पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४: फ्रान्स-पॅरिस येथील क्रीडा महाकुंभ

WhatsApp Group Join Now

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४: फ्रान्स-पॅरिस येथील क्रीडा महाकुंभ

संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या असलेल्या क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिंपिक. दर चार वर्षांनी हा क्रीडा महाकुंभ आयोजित केला जातो. यंदा या स्पर्धा फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केल्या जात आहेत, तर पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. पॅरिसमध्ये या स्पर्धा तिसऱ्यांदा आयोजित केल्या जात आहेत. या पूर्वी सन १९०० आणि सन १९२४ मधे त्या पॅरिसला आयोजित केल्या गेल्या होत्या. त्यानंतर तब्बल १०० वर्षांनी त्या पॅरिस येथे आयोजित केल्या जात आहेत. म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक्सचे २०२४ हे १००वे वर्ष आहे. म्हणूनच या स्पर्धेला एक ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. 

पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ ची वैशिष्ट्ये व थोडक्यात माहिती:

  • स्पर्धेचे अधिकृत नाव: XXXIII ऑलिंपियाडचे खेळ (Games of the XXXIII Olympiad)
  • ब्रीदवाक्य- गेम्स वाईड ओपन. (खेळ मोठे, वेगळे आणि अधिक खुले आहेत.)
  • एकूण सहभागी स्पर्धक: १०५०० हून अधिक (स्पर्धा सुरू असताना खेळाडूंची संख्या बदलू शकते. कोणत्याही ऑलिंपिक्स दरम्यान, खेळाडूंची अंतिम संख्या स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच निश्चित होते. काही खेळाडूंना अंतिम क्षणात काही कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकते किंवा नवीन खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.)
  • एकूण सहभागी देश: २०६
  • स्पर्धेतील एकूण क्रीडाप्रकार: ३६
  • एकूण स्पर्धा: ३२९

पॅरिस व्यतिरिक्त वेगवेगळ्या सोळा शहरांमध्ये, ३५ वेगवेगळ्या स्थानांवर १९ दिवस या स्पर्धा पार पाडल्या जाणार आहेत. याचे मुख्य स्टेडियम पॅरिस येथील स्टेड द फ्रान्स असून उद्घाटन आणि समारोप समारंभ तेथेच पार पडणार आहे.  परंतु या व्यतिरिक्त इतर खेळ वेगवेगळ्या शहरांतील ठिकाणी पार पडणार आहेत. यापैकी काही स्थळे अशी,

• ऍथलेटिक्स स्पर्धा: स्टेड द फ्रान्स, पॅरिस 

• पोहोणे व वॉटर पोलो: डिफेन्स एरेना, पॅरिस

• बीच व्हॉलीबॉल: शाँप दे मार्स

• फेन्सिंग, तायक्वांदो: ग्रँड पॅले 

• शहरी खेळ: प्लेस दे ला कॉनकॉर्ड 

• घोडेस्वारी: व्हर्साय 

  • या व्यतिरिक्त चार नवीन खेळ सामील करण्यात आले आहेत, ते असे: ब्रेकिंग (ब्रेकडान्सिंग), सर्फिंग, स्केटबोर्डिंग व स्पोर्ट क्लायम्बिंग.

ऍथलेटिक्स, पोहोणे, जिम्नॅस्टिक्स, सायकलिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, टेनिस हे ऑलिंपिक्समधील सर्वाधिक लोकप्रिय असलेले खेळ आहेत.

  • खेळाडूंच्या निवासासाठी ५४ एकर परिसरात सर्व सुविधांनी परिपूर्ण असे क्रीडाग्राम तयार करण्यात आले आहे.
  • स्पर्धेसाठी एकूण 5084 पदके तयार करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत केलेल्या आयफेल टॉवरच्या स्मारकाच्या नूतनीकरणादरम्यान त्यातून निघालेल्या धातूचा समावेश यंदाच्या पथकांमध्ये केला आहे. २००४ पासून पदकाची दुसरी बाजू ग्रीसमधील ऑलिम्पिक खेळांच्या पुनर्जन्माची कथा सांगते, ज्यामध्ये विजयाची देवी अथेना नायके आणि एलेना व्होत्सीने अथेन्स ऑलिम्पिक्स 2004 साठी डिझाइन केलेल्या स्टेडियमचा समावेश आहे.

