नैवेद्याचे महत्व आणि परंपरा..
आपण भक्तिभावाने शुद्ध भावनेने देवाला अन्न अर्पण करतो त्याला नैवेद्य म्हणतात. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ ठेवल्यानंतर जे अन्न भक्तांना वाटले जाते त्याला प्रसाद म्हणतात. अगदी अनंत काळापासून हि प्रथा चालु आहे. आपण जे रोजच्या जेवणासाठी बनवतो त्यातुन थोडा भाग रोज दाखवल्यानंतर राहिलेले अन्न प्रसाद म्हणुन ग्रहण करतात. याला काही भागात भोग चढवणे असेही म्हणतात. रोजचे अन्न प्रसाद म्हणुन ग्रहण केले तर त्यातून आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळते. नकारात्मक ऊर्जेपासुन आपले संरक्षण होते. आणि प्रत्येक सन वारासाठी तसेच देवासाठी वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणुन साग्रसंगीत बनवले जातात.
नैवेद्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा:
हिंदू धर्मात नैवेद्याला फार महत्व आहे. नैवेद्य न दाखवता ग्रहण केलेले अन्न विषासमान मानले जाते. हिंदु धर्मात हि विविध समाजाचे वेगवेगळी श्रद्धास्थाने आहे. आणि त्यांच्या प्रत्येकाचे नैवेद्याच्या दाखवण्याच्या तसेच नैवेद्य बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये नैवेद्य दाखवताना मनामध्ये चांगला भाव असला पाहिजे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने पैसे कमावले आहेत, ज्या भक्तिभावाने नैवेद्य अर्पण केला आहे तुम्हाला तसेच आशीर्वाद मिळतात. कारण आपल्या पुरणांमध्ये म्हणलेच आहे की
जैसा धन वैसा अन्न |
जैसा अन्न वैसा मन |
जैसा मन वैसा तन ||
देवाला हि प्रामाणिक पणे कष्ट करून कामावलेल्या पैसातुन भोग चढवावा. कारण त्यातुनच आपली देवप्रति असलेली भक्ति प्रतित होते. देवही ते अन्न ग्रहण करतात. त्याचबरोबर आपण तो प्रसाद ग्रहण केला तर आपणाला सकारात्मक ऊर्जे बरोबर दिव्यअनुभूती प्राप्त होते.
नैवेद्याचे प्रकार :
भारतामध्ये वेगवेगळ्या जाती तसेच धर्म आहेत. त्याप्रमाणे त्यांची श्रद्धा स्थाने वेगवेगळी आहे.त्यामुळे नैवेद्याचे प्रकार वेगवेगळे चैत्र महिन्यातील पाडवा नववर्षाचे स्वागत त्यानिमित्ताने पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजे, कुरडई, पापड तसेच लिंबाच्या झाडाचा मोहर गुळात मिसळून खायला देतात. गणपती उत्सवात मोदकाला प्राधान्य दिले जाते. तसेच गणपती बरोबर येणाऱ्या गौरायांसाठी शेवयाच्या भाताचा नैवेद्य दाखवला जातो. काही समाजात 12 भाज्यांचा नैवेद्य केला जातो. नागपंचमी या सनासाठी बाजरीचे पीठ आणि गुळापासून नागदिवे तसेच बाजरीच्या लाहया बनवल्या जातात. नागदेवतेला दुध, लाहया आणि नागदिवे नैवेद्य अर्पण केला जातो. मकर संक्राती या सनासाठी तिळाच्या पोळ्या, तिळाचे लाडू, तसेच खेंगट, बाजरीच्या भाकरी असे पदार्थ नैवेद्य म्हणुन बनवले जातात. गोकुळाष्टमी साठी गोपाळकाला बनवला जातो. आपली नैवेद्याची परंपरा फार जुनी आहे. त्याचा पुरणांमध्ये उल्लेख आढळतो.

