Prashant Damle new app tikitalay : “नॉक..! नॉक..! रसिकांनो, नवीन मराठी नाटक आलंय, बूक करा पटकन, तिकिट आलंय…!”
असं एखाद्या ॲपने तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं तर.? वाचताना गंमत वाटली ना? पण असं खरंच झालंय बरं! मराठी नाटक, मराठी चित्रपट किंवा मग मराठी संगीताचा कार्यक्रम असो आता तुम्हाला सगळ्यात आधी कळणार, कारण “तिकिटालय” हे मराठमोळं ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. ज्यामुळे तुम्हाला इतर बुकींग ॲपवर जाऊन मराठी नाटक वा चित्रपटाच्या शोज साठी शोधाशोध करावी लागणार नाही. आपल्या मराठी रसिकांसाठी ही आयडियाची कल्पना अंमलात आणली आहे आपले लाडके अभिनेते प्रशांत दामले आणि त्यांच्या, सहकाऱ्यांनी.
२७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून या ॲपचा शुभारंभ करण्यात आला. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे , “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराचे मानकरी ठरलेले आपले लाडके जेष्ठ अभिनेते अशोक सराफ, आणि जेष्ठ निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार महेश कोठारे यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ हे ॲप लाँच करण्यात आले. या ॲपचं सगळ्या स्तरातून खूप कौतुक करण्यात येत आहे.
या ॲपबद्दल प्रशांत दामले असं म्हणतात की, Prashant Damle new app tikitalay मराठी माणसाने मराठी माणसांसाठी, मराठी रसिकांसाठी आणलेलं हे ॲप आहे. प्रशांत दामले आणि त्यांचे सहकारी चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी पीएसी थिएटर एंटरटेन्मेंट प्रा. लिमिटेड अंतर्गत या ॲपची निर्मिती केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी काहीतरी करावं हे प्रशांत दामले यांच्या डोक्यात होतं. आता त्यांची ती इच्छा आणि स्वप्न या ॲपच्या रूपाने पूर्ण झालं आहे असं म्हणता येईल. कारण याचा फायदा रसिकांसोबतच मराठी निर्माते,दिग्दर्शक यांनासुद्धा होणार आहे.
आपल्या म्हणजे मराठी रसिकांच्या, मराठी प्रेक्षकांच्या बऱ्याचदा तक्रारी असतात की एखाद्या नाटकाचा प्रयोग आपल्या शहरात कधी कुठे लागतो ते कळत नाही. किंवा एखाद्या मराठी चित्रपटाचे शोज इतके कमी आणि मोजके असतात की ते कोणत्या चित्रपटगृहात किती शोज आहेत ते कळत नाही अशा वेळी “बुक माय शो” वर सुद्धा कधी कधी हे शोधावं लागतं. असाच अनुभव खुद्द प्रशांत दामले यांना स्वतःच्या नाटकाबद्दल आला. एका बुकिंग ॲप वर त्यांच्या नाटकाचा प्रयोग कुठे, किती वाजता आहे हे शोधूनही सापडत नव्हता. आणि याचमुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी, नाटक किंवा मराठी मनोरंजन करणाऱ्या माध्यमांसाठी हे नवीन ॲप सुरू करावं असं ठरवलं.
ॲपच्या शुभारंभाच्या कार्यक्रमा दरम्यान प्रशांत दामले यांनी काही आकडे जाहीर केले त्यानुसार प्रत्येक शहरातील लोकसंख्या बघता तेथील मराठी रसिक किती टक्के आहेत जे सांगितलं. त्या मायबाप रसिकांनी जर हे ॲप डाऊनलोड केलं तर त्यानुसार त्या शहरातील रसिकांची अंदाजे संख्या बघता एखाद्या नाटक निर्मात्याला ठरवता येईल की त्या शहरात आपण नाटकाचे प्रयोग लावू शकतो की नाही. कारण बऱ्याच रसिकांची ही तक्रार असते की काही नाटकांचे प्रयोग हे ठराविक शहरातच होतात , आमच्या शहरात का होत नाही. परंतु एखाद्या नाटकाचा प्रयोग करणं यामागे मोठं आर्थिक गणित असतं. कधी कधी अशा शहरांमध्ये नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षक नसतात. बुकींग होत नाही त्यामुळे मोठं नुकसान होतं आणि म्हणूनच या ॲपमुळे कदाचित निर्माते दिग्दर्शक यांना अंदाज येऊ शकतो की त्या शहरात कितपत बुकिंग होऊ शकेल आणि त्यानुसार प्रयोग ठेवले जातील.
आता हे ॲप लाँच करण्याचा नेमका उद्देश हाच होता की मराठी रसिकांना एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यापासून वंचित राहावं लागू नये. परंतु यात फक्त रसिकांचा फायदा आहे असं नाही तर मराठी निर्माते दिग्दर्शक यांनासुद्धा या ॲपचा फायदा होणार आहे. कसा ते पाहूच आपण.
तिकिटालय वैशिष्ट्ये : Features of Prashant Damle new app tikitalay
१. हे ॲप फक्त आणि फक्त मराठी चित्रपट, मराठी नाटक किंवा मराठी संगीताचा कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही मराठी मनोरंजन करणाऱ्या माध्यमांसाठी आहे. त्यामुळे इतर भाषिक नाटक किंवा चित्रपटांची इथे गर्दी नाही.
