राष्ट्रीय सुरक्षा दिवस (National Safety Day 2024): ४ मार्च – इतिहास, उद्दिष्टे, थीम.

WhatsApp Group Join Now

National Safety Day 2024: तुम्हाला माहीत आहे की ४ मार्च या दिवशी साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यास कधीपासून सुरुवात झाली? या दिवसाचा इतिहास आणि तो साजरा करण्यामागची उद्दिष्टे काय आहेत? आज आपण या लेखात हेच पाहणार आहोत.

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा इतिहास-

दरवर्षी ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस (National Safety Day) म्हणून साजरा केला जातो. सन १९७२ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवसाचे आयोजन राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Safety Council- NSC) तर्फे केले जाते. या परिषदेची केंद्रीय श्रम मंत्रालयाने  स्थापना ४ मार्च १९६६ या दिवशी केली. राष्ट्रीय स्तरावर एक कायमस्वरूपी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण चळवळ विकसीत करणे हा या परिषदेच्या स्थापनेमागचा उद्देश होता. एन.एस.सी. च्या स्थापना दिवसालाच भारताचा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्याची कल्पना प्रथम पुढे आली. त्यानंतर हा एक दिवसाचा कार्यक्रम पुढे एक आठवड्याच्या उत्सवात रुपांतरीत झाला व तो राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह (४ मार्च ते १० मार्च) म्हणून साजरा होऊ लागला. या वर्षी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा होत आहे. कार्यस्थळे, उद्योग आणि सार्वजनिक ठिकाणे येथील सुरक्षेला महत्त्व देणे तसेच दुर्घटना रोखण्यासाठी जनजागृती करणे हा प्रमुख उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणजे काय? (What is National Safety Day?)

४ मार्च १९६६ या दिवशी स्थापन झालेली राष्ट्रीय सुरक्षा परिषद ही एक ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी अशासकीय संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावर सुरक्षा, व्यावसायिक आरोग्य आणि पर्यावरण चळवळीचा विकास करणे हे तिचे मुख्य उद्दीष्ट आहे. संपूर्ण देशात विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि सेमिनार आयोजित करुन ही संघटना सुरक्षा (Safety), आरोग्य (Health) आणि पर्यावरण (Environment)- (SHE)- या त्रयीला उत्तेजन देते. कामकाजाच्या ठिकाणी सुरक्षित, आरोग्यदायी आणि पर्यावरणानुकुल वातावरण पुरविण्यासाठी उद्योगांना मार्गदर्शन आणि सेवा पुरवणे हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे ध्येय आहे. त्यासाठी परिषदेतर्फे व्याख्याने, परिषदा, परिसंवाद तसेच कार्यशाळा आयोजित केल्या जातात. 

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या/ सप्ताहाच्या व्यतिरिक्त ही सेवा परिषद अग्नी सेवा सप्ताह (१४ -२० एप्रिल), जागतिक पर्यावरण दिन (५ जून), रस्ते सुरक्षा सप्ताह (जानेवारी) आणि राष्ट्रीय इलेक्ट्रिकल सुरक्षा सप्ताह (२६ जून- २ जुलै) या मोहीमा सुद्धा राबवते. या मोहिमांच्या प्रचारासाठी आवश्यक असलेले बिल्ल, माहिती पुस्तिका, कापडी फलक, भित्तीपत्रिका, खिशात मावतील अशा छोट्या मार्गदर्शक पुस्तिका, विशेषत्वाने तयार केलेले प्रचारात्मक साहित्य व विशिष्ट सुरक्षा संदेश असलेले उपयुक्त लेख, सुरक्षा चित्रपट इत्यादी साहित्यही परिषदेतर्फे तयार करुन पुरवले जाते. वर्षभर सुरक्षेबद्दलची जाणीव कायम रहावी म्हणून परिषदेतर्फे सुंदर दिनदर्शिका (calendar) सुद्धा प्रसिध्द केली जाते. 

