Sankrant Special Short story
आज 14 जानेवारी, संक्रांत, सगळीकडे संक्रातीची लगबग सुरू होती. त्यातला त्यात पंढरपूरला विचारायलाच नको. किती तरी सवाष्ण स्त्रिया लांब लांब गावावरून रुक्मिणी मातेला वानवसा करायला आल्या होत्या. आशा ताई सगळं पाहून जड अंतःकरणाने लेकी कडे म्हणजे आरतीकडे जायला निघाल्या.

आरती आणि समीर दोघेही लहानपणापासून चे मित्र. एकाच शाळेत शिकलेले. एकत्रच लहाणाचे मोठे झाले होते. दोघांच्याही आवडी निवडी अगदी सारख्याच. जणूकाही एकाच साच्यात दोघांना तयार केले असावे. शाळेत असल्यापासून आरती आणि समीर सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घ्यायचे. पुढे आठवीत आल्यावर दोघांनीही NCC मध्ये भाग घेतला आणि तिथून पुढे दोघांचेही विचार बदलले.
NCC मध्ये आल्यावर देशभक्ती आणि देशासाठी काही तरी नक्कीच करायचं हे दोघांच्याही मनाने पक्क केलं. आणि त्यानुसार दोघेही तयारीला लागले.समीर आणि आरतीने नववीत असतांना आपापल्या घरी सांगून टाकले की ते NDA मध्ये जाणार आणि त्यानुसार ते तयारी सुरू करणार आहेत.समीरच्या घरी समीरने कोणतंही करियर निवडलं तरीही काहीच हरकत नव्हती. आरती कडे मात्र हलकल्लोळ उठला. मुलगी आहेस, तू कुठे सीमेवर लढाया करायला जाणार आहेस असा पवित्रा घेत वडिलांनी ठाम नकार दर्शिविला. वय लहान असल्यामुळे आरतीला विरोध करता आला नाही. आणि मुलीने पुढे जाऊन हट्ट धरू नये म्हणून तिच्या बाबांनी प्रदीपरावांनी तिला पुढे आर्टस् कॉलेजमध्ये घातलं. इकडे समीर दहावी उत्तीर्ण झाला की त्याचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पुण्याला शिकायला गेला. आणि आरती गावीच राहिली.
एकीकडे समीर त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी जीवाचं रान करत होता, तर आरतीच्या हाती मात्र काहीच उरले नव्हते. प्रदीपरावांनी आरतीला स्पष्ट सांगितले होते, आर्टस् घेऊन नेट सेट परीक्षा देऊन सरळ प्राध्यापक म्हणून नौकरी करायची, अगदीच ते नाही झालं तर बीएड करून शिक्षिका तर नक्कीच होऊ शकते. घर, मुलं बाळं, संसार सगळं व्यवस्थित सांभाळत नौकरी उत्तम प्रकारे करू शकतेस. आरती पुढे कोणताच पर्याय उपलब्ध राहिला नाही. समीरने मात्र ठरल्या प्रमाणे NDA मध्ये आपला प्रवेश नक्की केला.
आरती तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करत दिवस काढत होती. एकेकाळी डॅशिंग असणारी, कोणालाही न घाबरणारी आरती एकदम शांत आणि अबोल झाली होती. आशा ताईंना आरतीची ही अवस्था पाहवत नव्हती. पण नवऱ्याच्या निर्णयापुढे त्याही हतबल होत्या.करता करता दिवस निघून गेले, इकडे आरतीच्या लग्नाच्या हलचाली सुरू झाल्या. वेगवेगळ्या ठिकाणांहून उत्तम स्थळं आरती साठी येत होती, आणि एक दिवस अचानक समीर आणि त्याचे आईबाबा आरती कडे आले, तिचा हात मागायला. यावेळी आशा ताईंनी प्रदीपरावांकडे न बघताच लगेच होकार कळवला. त्यांना आरतीला सुखी समाधानी पाहण्याची ही संधी अजिबात हातातून जाऊ द्यायची नव्हती. आणि प्रदीपरावांनी देखील होकार दिला. ठरल्या प्रमाणे आरती आणि समीरचं लग्न पार पडलं. लग्नानंतर दोघेही फिरून आली, सर्व देवकार्य व्यवस्थित पार पडले. आणि समीर त्याच्या पोस्टिंग वर राजस्थान बॉर्डरवर परत जायला निघाला. पण आरती त्याच्या बरोबर जाणार नव्हती. आरतीला तो पुण्यात सोडून एकटाच जाणार होता. आणि आरतीही त्याच्या या निर्णयामुळे खूप खूश होती. कारणही तसेच होते. तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार तर मिळालाच होता, पण आता आरती आणि समीर आरतीच्या अर्धवट सोडून दिलेल्या स्वप्नांवर काम करणार होते. समीरने ठरल्याप्रमाणे आरतीला केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारी साठी पुण्याला आणून सोडले. आणि तिथूनच तो राजस्थानला रवाना झाला. यथावकाश आरतीने परीक्षेत विशेष प्राविण्य पटकावत भारतीय पोलीस सेवा दलात सामील झाली. यथावकाश समीर आरतीच्या संसार वेलीवर अंकुर आणि सुमेधा नावाची दोन फ़ुलं बहरली. आरतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग होत होत्या आणि त्यामुळे तिने मुलांना सांभाळण्यासाठी आशताईंना आणि प्रदीप रावांना बोलावून घेतले होते. समीरचे आई बाबा देखील येऊन जाऊन होते. पण समीरचे बाबा NDA प्रवेश मार्गदर्शन शिबिर घेत असल्यामुळे फारसा वेळ देऊ शकत नव्हती. त्यांना देशासाठी आणखी अनेक समीर तयार करायचे होते.
