नरकचतुर्दशीचे महत्त्व

WhatsApp Group Join Now

 नरकचतुर्दशी

ॐ धर्मराजाय नम:

ॐ मृत्यवे नम:

ॐ अन्तकाय नम:

ॐ वैवस्वताय नम:

ॐ यमाय नम:

अर्थात:अकाल मृत्यु पासून मुक्ती व सुरक्षित स्वास्थ्य प्राप्त होओ.

नरक चतुर्दशीच्या दिवशी या मंत्राचा जप करण्याची रीत आहे. या दिवशी मृत्यूची देवता यमराज यांची पूजा केल्यास दीर्घायुष्य लाभते असे म्हणतात.या दिवशी वाईट शक्तींचे उच्चाटन करून पुढच्या दीपावलीच्या दिवसांच्या शुभ कार्याला आरंभ करण्याचा मार्ग सुकर केला जातो.

‘असुरांच्या सहाराचा दिवस’ म्हणजेच एक प्रकारे नरकातुन पृथ्वीवर अवत्तीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. नरकासुर राक्षसाच्या वधाच्या निमित्याने आश्विन वैद्य चतुर्दशीला दिवाळीचा हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीला ‘छोटी दिवाळी’,’काली चतुर्दशी’ आणि ‘नरक निवारण चतुर्दशी’ असे देखील म्हटले जाते.

नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावून दिवा दान करण्याचे पौराणिक महत्त्व आहे.  या दिवशी संध्याकाळी दिवे लावल्याने अंधार दूर होतो, म्हणूनच नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात.  

भक्तहो, आजच्या या लेखात आपण सणाचे धार्मिक महत्त्व,कथा व अभंग स्नान याविषयीची माहिती जाणून घेऊया.

कथा:- प्राचीन काळी नरकासुर नावाचा एक राक्षस होता. तो आपल्या शक्तीचा उपयोग करून देवता आणि ऋषींना त्रास देत होता. नरकासुराचा अत्याचार इतका वाढू लागला की त्याने देव आणि संतांच्या 16 हजार १०० महिलांना बंधक बनवले. नरकासुराच्या अत्याचाराने त्रस्त होऊन सर्व देव आणि ऋषी श्रीकृष्णाच्या आश्रयाला गेले. श्रीकृष्णाने नरकासुराच्या दहशतीपासून मुक्ती देण्याचे आश्वासन सर्वांना दिले.

नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मरण्याचा शाप मिळाला होता म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामेच्या मदतीने कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध करून त्याच्या बंदिवासातून 16 १०० हजार स्त्रियांची मुक्तता केली. 

मरतांना नरकासुराने वर मागितला की आजच्या तिथीला ‘जो मंगलमय मुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये’. कृष्णाने तसा वर त्याला दिला.त्यामुळे अश्विन वाद्य चतुर्दशी हा नरक चतुर्दशी मानला जाऊ लागला. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचा वध करून श्रीकृष्ण जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांचे शरीर रक्ताने माखले होते त्याचे शुद्धीकरण करण्याकरिता तेलाने स्नान केले आणि त्यांनी याला ‘अभ्यंग स्नान’ असे नाव दिले.जे लोक अभ्यंग स्नान करतात त्यांना नरकात जावे लागत नाही अशी मान्यता आहे.

नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाही, हे जाणून श्रीकृष्णाने या १६१००सोबत विवाह करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण करून नरक चतुर्दशी साजरी करतात.

सण साजरा करण्याची पद्धत

ब्रह्म मुहूर्तावर उठून प्रथम आई च्या हातून औक्षण करतात.त्यानंतर तीळाचे तेल व उटणे संपूर्ण शरीराला लावून मर्दण करताना हा मंत्र म्हणतात. .

‘यमलोकदर्शनाभावकामोs अभ्यंग स्नान करिषये।’

अर्थ : नरक यातनेपासून सुटकेसाठी मी अभ्यंग स्नान करीत आहे.

यासुमारास घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ व बाहेर दीप प्रज्वलित केले जातात.

दिवाळी हा सण शरद ऋतू मध्ये येत असतो.त्वचा ही वायूदोषाचे स्थान असल्यामुळे या ऋतूमध्ये शरीराची त्वचा अधिक रुक्ष होत असते. त्वचेस स्निग्धता आणण्यासाठी तिळाच्या तेलात उटणे लावण्याची प्रथा आहे. उटण्या मध्ये विविध आयुर्वेदिक औषधी चूर्णांचे मिश्रण केलेले असते. तेल हे उष्ण व स्निग्ध गुणाचे असल्यामुळे अभ्यंगा मुळे वायू दोषाचे शमन होते.

संध्याकाळी मृत्युची देवता यमराज आणि धर्मराज चित्रगुप्त यांची पूजा करून दीपदान करून नरकातील यातनेपासून मुक्ती साठी प्रार्थना केली जाते.

नरक चतुर्दशीचे महत्व

या तिथीला आदल्या दिवशी पासूनच ब्रम्हांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडी मध्ये स्थित्यंतर घडून येते. त्यामुळे वातावरणात दूषित लहरींचा प्रभाव दिसून येतो. पातळातील वाईट शक्तीं या स्थित्यंतरांचा लाभ घेतात. पाताळात रज-तमात्मक कणांच्या हालचालीतून, नाद युक्त कंपन लहरी त्रासदायक ध्वनींची निर्मिती करतात.

या लहरीतील ध्वनी कंपन्यांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा केली जाते. दीपातील प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वात्मक माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरीतील रज-तम कणांचे विघटन केले जाते.

विघटनाच्या या प्रक्रियेमुळे अनेक वाईट शक्तींचे संरक्षण कवच नष्ट होण्यास सहाय्यक ठरते.यालाच ‘दीपाच्या सहाय्याने आसुरी शक्तींचा संहार’ असे म्हणतात.

अभ्यंग स्नानाचे आरोग्य दायी महत्त्व :-

अभ्यंगामुळे

  • शरीराचे रोम छिद्रे उघडे पडतात.त्यामुळे शरीराची रोगप्रतिकरक शक्ति वाढते.
  • वातदोषाचे शमन होते .
  • तिळाचे तेल हे हाडांच्या बळकटीसाठी व आरोग्यासाठी उपयुक्त असते.
  • शरीरातील मेद उत्सर्जित होण्यास मदत मिळते.
  • ताण तणावापासून मुक्ती मिळते.
  • रक्ताभिसरण वाढते.
  • शरीरातील थकवा नाहीसा होतो व शांत झोप लागते.
  • सौंदर्यात वाढ होते.

मित्रहो, नरक चतुर्दशीचा सण आपणास संयम व स्वछतेची शिकवणूक देते.आत्म्याची व शरीराची शुद्धता राखण्यास संयम अति आवश्यक आहे. मनातील अवगुण व रोग् युक्त शरीर यांच्यावर मात केल्यास शरीराचे व मनाचे आरोग्य राखल्या जाते व नरक यातनेपासून आपोआप मुक्ती मिळते.

माहिती आवडल्यास लाइक करा.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top