राष्ट्रीय सुरक्षा दिवस अभियानाचे उद्दिष्ट (National Safety Day India)

अनेकदा उद्योगांत किंवा कामकाजाच्या ठिकाणी पुरेशी जागृती आणि सतर्कता न बाळगल्याने मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. याबाबत जनजागृती करण्यासाठी व त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

या कार्यक्रमाची उद्दिष्टे अशी आहेत:

  • सर्वसामान्य जीवनशैलीत सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण यांना प्राथमिकता देणे.
  • देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण (SHE- Safety- Health- Environment) या त्रयींची चळवळ पसरवणे.
  • कामकाजाच्या ठिकाणी सुरक्षा आणि व्यावसायिक आरोग्य यांना प्राधान्य देण्यासाठी सुरक्षा नीती लागू करण्यास प्रोत्साहन देणे ही.
  • जीवनातील सर्वच क्षेत्रात सुरक्षितता आणि व्यावसायिक आरोग्य यांना प्राधान्य देणे व त्या बाबतीत लोकजागृती करणे.
  • सुरक्षित आणि पर्यावरणानुकुल उत्पादने आणि उद्योगधंदे यांना प्रोत्साहन देणे.
  • या सर्व उपक्रमांत लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न करणे.

वर उल्लेख केलेल्या तीनही क्षेत्रात सुरक्षा परिषदेची काय काय कामे आहेत ते आपण जाणून घेऊ.

१) सुरक्षितता- सर्व क्षेत्रात सुरक्षिततेच्या सर्व पैलूंवर लक्ष ठेवणे, त्याबाबत जागृती निर्माण करणे, तसेच दुर्घटनांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे उद्दिष्ट आहे. सुरक्षा संस्कृती रुजवणे व वाढवणे, सुरक्षिततेसाठी सावधानी बाळगणे, सुरक्षेच्या उपायांना प्राधान्य देणे, आपत्कालीन व्यवस्था निर्माण करणे इत्यादींचा यात समावेश होतो. 

या दिवशी सर्व क्षेत्रातील नागरीकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजीबाबत जागरुक केले जाते. कारखान्यांमध्ये होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अप्रिय घटनांमधून होणाऱ्या नुकसानाबाबत, तसेच त्या घटना थांबवण्यासाठी काय उपाय योजले पाहिजे याबाबत, माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. कामगारांना सुरक्षा उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

कामकाजाच्या ठिकाणांव्यतिरिक्त, दैनंदिन जीवनातील सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यावरही राष्ट्रीय सुरक्षा दिवस भर देतो. रस्ते, घरे, बांधकामांची ठिकाणे, उद्योग, कार्यालये इत्यादी ठिकाणी सुरक्षेसंदर्भात जागरूकता निर्माण केली जाते. यात सुरक्षितपणे वाहन चालवणे, घरगुती उपकरणे व अवजारे यांचा सुरक्षितरित्या वापर करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित व्यवहार ठेवणे यांचा समावेश होतो. 

२) आरोग्य– कामगारांचे आरोग्य उत्तम राखणे हे कुठल्याही उद्योगाच्या वाढीसाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे कामकाजाच्या ठिकाणी आरोग्य आणि स्वच्छतेच्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे तसेच अस्तित्वात असलेल्या सेवांचे ऑडिट करणे हे कामही राष्ट्रीय सुरक्षा परिषद करते. 

३) पर्यावरण– पर्यावरणाची समस्या ही एक जागतिक समस्या आहे. मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण ही गोष्टीचा सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेत समावेश केला गेला आहे. पर्यावरणानुकुल उद्योगधंद्यांना आणि उत्पादनांना परिषदेकडून प्रोत्साहन दिले जाते. उद्योगांतून बाहेर फेकले जाणारे टाकाऊ पदार्थ, उत्सर्जन आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारी घातक रसायने यावर उद्योगांनी नियंत्रण ठेवावे म्हणून परिषद प्रयत्नशील आहे.

या सर्व क्षेत्रांत उत्तम काम करणाऱ्या, सुरक्षेप्रती कटिबद्ध असणारया आणि दुर्घटना रोखण्यास मदत करणाऱ्या  व्यक्तींना व संस्थांना परिषदेतर्फे दरवर्षी पारितोषिकेही दिली जातात. 

