Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2024 – विशेष कामगिरीसाठी 19 मुलांनी जिंकला राष्ट्रीय बाल गौरव पुरस्कार

WhatsApp Group Join Now

जानेवारी महिना आला की वेगवेगळे पुरस्कार जाहीर होतात. शासन दरबारातल्या या पुरस्कारांना नक्कीच एक वेगळाच अर्थ असतो त्यामध्ये एक मोठा सन्मान असतो. आपल्या भारताची भावी पिढी म्हणजे आत्ताची मुलं त्यांचा  गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येतं. कौतुकाची थाप कोणाला आवडत नाही ?मग भविष्य घडवणाऱ्या या मुलांनी आपलं कौशल्य सिद्ध करत इतिहास घडवले आहेत,त्यांना राष्ट्रीय पातळीवरती सन्मानित करायलाच हवं.

याही वर्षी तंत्रज्ञानातील कामगिरी पासून नव्या शोधांसाठी, खेळातील कामगिरीसाठी  शैक्षणिक कामगिरीसाठी, क्रीडाविश्वातील विशेष प्राविण्य,  तसंच संस्कृती, समाजसेवा, शौर्य आणि कला  क्षेत्रात विशेष चमक दाखवलेल्या मुलांचा  भारतातील  सर्वोच्च नागरी सन्मान, प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने  सन्मान करण्यात आला. ए एल च्या मदतीने चालणारा रोबोट तयार करणारा तरुण, डाऊन सिंड्रोम असलेला गिर्यारोहक, गुगल बॉय आणि दिव्यांग चित्रकार  ही काही यावर्षीची विशेष कामगिरीबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलं, ज्यांना २२ जानेवारीला हे पुरस्कार सन्मानपूर्वक माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. नवी दिल्लीच्या  विज्ञान भवनात केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला हाेता.

     आयुष्यात अनपेक्षित अशा अनेक घटना घडतात त्यावेळी शौर्याची पराकाष्ठा करावी लागते,जीवाची बाजी लावावी लागते, कधी वेगळ्या पैलूंने विचार करावा लागतो. काही छोटे उस्ताद कलेच्या क्षेत्रात भरपूर मेहनत करून आपल्या कलेला अत्युच्च शिखरावर नेतात. तर काही छोटी मुलं समाजसेवेचा मोठा भार उचलतात.

        अशा मुलांचा कौतुक सोहळा व्हायलाच हवा. यावर्षी कोणत्या मुलांनी हा सन्मान पटकावला यांची उत्सुकता अधिक न ताणता या मु्लांच्या कार्याविषयी जाणून घेऊया.

१) आदित्य ब्राह्मणे

महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राह्मणे या १२ वर्षाच्या मुलाला त्याने दाखवलेली शौर्याबदद्ल  मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातला आदित्य हा आपल्या दोन चुलत भांवंडासह नदीच्या काठावर खेळत होता. त्यांचे दोन्ही भाऊ नदीच्या पाण्यात पडले आणि बुडायला लागले. आदित्यने आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांचे प्राण वाचवले. यात आदित्यचा दुर्दैवी अंत झाला. आदित्यने दाखवलेलं प्रसंगावधान आणि त्याचं शौर्य यामुळे त्याला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२)अरिजीत बॅनर्जी

पश्चिम बंगालमधल्या १३  वर्षीय कुमार अर्जित बॅनर्जी याला त्यांच्या  पारंपारिक पखवाज वाजवण्याच्या त्याच्या अप्रतिम कौशल्यासाठी सन्मानित करण्यात आलं. अरिजीतने याआधी आपल्या पखवाज वादनाच्या जोरावर भारतरत्न एम एस सुब्बुलक्ष्मी फेलोशिप मिळवली आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अर्जितचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.

३)अरमान उभ्रानी 

छत्तीसगढमधील बिलासपूर जिल्ह्यातील ६ वर्षाच्या अरमान उभ्रानीने तीन पुस्तकं लिहिली आहेत.अरमान हा बाल लेखक गणित आणि विज्ञान क्षेत्रातील अपवादात्मक कामगिरी, त्याचबरोबर कला आणि संस्कृती  विभागात पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी लेखक बनलेल्या अरमानने जगातला सर्वात लहान लेखक होण्याचा विश्वविक्रम केला आहे.अरमानचं गणितातलं प्राविण्य ही वाखाणण्याजोगं आहे.

१२ मिनिटं २८ सेकंदात अरमानने १०० गणितं सोडवण्याचा विक्रम  नोंदवलेला आहे.ऑनलाईन गुगल बॉय, गुगल मॅथ बॉय आणि वंडर बॉय या नावाने तो ओळखला जातो.

४)अनुष्का पाठक

यानंतरची बालिका आहे ती उत्तर प्रदेशातली. फक्त आठ वर्षांची असणा-या अनुष्काला  कला आणि संस्कृती विभागात पुरस्कार देण्यात आला. धार्मिक प्रवचनं देत   लहान वयात स्वतः ची स्वतंत्र ओळख निर्माण केली यासाठी अनुष्काला पुरस्काराने गौरवण्यात  आलं.