ऑलिम्पिक मशाल रिले: ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करणारी ऑलिम्पिक मशाल रिले 16 एप्रिलपासून सुरू झाली. ग्रीसमधील ऑलिम्पिया येथे ऑलिम्पिकची ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर 26 एप्रिल रोजी ती अथेन्स येथे पोहोचली. त्यानंतर मार्सेली, मोनॅको या मार्गाने प्रवास करत तिचा फ्रान्सचा दौरा सुरू झाला आहे.  या संपूर्ण दौऱ्यात 10 हजार लोक, खेळाडू , सेलिब्रिटी ही मशाल हाती धरतील. 68 दिवस आणि 12 हजार किलोमीटरचा प्रवास करत ही ऑलिम्पिक मशाल 26 जुलै रोजी उद्घाटन समारंभात ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करेल. 

पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ साठी मॅस्कॉट (शुभंकर):

खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी, प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच  विविध देशांतील लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेमधे एक मॅस्कॉट(शुभंकर) निवडला जातो. हा ‘शुभंकर’ खेळाच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावतो. उत्साह, आनंद, ऊर्जा यांनी परिपूर्ण असे हे शुभंकर खेळभावना तसेच खेळाची मूल्ये व्यक्त करतात. या ऑलिंपिक्समधे फ्रिजेस (Les Phryges) हा मॅस्कॉट निवडला गेला आहे. या मॅस्कॉटमागची प्रेरणा आहे एक फ्रिजियन टोपी (Phrygian Cap), जी स्वातंत्र्य आणि क्रांतीचे प्रतीक आहे. फ्रिजियन टोपीचा इतिहास मोठा असून ती फ्रेंच क्रांतीच्या काळात स्वातंत्र्याचे प्रतिक होती. खरे तर हे एक नसून दोन शुभंकर आहेत: ऑलिम्पिक फ्रिजे आणि पॅरालिम्पिक फ्रिजे.

  • ऑलिम्पिक फ्रिजे: ही सुवर्णपदकाचे चिन्ह असलेली एक लाल रंगाची टोपी आहे. ऑलिम्पिकच्या खेळांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हा शुभंकर आहे.
  • पॅरालिम्पिक फ्रिजे: ही सुद्धा ऑलिम्पिक फ्रिजेसारखीच टोपी आहे, पण यामध्ये पॅरालिम्पिक चिन्ह आहे, पॅरालिम्पिक खेळांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हा शुभंकर आहे.

हे फ्रिजेस अतिशय लोकप्रिय असून ऑलिंपिक्स खेळांच्या प्रसारात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. विविध ऑलिम्पिकपूर्व कार्यक्रमांमध्ये आणि उत्सवांमध्ये हे फ्रिजेस सहभागी केले गेले आहेत, ज्यामुळे खेळांची उत्सुकता वाढण्यास मदत झाली आहे. या फ्रिजेसचा वापर शालेय कार्यक्रमांमध्ये, जाहिरातीत आणि अधिकृत ऑलिम्पिक वस्त्रांमध्ये केला गेला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे प्रतिक (एम्ब्लेम):

सुवर्णपदक, ज्योत, आणि मारीअन्ने या तीन घटकांचा समावेश करुन पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे प्रतिकाची विशेषत्वाने संरचना करण्यात आली आहे. या प्रतिकाचे तिन्ही घटक अर्थपूर्ण आहेत.

  • सुवर्णपदक: सुवर्णपदक हे उत्कृष्टतेचे तसेच क्रीडाक्षेत्रातील उच्चतम यशाचे प्रतिक आहे. प्रत्येक खेळाडूसाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणे हे आयुष्यातील मोठे स्वप्न असते. ते साकार करण्यासाठी केले जाणारे कठोर परिश्रम, समर्पण, कौशल्य आणि यश यांचे ते प्रतिक आहे.
  • ज्योत: ‘ऑलिम्पिक ज्योत’ ही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या पारंपरिक प्रतिकांपैकी एक आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना ती प्रज्वलित केली जाते आणि स्पर्धेचा समारोप होईपर्यंत जळत राहते. ही ज्योत क्रीडाक्षेत्रातील उत्साह आणि उर्जा यांची निदर्शक आहे.
  • मारीअन्ने: फ्रेंच प्रजासत्ताकाचे प्रतीक असलेली आणि फ्रान्सची राष्ट्रीय ओळख असलेली ‘मारीअन्ने’ ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या फ्रेंच क्रांतीच्या तत्त्वांचा सन्मान करते. ती फ्रान्स गणराज्याच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या प्रतिकात मारीअन्नेच्या प्रतिमेला समाविष्ट करून फ्रान्सच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला सन्मान दिला गेला आहे.
  • या प्रतिकाचा एकत्रित अर्थ:  सुवर्णपदक, ज्योत आणि मारीअन्ने यांच्या संयोगाने तयार केलेले हे पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे प्रतिक खेळाडूंच्या यशाचे, क्रीडा ऊर्जेचे, आणि फ्रेंच प्रजासत्ताकाच्या मूल्यांचे एकत्रित प्रदर्शन करते. ते जगभरातील लोकांना प्रेरणा देऊन ऑलिम्पिकच्या मुख्य तत्त्वांचा सन्मान करते.

