्ये ह्यांनी राणीच्या नवऱ्याची(आनंद) भूमिका आपल्या मजेशीर शैलीत केली आहेच तर अभिनेत्री सुकन्या मोने (राणीची आई), सुप्रिया पाठारे(आनंदची आई) ह्या दोघी सासूबाईं अशी ह्यांच्या घरातली मंडळींची मजामस्ती चित्रपटात पाहायला मिळते. तर सहकलाकार म्हणून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, अभिनेते सुनील अभ्यंकर यांनीही छान काम केले आहे. आणि बालकलाकार मायरा वायकुळ हिने राणी आणि आनंद ह्यांच्या मुलीची भूमिका केली आहे. एकंदरीतच उत्तमोत्तर कलाकारांनी हा सिनेमा नटला आहे.
हिरण्यगर्भ मनोरंजन ची प्रस्तुती असलेल्या ह्या सिनेमाचे
अभिनेते स्वप्नील जोशी निर्माते आहेत. त्यांनी पहिल्यांदाच निर्माता म्हणून काम केले आहे. तसेच, प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे देखील ह्या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. दिग्दर्शक परेश मोकाशी ह्यांनी ह्या चित्रपटाचे ही दिग्दर्शन उत्तम केले आहेच. तसेच ह्या चित्रपटाचे लेखनही परेश मोकाशी ह्यांनी मधुगंधा कुलकर्णी ह्यांच्या सोबत केले आहे. संदीप यादव यांनी चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. तर “नाच गं घुमा” हे टायटल साँग (“Naach Ga Ghuma” Title Song) परेश मोकाशी लिखित असून वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते ह्यांच्या सुंदर आवाजाने बहारदार झालेच आहे आणि सध्या खूप चर्चेतही आहे. सोशल मीडियावर ही हे गाणं ट्रेंडिंग होताना दिसत आहे.
धावपळीच्या, दगदगीच्या जीवनात विशेष करून सर्वच स्तरावरील स्त्रियांना आपल्या स्वप्नांना बऱ्याचदा मुरड घालावी लागते. जर कुटुंबाचा पाठिंबा असला तरी कधी कधी इतर अनेक अडचणींना तिला सामोरे जावे लागते. सगळं करायचं असते पण ही कसरत करताना तिला अपयशाच्या मार्गावर जात आहोत ह्याची भीती वाटत राहते. आणि तिची अवस्था “नाच गं घुमा, नाचू मी कशी?” अशा स्थितीत नेणारी होते. ह्या सर्व प्रसंगांना खुलविण्यासाठी उत्तम संवाद, संकलन, चित्रीकरण, संगीत, गाणी ह्यांचा चांगला वापर केलेला दिसतो.
हलका फुलका असा मनोरंजन करणारा हा सिनेमा (Cinema) पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. प्रत्येकाने नक्कीच पहावा. ज्यांच्यावर आपण अवलंबून असतो; त्यांच्यावरचा विश्वास कधी ही अविचाराने डगमगू देऊ नये हा विचार आणि सोबत मालकीण आणि मोलकरीण ह्यांच्यातील “तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना” अशा कडू – गोड नात्याची विण आणखी घट्ट करायला हा सिनेमा नक्कीच यशस्वी म्हणता येईल. शेवटच्या प्रसंगात राणीच्या डोळ्यात दाखवलेल्या आनंदाश्रू मधून त्यांच्यातल्या भावनिक नात्याची जवळीक हा चित्रपट पाहूनच तुम्हाला अनुभवता येईल.
नाच गं घुमा चित्रपट पुनरावलोकन (रिव्ह्यु) | Naach Ga Ghuma Movie Review सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात पण आशाताई सारखी व्यक्ती आहे का? जिची तुम्हाला खूप साथ मिळते. हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहे.
आपल्या मित्र परिवाराला हा लेख नक्की पाठवा. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहितीपर लेखांसाठी, बातम्यांसाठी, नवनवीन कथांसाठी आपल्या ‘लेखकमित्र’ वेबसाईटला नेहमी नक्की भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप चॅनल ही फॉलो करा.
वाचक मित्रहो, खूप खूप धन्यवाद.
नाव – नंदिनी हाटकर, मुंबई.