Rudraksha full Information in Marathi:प्राचीन काळापासून रुद्राक्षाला प्रचंड अध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आहे. रुद्राक्ष हे शिव शंकरांनी निसर्गाच्या रूपात दिलेलं एक प्रकारचं दानच आहे. रुद्राक्षाची उपासना ही शिव उपासना मानली जाते. रुद्राक्ष घालण्याचे बरेच फायदे आहेत. पण रुद्राक्षाचे प्रकारही खूप आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकारानुसार रुद्राक्षाचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत.
तसे पाहता रुद्राक्ष हे एका वनस्पती पासून मिळते. त्याची उत्पत्ती कशी होते? त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत ? त्यांचे महत्त्व काय? रुद्राक्ष तयार होण्यामागची कथा नेमकी कोणती आहे ? रुद्राक्ष कोठे आढळते ? हे सर्व आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
रुद्राक्ष कसे तयार होते?
रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. हे झाड प्रामुख्याने हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये दिसून येते. तसेच भारत, नेपाळ, इंडोनेशिया, जावा इत्यादी देशांमध्ये देखील रुद्राक्षाची झाडे आढळतात. या झाडाची उंची 55 ते 60 फूट असते. यांची पाने आंब्याच्या पानां सारखीच दिसतात. हे झाड सदापर्णी असून वर्षभर नवीन पालवी फुटणे आणि काही पाने गळून पडणे ही प्रक्रिया अव्याहतपणे चालूच असते. साधारणतः हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यात या झाडाला मोहर म्हणजेच फुले येतात. या फुलांचे रूपांतर फळांमध्ये होऊन त्या फळातून रुद्राक्ष तयार होते. रुद्राक्षाच्या झाडाचे शास्त्रीय नाव इलेओकार्पस ग्रॅनीट्रस रॉक्सबी असे आहे.
रुद्राक्षाच्या फळाचं जिथे देठ असतं. तिथेच त्याला आतील बाजूस एक छिद्र असतं आणि त्यातूनच रुद्राक्षाच्या आतील भागाचे पोषण होत असते. या छिद्रापासून फळावर कमी अधिक प्रमाणात अर्धगोल खाचा सुरू होऊन त्या खालच्या बाजूस पुन्हा एकत्र येऊन मिळतात आणि यालाच रुद्राक्षाचे मुख असे म्हणतात.
रुद्राक्षाची कथा
शिवपुराणात रुद्राक्षाच्या उत्पत्तीचा काही उल्लेख आढळतो. असं म्हटलं जातं की हिमालयात शंकरांना असुराधिपती त्रिपुराचा वध करण्यासाठी त्याच्याशी अनेक दिवस घनघोर महायुद्ध करावे लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्याची प्रचंड आग होऊन ते रक्तासारखे लाल भडक झाले. तो दाह सहन न झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून काही अश्रू बाहेर पडले आणि त्याचवेळी ब्रह्मदेवांनी त्यापासून एक वृक्ष उत्पन्न केला पुढे काही काळानंतर त्या वृक्षाला जी फळे आली त्यांनाच रुद्राक्ष असं नाव पडलं.Rudraksha full Information in Marathi
रुद्राक्षाचे प्रकार
रुद्राक्षाचे त्याच्यावर असणाऱ्या खाचांवरून काही प्रकार पडतात. यालाच रुद्राक्षाचे मुख असेही म्हणतात. प्रत्येक मुखी रुद्राक्षाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. आणि त्यानुसार विविध समस्येसाठी धारण करण्याचे नियमही वेगवेगळे आहेत.
1. एक मुखी रुद्राक्ष :
एक मुखी दुर्लभ रुद्राक्ष हे फारच दुर्मिळ असते. हा रुद्राक्ष साक्षात भगवान शंकराचे स्वरूप मानला जातो. यावर सूर्याचा देखील प्रभाव असतो. आणि आपले जीवन हे सूर्य प्रणालीवर आधारित असल्यामुळे एकमुखी रुद्राक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. सर्व प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी, ध्येयप्राप्तीसाठी हे रुद्राक्ष धारण करणे खूप फायदेशीर असते.
2. द्विमुखी रुद्राक्ष :
द्विमुखी रुद्राक्षालाच गौरीशंकर रुद्राक्ष असेही म्हटले जाते. हा रुद्राक्ष शंकर आणि पार्वती यांचे प्रतीक मानला जातो. जर पती-पत्नीमध्ये काही वाद होत असतील तर हा रुद्राक्ष धारण करायला सांगतात. तसेच विवाह जुळणे, वैवाहिक सौख्य मिळणे, संतती सुख मिळणे, मनशांती, उद्योग धंदा किंवा व्यवसायात प्रगती साधण्यासाठी देखील हा रुद्राक्ष धारण केला जातो.
3. त्रिमुखी रुद्राक्ष :
पुरणातील काही कथांनुसार हा रुद्राक्ष ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानला जातो. हा एक बहुगुणी आणि सामंजस्याच्या व समृद्धीच्या वाटेवर रुद्राक्ष आहे. हा धारण केल्यामुळे विद्या, धन आणि सुख-समृद्धी अशा तिन्ही गोष्टींची प्राप्ती होते.
4. चौमुखी रुद्राक्ष :
हा रुद्राक्ष साक्षात ब्रह्मदेवाचे प्रतीक मानला जातो. हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे स्मरणशक्ती तीव्र होते. तसेच यामुळे संभाषण कौशल्य सुधारते. हा रुद्राक्ष सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी देखील धारण केला जातो.
5. पंचमुखी रुद्राक्ष :
पंचमुखी रुद्राक्षाला पंचानन शंकराचे किंवा कालाग्नि रुद्राचे स्वरूप मानले जाते. यात जल, अग्नी वायू, पृथ्वी, आकाश अशा पंचमहाभूतांचा समावेश असतो. हा धारण करणाऱ्याला मनशांती प्रदान करतो. हे रुद्राक्ष सर्वत्र सहजपणे आढळते.
