कथेचं  नाव – मरण घेता का मरण? l Marathi Motivational Story For Reading

WhatsApp Group Join Now

मराठी कथेचं  नाव – मरण घेता का मरण? एक  जीवघेणा संघर्ष..

भांड्याची जरा जोरातच आदळआपट करत वैष्णवीची टकळी सकाळपासून चालूच होती.

” या सुनीताला ( तिची मदतनीस ) कळू नये का ? आदल्या दिवशी सांगावं ना येणार नाही म्हणून. अशी वेळेवर बुट्टी मारतं का कोणी ? आता भांडी घासू, का डबे करू ? आधी सांगितलं तर माणूस तयार राहतो ना या सगळ्या कामाला; पण नाही, ही कशाला आधी सांगते ?

अरे बापरे खालून भाजी पण मलाच आणावी लागेल. त्यात हा दादा घरी आला आहे. एक दिवस पण थांबायला तयार नाही. त्याला उद्या जा म्हणते तर यालाही आजचं जायचंय गावाला .रिटायर झालाय बरं फौज मधून. थांबला एक दिवस तर नाही, जसा काही हा गेला नाहीतर याच्या गावंचा सूर्यच उगवणार नाही.”

अशी बिनकामाची सकाळपासून स्वतःशीच चालू असलेली वैष्णवीची बडबड ऐकून शेवटी तिचा नवरा बोललाच, ” कित्ती किरकिर करतेयस गं सकाळपासून ? एक दिवस नाही आली बिचारी तर एवढं काय आभाळ कोसळलं ग तुझ्यावर ? बस ना जरा शांत, एवढा त्रास होतो तर काम करू नको; पण बोलू नको ग बाई. सकाळपासून पेपरचं एकच पान वाचून पलटवून होत नाही. तोंडाचा एवढा वस्तरा चालवू नकोस, हृदयाचे तुकडे होतात माझे इकडे.”

” हो ना ! मग उचला ते तुकडे आणि खा नाष्ट्यामध्ये तुकडे होतात म्हणे, ज्याला ठेच लागते ना तोच बोलतो बरं. नुसतं एकाजागी बसून ऑर्डर सोडणाऱ्याला ती वस्तऱ्याची धार येऊच शकत नाही आणि कोण बिचारी ? ती सुनीता ? ती बरी बिचारी आणि रोज इथे मी मरमर काम करते मला म्हणता का कधी बिचारी ? आआ.”

 वैष्णवी आता हळू हळू रौद्र रूप धारण करू लागली होती. ते नेमकं तिच्या नवऱ्याने हेरलं आणि आपलं कार्यक्षेत्र ओळखून पेपर मध्ये चेहरा आकंठ बुडवून मौनत्व पत्करलं. तेवढयात शेजारच्या दातेकाकू धापा टाकत वैष्णवीकडे आल्या आणि म्हणाल्या, “अग तुला कळलं का गं सुनीताचं ?”

” नाव काढू नका काकू तिचं. सकाळपासून वैताग आणलाय नुसता. मुलगा शाळेतही गेला तरी हिचा काय पत्ता नाही अजून. ही काय पद्धत झाली का हो काकू ?सांगायचं तरी.” वैष्णवी म्हणाली.

” अग ऐक तरी.” काकू म्हणाल्या.

” काय ऐकायचं हो तिचं ? परवा काय तर हिचा काका गावाला गेला म्हणून सुट्टी. मागे काय तर भाऊ गावी गेला म्हणून उशीर, आता कोण गेलं ?” काकूंना पाणी देत वसकनच वैष्णवी ओरडली.

” तिचा मुलगा गं.” पाणी पीत काकू बोलल्या.

” घ्या जमलं, द्या आता टाळी.”, वैष्णवी म्हणाली.

” अग, टाळी कसली वाजवतेस ? हात जोड त्यापेक्षा.” काकू म्हणाल्या.