नैवेद्याचे रेसिपी: पारंपारिक पदार्थ –
1] मोदक करताना तांदळाच्या पिठाची उकड काडून घेतात आणि नंतर त्यात ओला नारळ ,गुळ, काजु, बदाम, किशमिश, घालुन सारण तयार करून उकडीच्या पुरी तयार करून त्यात भरतात आणि मोदक तयार करतात.
2] पंचामृत तयार करताना त्यामध्ये दही, दुध,तुप, मध आणि केळीचे छोटे छोटे तुकडे करून एकत्र करतात. आणि अशाप्रकारे आपले नैवेद्याचे पंचामृत तयार होते.
3] सत्यनारायनाचा प्रसाद करताना दुधात गरा वैरला जातो त्यात साखर, विलायची, केसर, केळीचे काप, बदाम, काजु घालुन व्यवस्थित शिजवून गोडाचा शिरा केला जातो.
4]भोगीची खेंगट भाजी करताना त्यामध्ये त्या मोसमात शेतात पिकणाऱ्या भाज्या,कडधान्य, तृणधान्य यांचा वापर करतात. यामध्ये बोर, ऊस, हरभऱ्याचे घाटे,ऊसाच्या ओंब्या, ज्वारीचे दाणे भरलेले कणीस, वांगी, घेवडा, वाल, शेंगदाणे, वाटाणा, बटाटा आणि गाजर या भाज्या शिजवून घेतात. त्यांना 4 ते 5 लसूण पाकळ्या, कडीपत्ता, तिळ, खोबरे, कोथिंबीर, हरभरा, ज्वारीचे दाणे भाजून, आणि शेंगदाणे यांना एकत्र एकजीव होईपर्यंत वाटून त्याची फोडणी दिली जाते. चवीपुरते मीठ मसाले टाकून शिजवलेल्या भाज्या टाकून लागेल त्या प्रमाणात पाणी टाकून खेंगट भाजी बनवली जाते.
नैवेद्याच्या तयारीमधे उपयोग होणारी विशेष साहित्य :
नैवेद्यासाठी लागणारे साहित्य आपण नैवेद्य कोणत्या प्रकारचा नैवेद्य किंवा कोणत्या देवाला नैवेद्य बनवायचा आहे यावर अवलंबून आहे. तरीही यामध्ये दुध, साखर, गरा, तुप, केळी, फळ, खोबरे, ओला नारळ, वेगवेगळ्या भाज्या, दही, घेवडा, भोपळा, शेगदाणे ,गुळ आणि त्यावर तुळशी पत्र ई.
नैवेद्याचे आरोग्यदायी फायदे:
1] गुढीपाडव्याला आपण कडूलिंब आणि गुळ एकत्र करून खातो. कारण कडूलिंब रक्त शुद्ध करण्यासाठी ओळखला जातो. आपले रक्त शुद्ध करून आपले शरीर आरोग्यदायी ठेवतो. आणि गुळामधे भरपुर प्रमाणात लोह असते ते आपल्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतो. तसेच त्वचेसाठी कडूलिंबाचा वापर करतात.
2] गोकुळअष्टमी किंवा नागपंचमी ला ज्या साळीच्या लाहया नैवेद्य म्हणुन दाखवतात त्या अॅंटी ऑक्सिडंट म्हणुन काम करतात शरीरात. मासिक पाळीदरम्यान महिलांना जो पोटदुखी,कंबरदुखी, अंगदुखीचा त्रास होतो तो या लाहया रोज सेवन केल्यामुळे कमी होतो.
3] मकरसंक्रांतीला जे तिळ घालुन लाडू किंवा पोळ्या बनवल्या जातात त्याही खुप आरोग्यदायी असतात. मकरसंक्रांतीचा सन हा थंडीत येतो. त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्याचे काम तिळ करतात. हाडे मजबुत होतात. शरीरातील कोलेस्टेरोल कमी होते.
4] तसेच मकरसंक्रांतीला आपण खेंगट बनवतो. त्यातील सर्व भाज्या ह्या त्या मोसमात शेतात भरपुर प्रमाणात असतात. शेतकऱ्याकडे भरपुर धनधान्य असते. आणि या सर्वांचा उपयोग करून भोगीची भाजी बनवली जाते. अस म्हणतात “जो न खाई भोगी तो सदा रोगी” म्हणजे एवढी आरोग्यदायी भाजी असते.
