सक्तीची सुट्टी मिळाली आणि ती गळून पडली. नाही म्हणता फार लक्षणं नव्हती पण शरीरभर कणकण होती.चार पावलं चालली तरी धापेने जीव नकोसा व्हायचा तिचा. ती उठली तेव्हा खिडकीच्या बारेवर बसलेली चिमणी आपल्या इवल्याशा चोचेतून चिव चिव करत काहीतरी शोधत होती.मीराची नजर त्या चिमणीवर पडली तशी तिच्या डोळयांत तिला तिच्यासारखंच काहीतरी जाणवलं आणि तिने पटकन नजर फिरवली.उठताना पावलं काहीशी जड वाटत होती. तिने मोठा उसासा टाकला आणि एक हात मांडीवर आणि एक भिंतीला असं करत उठली.तिला,घर फार शांत भासलं होत.पायाखालची फरशी तळव्यांना थंडीने शेकत होती.असंही एरवी तीन खोल्यांच्या त्या घरात तिचा एकच कोपरा होता.तिच्या आवडीचा कोपरा.त्याच कोपऱ्यातच उभं राहून मऊमऊ भात आणि भाकऱ्या करायची,उभ्या उभ्याच थंड होऊन जाळी पडलेला चहा दोन घोटात पोटात ढकलायची..
भांड्यावरून हात फिरवून मायेने त्यांच्याशी बोलायची.आईने दिलेला तो तवा जो आता खोल खड्डा पडून उथळ झालाय तरी त्यावर भाजलेल्या भाकरीची चव तिच्या तोंडात बराच काळ रेंगाळत असे.तब्बल अडीच आठवड्यांनी ती चालत स्वयंपाकघरात शिरली तसं तिला उन्मळून आलं. ओट्यावर वाळत घातलेला टॉवेल सुकून फडफडित झाला होता.कट्टा सुतक पडल्यासारखा ओसाड दिसत होता. भांड्यावर धूळ साचल्या सारखी दिसत होती. तशी तिला लक्षणं फार नव्हती पण कणकण वाटायची आणि धाप लागायची,तिने तसंच अंगावर ढकललं .त्यातही तिने आठवडा काढला पण काही सहन होईना आणि सांगता येईना अस झालं आणि एका सकाळी तिने अंथरूनच नाही सोडलं म्हणून सगळ्यांना हे कळालं.
त्याआधी?असो मग काय एक खोली, एक अंथरून आणि चार फरश्यात तिचं वावरणं आलं.इतक्या वर्षात कधीच न जाणवलेल सुरकुतेपण आता तिला जाणवायला लागलं.वरवर दिसणारी खोलीची भिंत आतून पोकळ झालीय हे कळलं,बारीक मोठी मिळून एकूण सोळा छिद्र पडलीत छताला हे मोजून झालं. डोक्यातले तांबूस केस,डोळ्यांखालची काळी किनार,मुजत चाललेल्या खरबडीत हातावरच्या रेषा सगळं अगदी स्पष्ट दिसू लागलं.
एरवी,स्वतःसाठी वेळ काढावा असा एक क्षण तिच्या वाट्याला कधीच आला नाही आणि त्याचा विचार ही तिने कधी केला नाही.पण इथे आता सक्ती आली आणि सगळंच थांबल..
तिच्यासोबत तिच्या देवालाही चौदा दिवसांची सुट्टी मिळाली.या घरात येऊन पंचवीस वर्षे झाली म्हणता तिने एक आवंढा गिळला.घरात आली घरचीच झाली म्हणताना तिने स्वतःच्याच चेहऱ्यावरून हात फिरवला.याआधी कधी असं जाणवलं नाही,पण आता तिला नाईलाज झाला आणि एका जागी बसावं लागलं.