” हो आता तेवढंच राहिलं. हातच काय जोडू ? चांगला साष्टांग नमस्कारच घालते मॅडम ना आल्यावर.”, वैष्णवी म्हणाली.

” अग गप्प बस गं, तूच बोलते आहेस केव्हाची. मला बोलू तर दे .अगं तिच्या मुलाने गळफास घेतला सकाळी तिच्या घरी.” काकू म्हणाल्या.

” काय ?”

 ” हो ना अगं.” काकू अगतिकतेने बोलत होत्या.

” काय सांगताय काय काकू ? आधी का नाही सांगितलं हो ?” वैष्णवी म्हणाली.

” घ्या बोलू दिलं का तू ?” काकू म्हणाल्या.

” अरे बापरे ! वाईट झालं हो. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो.” वैष्णवी हात जोडून म्हणाली.

” अग ! त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तो निघालाय कुठे अजून?” काकू बोलल्या.

” म्हणजे ?” 

” अग जिवंत आहे तो. दवाखान्यात नेले त्याला वेळेवर म्हणून वाचला म्हणे. हात जोड सुखरूप घरी यावा म्हणून.” काकू म्हणाल्या.

“अरे देवा !” वैष्णवी म्हणाली.

 ” का ग ! काय झालं ?” 

” नाही काही नाही हो काकू, मी आपलं काहीच पुढचं न ऐकता आत्म्याला शांती वगैरे बोलली.“ वैष्णवी म्हणाली.

” मग, म्हणून पुढच्याचं म्हणणं आधी ऐकून घेत जा जरा, तू तर काहीही बोलतेस. अगं ! सकाळी उठल्यावर सुनीताला दिसला म्हणे तो अशा अवस्थेत. लगेच बोलावलं तिने सगळ्यांना.” काकू वैष्णवीला सांगत होत्या.

” पण, कारण काय हे कळलं का हो ?” वैष्णवीने विचारलं.

” नाही ना अगं कारणच नाही कळलं. आता तो शुद्धीवर आल्यावर सांगेल बाई काय ते. बरं चल, मी निघते. तुला सांगायचं होतं म्हणून आले. मलाही कामं उरकायची आहेत.” काकू म्हणाल्या.

” हो हो या काकू.” असं म्हणून वैष्णवीने दार लावलं खरं पण तिच्या मनाचं दार मात्र आता नको त्या विचारांसाठी सताड उघडं झालं होतं.

कारणच नाही कळलं हे वाक्य तिच्या मनात सतत घोळत होतं. आताच अशात तिच्या एका स्नेहीच्या मुलीने गळफास घेतला. कारण काय? तर कळलं नाही.

इतका स्वस्त झालाय का जीव आणि मरण फुकट ? म्हणजे आता आत्महत्येचं कारण काय हे त्यांच्या मागे राहिलेल्या आईवडिलांनी गळफासाला, विषाला किंवा त्या विहिरीला विचारावं का ? का वागत असतील ही मुले अशी ? थोडंसं अपयश आलं, मानापमान झाला, टप्पे टोणपे मिळाले की सरळ जीव देऊन मोकळे ? आईने नऊ महिने पोटात वाढवून जन्म मरणाचा फेरा चुकवून दिलेला जन्म, त्यांचं शिक्षण, जडणघडण या सर्वांना शून्य किंमत असते ?

जीव द्यायला दोन मिनिटे लागतात पण मुलांना मोठं करणं याला तपश्चर्या लागते. त्याला काहीच किंमत नसते ? मनात अनंत प्रश्नांचं काहूर माजलं होतं वैष्णवीच्या.तेवढ्यात तिची तंद्री भंग करायला भाजीवाल्याचा आवाज आला. जरा भानावर येऊन वैष्णवी खाली भाजी घ्यायला गेली तर,

 ” मरण घेता का मरण? मरण घ्या मरण…ओ ताई घ्या मरण ,४० रुपये किलो. ओ या पटापट कोणा कोणाला मरायचय ? सांगा ताई, तुम्हाला किती किलो देऊ ?” चक्क भाजीवाला ओरडत होता.