5] सत्यनारायण पुजेला आपण पंचामृत आणि गोडाचा शिरा बनवतो. या पंचामृताचे आपल्या परंपरेत अनन्य साधारण फायदे आहेत. आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढते. जिवानुजन्य आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. गर्भवती महिलांचा याचा सर्वाधिक फायदा होतो. मेंदूची वाढ होते. केस आणि त्वचा तुकतुकीत होते. यामध्ये असणारे घटक हे आपल्या शरीराला प्रचंड पोषक आहेत.
नैवेद्य अर्पण करताना अनुसरावयाची पद्धत:
नैवेद्य अर्पण करताना तो शुद्ध आणि स्वच्छ असावा. नैवेद्य शाकाहारी असावा. नैवेद्य तयार झाल्यानंतर तो केळीच्या पानावर वाढावा. पानाचा देठ देवाकडे आणि पानाचे टोक आपल्याकडे करावे. नंतर नैवेद्याची यथासांग मांडणी केल्यावर दोन तुळशी पत्र घ्यावेत एक नैवेद्यावर आणि एक देवाच्या चरणी ठेवावे. पाण्याने पानाभोवती एकदा मंडल काढावे. त्यानानंतर इष्टदेवतेची प्रार्थना करावी. आणि नैवेद्य देवाला अर्पण करावा.
विविध देवतांसाठी वेगवेगळे नैवेद्य:
वेगवेगळी देवता तशी वेगवेगळी श्रद्धा आणि तसे त्यांचे नैवेद्य –
1] विष्णुदेवांसाठी शिरा अर्पण करतात.
2] गणपती बाप्पा साठी मोदक चा नैवेद्य अर्पण करतात.
3] सत्यनारायणा साठी पंचामृत आणि गोडाचा शिरा अर्पण करतात.
4] शंकर महादेवांसाठी दुध अर्पण केले जाते.
5] दुर्गा माते साठी दुध आणि इतर पांढरे पदार्थ अर्पण करतात.
6] श्रीकृष्णा साठी दही, दुध, तुप, लोणी यासारखे पदार्थ अर्पण करतात.
नैवेद्याच्या कथा आणि पुरणातले संदर्भ:
1] एकदा देव देवतांनी अमृता पासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वती साठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश यांच्यात मोदकासाठी भांडण लागले. त्यावर देवी पार्वतीन एक उपाय शोधला कि जो धर्माचरणात सर्वोत्तम असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल. त्यासाठी त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा करावयाची होती. मग कार्तिकेय प्रदक्षिणेला निघून गेले आणि गणेशाने आई वडील भोवती प्रदक्षिणा घातली आणि परिक्रमा पूर्ण केली. व माता पित्याचे मन जिंकले आणि मोदकाची प्राप्ती केली. पद्म पुराणात याचा उल्लेख आढळतो.
2] गोकुळाष्टमी च्या गोपाळकाला याबद्दलही पुराणात उल्लेख आहे. श्रीकृष्ण यांनी सर्व गोपाळाना आपापल्या घरून जेवण आणायला सांगितले व आणलेल्या जेवणाचा एकत्र काला केला त्याला गोपाळकाला म्हणतात. आणि तो एवढा अप्रतिम बनला होता ना कि त्याची चव घ्यायला देवांनी माशाचे रूप घेतले होते परंतु तरीही त्याचा आस्वाद घेता आला नाही.
माझा हा लेख आवडला असल्यास लाईक करा. आणि कॉमेंट मधे नक्की सांगा..
लेखिका -सुप्रिया विशाल सरडे. करमाळा
फार उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद !
आजच्या प्रत्येक गोष्टीकडे शास्त्रीय पद्धतीने बघणाऱ्या पिढीला या अशा गोष्टीही माहीत असणे गरजेचे आहे.