ओटी भरण्याची परंपरा आणि तिचे कारण
भारतीय संस्कृतीत पूर्वापार जतन करत आलेल्या रुढीपरंपराना जसे अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे तसेच वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे “ओटी भरण” हा विधी. भारतीय लोकसंस्कृतीतील स्त्री जीवनामधील ही एक महत्त्वाची रूढी आहे. भारतातील विविध प्रांतात तसेच समाजातील विविध स्तरात ही पद्धत थोड्याफार फरकाने अस्तित्वात आहे. ओटी भरणे हा विधी स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असून, हा स्त्रीच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला सन्मानच आहे.

परंपरेचा उगम
ही परंपरा चालू होण्यामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे. ओटी म्हणजे नाभी खालचे पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. याला ओटीपोट असेही म्हणतात. स्त्रियांच्या ठाई असणारी नवनिर्मितीची क्षमता, तिची सर्जनशीलता व मातृत्व याचा संदर्भ या परंपरेच्या मागे आहे. मातीमध्ये जसे नवनिर्मितीचे सामर्थ्य असते तेच नवनिर्मितीचे अर्थात वंश वृद्धीचे सामर्थ्य स्त्रियांच्या गर्भाशयात असते. ओटी भरणे याचा सोपा अर्थ म्हणजे एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला संतती सुख प्राप्त व्हावे यासाठी दिलेल्या शुभेच्छा. ओटी फक्त सवाष्ण, म्हणजेच जिचा पती हयात आहे अशा सौभाग्यवती स्त्रियांचीच भरली जाते. कुमारीका अथवा विधवा स्त्रियांची ओटी भरण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत नाही.
श्रावण महिना हा सुवासिनींसाठी सणवार आणि व्रतवैकल्य ह्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा महिना. या सणावारांच्या काळात एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीची ओटी भरणे याला हिंदू धर्मात, त्यातही विशेषतः महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ, डोहाळे जेवण, बारसे असो किंवा सासरी जाणारी लेक अथवा सणासुदीला बोलावलेली सवाष्ण असो; या प्रत्येक वेळी लग्न झालेल्या स्त्रीची, म्हणजेच सुवासिनीची ओटी भरली जाते.
विधी
ओटी भरण्यासाठी तांदूळ अथवा गहू, सुपारी, खोबरे, श्रीफळ, लेकुरवाळे हळकुंड, हळद कुंकू आणि पाच प्रकारची फळे इत्यादी सामग्री वापरली जाते. या सर्वांना एक प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्नहारी, सौभाग्यदायी, आरोग्यवर्धक तसेच शुभदायी आहेत. ओटी मधील धान्य म्हणजेच तांदूळ अथवा गहू हे पावित्र्य, सुपीकता आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. ओटीतील सुपारी, जिला “वर्षायु फळ” असेही म्हणतात, ( फळ तयार होण्यास पूर्ण एक वर्ष लागते त्यामुळे तीनही ऋतूंचे संस्कार यावर होतात) ते अखंडतेचे प्रतिक मानतात. सुपारी सोबत ओटीत न सोललेला नारळ (असोल्या) ही घातला जातो, त्याला ‘श्रीफळ’ असेही म्हणतात. हा पाण्याने भरलेला नारळ सशक्त गर्भाचे प्रतीक म्हणून ओटीत घातला जातो. सुपारी व नारळ या दोन्ही वस्तू तांबूल पत्र अर्थात विड्याच्या पानावर ठेवून ओटीत घातल्या जातात. विड्याच्या पानांमध्ये वात- पित्त- कफ या त्रीदोषांवर मात करण्याची औषधी शक्ती असते. त्यामुळे असे हे गुणकारी पान स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी ओटी मध्ये घातले जाते.
ओटी भरणारी सुवासिनी आपल्या पदरामध्ये ओटीचे सामान भरून ते,जिची ओटी भरायची आहे तिच्या पदरात, ओच्यात किंवा दुप्पट्यात सोडते आणि वरून तीन किंवा पाच वेळा ओंजळीने तिच्या पदरात तांदूळ अथवा गहू घालते. सुवासिनीच्या कपाळावर अनामिका आणि मधले बोट अथवा अंगठा यांच्या साह्याने हळदीकुंकू लावले जाते. ते सौभाग्याचे प्रतीक असून तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना म्हणून लावले जाते. ओटी भरताना पाच फळे देखील ओटीत घालण्याची पद्धत आहे. कोणतेही फळ हे पूर्णत्वाचे प्रतीक असते. गर्भाला पूर्णत्व लाभून त्याचे सुदृढ बालरूपात या धरतीवर आगमन व्हावे यासाठी फळ हे प्रतीक मानले जाते. सुवासिनीला यावेळी केसात माळण्यासाठी गजरा अथवा फुले देण्याची पद्धत असून त्याचा संबंध तिचे मन प्रसन्न राहावे यासाठी आहे. ओटी ही खणा नारळाने भरण्याची पद्धत आहे. खण म्हणजे ब्लाऊज पीस. अलीकडे मॅचिंगच्या जमान्यात खणा ऐवजी पाकिटात पैसे भरून देण्याची पद्धत रूढ होत आहे.
लग्नात नवविवाहितेची अशी साग्र संगीत पद्धतीने ओटी भरतात. सासर होऊन ती पहिल्यांदा माहेरी जाताना तीच ओटी भरून तिला माहेरी पाठवण्याची पद्धत काही ठिकाणी असून, माहेराहून येताना तिथल्या सुवासिनींकडून तीच ओटी भरून परत सासरी पाठवण्याची पद्धत आहे. एखाद्या विवाहितेला दिवस गेले, म्हणजेच गर्भधारणा झाली की दुसऱ्या अथवा तिसऱ्या महिन्यात सासर माहेरच्या मोजक्याच सवाष्ण स्त्रियांच्या उपस्थितीत तिची “चोर ओटी” भरण्याची पद्धत आहे. नवागताच्या आगमनाचे गुपित चार चौघांना लगेच कळू नये हा या मागचा उद्देश. सासरी चाललेल्या मुलीची ओटी सवाष्ण आई भरू शकते परंतु मुलगी मात्र आपल्या आईची ओटी फक्त अधिक महिन्यातच भरू शकते. यावेळी “ पुन्हा तुझ्याच पोटी जन्म मिळू दे”, म्हणून आशीर्वाद मागण्याची प्रथा आहे. सासूची ओटी सुनेने भरू नये असाही एक संकेत आहे. कारण लग्नानंतर सासूने आपल्या कुशीतील फळ तिच्या स्वाधीन केलेले असते. गर्भारपणात तिसऱ्या अथवा सातव्या महिन्यात गर्भवतीची ओटी भरल्यानंतर तिची ओटी प्रसुती होईपर्यंत भरत नाहीत.
अशाप्रकारे प्राचीन काळापासून प्रचलित असलेली “ओटी भरण” ही सुंदर परंपरा आजच्या समाज जीवनातही पाळली जाते, यावरूनच तिचे सांस्कृतिक तसेच पारंपारिक महत्त्व लक्षात येते.
लेखिका –स्मिता यशवंत चोथे ,कोल्हापूर.