 ” काय ?” वैष्णवी जोरातच ओरडली.

“अहो मरण ! मरण घ्या मरण.” भाजीवाल्याचं ओरडणं चालूच.

जवळ जाऊन बघितलं तर, त्या भाजीवाल्याच्या ठेल्यात फासाची दोरी, विषाची बाटली असलं काहीतरी विचित्र ठेवलं होतं आणि ते विकणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द यमराज होता.

 “ओ काही काय बोलताय ? काहीही विकाव का ?” वैष्णवी खेकसलीच भाजीवाल्यावर.

“ओ ताई घेऊन ठेवा खूप स्वस्त आहे परत महाग होईल बरं. सांगा पटकन कसं मरणार, फास घेऊन का विहिरीत का विष घेऊन ?” भाजीवाला बोलत होता.

 ” मर मुडद्या तूच. मला का मारतो आहेस ?” वैष्णवी रडवेली झाली होती.

” काय ? ओ ताई मला का शिव्या देताय ? मी काय केलं ? उगाचच. महाग वाटतंय तसं सांगायचं ना, स्वस्त करून देतो . घ्या तुमचं नाही माझं नाही ३५ रुपये द्या आणि घ्या हे बटाटे.” भाजीवाला म्हणाला.

” बटाटे?”

” हो बटाटे. दुसरं काही हवं आहे का ?” भाजीवाला बोलला.

“आ ! नाही, नको, दे बाबा.” वैष्णवी त्या भाजीवाल्याला सारखी निरखूनच बघत होती पण तो भाजीवालाच होता नेहमीचा. मग मगाशी जो दिसला तो कोण होता ?

‘ अरे बापरे आपलं डोकं नाही ठिकाण्यावर. ध्यानीमनी, चित्ती सगळीकडे मरणच ऐकू येतय. भानावर ये वैष्णवी.’ अशी वैष्णवी स्वतःचीच समजूत काढून मनात बोलत होती.

भाजी घेऊन लिफ्ट मध्ये गेली तर मध्येच कुलकर्णी काकू शिरल्या आणि वॉचमन दादाला ‘ सर्वात वरचा मजला रे.’ असं म्हणाल्या.

“ ओ मला नाही जायचंय वरती थांबा तुम्ही इथेच.” वैष्णवी घाबरून म्हणाली.

” अग काय झालं ? मी माझा मजला सांगितला त्याला. तू तुझ्या घरी तुझ्या मजल्यावर उतर ना.” कुलकर्णी काकू म्हणाल्या.

“आ ! काय काकू ?”

“अग तब्येत बरी आहे का ?” कुलकर्णी काकूंनी वैष्णवीला विचारले.

” हो हो काकू अगदी ठणठणीत आहे. येऊ मी ?” वैष्णवी लिफ्टमधून उतरली आणि थेट जिन्यानेच घरी गेली.

“ कशाच काय ! आता यांना काय सांगू माझं तर आज काहीच जागेवर नाही म्हणून. मेंदूचा डोक्याशी, डोक्याचा मनाशी, कानाचा डोळ्याशी कशाचा कशाचीच काहीच संबंधच जुळून येत नाहीये आज.” वैष्णवी स्वतःशीच बोलत होती.

घरी येऊन स्वयंपाक करून तिने दुपारी तिच्या दादाला जेवायला वाढलं; पण अजूनही तिचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतच. जेवताना वैष्णवी बसली त्याच्याशी जरा निवांत बोलत.

” काय रे दादा, मग आता रिटायरमेंट नंतर पुढे काय ठरवलं आहेस ?”