त्यावेळी जगभर कोरोनाने थैमान मांडल होतं, साधी शिंक आली तरी लोकं लांब पळत होती त्यात इथे तर ती तापाने फणफनत होती.कोरोनात आपल्यामुळे कुणाला काही होऊ नये म्हणून तिने एक खोली अंतर ठेवलं होतं,असंही आपल्यामुळे कुणाचं कवडीभर ही नुकसान होऊ नये याच चिंतेत ती सतत असायची आणि सगळ्यांना जपणं हेच आपल्या आयुष्याच ध्येय आहे असं असल्यासारख वागत होती,तिच्या किचन च्या खिडकीवर कितीतरी पाखरं किलबिलाट करायची,घरात माणसांचा राबता होता,दारात आलेला कुठलाच व्यक्ती खाली हाताने गेला नाही,काहीच नाही म्हणलं तरी गुळाचा खडा तरी ती ठेवायचीच.ती थोरली तिच्या हाताखालीच दोन दिर मोठे झाले,नोकरी लागले.नवरा एका कारखान्यातून एका मोठ्या पोस्टवरून रिटायर झाला तरीही घरात रोज त्यांचं रुटीन असे,पेपरच्या घडी पासून ते इस्त्रीच्या कपड्यांपर्यंत ही सगळ जसच्या तसं बघायची.मुलगा आणि सून एकाच कंपनीत कामाला, त्यांना दूर पडत म्हणून ते घर घेऊन वेगळीकडे राहिलेले.सासू लवकर गेली पण आजेसासू होती.म्हणायला काहीशी खाष्ट, टोचून बोलणारी होती तरीही ,मीरा ला मात्र कधीच काही म्हणतं नसे. ती या घरात आली तशीच एकरूप झाली.
घरात तिचा मान होता, खरंतर असं तिला वाटायचं.यातही तिला सुख वाटायचं आणि दोन घास जास्तीचे जेवण जायचं,आपल्याविना यांचं कसं होणारं??हे रोज दिवसातून अनेकदा म्हणायची, आणि हसून कामाला लागायची,अज्ञानात सुख असतं ते हेच असावं.तिचा दिवस सकाळी सहाला सुरू व्हायचा ते रात्री साडे अकरा,बारापर्यंत चालूच असे,यातच जेवण खाणं, लोकांचा राबता,भाजीवाला, फळवाला, इस्त्रीवाला यांचे हिशोब सगळं सगळं तीच बघायची.
पण या एका आठवड्यात तिला जाणवलं आपण किती क्षीण होत चाललो आहे.या खोलीत रहा,बाहेर पडू नका, कुणाच्याही जवळ जाऊ नका हे जेव्हा झालं तेव्हा तिला जाणवलं गेल्या पंचवीस वर्षात असं सक्तीच असं काहीच नव्हतं,तसे तिने स्वतःचे हात बघितले आणि तिला जाणवलं किती खरबरीतपणा भरला आहे हातात, तशीच तिची नजर शरीरभर गेली तिला ती सुकल्या सारखी वाटायला लागली. एरवी तिच्याच हातच्या चहाने होणारी सकाळ आता उशीरा होत होती,त्यातही विना कोणत्या कुजबुजीशिवाय. तिला याच मनोमन वाईट वाटलं,आपल्याविना याचं कस होणार?या प्रश्नाची होणारी उकल तिला टोचत होती.माणसाचा अति आत्मविश्वास जेव्हा तुटत जातो तेव्हा त्याच्या सारख दुःख नसतं.
तीच ताट दाराच्या फटीतून आत सुरकून येई तेव्हा तिच्या वाहणाऱ्या धारा बघायला आणि पुसायला कुणीच नव्हतं. घरात कुणालाही नसलेली लक्षण आपल्याच वाट्याला नेमकी कशी?कुठून आली याचं उत्तर तिला सापडत नव्हतं,चौदा दिवसांत सगळंच बदललेलं तिला दिसत होत.
