दिवाळीचा सण आणि रांगोळी

WhatsApp Group Join Now

दिवाळीचा सण आणि रांगोळी

         “ आई, रांगोळीचे रंग कुठे ठेवलेत?, इथे लक्ष्मी येण्याची वेळ झाली तरीही ह्यांची रांगोळी आटोपली नाही! , ये आपण इथे पिवळा रंग भरुया का! ,ये पोरींनो करा की पटापटा देवी जशी तुमच्या रांगोळीसोबत सेल्फिच घेणार आहे! “

         मित्रांनो ,असे एक ना अनेक वाक्य काही अंशी प्रमाणात प्रत्येकाच्याच घरी एका खास सणाच्या दिवशी ऐकायला मिळतात. हो नं !…. कुठला बर असेल ? अगदी बरोबर ‘दिवाळी’! लक्ष्मीदेवीच्या स्वागताची पूर्वतयारी . निश्चितच त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे ‘रांगोळी रेखाटन ‘ . जिच्याशिवाय आई लक्ष्मीचं स्वागतच अशक्य. आज आपण ह्यावरच बोलणार आहोत…’दिवाळीतील रांगोळीचे महत्त्व आणि रेखाटन!’

इतिहास :

          रांगोळी काढणे ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला साधारणतः यजुर्वेदाच्या काळात, यज्ञसंस्थेच्या जन्मापासून झालेली आढळते. हडप्पा , मोहेजोदडो संस्कृती व लिळाचारित्रातही रांगोळीचा उल्लेख आहे. रामायणात , रावणाचा वध करून जेव्हा राम – सीता व लक्ष्मण अयोध्येत परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी होती आणि तो दिवस म्हणजे ‘ दिवाळीचा ‘दिवस होय.

         उत्सव, विज्योत्सव, मंगलसमारंभ, कुळाचार, संस्करविधी, व्रतवैकल्य अशा प्रसंगात रांगोळी पिढ्यानपिढ्या महत्त्वाची भूमिका पार पाडत आलेली आहे. 

साहित्य :

    रांगोळी रेखाटतांना प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात रांगोळीचा वापर केलेला दिसतो .जसे , तांदळाचे पीठ,अन्य कोरडे पीठ,संगम्रवराचे चूर्ण, मीठ, कोरडे व ओल्या रांगोळी दगडाचे चूर्ण, लाल विटांची पावडर, चुना, फुलं व फुलांच्या पाकळ्या इत्यादी.

दिवाळी आणि रांगोळीचे महत्व :

   दीपोत्सव म्हणजे उत्सवाचे स्नेहसंमेलन! वसुबारस,धनत्रयोदशी,लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज असे पाच उत्सव संमिलित होऊन दिवाळी साजरी करतात. ह्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात ही पहाटे अंगण सारवून त्यावर रांगोळी काढून केली जाते. सारवलेल्या अंगणात कुठलीही नकारात्मकता असल्यास ती रांगोळीने नाहीशी होते. त्यावर दिव्यांची आरास एक सकारात्मकता आणते. चला तर मग बघुयात प्रत्येक दिवसानुसार काढण्यात येणारी रांगोळी 

१) वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवस. हया दिवशी गाय-वासरू ह्यांच्या प्रती कृतज्ञता व आदर ह्याचे प्रगटीकरण रांगोळीतन प्रतिबिंबित करतात..

२)धनत्रयोदशी : ह्या दिवशी, लक्ष्मीचे व कुबेराचे स्वागत सायंकाळी धनाने भरलेला हंडा,कलश, हत्ती अशी प्रतीकात्मक स्वरूपाची रांगोळी काढून करतात.

३) लक्ष्मीपूजन : दीपोत्सवातील महत्वाचा दिवस. नरकचतुर्दशी व दिवाळीचा दिवस म्हणजे महालक्ष्मीच्या पूजनाचा दिवस. लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याकडे अजूनही पारंपरिक रांगोळी काढली जाते. ह्या दिवशी लक्ष्मी तिच्या सोनपावलांनी घरात समृध्दी,शांतता, ऐश्र्वर्य, चैतन्य घेऊन येते .