ऑलिम्पिक पदके:

ऑलिम्पिक खेळांमध्ये पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला सुवर्ण पदक, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला रौप्य पदक तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला कांस्य पदक दिले जाते.

यातील सुवर्ण पदक हे सोन्यापासून बनवलेले नसते. ते चांदीचे असून त्यावर सोन्याचा मुलाम असतो. सुवर्ण पदकांमध्ये सहा ग्रॅम पेक्षा अधिक सोने नसते.

रौप्य पदक हे १००% शुद्ध चांदीचे असते, तर कांस्य पदक ९५% तांबे आणि ५% जस्त यांचे मिश्रण असते.

प्रत्येक ऑलिम्पिकसाठी पदकांची रचना वेगवेगळी असते. पदकावर एका बाजूला नेहमीच ऑलिम्पिक चिन्ह आणि स्पर्धेचे अधिकृत नाव असते, तर उलट बाजूस स्पर्धेचे ठिकाण, तारीख, आणि क्रीडाप्रकार यांचा उल्लेख असतो. सन २००४ पासून, पदकाच्या दुसऱ्या बाजूला ग्रीसमधील ऑलिम्पिक खेळांच्या पुनर्जन्माची कथा सांगण्यात आली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी एकूण ५०८४ पदके तयार करण्यात आली आहेत. या पदकांचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही वर्षांत आयफेल टॉवरच्या नूतनीकरणादरम्यान निघालेल्या धातूचा समावेश या वर्षीच्या पदकांमध्ये केला आहे, ज्यामुळे पदकांना विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होते, त्याबरोबरच, ती पदके पर्यावरणीय टिकाऊपणाचे आणि पुनर्वापराचे उदाहरण आहेत.

पदकाच्या डिझाइनमध्ये ग्रीक संस्कृतीतील विजयाची देवी ‘अथेना नायकेचा’ समावेश आहे. अथेन्स ऑलिम्पिक्स २००४ साठी एलेना व्होत्सीने संरचित केलेल्या स्टेडियमचा समावेशही या पदकांच्या रचनेमध्ये आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाचे फायदे:

ऑलिम्पिक खेळ आयोजीत केल्याचे फायदे त्या देशाला अनेक स्तरांवर  होत असतात. 

१) सांस्कृतिक फायदे: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचे केंद्र असलेल्या पॅरिस या शहराचा ऐतिहासिक वारसा ऑलिम्पिक खेळांमुळे अधिकच समृद्ध होईल. पॅरिसमधील आयफेल टॉवर, लूव्र संग्रहालय आणि सीन नदी यासारखी अनेक प्रसिद्ध स्थळे खेळांसाठी वापरली जातील, ज्यामुळे जागतिक स्तरावर या स्थळांचे महत्त्व निश्चितच वाढेल. या निमित्ताने पॅरिस आणि फ्रान्सच्या स्थानिक परंपरांचा सन्मान आणि त्यांचे जतन करणे, पर्यटकांना पॅरिसच्या विविध सांस्कृतिक स्थळांची ओळख करून देणे शक्य होईल.कला, संस्कृती, आणि क्रीडा यांच्या संयोगातून जगभरातील लोकांना एकत्र आणणे या उद्देशातून पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या आयोजनाच्या आधीपासूनच फ्रान्समध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका सुरू झाली आहे.यात नाटके, संगीत कार्यक्रम, चित्रप्रदर्शन, साहित्यिक कार्यक्रम, आणि स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन यांचा समावेश आहे. खेळांदरम्यान आणि आधी तसेच उद्घाटन व समारोप समारंभाच्या वेळी विविध कला प्रदर्शन, संगीत महोत्सव, आणि नृत्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

२) आर्थिक फायदे: पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पायाभूत क्षेत्रे, पर्यटन, सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रात नवीन रोजगार संधी उपलब्ध होतील. 