इतक्या वर्षात स्वतःकडे पहावं,पुन्हा पुन्हा स्वतःच्याच प्रेमात पडावं हे सगळं ती मागे सोडून आली होती. तिने त्या खोलीतल्या कपाटातून एका कपड्यात बांधलेली अर्धवट अशी विणलेली शाल काढली त्याच कोपऱ्यात तिला कधीकाळी फिरायला गेली तेव्हाचे फोटो मिळाले, ते घेऊन ती तासंतास न्याहळत बसली आणि सासूबाईनी दिलेला जुन्यातला एक रेडीओ. दिवसभरात उसंत म्हणजे काय हे माहीती नसलेली ती आता तासंतास खोलीच्या कोपऱ्यांना न्याहळत रहायची,खोकल्याची उबळ आली तर तिच्या श्वासांचा वाढणारा आवाज दिवसेंदिवस कमी कमी होत होता. एरवी फक्त तिच्या किचनची लाईट सगळ्यात आधी सुरू होऊन सगळ्यात शेवटी बंद व्हायची तेच आता तिच्या रूम ची लाईट सगळ्यात शेवटी चालू होऊन रात्री लवकर बंद व्हायची.नाही म्हणता दाराआडून घरच्यांशी बोलणं व्हायचं त्यातही दिवसेंदिवस ती अश्रू कमी ढाळत होती.
या चौदा दिवसांत ती बरंच मागे जाऊन आली होती. काळानुसार आपण नुसते वाहत आलोय इतकी वर्षे हे तिला जाणवायला लागलं होतं.हे सक्तीचे दिवस तिला आता हवेहवेसे वाटायला लागले होते,आपल्या विना कुणाचं काहीही अडत नाही हेही तिला चांगलंच जाणवतं होत.तब्बल चौदा दिवसांनी उघडलेल्या दारामागे आता एका वेगळ्याच मीराचा जन्म झाला होता.त्या सक्तीच्या सुट्टीत तिने गेलेल्या जवळपास पंचवीस वर्षांचा आराम केला होता.तिने ती शाल पूर्ण केली होती आणि सगळ्यात महत्त्वाच तिने बाहेर येऊन कुणाजवळही टाहो न फोडता ती शांत झाली होती, जस की आपण आपल्यालाच पुन्हा पुन्हा नव्याने गवसतो तसं.
तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या, तेज होतं.कोरोनाची निव्वळ लक्षण म्हणून वेगळ ठेवलेल्या तीला आता काळाच्या ओघात तिच्यातली हरवलेली मीरा सापडली होती.बाहेर पडल्यानंतर पूढे मात्र तिने कधीही कुणाच्याही आयुष्यात स्वतःच स्थान निर्माण करत बसायचा अट्टाहास सोडला,आपल्या विना ही जग जसच्या तसं धावत याची चव चाखल्यानंतर कुणासाठीही झुरत राहणाऱ्या स्वभावाची तिने कात टाकली;आणि सगळ्यात महत्त्वाचे आपलं आयुष्य निव्वळ एका खोलीपुरतं,काही माणसांपुरतं सीमित आहे यावाक्यापासून ती दुरावली,आणि रोजच्या दिवसातला काही काळ हा निव्वळ तिच्याच साठी निघू लागला.आता आपल्या विना यांचं काय? असले प्रश्न तिला भेडसावत नव्हते.कुणाच्याही आयुष्यात आपला गरजेपेक्षा जास्त असलेला हस्तक्षेप आपलं मोल कमी करतो याची उकल तिला झाली आणि तिथून पुढे तिचं आयुष्य सगळंच बदललं गेलं. म्हणूनच आयुष्यात काही सक्तीच्या सुट्ट्या आयुष्य बदलवून टाकतात हे खरं.!
तुम्हाला कथा कशी वाटली..अश्या विविध विषयांवरच्या कथा वाचण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद.!
-निलम घाडगे (पुणे)
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
सुंदर कथा ,मीराच्या भावनांचे बदलणारे कांगोरे खूप छान पकडले आहेत. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
खुपच छान!!