” काही नाही. अजूनही काय करायचं टेंशनच आहे. एक्स सर्विसमनच्या नोकऱ्या नाहीत, तिथेही स्पर्धा. पोरं अजून लहान आहेत त्यांचं शिक्षण, पुढचं सगळं. शहरात महागाई तर विचारूच नको, गावात जाऊन राहावं तर मुलांना शिक्षणासाठी त्रास होईल. त्यात आता सगळ्या सवलती रिटायर्ड झाल्यावर काढून घेतल्या. जेव्हा ऑन ड्युटी असतो तेव्हा कसल्या कसल्या परिस्थितीतून जावं लागतं. जीवाची शाश्वती नसते, ना ऊनवाऱ्याची तमा. कसल्याही परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवणं महत्वाचं असतं.” तिचा भाऊ जेवत जेवत सांगत होता.

एकदा तर तो घेऊन जात असलेलं कंटेनर लाचुंग येथे बर्फात अडकून पडलं म्हणे. ही सारी टीम १५ दिवस त्या १४ फूट बर्फात कंटेनर मध्ये अडकून होती. ते रोज बर्फ काढत होते पण तरीही तो बर्फ कमी होत नव्हता. नशिबाने तो कंटेनर खाण्यापिण्याच्या रसदीचा होता नाहीतर काही खरं नव्हतं या सगळ्यांचं. त्यांची तिथून सुटका झाल्यानंतर ६ महिन्यांनी तो कंटेनर तिथून काढता आला.” दादा सांगत होता आणि वैष्णवी सुन्न पणे ऐकत होती.

तिचे विचार सुरूच होते, एकीकडे जीव एवढा स्वस्त आणि एकीकडे ही जीवघेणी, जिवंत राहण्यासाठी असलेली अनमोल धडपड. किती फरक आहे ? का ? तर त्यांना त्यांच्या कुटुंबाला भेटायचं असतं, बघायचं असतं त्यांच्यासाठी जगायचं असतं, सोबत कर्तव्य ही बजावायचं असतं; पण सतत मृत्यू त्यांना गिळण्यासाठी मानगुटीवर बसलेला आणि इथे सुखा सुखी सगळं मिळत असताना यांना ? किती ही तफावत?.आपण सुखाने झोपावं, आपल्याला सुरक्षित आयुष्य मिळावं म्हणून स्वतःचे सण, सोयरे, नातलग, कुटुंब सारं सारं सोडून अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या मनात जीव देण्याचा विचार नसेल येत का हो कधी ?त्यालाही वाटत असेलच ना दिवाळीला आपल्या लोकांत आपल्या घरी असावं, अभ्यंगस्नान करावं, आई बाबांसोबत दिवाळी, होळी, संक्रान्त साजरी करावी . बहिणीकडून भाऊबीजेला ओवाळून घ्यावं, राखी बांधावी; पण त्यांना या ऐवजी देशासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकावा लागतो. दीपावली, भाऊबीज ,पाडवा, होळी, संक्रान्त मनात थैमान घालत असताना अचानक कुठून तरी येणारी गोळी अचूक नेम धरत उरात शिरते आणि सगळं वादळ एका क्षणात शांत होतं.

नियतीने डाव साधलेला असतो तरी त्या मिटणाऱ्या डोळ्यांत कुटुंबाला भेटण्याची, त्यांना एकदा डोळे भरून बघण्याची अनामिक ओढ तशीच उत्कट असते. त्यांना जगायचं असतं, जीव हवा असतो कारण त्यांना खरी जीवाची किंमत असते. जीव वाचणं किती महत्वाचं असतं हे त्यांना बघून कळतं. लेकीन कम्ब्बखत मौत मात दे जाती है.  त्या शहीद झालेल्या भावाची बहीण तिच्या भावाच्या हातासाठी तरसत असते, तर इथे भावाने ओवाळणीत काय दिलं ? एवढंच दिलं, तेवढंच दिलं,या रुस्व्या फुगव्यात काही बहिणी सणाची मजा घालवत असतात.

देशासाठी शहीद झालेल्या मुलाचं पार्थिव खांद्यावर नेतांना त्याच्या वडीलांचा जीव किती आक्रोश करत असेल; पण त्यांना अभिमान असतो त्या जवान मुलाचा ,कारण त्याने देशासाठी जीव दिला; पण इथे काय ?       याच्या वडिलाचा जीव विचारत असेलच ना रे त्याला,

” का दिला तुझ्या मुलाने जीव ?” काय सांगावं त्या वडिलांनी ? जिथे त्यांनाच कारण माहीत नाही.

