यावर्षी उन्हाळा खूप जास्त वाढला आहे. एप्रिल महिन्यातच तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे आणि पुढे ते अजूनही वाढायची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एप्रिल, मे महिन्यात बऱ्याच शहरांमध्ये पाणीकपात सुद्धा केली जाते. एवढ्या गर्मीमध्ये जिथे माणसांना उन्हाळा सहन होत नाही तिथे आपल्या झाडांना कसा सहन होणार? आपण वर्षभर प्रेमाने जोपासलेल्या आणि वाढविलेल्या झाडांची काळजी कशी घ्यावी ही चिंता सध्या बऱ्याच जणांना भेडसावत असेल. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही शेअर करणार आहोत उन्हाळ्यात आपल्या बागेतील आणि घरातील झाडांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही टिप्स.
- उन्हाळ्यात झाडांना रोज पाणी दिले तरी उन्हामुळे माती लगेच कोरडी पडते. अशावेळी पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आपण खालील उपाय करू शकतो. ज्यामुळे झाडांना कमीतकमी त्रास होईल आणि त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते.
- मल्चिंग (Mulching): उन्हाळ्यात झाडांची सुकलेली पाने आपल्याला जागोजागी बघायला मिळतात. अशी सुकलेली पाने एकत्र करून आपल्या झाडांच्या कुंडीत मुळाजवळ पसरून घ्यावी. त्यामुळे मातीवर सूर्यप्रकाश प्रत्यक्षपणे पडणार नाही आणि मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
- ग्रीन नेट: आपली झाडे लहान असतील किंवा प्रखर सूर्यप्रकाशात असतील तर त्यांच्या भोवती ग्रीन नेट लावावे. किंवा आपल्या गच्चीच्या किंवा बाल्कनीच्या ज्या बाजूने सूर्यप्रकाश येत असेल तिथे हे ग्रीन नेट लावावे. त्यामुळे झाडांचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण होईल.
- सुशोभित दगड (Decorative Pebbles): उन्हाळ्यात आपण आपल्या कुंडीच्या आत झाडाच्या मुळाशी छोटे छोटे सुशोभित दगड लावू शकतो. त्यामुळे मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच ते दिसायला ही खूप सुरेख दिसतात.
- ठिबक सिंचन: झाडांना दिवसभर पाणी मिळत राहावे आणि मातीतील ओलावा टिकून राहावा म्हणून आपण घरच्या घरी ठिबक सिंचन लावू शकतो. त्यासाठी एका प्लास्टिकच्या बाटलीला खालच्या बाजूने २-३ छोटी छिद्रे करावीत आणि ती बाटली पाणी भरून कुंडीमध्ये लावून ठेवावी. यामुळे झाडाला पूर्ण दिवस थोडे थोडे पाणी मिळत राहील.
- झाडांखाली प्लेट ठेवणे: अगदी घरगुती उपाय म्हणजे तुम्ही एखादी घरातील वापरात नसलेली प्लेट झाडांच्या कुंडीखाली ठेवून त्यात डेकोरेटिव्ह दगड आणि पाणी भरून ठेवू शकता. यामुळे झाडांच्या मुळांना पाणी मिळत राहील.
- कितीही उन्हाळा असला तरी फळभाज्या आणि फुलझाडे यांना वाढीसाठी सकाळच्या कोवळ्या उन्हाची गरज असते. त्यामुळे बाल्कनी किंवा टेरेस वर झाडे अशा रीतीने एका बाजूला लावून ठेवावीत जेणेकरून त्यांच्यावर सकाळी कोवळे ऊन पडेल आणि दिवसभर सावली राहील.
- उन्हाळ्यात झाडांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी घालावे. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि मातीत पाणी बराच काळ टिकून राहते.
- तसेच मधेमधे झाडावर पाण्याचा शिडकावा करावा जेणेकरून झाडे थंड राहण्यास मदत होईल आणि त्यांना सनबर्न होणार नाही. तसेच अधूनमधून झाडांची पाने ही ओल्या फडक्याने पुसून घ्यावीत.
- हिवाळ्यात झाडे ही हायबरनेशन मध्ये असतात. उन्हाळा हा झाडांसाठी वाढीचा काळ असतो. ह्या काळात झाडांना जसे पाणी गरजेचे असते तेवढेच गरजेचे असते योग्य खते घालणे.
