नारळी पौर्णिमा म्हणजे काय? समुद्राला नारळ अर्पण करण्यामागचे विज्ञान काय?
सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा
मनी आनंद मावेना कोलीये दुंनियेचा,
चला बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला,
हाती जोडूनी नारल सोन्याचा देऊया दरियाला.
नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात येथील समुद्रकिनार्यावर राहणारे कोळी बांधव साजरा करतात. महाराष्ट्रात कोकण किनारा आणि मुंबई येथे खूप मोठ्या प्रमाणात मच्छिचा व्यापार चालतो. श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा यालाच नारळी पौर्णिमा असे म्हणतात. काय आहे या दिवसाचे महत्व? समुद्राला नारळ का अर्पण केला जातो? त्याची महती काय? आज या लेखात आपण ही माहिती घेणार आहोत.
मच्छिमार लोकांचे जीवनमान:
कोकण, गोवा, पालघर, गुजरात आणि मुंबईच्या समुद्रकिनार्यालगत राहणारे कोळी समाज, भंडारी समाज, आगरी समाज यांचा प्रमुख व्यवसाय हा मच्छीमारी करणे हा होय. यांचे संपूर्ण आयुष्य हे समुद्रावरील मच्छिवर अवलंबून. दररोज पहाटे हे मच्छिमार लोक यांच्या नौका, छोट्या होड्या, पगार (कोकणात या छोट्या होड्याना पगार असे संबोधले जाते.) जाळ्या घेऊन खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी जातात. आणि जे छोटे मोठे मासे मिळतील त्यावर त्यांची रोजची गुजराण होते. जर जास्तीचे मासे मिळाले तर ते मार्केटमध्ये जाऊन विकायचे.
वर्षाचे बारा महीने हेच काम. पण जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला की समुद्र खवळतो. खूप मोठ्या लाट्या अगदी उग्र रूप धारण करतात. तसेच या पावसाच्या महिन्यामध्ये माशांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे या मच्छीमारी बांधवांना हे पावसाचे दोन तीन महीने सक्तीची विश्रांति घ्यावी लागते. ती विश्रांती नारळी पौर्णिमे पर्यन्त लांबते. नारळी पौर्णिमा ही सात्विक अशा श्रावण महिन्यात येते. या दिवशी समुद्राला खूप मोठी भरती येते. श्रावण महिन्यात पावसाचा जोरही हळू हळू कमी होत जातो आणि समुद्र शांत होतो. त्यानंतर परत या मच्छिमार बांधवांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायाची सुरुवात होते. यांचे संपूर्ण जीवन या लाटांवर स्वार होवूनच सुरू होते. म्हणून नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करून यांच्या घरातील आई, भगिनी, पत्नी या समुद्राची पुजा करतात.
नारळी पौर्णिमेचे महत्व आणि नारळ अर्पण करण्यामागचा अर्थ काय?
श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहात असतात. या दिवशी कोळी भगिनी या सजून नटून समुद्राची पुजा करतात व नारळ अर्पण करतात व समुद्राला गार्हाणे घालतात की. “आमचा धनी आपल्या कुटुंबाला मागे सोडून, खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातो. त्याचे रक्षण कर व त्याला भरपूर मासोळी मिळू दे”. कोळी बांधवांची संपूर्ण मदार ही समुद्रावरच अवलंबून असते म्हणून समुद्राला शांत होण्यासाठी तसेच समुद्राचा कोप होऊ नये, कोळयांच्या नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी समुद्राला विनंती केली जाते.
तसेच वरुण देवाची पूजाही केली जाते. वरुण देव म्हणजे पाऊस, त्याची पुजा करण्याचे कारण म्हणजे मच्छिमार बांधवांचा संपूर्ण प्रवास हा पाण्यातून असतो. त्यामुळे वरुण देवाची पुजा करणे क्र्मप्राप्त ठरते. वरुण देवता ही जलावर ताबा मिळविणारी व त्यावर संयम ठेवणारी असल्याने, या दिवशी सागररूपी वरुण देवतेला आवाहन करून नारळ अर्पण केला जातो. खवळलेल्या समुद्राच्या लाटा या यमलहरी प्रमाणे भासतात. या यमलहरी नारळाच्या तेजतत्व पाण्याकडे आकृष्ट होतात. त्यानंतर त्या सागरात विलीन होतात.
नारळ अर्पण करणायची पद्धत समजून घेऊनच तो अर्पण करावा त्याला समुद्रात फेकू नये. तो ओंजळीत घेऊन सागराला अर्पण करावा. किंवा कोळी बांधव करतात तशी पुजा करून, तो नारळ फोडून त्याचे पाणी सागरात अर्पण करावे व नारळाचे तुकडे चारी दिशांना भिरकावून, हात जोडावे.
श्रावण महिन्यात तसाही पावसाचा जोर कमी होऊन हळूहळू संपतो. त्यामुळे कोळी बांधव खुश होऊन या दिवशी आपल्या होड्यांची पुजा सुद्धा करतात. होड्यांना रंगरंगोटी केली जाते. त्यांनाही सजवून त्यांची पुजा अर्चा केली जाते.
नारळी पौर्णिमेचा नैवेद्य:
नारळी पौर्णिमेला समुद्र आणि वरुण राजाची पुजा करून झाल्यावर समुद्राला नारळ अर्पण केला जातो. त्यानंतर कोळी बांधव आपल्या सजविलेल्या होड्यांची सुद्धा पुजा करतो. या होड्या कोळी बांधवच्या सख्या असतात. त्यांच्याशिवाय तो समुद्रात मच्छीमारी कशी करणार? म्हणून होड्यांची पुजा केली जाते व त्यांना गोडधोडाचा नैवेद्य म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी वडी या सारखे पारंपरिक पदार्थ केले जातात. एकूणच या नारळी पौर्णिमे नंतर कोळी बांधवांचे प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे मच्छीमारी सुरू होते.
काही ठिकाणी नारळला सोन्याचे वेष्टन करून म्हणजे सोनेरी कागदाने सजवून तो नारळ समुद्राला अर्पण केला जातो. काही ठिकाणी नारळावर नारळ आपटून जो जिंकेल त्याचे नारळ अशा स्पर्धाही घेतल्या जातात. कुठे कुठे कोळी भगिनी कोळी नृत्य साजरे करतात. एकूणच धमाल असते नारळी पूर्णिमेला आणि त्याच दिवशी रक्षा बंधनही असते. अशा प्रकारे कोळी बांधव सागराला प्रार्थना करून नारळी पौर्णिमा साजरी करतात.
मैत्रिणींनो तुम्हाला या नारळी पौर्णिमा म्हणजे काय? आणि त्याची महती ही माहिती कशी वाटली? असे माहितीपर लेख आपणाला वाचायचे असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करा. ही माहिती कशी वाटली? तुम्हाला ही माहिती आवडली का? तर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.”
लेखिका : सपना कद्रेकर मुंबई
छान माहिती आहे,, या लेखातून नारळी पौर्णिमेचे काही नवीन माहिती सुद्धा भेटली.