अशा ताईंना आरतीच्या आयुष्याचा हा सारा चित्रपट डोळ्यासमोर दिसत होता. आणि अंकुरच्या म्हणजेच आरतीच्या मुलाच्या आवाजाने त्या भानावर आल्या, “आज्जी गुरुजी आले आहेत, मी येतो लगेच धोतर नेसून”.आणि अशा ताईंच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्या देखील जड अंतःकरणाने हॉल मध्ये आल्या. गुरुजी विधींची सगळी तयारी करू लागले. युनिफॉर्म मध्ये असलेल्या समीरचा फोटो हॉल मध्ये ठेऊन त्याला हार घातला होता, तर अंकुर पिंडदान करायला बसला होता. समीर….. काश्मीर मध्ये कर्तव्य पार पाडत असताना भारतमातेच्या चरणी अर्पण झाला होता. 31 डिसेंबर, सर्व जण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत होते. तर उत्साही पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कश्मीरला आले होते. रात्री बारा वाजता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलच्या बाहेर येऊन बर्फवृष्टी चा आनंद घेत, नाचत बागडत होते आणि नेमकं याच वेळी दबा धरून बसलेले अति*रेकी पुढे आले आणि पर्यटकांवर बेछूट गोळीबार सुरु केला. सगळी कडे सायरन वाजायला सुरुवात झाली. समीरला हेड ऑफिस कडून सूचना आल्या. आणि समीर कशाचीही पर्वा न करता निघाला . त्याचे साथीदार त्याला समजावून सांगत होते की आपल्या जवळ पुरेसा शस्त्रसाठा नाहीये, आणि शत्रूचे नक्की संख्याबळ देखील ठाऊक नाहीये,तर आपण थोडा विचार करून पुढे जाऊ. पण समीर कोणाचंच काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. शत्रूचा खात्मा आणि नागरिकांचे संरक्षण हे आणि एवढेच लक्षात ठेवून तो भिडला. शत्रूला हरप्रकारे नडला आणि शेवटी मातृभूमीच्या रक्षणासाठी कामी आला….
आजची संक्रांत ही आरतीच्या जीवनातील सगळ्यात काळी संक्रांत ठरली होती.आज समीरचा चौदावा होता. खरं तर आरती आणि कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरली नव्हती, पण सगळ्या कुटूंबाला हे सत्य स्वीकारून पुढे जाणे भागच होते. सगळेजण आरतीची वाट पहात बसले होते. आरती रूमचा दरवाजा बंद करून बसली होती. खूप आवाज दिले तरीही येते, आलेच,एवढंच उत्तर देत होती.
आणि ती जेंव्हा हॉल मध्ये आली त्यावेळी आशाताईंच्या हातातून पूजेचं ताटच खाली पडले. गुरुजी देखील तिच्याकडे बघतच राहिले. आरती पूर्ण सवाष्ण वेशात आली होती. आशाताई तिच्याकडे पहातच बसल्या, शेवटी बळ एकवटून तिला विचारले,”आरती बाळ बरी आहेस का?” आरतीने हो असं उत्तर दिलं आणि सांगितले की तिला लगेचच ड्युटीवर जायचे आहे. विठ्ठल मंदिर परिसरात घातपाताची शक्यता आहे आणि साध्या वेशात पोलिसांनी जाणे गरजेचे आहे. अशा ताईंनी समीरचं पिंडदान तरी पार पडू देत म्हणून तिला सूचना केली. तर आरती समीरच्या फोटोला नमस्कार करून “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणत समीरच्या फोटोला कडक सॅल्युट ठोकत, हातात सतीचं वाण घेत, तिच्या इतर सख्यांच्या मदतीला निघून गेली………..
लेखिका – सौ. सुषमा दडके
(वरील कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर कथा स्वतः वेबसाइटसाठी दिलेल्या आहेत )
खूप सुंदर कथा
खूप खूप धन्यवाद🙏
छान कथा आहे आधुनिक स्त्रीचे मनोधैर्य या कथेतून दिसते… पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा..!!
कथेने छान वळण घेतले आहे. छान प्रेरणादायी कथा
खूप सुंदर कथा.
खूप छान 👍सुष ❤️keep it up!!
मनोबल वाढवणारी अप्रतिम कथा👌👌
Khushi chhaan, Ashish limit raha
Khuup chhaan ashich lihit raha
सुषमा, अतिशय सुंदर कथा लिहिली आहेस. खूप छान ❤️
खऱ्या अर्थाने सतीच वाण 🙏
खूप छान लेख लिहिला आहे.
खूप छान
Khup sundar katha…..ashich lihit raha
सुंदर लिखाण… भूतकाळ, वर्तमानकाळ सुंदर रित्या एकत्र मांडले आहेस… कथेत्तली वळणं पूर्णपणे अनपेक्षित नव्हती धूसर कल्पना देत होती पण पूर्ण अपेक्षित पण नव्हती… विषय खूप प्रगल्भ आहे आणि अश्या परिस्थितीत असणाऱ्या आपल्या भगिनिंबद्दल आदर वाढवला आहेस सुषमा!!
छान लिहिलंय 🌹
खूप छान कथानक
खुप सुंदर मांडणी केली
खूप छान
खूपच सुंदर !! तुमच्या लिखाणाने अगदी डोळ्यासमोर प्रसंग चित्रित होतात… आम्हां वाचकांना अश्याच अप्रतिम भेटी देत रहा..thank you..😊
khup sundar