न्युरालिंकचा अद्भुत आविष्कार – टेलिपथी l Neuralink full information in marathi

WhatsApp Group Join Now

केवळ विचारांनी करा उपकरणे नियंत्रित!!

भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध घेऊन आणि त्या घटनांच्या परिणामांची कल्पना करून अनेक चित्रपट जगात बनवले जातात. ते अतिशय लोकप्रियही ठरतात. कारण भविष्यात काय घडेल हे जाणून घेण्याची माणसाला नेहमीच उत्सुकता असते. अशाच एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना 29 जानेवारी 2024 रोजी जगात घडली……

विचार करा की एक व्यक्ती घरात बसली आहे. तिच्यासमोर टीव्ही, मोबाईल आणि संगणक आहे. ती व्यक्ती जागेवरूनही न उठता, हात-पाय सुद्धा न हलवता केवळ मेंदूतील विचारांच्या सहाय्याने मोबाईलवर टाईप करत आहे, संगणकावर काम करत आहे, इच्छा झाली तर टीव्हीवर चित्रपट बघत आहे किंवा व्हिडिओ गेम खेळत आहे. हे सगळे केवळ अद्भुतरम्य आणि अशक्य वाटते ना?  पण हे लवकरच प्रत्यक्षात येणार आहे आणि याच तंत्रज्ञानाबद्दलची घोषणा 29 जानेवारीला इलॉन मस्क यांनी केली. 

आज या लेखात आपण या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत. 

काय आहे न्युरालिंक (neuralink) तंत्रज्ञान?

न्युरालिंक (neuralink) ही चेतासंस्थेच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली कंपनी इलॉन मस्क यांनी सात शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर यांच्यासह इ.स.२०१६ मध्ये स्थापन केली. आज या कंपनीत चारशेहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. या कंपनीने मानवी मेंदूमध्ये एका चीपचे रोपण केले असून ज्या व्यक्तीच्या मेंदूत या चीपचे रोपण केले आहे तिची तब्ब्येत सुधारत असल्याची उद्घोषणा इलॉन मस्क यांनी 29 जानेवारीला X च्या व्यासपीठावर (पूर्वीचे ट्विटर) केली आणि संपूर्ण जगात एकच चर्चा सुरू झाली.

अत्यंत क्रांतिकारक आणि ऐतिहासिक अशी ही घटना आहे. न्युरालींकच्या या पहिल्या उत्पादनाला त्यांनी टेलिपथी (Telepathy) असे नाव दिले आहे. या उत्पादनाची चाचणी मानवावर करण्यासाठी या कंपनीने गेल्या वर्षी स्वयंसेवकांची भरती प्रक्रिया चालू केली होती. तत्पूर्वी मे २०२३ मधे त्यांनी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची (Food and Drug Administration of US) परवानगी अशा प्रकारच्या चाचणीसाठी मिळवली होती. ज्या व्यक्तींना मज्जातंतूंना इजा झाल्यामुळे quadriplegia (हात आणि पायांच्या मर्यादित हालचाली) हा विकार झाला आहे आणि जे ALS (amyotrophic lateral sclerosis) या विकाराने ग्रस्त होते अशा व्यक्ती या अभ्यासासाठी पात्र होत्या. या अभ्यासाला त्यांनी PRIME (Precise Robotically Implanted Brain-Computer Interface) असे नाव दिले. मानवी मेंदू आणि संगणक यांच्यामध्ये थेट संपर्क प्रस्थापित करणे हेच या अभ्यासाचे उद्दिष्ट होते आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत असे म्हणता येईल. असा संपर्क प्रस्थापित करता आल्यास पक्षाघात झालेले लोक आपल्या विचारांच्या सहाय्याने फोन, संगणक इत्यादी बाह्य उपकरणे वापरू शकतील आणि तसेच त्यांच्यामार्फत दुसरे कोणतेही उपकरण!!

न्युरालिंक (neuralink) मेंदूत चीप बसवली म्हणजे नक्की काय केले?

या अभ्यासाच्या दरम्यान आर वन हा रोबो (R1 Robot) मेंदूमध्ये चीप रोपण करण्याच्या कामासाठी वापरला गेला. या चीपला एन वन (N1) असे म्हटले गेले. या चीपचा आकार पाच नाणी एकावर एक ठेवल्याप्रमाणे आहे. अत्यंत बारीक आणि लवचिक अशा तंतूंच्या सहाय्याने ही चीप मेंदूमधील मानवी हालचाली नियंत्रित करणाऱ्या भागात बसवली गेली. आपण मोबाईल मध्ये सिम कार्ड बसवतो ना अगदी तशीच!! एकदा बसवल्यानंतर ही चीप बाहेरून दिसू नये म्हणून ती सौंदर्यदृष्ट्या अदृष्य (cosmetically invisible) बनवली गेली. मेंदूमध्ये निर्माण होणारे संदेश मुद्रित (रेकॉर्ड) करणे आणि ते संदेश, त्यांचे अर्थ उलगडून दाखवणाऱ्या (डीकोड करणाऱ्या) ॲप पर्यंत पाठवणे हे याचे प्रमुख कार्य आहे. ब्लूटूथच्या सहाय्याने हे संदेश ॲपपर्यंत पोहोचतील. हे ॲप प्रामुख्याने मानवी हालचाली डीकोड करण्याच्या उद्देशाने बनवले गेले आहे. 