२. या ॲपद्वारे तुम्ही तिकिट बुकिंग तर करू शकणारच, त्यासाठीच ते आहे परंतु या व्यतिरिक्त बुकिंग करताना तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल किंवा नाटकाबद्दल संपूर्ण माहिती सुद्धा वाचता येणार आहे. म्हणजे ते नाटक / चित्रपट कशाबद्दल आहे, कलाकार कोण आहेत, सारांश काय आहे अशी माहिती इथे वाचायला मिळेल.
३. या ॲप वर फक्त नाटक आणि चित्रपट नव्हे तर मराठी कॉमेडी शो, मराठी इव्हेंट, गाण्यांच्या मैफीली, कवितांचे कार्यक्रम अशा सगळ्या प्रकारच्या मराठी मनोरंजनाची माहिती आणि बुकिंग तुम्हाला करता येणार आहे.
४. या ॲपमुळे फक्त रसिकांचा फायदा होईल असं नाही तर मराठी निर्माते दिग्दर्शक यांचा सुद्धा फायदा या ॲपमुळे होणार आहे. आपल्या चित्रपटाचं प्रमोशन, जाहिरात या ॲपवर ते करू शकतात. ट्रेलरचा व्हिडिओ असेल किंवा इतर व्हिडिओ असेल त्याद्वारे निर्माते, दिग्दर्शक आपल्या कलाकृतीचं विनामूल्य प्रमोशन या ॲपवर करू शकतात.
५. या ॲपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही एखाद्या ठराविक शहरात आहात किंवा जाणार आहात तर त्यानुसार तिथे पुढच्या काही दिवसांतील नाटक, चित्रपट याबद्दल माहिती बघून तसा प्लान करू शकता. म्हणजे शहरानुसार तिथे होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती तुम्हाला या ॲपवर मिळेल.
६. एखाद्या नाटकाचे आगामी प्रयोग कुठे कधी आहेत ही सुद्धा माहिती यावर मिळेल. “नाट्यगृह” या ऑप्शन वर क्लिक केल्यावर कोणत्याही शहरातील कोणत्याही नाट्यगृहातील पुढच्या पंधरा दिवसांचे नाट्यप्रयोग तुम्हाला समजू शकतील.
६. साधी, सोपी, सुटसुटीत मांडणी. या ॲपचं डिझाईन हे अशा प्रकारे केलं आहे की कोणीही अगदी सहजरीत्या हे ॲप हाताळू शकतो, किंवा तिकिट बुकिंग करू शकतो.
७. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा एखादं नाटक कालांतराने बंद झालं तरी त्या नाटकाबद्दल सगळी माहिती मात्र या ॲपवर तुम्हाला मिळणार. ही खरंच खूप छान गोष्ट आहे कारण आतापर्यंत बरीच छान आणि दर्जेदार नाटकं होऊन गेली, ती बंद झाली परंतु त्याबाबत आता फारशी माहिती कुठे उपलब्ध नाही. तर हे टाळण्यासाठी बंद झालेल्या नाटका बद्दल सुद्धा तुम्हाला इथे माहिती मिळेल.
मराठी चित्रपट वा नाटकांच्या बाबतीत ही शोकांतिका असते की प्रेक्षकांना एखादा चित्रपट किंवा नाटक बघायचं असतं परंतु चित्रपटांना जास्त स्क्रीन मिळत नाहीत किंवा कुठे शोज आहेत ते कळत नाही,आणि जे शोज असतात त्याबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही. विशेषतः नाटकाबद्दल हा अनुभव जास्त येतो. वर्तमानपत्रातील नाटकाच्या जाहिराती बघेपर्यंत तो प्रयोग होऊन गेलेला असतो. आणि त्या शहरात पुन्हा कधी प्रयोग असेल याची काही माहिती नसते. याचाच सुवर्णमध्य साधण्यासाठी प्रशांत दामले यांनी ही आयडिया शोधली आहे. या ॲपमुळे आता मराठी माणसाला एखादा नवीन चित्रपट आला किंवा एखादं नाटक असेल त्याची माहिती आणि बुकिंग या ॲपद्वारे करता येणार आहे. मग आहे की नाही ही आनंदाची बातमी.!
मग काय मंडळी.! कसं वाटलं हे मराठी मनोरंजनाचं मराठमोळं ॲप. आता आपण मराठी वर आणि मराठी कलाकृतींवर प्रेम करणाऱ्या सगळ्याच रसिकांनी हे ॲप डाऊनलोड करायला हवं. या १५ मार्च पासून हे ॲप सेवेत रूजू होईल, अहो म्हणजे १५ मार्च पासून या ॲपवर तुम्ही तिकिट बुकिंग करू शकता. बरं हे ॲप अगदी विनामूल्य आहे. प्ले स्टोअर वरून अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकता. कमेंट करून सांगा बरं डाऊनलोड केलं की नाही.?
हा लेख Prashant Damle new app tikitalay तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाप्रकारची अजून माहिती हवी असेल, असे अजून माहितीपूर्ण लेख वाचायचे असतील तर आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.!
धन्यवाद!
-आकांक्षा कोलते.