५) हेत्वी कांतिभाई खिमसुर्या

“ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत” दत्ता हलसगीकर यांच्या या ओळी सार्थ ठरवणारा बालक म्हणजे हेत्वी कांतिभाई खिमसुर्या. हेत्वी  या १३ वर्षीय मुलाने अपंग मुलांसाठी आपली मासिक अपंगत्व पेन्शन दान केली. स्वतः सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असणा-या हेत्वीने २५० मुक्त हस्त शैलीतली चित्रं रंगवली आहेत.त्याच्या या कलात्मक क्षमतेचा सन्मान म्हणून  हेत्वीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

६)इश्फाक हमीद 

कश्मीरच्या  बारामुल्लाचा रबाब वादक इश्फाक हमीद फक्त १३ वर्षाचा आहे.. वयाच्या आठव्या  वर्षी त्याने  वडिलांकडून रबाब  शिकायला सुरुवात केली. चुलत भावाला रबाब  शिकताना पाहिलं आणि इश्फाक ही रबाब हे वाद्य शिकायला त्तयार झाला.इश्फाकच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या रबाब वादन सुरू आहे.इश्फाक  रबाब वादनातील चौथी पिढी आहे.

७) एमडी हुसेन

एमडी हुसेन हा बिहारमधला किलकारीचा  16 वर्षाचा  तरुण. हस्तकलेतील त्याच्या  कौशल्यासाठी  त्याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. टाकाऊ वस्तूंपासून सुंदर वस्तू खेळणी तयार करण्यात हुसेन पटाईत आहेत. ब-याच स्पर्धांमधून  भाग घेत त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत.

८)पेंड्याला लक्ष्मी प्रिया (Pendyala Laxmi Priya)

कुचीपुडी शैलीतील १४ वर्षीय नृत्यांगना पेंड्याला लक्ष्मी प्रिया ही देखील पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराविजेती ठरली आहे. नृत्याची किंवा कलेची काहीही पार्श्वभूमी प्रियामागे नाही. पण जेंव्हा तिला नृत्य शिकावं असं वाटलं, तेंव्हा तिच्या आईने आणि आजीने सक्रिय पाठिंबा दिला,कारण त्या दोघींना नृत्याची आवड असूनही शिकायची संधी मिळाली नाही. मिळालेल्या संधीचा सोनं करत प्रियाने नृत्यावर अफाट मेहनत घेतली सात वर्षांत 200 पेक्षा जास्त नृत्याचे कार्यक्रम तिने केले. २०२३ चा राष्ट्रीय कला उत्सव राष्ट्रीय पुरस्कार नृत्य प्रकारात तिने  जिंकला आहे.

९)सुहानी चौहान

दिल्लीच्या सुहानी चौहान हिने साकारलेल्या ‘SO-APT’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाला पुरस्कार मिळाला आहे. १६ वर्षीय सुहानीने शून्य कार्बन उत्सर्जन करणारे शेतकऱ्यांसाठी, सौरऊर्जेवर चालणारे कृषी वाहन विकसित करण्याची कल्पना मांडली आहे.सौरऊर्जेवर चालणारे हे वाहन बियाणं पेरण्यासह शेतीतील बरीच कामं करू शकतं.

१०)आर्यन सिंग

आर्यन सिंग हा राजस्थानमधला १७ वर्षीय तरुण.त्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ करून एक रोबोट अॅग्रोबोट तयार केला आहे.हा रोबोट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे.AI-ची मदत घेऊन हा रोबोट काम करतो

११)अवनीश तिवारी

 आयुष्याची दुर्दैवी सुरुवात करणा-या इंदोरच्या अवनीशने आयुष्यात विजय मात्र अक्षरशः खेचून आणला आहे. डाउन सिंड्रोम आणि हृदयाला छेद घेऊनच जन्मलेल्या अवनीशच्या भाळी अनाथ आश्रमच लिहिलेला होता. बँकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या आदित्य तिवारीने मात्र सटवाईने लिहिलेलं हे दुर्भाग्य पुसून टाकलं. अवनिशला त्यांनी रीतसर दत्तक घेतलं. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी अवनीशने माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ट्रेक केला. अवनीशने केलेल्या त्याच्या  समाजसेवेबद्दल 2022 मध्ये त्याला श्रेष्ठ दिव्यांग बाल पुरस्कार देखील मिळला आहे.

१२) गरिमा यादव

हरियाणातील महेंद्रगड मध्ये  राहणा-या गरिमाला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.आज  ९ वर्षाची असलेली गरिमा यादव वयाच्या केवळ ३-या वर्षापासून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण तर देतेच त्याचबरोबर त्यांना अभ्यासाचे साहित्य ही पुरवते.

गरिमा  पाहू शकत नाही. मात्र ती “साक्षर पाठशाला” नावाची शाळा आत्मविश्वासाने  चालवते. १०००  गरीब मुलांना अभ्यास साहित्याचे वाटप गरिमाने केलं आहे. गदिमांची  जिद्द वाखाणण्याजोगी आहे.