- उन्हाळ्यात झाडांना गांडूळ खत, शेणखत, हाडांची पूड (Bone Powder), तेलाची पेंड यासारखी खते देऊ शकतो. ही खते २-४ आठवड्यातून एकदा देऊ शकता. उन्हाळ्यात झाडांना शक्यतो कंपोस्ट घातले जात नाही कारण ते गरम पडण्याची काळजी असते. त्यामुळे झाडाची मुळे करपू शकतात.
- किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नैसर्गिक रसायनांचा वापर करावा. आणि हि रसायने पाण्यात विरघळून मग फवारणी करावी.
- नवीन रोप लावले असल्यास त्याला द्रवरूपी खते द्यावी. आजकाल बाजारात पावडर, द्रवरूपी, प्लान्ट फूड स्टिक अशा अनेक स्वरूपातील खते उपलब्ध आहेत.
- उन्हाळ्यात झाडांच्या वाढीच्या काळात तुम्ही त्यांना NPK हे खत घालू शकतो. हे खत शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा घालावे जेणेकरून झाडे करपत नाहीत.
- उन्हाळ्यात बऱ्याच फुलझाडांना बहर येतो. एकदा बहर येऊन गेला की या झाडांना द्रवरूपी खते द्यावी. एकदा फुले येऊन गेल्यामुळे मातीतील पोषक मूल्ये कमी झालेली असतात त्यामुळे त्यांना परत खत देण्याची गरज असते.
- मे महिन्यापासून जून महिन्यात पाऊस लागेपर्यंत झाडांना शक्यतो द्रवरूपी खतेच द्यावीत. सॉलिड स्वरूपातील खते देऊ नयेत.
- छाटणी: उन्हाळा सुरु झाला कि झाडांची वरचेवर निगा राखणे गरजेचे आहे. झाडाची सुकलेली पाने, फुले आणि फांद्या या लगेच काढून टाकाव्यात. तसेच झाडाची वरचेवर छाटणी सुद्धा करावी. यामुळे पाणी आणि खत यांचा फायदा झाडाच्या वाढीसाठी होतो.
- खुरपणी: उन्हाळ्यात झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मुळाशी आलेले तण, गवत किंवा इतर छोटी झाडे यांना वेळच्या वेळी खुरपणे गरजेचे असते. नाहीतर मातीतील सर्व पाणी आणि पोषक मूल्ये हे तण आणि झाडे शोषून घेतात आणि आपल्या झाडांची वाढ योग्य प्रकारे होत नाही.
- उन्हाळ्यात शक्यतो नवीन झाडे लावू नयेत. नवीन झाडे फेब्रुवारी महिन्यात लावावीत. तसेच जी नवीन झाडे आपण उन्हाळ्याच्या सुरवातीला लावली असतील त्यांना उन्हाळ्यात दुसऱ्या कुंडीमध्ये हलवू नये. तीव्र सूर्यप्रकाशात झाडांना एका ठिकाणाहून हलवून दुसऱ्या ठिकाणी लावले तर त्यांना शॉक बसतो. आणि त्यामुळे ते झाड कोमेजून जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे झाडाचे रिपॉटिंग हे पावसाळा सुरू झाल्यावर करावे.
- उन्हाळ्यात कोणती झाडे लावावीत?
- उन्हाळ्यात जर तुम्हाला तुमच्या किचन गार्डन मध्ये भाजी लावायची असेल तर काकडी, कारली, भोपळा, कलिंगड, भेंडी, मिरची आणि वांगी हे खूप चांगले पर्याय आहेत. भाजीपाल्याची वाढ जर योग्य आणि चांगली व्हायला हवी असेल तर तुमच्या कुंडीचा आकार किमान आठ ते दहा इंच असायला हवा.
- जर तुम्हाला फुलझाडांची आवड असेल तर तुम्ही सदाफुली, झिनिया, पोर्च्युलॅका, गोम्फ्रिना, कॅलिऑप्सिस, अमॅरिलिस लिली यांसारख्या फुलझाडांची लागवड करू शकता.
- जर तुम्हाला घरात गारवा देणारी आणि हवा शुद्ध ठेवायला मदत करणारी झाडे लावायची असतील तर तुम्ही स्नेक प्लांट, फर्न, पाम ट्री, कोरफड, मनी प्लांट अशी झाडे लावू शकता.
तर या उन्हाळ्यात आपल्या आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत असताना थोडेसे लक्ष आपल्या बागेकडे ही देऊया. ह्या उपयोगी टिप्स आपल्या मित्र परिवारा सोबत नक्कीच शेअर करा. आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका: नेहा करंदीकर – हुनारी, मालवण