6. सहामुखी रुद्राक्ष :
हा रुद्राक्ष देखील फार दुर्मिळ नसतो. हा रुद्राक्ष बुद्धीची देवता असणाऱ्या साक्षात श्री गणेशाचे प्रतीक मानला जातो. काही ग्रंथानुसार हा रुद्राक्ष शिवपुत्र कार्तिकीकेय याच्या प्रभावाखाली असतो, असाही उल्लेख आढळतो. शक्यतो हा रुद्राक्ष बौद्धिक वादविवाद किंवा शारीरिक लढाईमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी वापरला जातो. बहुतांश व्यापारी हा रुद्राक्ष धारण करतात.
7. सातमुखी रुद्राक्ष :
सातमुखी रुद्राक्ष हा सप्तऋषींचे प्रतीक मानला जातो. तसेच हा ‘अनंग’ या नावाने देखील प्रसिद्ध आहे. ऋषींच्या सामर्थ्याने यश, कीर्ती, प्रतिष्ठा इत्यादी प्राप्त करून घेण्यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो. तसेच पापक्षालनासाठी देखील हा रुद्राक्ष धारण करतात.
8. अष्टमुखी रुद्राक्ष :
अष्टमुखी रुद्राक्ष हा बटुक भैरवाचे प्रतीक आहे. याच्या धारणेने आयुष्य वाढते. याच्यावर साक्षात भैरवनाथाचा प्रभाव असल्यामुळे हे अत्यंत बलशाली असते आणि त्यामुळेच दुर्मिळही असते. शारीरिक आणि भौतिक त्रासापासून, संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक संरक्षण कवच म्हणून हे रुद्राक्ष धारण केले जाते.
9. नऊ मुखी रुद्राक्ष :
नऊमुखी रुद्राक्ष हा नवदुर्गा देवीचे प्रतीक आहे विद्या, धन, सुख, ऐश्वर्य, मोक्ष, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो.
10. दशमुखी रुद्राक्ष :
हा रुद्राक्ष विष्णूच्या दशावताराशी संबंधित आहे. दाही दिशांना उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या नवग्रह पीडा दूर करण्यासाठी, अकाली मृत्यूला दूर लोटण्यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो.
11. अकरामुखी रुद्राक्ष :
अकरामुखी रुद्राक्ष हा अकरा रुद्र म्हणजेच त्र्यंबक, भव, रुद्र, शर्व, पशुपती, ज्येष्ठा, कनिष्ठा, श्रेष्ठ, सोम, शिव, जघन्य इत्यादींचे प्रतीक मानला जातो. सर्व तऱ्हेचे वैभव, सुखासीन आयुष्य, आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळवण्यासाठी हा रुद्राक्ष धारण करतात.
12. बारामुखी रुद्राक्ष :
बारामुखी रुद्राक्ष हा महाविष्णू आणि बारा आदित्य यांचे प्रतीक मानला जातो. बारा ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद याला प्राप्त असतो. दारिद्र्य, रोग, नैराश्य भय, अनारोग्य, दुर्दैव, दुःख, धनहानी निःसंतता, संकटे आणि बाधा अशा बारा गोष्टींवर मात करण्यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो.
13. तेरामुखी रुद्राक्ष :
तेरामुखी रुद्राक्ष हा इंद्र देवतेच्या प्रभावाखाली येतो. अध्यात्मिक प्रगती करणे, अचानक धनलाभ घडून आणणे, कठीण प्रसंगातून मार्ग काढणे, लोकप्रियता संपादन करणे यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो.
14. चौदामुखी रुद्राक्ष :
चौदा मुखी रुद्राक्षाला साक्षात हनुमंताचे स्वरूप मानले जाते. हा रुद्राक्ष अत्यंत आहे. हा धारकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. तसेच याची उपासना करणाऱ्याला शिवलोकी मुक्ती मिळते असे मानले जाते.
इंद्रमाळ :
इंद्रमाळ सर्वात श्रेष्ठ आणि दुर्लभ माळ असते. या माळेत एक मुखी ते एकवीस मुखी गौरीशंकर आणि गणेश रुद्राक्ष असे सर्व रुद्राक्ष एकत्र बांधलेले असतात. जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी आणि सर्व सुखे प्राप्त करण्यासाठी ही माळ धारण केली जाते.
रुद्राक्ष धारण करताना घ्यावयाची काळजी :
• शक्यतो रुद्राक्ष हे स्वतःच्या मनाने धारण करू नये. कोणत्या तरी अभ्यासू व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच हे धारण करावे.
• तसेच बरेचदा हे रुद्राक्ष दोन-तीन प्रकारच्या रुद्राक्षांना एकत्र बांधून देखील धारण केले जाते.
• रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष अवश्य काढून ठेवावे.
• नियमितपणे दरवर्षी हे रुद्राक्ष विशिष्ट अभिषेक अथवा लघु रुद्र पूजे द्वारे पुन्हा पुन्हा चार्ज करून घ्यावे.
• भोक पडलेल्या अथवा तुटलेल्या रुद्राक्षाला कधीही धारण करू नये.
तुम्हाला ही माहिती Rudraksha full Information in Marathi कशी वाटली हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स जरूर कळवा.तसेच अशा नवनवीन माहितीसाठी आणि कथांसाठी आमच्या लेखक मित्र वेबसाईटला सतत भेट देत रहा. आणि आमच्या wha’s app चॅनल ला देखील लगेच जॉईन करा.
स्नेहल बाकरे, पुणे
छान माहितपूर्ण लेख. धन्यवाद.