पाडवा – नवविवाहितांसाठी विशेष दिवस
दिपसुमने ज्योत उमलूनी फुलली सदनाच्या भाळी
रंग लेपूनी सौख्याचे थाटात नटली रांगोळी
फुल माळूनी फुलात माळीत गुंफल्या माळी
क्षण सोन्याचे घेऊन आली दिपवेडी दिवाळी
हिंदू धर्मातील प्रमुख उत्सवांपैकी एक म्हणजे दिवाळी. अंधारावर प्रकाशाचे वर्चस्व, नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी हा सण थाटात साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या दिवाळीच्या पाचही दिवसांचे विशेष धार्मिक महत्व असते. या लेखात आपण दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच ‘पाडवा’ शब्ददीप प्रज्वलित करून साजरा करणार आहोत. या वर्षी २ नोव्हेंबर शनिवार बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आहे. या लेखात आपण पाडव्याचे महत्व आणि माहिती जाणून घेणार आहोत.
शुभ तिथी आणि पवित्र विधींचा धार्मिक संगम म्हणजे दिवाळीचा सण! दिवाळीत येणारी ‘कार्तिक शुद्ध प्रतिपदा’ ही तिथी अर्थातच दीपावली पाडवा हा दिवाळीचा तिसरा दिवस. पुराणांमध्ये पाडव्याविषयी विविध कथा आणि मान्यता प्रचलित आहेत. या दिवसाला बलिप्रतिपदा असेदेखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून असुरराज बळी याला पाताळ लोकात पाठवले होते अशी आख्यायिका आहे. या दिवशी देवी पार्वतीने भगवान शंकराला द्युत खेळामध्ये पराजित केले होते. त्यामूळे या दिवसाला ‘द्युत प्रतिपदा’ असे देखील संबोधण्यात येते. हा दिवस वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही कार्तिक महिन्याच्या शुध्द पक्षातील प्रथम तिथी आहे. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने निर्माण केलेल्या ‘विक्रम संवत’ या ऐतिहासिक दिनदर्शिकेचा आरंभ होतो. पाडव्याच्या दिवशी उत्तर भारतात श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात गोवर्धन पूजा केली जाते. देवाला विविध प्रकारचे पक्वान्न आणि मिष्ठान्न अर्पण केले जातात. त्यामूळे या सणाला ‘अन्नकूट’ असेही म्हटले जाते. तसेच आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक या दिवशी नववर्षाची सुरुवात मानतात. त्यांच्या जमाखर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात.
अशा प्रकारे पाडव्याच्या दिवसाचे महत्व अतिशय व्याप्त आणि सखोल आहे. या दिवशी पौराणिक , भौगोलिक , आर्थिक आणि अध्यात्मिक परंपरांचा दिव्य संगम भारतभरात साजरा केला जातो.
पतीपत्नीच्या नात्यातील गोडवा म्हणजे पाडवा! प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी विशेषतः नवविवाहितांसाठी पाडव्याचे खास महत्व आहे. त्यामागे वामन अवताराची विशेष आख्यायिका आहे. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. तो स्वभावाने दानशूर आणि कर्माने अतिशय पराक्रमी राजा होता. परंतु, तो अहंकाराच्या अधीन झाला आणि त्याच्या प्रगतीचे खंडन झाले. यावेळी श्री विष्णूंनी वामनावतार धारण करून बळीराजाकडून तीन पावले भूमीचे दान मागितले. बळीराजा दान देण्यास तयार झाला आणि विष्णूंनी आपले विशाल रूप धारण करून दोन पावलात स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा उरली नाही म्हणून वचनपूर्तीसाठी उदार बळीराजाने आपले मस्तक पुढे केले.
बळीराजाच्या उदारतेवर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला पाताळाचे राज्य दिले. या प्रसंगामध्ये आपल्या पतीची लीला, औदार्य आणि न्यायी भूमिका पाहून विष्णुपत्नी देवी लक्ष्मीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूला ओवाळले आणि विष्णूंनी देवी लक्ष्मीला ओवाळणी दिली. त्यामूळे या दिवशी पत्नी पतीला ओवाळते अशी प्रथा सुरू झाली. पाटाभोवती रांगोळी काढून त्यावर पतीला विराजमान करून पत्नी पतीचे औक्षण करते आणि पती पत्नीला ओवाळणी देतो. पाडव्याविषयीच्या या कथेतून पतीपत्नीच्या नात्यात प्रेम असावे तसेच आदर आणि परस्परांविषयी कृतज्ञता देखील असावी ही शिकवण मिळते. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी हा मोलाचा उपदेश आहे. सन्मानरहित प्रेम ही मोहाची परिभाषा ठरते. आयुष्यभराचे हे सुंदर नाते निभावताना एकमेकांना यथोचित सन्मान देणे हे पती आणि पत्नी दोघांचे कर्तव्य आहे. दोघांनाही एकमेकांच्या यशस्वीतेचे कौतुक व योगदानाची जाणीव असावी. अशा प्रकारे पाडव्याचा सण वैवाहिक जोडप्यांसाठी एक मोलाची शिकवण आहे तसेच या निर्मळ आणि प्रेमळ नात्याची आठवण देखील आहे.
नवविवाहित दांपत्यासाठी हा सण विशेष महत्त्वाचा असतो. लग्नानंतरचा पाहिला पाडवा नवविवाहितेच्या माहेरी मोठया थाटात साजरा केला जातो. या दिवशी जावयाला आहेर करतात. यालाच दिवाळसण असेही म्हणतात. पतीपत्नीच्या नात्याला समर्पित पाडव्याचा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
पाडव्याबद्दल ही संक्षिप्त माहिती वाचकांसाठी ज्ञानवर्धक आणि मनोरंजक ठरावी या प्रयत्नासह वेळ आली आहे इथेच थांबण्याची. तुम्हांला हा लेख कसा वाटला हे प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
धन्यवाद..!
– लेखिका: श्रावणी सुळ