४) पाडवा : हा दिवस पतीपत्नीच्या नात्याचा उत्सव म्हणून साजरा करतात तेव्हा त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाची किंवा मुक्तहस्त रांगोळी काढली जाते.

५) भाऊबीज : हा दिवस भाऊ- बहिणीच्या नात्याचा उत्सव तेव्हा त्यांचं प्रेम दिसेल अशी रांगोळी आपण काढू शकतो.

प्रतीके: 

     दिवाळीच्या दिवशी प्रतीकात्मक रांगोळींना विशेष महत्त्व असते. ती धार्मिकता व शुभता दर्शवितात. जसे शंख,चक्र, चंद्र, सूर्य, गोपद्म, कमळ, त्रिशूळ, कलश, गदा,श्री, कासव, चैत्रांगण, लक्ष्मीची पावले ,भूमितीय आकार इत्यादी.

रांगोळीतील रंगांचे महत्त्व:

  ह्या दिवशी रांगोळीत रंग भरताना काही रंगांना विशेष प्राधान्य दिलं जातं. असं म्हणतात ह्या रंगांशी निगडित असलेली ऊर्जा आपल्या आयुष्यात रंग भरते. बघुयात प्रत्येक रंग दिवाळीच्या दिवशी काय घेऊन येतो ते –

लाल – उत्कटता,प्रेम,वाईटावर चांगल्याचा विजय.

पिवळा – ज्ञान, शिक्षण, शुभ वातावरण.

हिरवा – निसर्ग, आनंद, वाद आणि सुसंवाद.

पांढरा – शुद्धता, शांतता, देवी-देवतांच्या उपस्थितीचे    प्रमाण.

नारंगी – उत्साह व ऊर्जा.

निळा – दिवाळीचा अविभाज्य भाग.

जांभळा – ऐश्वर्य व भव्यता.

प्रांतानुसार दिवाळीतील रांगोळ्यांचे रेखाटन:

महाराष्ट्र :  

१) ठिपक्यांची रांगोळी – ठिपके जोडून भूमितिय आकार, मार,कासव, कमळ, वेल काढले जातात. ह्या विशेषकरून चौकोनि आकारात असतात.

२) संस्कारभारती – विविध रंगांची उधळण ह्या रांगोळी प्रकारात दिसते. ह्या रांगोळीचे मूळ पवित्र चिन्ह, हिंदू मूल्ये व संस्कार ह्यात आहे.

३) फुलांची रांगोळी – वेगवेगळ्या रंगांची फुलं व त्यांच्या पाकळयांचा उपयोग करून वर्तूळाकार, आयाताकृती किंवा चौकोनी सजावट केली जाते.

गुजरात: गुजरातमध्ये दिवाळीच्या दिवशी ‘ रंगराग ‘ नावाची रांगोळी काढल्या जाते . त्यात तांदळाच्या पीठाने तांब्याच्या थाळीवर सुबक आकार काढल्या जातात.

राजस्थान – येथे रांगोळीला ‘मंदाना ‘ म्हणतात. भिंतींना लाल मातीने सारवून ,कापसाच्या बोळ्याने, चुन्याचा वापर करून रांगोळी काढतात.

पश्चिम बंगाल – बंगाली स्त्रिया पारंपारिक पद्धतीने गाणे गात जमिनीवर किंवा भिंतीवर तांदळाच्या पीठाने प्रतीकात्मक रंगीत आकृत्या, लक्ष्मीची पदचिन्हे रेखाटतात. येथे रांगोळीला ‘अल्पना’ म्हणतात.

दक्षिण भारत – येथे ‘कोलम’ रांगोळी प्रकार बघायला मिळतो. ज्यात दैवी सुरक्षेची हमी व आत्मिक शुद्धता बघायला मिळते.

     एखाद्या कोपऱ्यालाही महत्त्व प्राप्त करून देण्याची ताकद ह्या रांगोळीत आहे. म्हणून आपल्यात तिला धार्मिक महत्व आहे . तेव्हा, येणाऱ्या दिवाळीला वेगवेगळ्या रंगांची सुबक रांगोळी काढून लक्ष्मीमातेच स्वागत करूयात!

  मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडल्यास कमेंट्स करून नक्की सांगा . 

           दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top