हे सर्व समजण्यासाठी मानवी मेंदू कसा काम करतो ते समजून घेऊयात. म्हणजे समजा आपल्याला संगणकावर काम करायचे आहे. तर सर्वप्रथम आपल्या मेंदूत तसा संदेश तयार होतो. तो संदेश मज्जातंतूमार्फत हाताच्या स्नायूंना पाठवला जातो आणि त्यानुसार हाताचे स्नायू कार्य करतात आणि कॉम्प्युटरच्या कीबोर्ड वर बोटांच्या सहाय्याने काम करण्यास सुरुवात करतात. ही प्रक्रिया पुष्कळ गुंतागुंतीची असते. आपले डोळे, हात, हातांची बोटे अशी अनेक इंद्रिये एका वेळेस काम करत असतात. परंतु समजण्यासाठी ती सोप्या भाषेत इथे सांगितली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया इतकी जलद गतीने होते की आपल्या मनात विचार येताच आपले काम चालू होते. आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेची जाणीवही होत नाही. परंतु जेव्हा माणसाला पक्षाघात किंवा तत्सम आजार होतात तेव्हा मज्जातंतू संदेशवहनाचे काम करत नाहीत. त्यामुळे संदेश हातापर्यंत जात नाही आणि हात काम करत नाही. पक्षाघात झालेल्या व्यक्तींना कम्प्युटरच्या कीबोर्ड वर काम करणे तर अशक्यच असते. परंतु वरील तंत्रज्ञानाचा वापर करून अशी व्यक्ती कॉम्प्युटर कर्सर किंवा कीबोर्ड यांचे त्याच्या विचारांच्या सहाय्याने नियंत्रण करू शकत शकेल. 

न्युरालिंक (neuralink) कशी काम करेल ही चीप? (Neuralink full information in marathi)

  • ही चीप ब्लूटूथच्या सहाय्याने मानवी मेंदूला कम्प्युटर किंवा मोबाईलशी जोडेल. 
  • एखाद्या पक्षाघात झालेल्या व्यक्तीच्या मेंदूत जर ही चीप बसवली तर त्या व्यक्तीच्या मेंदूत निर्माण झालेले तरंग ही चिप वाचू शकेल.
  • हा तरंग नंतर संगणकाला समजेल अशा भाषेत संगणकापर्यंत पोहोचवला जाईल. या भाषेला बायनरी भाषा असे म्हणतात. यामध्ये फक्त ० आणि १ यांचा वापर केला असतो. 
  • संगणक किंवा मोबाईलपर्यंत पोहोचल्यानंतर तो तरंग त्या उपकरणाकडून वाचला जाईल आणि ते उपकरण त्यानुसार काम करेल.
  • म्हणजेच ही चीप मानवी मेंदूतील तरंग वाचून, त्याची फोड (डीकोड) या करून, संगणक, मोबाईल किंवा तत्सम उपकरणापर्यंत पोहोचवण्याचे काम करेल.

म्हणूनच मेंदू मध्ये बसवलेल्या या चीपला लिंक (Link) असे नाव दिले आहे. कारण ही चीप मानवी मेंदू इतर उपकरणांसोबत जोडण्याचे काम करते. 

न्युरालिंक (neuralink) तंत्रज्ञानाचा फायदा कोणाला होईल?

सुरुवातीला, अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या व्यक्तींना या तंत्रज्ञानाचा लाभ होईल. जर स्टीफन हॉकिंग एखाद्या टायपिस्टच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने किंवा एखाद्या लिलावकर्त्यापेक्षा वेगाने जर संवाद साधू लागले किंवा संदेश पाठवू शकले तर काय होईल याचा फक्त विचार करा असे इलॉन मस्क म्हणतात. हे तंत्रज्ञान विकसित करण्यामागे हेच ध्येय आहे.

थोडक्यात, मेंदू आणि शरीराचा एखादा अवयव यामधील संदेशवहनाचे काम थांबले तर या चीपच्या सहाय्याने ते परत स्थापित करता येईल. 

न्युरोलिंक या कंपनीने याबाबतीतला एक व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यात आपण स्पष्ट बघू शकतो की अशीच एकदा मेंदूत बसवली की ती चीप बसवलेली व्यक्ती केवळ विचार करून मोबाईल किंवा संगणकावर टाईप करू शकते किंवा केवळ विचार करून व्हिडिओ गेम खेळू शकते. एखादा चित्रपटही अशी व्यक्ती बघू शकते. त्यासाठी त्या व्यक्तीला जागेवरून हलण्याची सुद्धा आवश्यकता नसते. केवळ विचारांच्या साहाय्याने हे सर्व बसल्या जागी करता येते. दृष्टीहीन, अपंग, तसेच पार्किन्सन्स, एएलएस यांसारख्या मज्जासंस्थेसंबंधीच्या विकारांनी पीडित व्यक्तींचे जीवन सुखकर करणे हाच या तंत्रज्ञान विकसित करण्यामागचा इलॉन मस्क यांचा मुख्य उद्देश आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशा व्यक्तींना आपले हात -पाय न हलवता,  न उठता- बसता मोबाईल, संगणक व इतर उपकरणे वापरता येतील. 

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवाचे जीवन सुखकर करण्याच्या, मानवी जीवनातील समस्या सोडवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे असे म्हणता येईल. मानवी बुद्धीमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) यांच्यात समन्वय साधण्याच्या दिशेने ही सकारात्मक वाटचाल आहे. 

तुम्हाला ही माहिती (Neuralink full information in marathi) कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

4 thoughts on “न्युरालिंकचा अद्भुत आविष्कार – टेलिपथी l Neuralink full information in marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top