१३)ज्योत्स्ना अख्तर

त्रिपुरातील 16 वर्षीय तरुणी ज्योत्स्ना अख्तर   बालविवाहाविरोधात ठामपणे उभी राहिली. एके दिवशी ज्योत्स्नाला कळलं की तिच्यापेक्षा दुप्पट  वयाच्या  घटस्फोटीत  पुरुषाशी ज्योत्स्नाचं लग्न ठरवलं होतं. ज्योत्स्नाला पुढं शिक्षण घ्यायचं ,नोकरी करायची होती.ज्योत्स्नाने नकार दिला,मात्र घरच्यांनी तिच्या नकाराकडे दुर्लक्ष केलं.शेवटी बालिका मंचाकडे ज्योत्स्ना ने धाव घेतली.जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून तिचं लग्न रोखलं.आज ज्योत्स्ना इतर मुलींचं प्रेरणा स्थान आहे.

१४)सय्यम मुझुमदार

सय्यम मुझुमदार आसाममधला 15 वर्षीय तरुण त्याला  वन्यजीव संरक्षण क्षेत्रात पुरस्कार देण्यात आला. सय्यमने वयाच्या 10 व्या वर्षापासून  कुत्री, ससे आणि सापांसह इतर भटक्या प्राण्यांसाठी मदतकार्य केलं आहे. या प्राण्यांना त्याने आश्रय दिला, अन्न दिलं, संसर्गजन्य आजारांपासून मुक्ती दिली.आतापर्यंत त्यांने 1,000 पेक्षा जास्त भटकी कुत्री आणि 800 पेक्षा जास्त सापांची सुटका केली आहे.

१५)आदित्या यादव

उत्तर प्रदेशातील 12 वर्षाच्या आदित्या यादव या मुलीला तिच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. आदित्या यादव. 2022 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली, जेव्हा तिने ब्राझीलमध्ये झालेल्या मूकबधिर ऑलिम्पिक स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं 

आदित्याला कोणताही अडथळा थांबवू शकला नाही  जरी तिला बोलता येत नाहीं, तरी, तिने वयाच्या  5 व्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आदित्याने वयाच्या 9 व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आणि 12 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला सुरुवात केली. दहा वर्षांची असताना, २०१९ साली  तैपेई येथे झालेल्या मूकबधिर जागतिक स्पर्धेत भाग घेऊन खेळणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनण्याचा इतिहास रचला आहे.

१६)चारवी अनिलकुमार 

मूळची बंगळुरूची असलेल्या चारवीने 2022 मध्ये अंडर-8 गटात वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवल्यानंतर तिचं नाव  चर्चेत आलं.चार्वीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत.ऑक्टोबर 2022 मध्ये जागतिक कॅडेट चॅम्पियन म्हणून चार्वीने विजय मिळवला. यानंतर चार्वीने इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये 8 वर्षांखालील गटात पाच सुवर्ण पदके आणि एक रौप्यपदक मिळवलं. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला FIDE कडून वुमन कॅन्डीडेट मास्टर (WCM) ही पदवी मिळाली आहे.

१७) जेसिका नेईi सारिंग

अरुणाचल प्रदेशातील ९ वर्षांची ही  कुशल बॅडमिंटन चॅम्पियन आहे. जेसिकाने दोरजी खांडू मेमोरियल स्टेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मुलींच्या एकेरी गटात 09, 11 आणि 13 अशा सेटने विक्रमी खेळी केली आहे. अलीकडेच, तिने बिहारमध्ये अखिल भारतीय सब ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत (U-13) सुवर्णपदक जिंकले., ही स्पर्धा जिंकणारी ती अरुणाचल प्रदेशची पहिली बॅडमिंटनपटू ठरली 

१८)linthoi Chanambam

मणिपूरची 17 वर्षीय तरुणी  ज्युडो चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय आहे. साराजेवो इथं झालेल्या 2022 च्या जागतिक ज्युडो कॅडेट्स चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक मिळवलं

१९)आर  सूर्य प्रसाद

आंध्र प्रदेशातील, आर सूर्याने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी किलीमांजारो पर्वत सर करण्याचा पराक्रम केला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण सुरू केले आज  नऊ वर्षांचा असणारा आर सूर्य प्रसाद हा माऊंट किलीमांजारो पर्वतरांगेतील  शिखर गाठणारा दुसरा भारतीय ठरला आहे 

तर भारतभरातून १९ मुलांना वेगवेगळ्या विभागात प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने  सन्मानित करण्यात आलं. प्रधान मंत्री राष्ट्रीय बालपुरस्कारप्राप्त व्यक्तीला एक पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले आहे.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

   धन्यवाद !

1 thought on “Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2024 – विशेष कामगिरीसाठी 19 मुलांनी जिंकला राष्ट्रीय बाल गौरव पुरस्कार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top