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची थीम (National Safety Day Theme)

विविध विषय तसेच घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एन.एस.सी. दरवर्षी ‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ तसेच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करताना एक नवीन थीम ठरवत असते. संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात या विषयांबद्दल लोकांना माहिती देणे आणि नागरिकांच्या कल्याणच्या दृष्टीने काम करणे यात अपेक्षित असते. उदाहरणार्थ २०२२ या वर्षासाठी थीम होती, ‘युवा मनाचे पोषण- सुरक्षा संस्कृतीचा विकास (‘Nurture young minds- Develop safety culture’). अशी होती, तर २०२३ साठी ती होती, ‘आमचे लक्ष्य- शून्य नुकसान’(Our Aim- Zero Harm) . २०२४ साठी ती ‘इ.एस.जी. उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष द्या’ (Focus on Safety Leadership for ESG Excellence) अशी आहे. या घोषवाक्यातून हे स्पष्टपणे दिसत आहे की राष्ट्रीय सुरक्षा परिषद आता ‘सुरक्षा, व्यावसायिक आरोग्य आणि पर्यावरण’ याबाबतीत उद्योगाच्या व्यवस्थापकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करत आहे. सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून उद्योगांमधील नेतृत्वाने कर्मचाऱ्यांचे कल्याण व पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून धोरणे आखली पाहिजे.  ESG (Environmental Impact, Social Responsibility,and stronger Governance) उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा दिवस कसा साजरा करतात? (National Safety Day 2024 Celebration)

जीवनातील सर्व पैलूंमधे सुरक्षेच्या महत्वाच्या बाबतीत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. राष्ट्रीय सुरक्षा परिषतेतर्फे, लोकांना सुरक्षेच्या उपायांबाबत माहिती करुन देण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात. 

राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा उत्सव ध्वजारोहण समारंभाने सुरु होतो. त्यानंतर शपथ ग्रहण समारंभ होतो. सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी ही प्रतिज्ञा घेतली जाते. अनेक संस्था, कारखाने, शैक्षणिक संस्था येत्या सुरक्षा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात सुरक्षा प्रदर्शन, सराव कवायती (मॉक ड्रिल) व त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. लोकांमधे सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पोस्टर्स तसेच बॅनर्स लावले जातात. कामकाजाच्या ठिकाणी संभाव्य धोके ओळखणे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता निश्चित करून त्या दृष्टीने सुधारणा व उपाययोजना करणे यासाठी निरीक्षण तसेच ऑडिट केले जाते. सुरक्षिततेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा व संघटनांचा सन्मान केला जातो. शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षा उपायांबद्दल माहिती करुन देण्यासाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, सेमिनार्स, प्रदर्शने इत्यादींचे आयोजन केले जाते. या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतर्फे व्यक्ती आणि संघटनांनी पालन करण्यासाठी सुरक्षानिर्देश तसेच शिफारसीही प्रसिद्ध केल्या जातात. त्यात अग्नी सुरक्षा, इलेक्ट्रिकल सुरक्षा, रस्ते सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा इत्यादी विविध पैलूंचा समावेश असतो. 

निष्कर्ष-

राष्ट्रीय सुरक्षा दिवस /सप्ताह (National safety Day/ week) हे सुरक्षितता, व्यावसायिक आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षा संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. या वर्षीची थीम – ‘इ.एस.जी. उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष द्या’ ही ‘ESG धोरणांचा एक मूलभूत घटक म्हणून उद्योगांनी सुरक्षिततेचा अंगीकार करावा’ अशी अपेक्षा व्यक्त करते. सुरक्षेच्या नियमावलींकडे एक जाचक बंधन म्हणून न पाहता, जबाबदार, शाश्वत आणि नैतिक व्यवसायासाठी प्रेरणा म्हणून पाहणे आवश्यक आहे. नियोक्ते, कर्मचारी आणि सरकार या सर्वांची ही संयुक्त जबाबदारी आहे.

या सर्वांनी मिळून एक सुरक्षित, निरोगी, पर्यावरणपूरक तसेच उत्तम भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न कारणे आवश्यक आहे.

तुम्हाला राष्ट्रीय सुरक्षा दिवसाबद्दलची (National Safety Day 2024) ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

2 thoughts on “राष्ट्रीय सुरक्षा दिवस (National Safety Day 2024): ४ मार्च – इतिहास, उद्दिष्टे, थीम.”

  1. Madhavi Gopalan

    खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. खरोखरच राष्ट्रीय सुरक्षा ही जाचक न वाटता तिचा अंगीकार केला पाहिजे. काल दिल्लीत माॅल मध्ये घडलेल्या घटनेसाठी जबाबदार व्यक्तींनी तसा विचार केला असता तर निष्पाप जीव धोक्यात आले नसते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top