३) सामाजिक फायदे:  अशा भव्य प्रमाणावर आयोजित केलेल्या स्पर्धांमुळे अनेक सामाजिक फायदेही होत असतात. समाजातील विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचे काम त्यायोगे होत असते. या निमित्ताने फ्रान्समध्ये जे विविध सामाजिक उपक्रम आणि प्रकल्प राबवले जात आहेत, त्याद्वारे समाजाला मोठा फायदा होणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना तसेच देशातील तरुणांना क्रीडा आणि संस्कृतीमध्ये सहभाग घेण्यास प्रेरणा मिळेल.

४) जागतिक संवाद साधणे: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जगभरातील सुमारे २०६ देशांचे स्पर्धक सहभागी होऊन ऑलिम्पिक खेळांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्यांचा प्रदर्शन करीत त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे या स्पर्धा एक जागतिक संवादाचे माध्यम बनतील. विविध देशांतील लोक आणि संस्कृती एकमेकांशी या निमित्ताने संवाद साधतील. यावेळी विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील. जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी यापेक्षा उत्तम माध्यम ते कोणते?

५) दीर्घकालीन फायदे: ऑलिंपिक खेळांच्या निमित्ताने पॅरिसमध्ये अनेक सांस्कृतिक आणि क्रीडा सुविधा निर्माण होत आहेत. अनेक ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन आणि विकास फ्रान्समध्ये होत आहे. नवीन सार्वजनिक सेवा निर्माण होत आहेत. या सर्वांचा सकारात्मक परिणाम पुढील अनेक वर्षे राहिल. जागतिक स्तरावर फ्रान्सचा प्रभाव वाढेल.

हे आणि असे अनेक फायदे ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनामुळे होत असतात. ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन हे देशासाठी प्रतिष्ठेचे असते. म्हणूनच कितीही खर्चिक असले तरी, अनेक देश ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यास उत्सुक असतात.

पॅरिस ऑलिंपिक्समधे भारत: ‘इंडिया हाऊस’

भारताकडून एकूण ११७ पेक्षा जास्त खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी प्रथमच भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये ‘इंडिया हाऊस’ मिळले आहे. पॅरिसमधील ५५.५ हेक्टर ( १३७ एकर) क्षेत्रफळाच्या सर्वात मोठ्या उद्यानात, ला व्हिलेट मधे, हे  ‘इंडिया हाऊस’ असेल. भारताच्या जगभरातील चाहत्यांसाठीआणि क्रीडापटूंसाठी ‘इंडिया हाऊस’ हे भारताचे एक प्रतिबिंब असेल. इथे पारंपरिक भारतीय पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. भारतातील प्रेक्षणीय स्थळे, संगीत, चविष्ट पाककृती आणि उत्कृष्ट पोषाख व पारंपारिक दागिन्यांचा यात समावेश असेल. अतिथींना भारतातील गावे व शहरांमध्ये नेऊन ट्रान्सेंडेंटल तंत्रज्ञानाच्या मदतीने देशात काय आहे, हे माहित करून दिले जाईल. भारताचा गेल्या काही वर्षांतील विकास जगाला दाखवण्याची ‘इंडिया हाऊस’ ही मोठी संधी असेल. ‘इंडिया हाऊस’ मुळे ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांना आपण आपल्या देशात असल्यासारखे वाटणार आहे. स्पर्धेदरम्यान “वॉच-पार्टी” व सेलिब्रेशनसाठी एकत्र येण्याचे ठिकाण भारतीयांना मिळेल. 

आगामी ऑलिम्पिक स्पर्धा: 

  • २०२८ उन्हाळी ऑलिम्पिक: लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे २१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२८ दरम्यान ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाणार आहे. हे तिसऱ्यांदा लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. लॉस एंजेलिसने यापूर्वी १९३२ आणि १९८४ मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. 
  • २०३२ उन्हाळी ऑलिम्पिक: ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथे जुलै ते ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक खेळांचे आयोजन होणार आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी सन १९५६ मध्ये मेलबर्न येथे आणि सन २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते.

२०२० मधे जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आजवरची सर्वाधिक पदके जिंकली होती. तशीच चमकदार कामगिरी या ही ऑलिम्पिक स्पर्धेत व्हावी अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे. त्यासाठी सर्व स्पर्धक खेळाडूंना अनेकानेक शुभेच्छा!

तुम्हाला पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ बद्दल ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

1 thought on “पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४: फ्रान्स-पॅरिस येथील क्रीडा महाकुंभ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top