राखी-पौर्णिमा,रक्षाबंधन
“भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बेहन को ना भुलाना!!” हे गीत आपण सर्वजण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. हे गीत ऐकले की राखीपौर्णिमेची हमखास आठवण येते. प्रत्येक भावा-बहिणीला आपल्या अगदी मनाच्या जवळचे असे हे गीत आहे.
हे गीत राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन यावर आधारित आहे. चला तर मग आज आपण ‘राखीपौर्णिमा’ किंवा ‘रक्षाबंधन’, तसेच ‘नारळीपौर्णिमा’ या सणाबद्दल या लेखामधून माहिती जाणून घेऊयात!!
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राखीपौर्णिमेच्या; रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!! आपल्या भारतीय संस्कृतीत ‘रक्षाबंधन’,‘राखी पौर्णिमेला’ तसेच ‘नारळी पौर्णिमेला’ खूप महत्त्व आहे.
श्रावण महिना आला की आपल्याकडे व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची अगदी लगबग सुरू होते. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. जसे की नागपंचमी, श्रावणी सोमवार, शुक्रवार, सत्यनारायण पूजा, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी वगैरे. ज्येष्ठ महिन्यापासून पावसाला सुरुवात झालेली असते. आषाढातही पाऊस बरसून सृष्टी हिरवीगार झालेली असते. धरती जणू हिरवा शालू नेसून सज्ज असते. निसर्गाबरोबरच सर्वत्र अगदी चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण असते. श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. बालकवींनी लिहिलेल्या कवितेप्रमाणे “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे…,” सर्वत्र हिरवेगार गालिचे जणू पसरलेले असतात. अशा या श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला आपण राखीपौर्णिमा रक्षाबंधन, किंवा नारळीपौर्णिमा हा सण साजरा करतो.
राखीपौर्णिमेचा हा सण भावा बहिणीचे प्रेमाचे नाते वृद्धिंगत करणारा सण आहे. तर हा ‘राखीपौर्णिमे’चा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो त्याबद्दलची माहिती आज जाणून घेऊया.
राखी पौर्णिमेचा धार्मिक विधी व मुहुर्त व साजरी करण्याची पद्धत :
१. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान , उपकर्मे करून छान आवरून, लहान-मोठ्या सर्व बहिणी आपल्या भावाकडे किंवा भाऊ जर दुसऱ्या गावी असेल तर थोडे आधीच; त्या भावाकडे अथवा माहेरी जातात.
२. राखीपौर्णीमेचा मुहूर्त दिला असेल त्यानुसार बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकुम तिलक, अक्षता लावून त्याला ओवाळते. भावाच्या मनगटावर राखी, एक रक्षा-सूत्र, पवित्र धागा बांधते. राखी बांधताना हा श्लोक म्हणावा “येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल: तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल”!! म्हणजेच जशी दैत्यांचा राजा बलीच्या मनगटावर दैत्यगुरु शुक्राचार्यांनी राखी बांधली तशी मी तुला ही राखी बांधत आहे.
३. यावर्षी भद्रा नक्षत्र पहाटे सहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे. दुपारी दीड नंतर रात्री नऊ वाजेपर्यंत आपण राखीपौर्णिमा साजरी करू शकतो. भद्रा काळात शक्यतो राखी बांधू नये असे सांगितले जाते.
४. बहीण आपल्या लाडक्या भाऊरायाला हातावर राखी, रक्षासूत्र (रक्षा म्हणजे रक्षण व सूत्र म्हणजे पवित्र धागा) बांधून त्याच्या सुखसमृद्धी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याबरोबरच बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी भाऊ स्वीकारत असतो.
५. राखी पौर्णिमेलाच ‘पोवती पौर्णिमा’ देखील म्हटले जाते. कापसाच्या नऊ सुती धाग्यांनी एक पोवते तयार केले जाते. त्याला आठ, बारा, चोवीस अशा गाठी मारल्या जातात. ब्रम्हा विष्णू, महेश, सूर्य आदि देवतांना आवाहन करून ते पोवते बांधले जाते. तसेच पोवते राखी पौर्णिमेला आपल्या घरातील पुरुषांच्या मनगटावर पण बांधले जाते.
६. भाऊ बहिणीला प्रेमाची भेट म्हणून मिठाई किंवा बहिणीच्या आवडीची एखादी वस्तू अशा स्वरूपात भेट देत असतो व ‘तू निश्चिंत रहा’ असे आश्वासनही देत असतो.
७. आपली लाडकी लेक, बहीण येणार म्हणून तिच्यासाठी सुग्रास भोजन बनवले जाते. या दिवशी नारळीपौर्णीमा असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गूळ- खोबरे वापरून चविष्ट असा ‘नारळी-भात’ तयार केला जातो.
८. आपल्याकडे सण-समारंभाच्या प्रसंगी काही खास पदार्थ बनवले जातात. यामागे सुद्धा काही शास्त्रीय कारण असते. पावसाळ्याच्या थंड दिवसामध्ये शरीराला उष्णता मिळावी म्हणून गुळ, खोबरे वापरून हा नारळी -भात केला जातो. गुळ हा उष्ण व खोबरे पौष्टिक असल्यामुळे शरीराला उष्णता, ऊर्जा मिळावी म्हणून या दिवशी नारळीभात बनवण्याचे प्रयोजन आहे.
९. भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतिक असलेला हा सण दरवर्षी अतिशय उत्साहात साजरा केला जातो. सख्खे भाऊ बहिण तर हा सण साजरा करतात.परंतु संकटकाळी भावाप्रमाणे धावून आलेल्या एखाद्या मानलेल्या भावाला सुद्धा अशी बहीण आवर्जून राखी बांधते.