प्रत्येक शहीद झालेल्या जवानाला लपेटून नेणारा राष्ट्रध्वज ढसाढसा रडून त्याला विचारत असेल,” का रे लेकरा का जीव दिलास माझ्यासाठी ?”

त्यावर ते प्रत्येक जवान त्याला उत्तर देत असतील, ” अरे भारतमातेच्या रक्षणासाठी जीव देऊन, मृत्यूच्या कवेत शेवटचं जाताना तुझ्या उबदार मिठीतून जाण्याचं भाग्य काय प्रत्येक भारतीयाच्या नशिबी आहे का ? अरे ते फक्त आम्हालाच, यासाठी तर असे कितीतरी आयुष्य कुर्बान तुझ्यासाठी.” यावर तो राष्ट्रध्वज सुद्धा निरुत्तर होत असेल.

काय ते शौर्य काय ती राष्ट्रभक्ती. जेव्हा एक संपूर्ण कुटुंबं त्याग समर्पण करतं ना तेव्हा एक जवान देशाला मिळत असतो. तो त्याग ते समर्पण आठवावं, त्यांचा आदर्श घ्यावा. आज अशी कितीतरी मुलं आजूबाजूला आहेत, जी अत्यंत बिकट परिस्थितीत शिकून मोठ्ठी होतात. संघर्ष करतात, हिम्मत हरत नाहीत.

छत्रपती शिवरायांच्या राज्यात राहून जर आपल्या मनात आत्महत्येचे पळपुटे विचार येत असतील तर सर्व महापुरुषांचे जीवन चरित्र आठवावे. आयूष्य एकदाच मिळतं आणि ते सुंदर आपल्यालाच बनवायचं असतं.जाणारा तर निघून जातो पण त्याच्या जाण्याने त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं ते पुन्हा उभं राहतं ही; पण त्या पायांमध्ये आधीसारखं बळ राहत नाही. आईवडिलांच्या डोळ्यात ती चमक पुन्हा कधीच दिसत नाही. दिसतो फक्त प्रश्नचिन्ह, का दिला असेल जीव आमच्या लेकराने ?

जगावं तर असं की सगळ्यांनी आदर्श घ्यावा आणि मरावं तर असं की मृत्यूलाही आपल्याला नेताना अपराधीपणा वाटावा. सकाळपासून ज्या सुनीताचा वैष्णवीला राग येत होता आता तिच्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना करून तिला असह्य होत होतं कारण सुनीताचा संघर्ष तिने जवळून बघितला होता. नवऱ्याच्या माघारी तिने तिच्या मुलाला किती कष्टाने वाढवलं होतं हे तिला माहित होतं. मुलगा शिकेल आणि तिचे दिवस बदलतील, तिचा संघर्ष थांबेल असं वाटत असताना तिच्या मुलाने तिच्यासमोर असा प्रसंग आणून ठेवावा ?देव तिला ह्यातून बाहेर येण्याचं बळ देवो, तिच्या मुलाला सुखरूप ठेवो अशी प्रार्थना करून तिने तिच्या दादाला निरोप दिला आणि परत कामाला लागली.

आपण मातांनी आपल्या मुलांना शिक्षणासोबत एकच शिकवायला हवं, “ आयुष्यात मांजर बनता आलं पाहिजे, मग त्याला कसही फेका, ते उभच राहतं.”

हे जमवलं तर जगण्याची इच्छा जीव देण्याच्या निर्णयावर मात करेल आणि म्हणायची वेळ येणार नाही,“ कोणी मरण घेता का मरण ???”

तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

      धन्यवाद !

11 thoughts on “कथेचं  नाव – मरण घेता का मरण? l Marathi Motivational Story For Reading”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top