१०. परदेशी असलेल्या भावाला बहीण राखी पाठवते. तसेच आपल्या भारत देशाच्या सीमेवर आपले रक्षण करण्या साठी सज्ज असणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांना देखील सर्व देशभरातून राख्या पाठवल्या जातात. असा हा राखिपौर्णीमेचा सण!! या सणामुळे हे निस्वार्थ प्रेमाचे अतूट बंध आणखीनच दृढ होत असतात.
पौराणिक संदर्भ :
१. पूर्वी देव व दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. एकदा वृत्रासुर नावाच्या राक्षसाने इंद्रादेवाला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेवून युद्धास निघाला. त्यावेळी इंद्राची पत्नी शचिने त्याला युद्धात विजय प्राप्त व्हावा म्हणून त्याच्या हातावर एक धागा बांधला. पुढे इंद्र युद्धाला गेल्यानंतर त्याने असुरांचा पराभव करून विजय प्राप्त केला. इंद्राची पत्नी शचि हिला भगवान विष्णूंनी हा धागा दिला होता. या प्रसंगाची आठवण म्हणून राखी पौर्णिमा साजरी केली जाते असे मानले जाते.
२. दुसरी कथा अशी सांगितली जाते की, एकदा भगवान श्रीकृष्णाला हातावर काही जखम झाली होती. त्यातून भळभळा रक्त वाहत होते. ते पाहून द्रौपदीने त्वरित आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून ती चिंधी श्रीकृष्णाच्या मनगटावर बांधली. त्यामुले त्या जखमेतून वाहणारे रक्त थांबले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन द्रौपदीला तिचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले. पुढे जेंव्हा द्यूत खेळताना दुष्ट दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्रहरण घडवून आणले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला वस्त्रे पुरवून तिचे लज्जारक्षण केले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचा भातृधर्म पाळला. तेंव्हापासून पुढे ही प्रथा अशीच चालू राहिली आहे.
ऐतिहासिक संदर्भ :
१. चित्तोडची राणी कर्मवती हिने हुमायूं बादशहा याला आपले रक्षण करण्यासाठी राखी पाठवली होती. बहादूर शहाजफर याने जेव्हा चित्तोडवर आक्रमण केले तेव्हा हुमायूं बादशहाने राणी कर्मवतीचे रक्षण केले होते.
२. अजून एक संदर्भ असा की दुसरा आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करत असताना त्याच्या प्रधानाने कट रचून त्याचा खून केला. त्याचे प्रेत नदीच्या पाण्यात टाकून दिले. ते एका हिंदू स्त्रीला दिसले. तिने ते वाहून जाऊ नये म्हणून ते बाहेर काढून त्याचा वाली येईपर्यंत त्याचे रक्षण केले व जेव्हा बादशहाचा सैनिक आला तेव्हा ते त्याच्या हवाली केले. बादशहाच्या मुलाने त्या स्त्रीचे आभार मानले व तिला आपली बहीण मानले तेव्हापासून ती स्त्री त्याला दरवर्षी राखी बांधत असे. ही प्रथा पुढेही बहादुरशहा व अकबरशहा यांनी चालू ठेवली. याचा इतिहासात उल्लेख आहे.
नारळी-पौर्णिमे बद्दल अधिक माहिती :
१. या बाबतीत अजून एक संदर्भ असा की, नारळी-पौर्णिमा हा विशेषकरून कोळीबांधवांचा किंवा समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचासुद्धा सण मानला जातो.
२. या दिवशी कोळी बांधव ‘वरुणराजाची पूजा’ म्हणजेच पावसाच्या देवतेची पूजा करतात.
३. कोळी बांधवांची उपजीविका ही मुख्यत्वे समुद्रावर, खासकरून समुद्रातून मिळणाऱ्या मत्स्योत्पादनावर अवलंबून असते.
४. या दिवशी वरुणदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी कोळीलोक समुद्राला नारळ, तांदूळ, फुले अर्पण करतात. समुद्राला शांत होण्याची विनंती करतात. कारण समुद्र शांत झाला तरच त्यांना मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करता येतो. त्यामुळे हा सण कोळी बांधवांसाठी खूप विशेष आहे.
५. ज्येष्ठ आषाढाचे दोन महिने भरपूर पाऊस पडून गेलेला असल्याने सर्वत्र सुजलाम-सुफलाम असे वातावरण असते. समुद्रालाही उधाण आलेले असते. अशा वेळी ते मासेमारी करू शकत नाहीत.
६. श्रावण महिन्यात पाऊस कमी झाला की मच्छीमार बांधव समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतात. म्हणून ते या श्रावणपौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात आणि मासेमारीला सुरुवात करू देण्याची परवानगीच जणू समुद्र देवतेजवळ मागत असतात.
असा हा ‘रक्षाबंधन’ अर्थात ‘राखी-पौर्णिमेचा’ सण हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र व मांगल्याचा सण मानला जातो. समाजातील सर्व स्त्रियांचा सन्मान व रक्षण करण्याची परंपरा म्हणून या सणाकडे पाहिले पाहीजे. समाजातील कोणत्याही स्तरातील अबालवृद्ध स्त्रीचे रक्षण करणे हे आपले परमकर्तव्य आहे हे प्रत्येक जाणले पाहिजे. जणू ती आपली माता-बहीण आहे या दृष्टीने स्त्रियांकडे पाहिले पाहिजे. सबलांनी अबलांचे, दुर्बलांचे रक्षण केले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने राखी-पौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल.
तुम्हाला या लेखातील माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा. ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशा कथा व सणवारांच्या अधिक माहितीसाठी लेखक मित्र डॉट कॉम ला नक्की भेट द्या.
धन्यवाद!!!
लेखिका – माधुरी इनामदार , पुणे.