नमस्कार मंडळी, संत गाडगेबाबांची महती व त्यांचे कार्य आपण सर्वांनी शालेय जीवनात पाठ्य पुस्तकातून वाचलेच असेल. स्वच्छतेचे प्रसारक म्हणून सर्वांना ते ज्ञात आहेत. असे हे थोर संत गाडगेबाबा यांची आज जयंती या निमित्ताने त्यांच्याबद्दल आपण आज या लेखातून माहिती घेणार आहोत.
Sant Gadge baba Jayanti in Marathi 2024:स्वच्छतेचे प्रसारक व आपल्या भजन- कीर्तनातून जनजागृती करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. गाडगेबाबांना” संत गाडगेमहाराज” असेही म्हटले जाते. संत गाडगेबाबा हे लोकांच्या जीवनाच्या विकासासाठी कायम झटले. जसे त्यांचे विचार महान होते तसे त्यांचे कार्यही महान होते. रंजल्या – गांजलेल्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असे ते म्हणायचे.
संत गाडगेबाबांचा परिचय:-
23 फेब्रुवारी 1876 रोजी डेबुजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात शेंडगाव येथे झाला. झिंगराजी जानोरकर हे त्यांचे वडील तर आईचे नाव सखुबाई होते. संत गाडगेबाबांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. जातीने ते परीट होते.
संत गाडगेबाबांचे बालपण:-
गाडगेबाबा लहान असताना त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती.शेंडगावात ज्यावर हक्क सांगावा असे काहीही उरले नव्हते.शेत, घर सगळे दुसऱ्याचे झाले होते. अशा तऱ्हेने चारी बाजूने निराश्रय झालेल्या या मायलेकरांना दापूरे या गावी त्यांच्या मामाकडे आश्रय लाभला. लहानपणापासून गुरे,ढोरे चरावयास नेणे, शेतीची कामे करणे, पडतील ती कामे ते आनंदाने करीत.
बालपणी विटी दांडू,आट्यापाट्या, सूर पारंब्या तसेच कुस्ती या खेळात बाबा पारंगत होते.आईकडून आलेली देवाधर्माची ओढ लहानपणापासून त्यांच्याही अंगी होती. बाबांचा आवाज सुरेल होता.आईकडून ऐकत आलेल्या भजन,कीर्तनांचा प्रभाव बाबांवर होता. दिवसभर शेतात कष्ट करून रात्री गावातल्या मंदिरात भजनाचा कार्यक्रम चालायचा.
संत गाडगेबाबांचा विवाह:-
गाडगेबाबांचा विवाह1892 रोजी लहानवयात कुंताबाई यांच्याशी झाला. त्यांना चार मुले होती. परंतु संसारात त्यांचे मन फारसे रमत नव्हते. घरसंसाराचा त्याग करून ते गावागावात जनजागृती करण्यासाठी हिंडू फिरू लागले.लोकांचे दुःख, हाल, दारिद्र्य त्यांना पहावत नव्हते. ते फार कनवाळू वृत्तीचे होते.
संत गाडगेबाबांचा पेहराव :-
संन्यासाचा मार्ग स्वीकारून त्यांनी नवीन अध्यायास सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा वेश बदलला होता. अंगावर एक जुने फाटके कुडते, जुने धोतर , डोक्यावर खापर,एका हातात फुटके मातीचे गाडगे व दुसऱ्या हातात काठी.एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी असायचा असा त्यांचा पेहराव होता. गोरा रंग, गोल चेहरा, घारे डोळे, जाडजुड व धिप्पाड अशी बाबांची शरीर यष्टी होती.नेहमी जवळ मातीचे गाडगे असल्याने लोक त्यांना गाडगेबाबा या नावाने ओळखू लागले.
संत गाडगेबाबांचे समाजकार्य :-
गावोगावी फिरत असताना लोकांच्या परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. बाबा स्वतः शिकले नव्हते. परंतु त्यांची बुद्धी अतिशय तीव्र होती. शिक्षणाविना अंधश्रद्धे ला बळी पडून समाजाचा अध:पात होतो आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. कित्येक संसार घरातील पुरुष मंडळींच्या व्यसनाच्या आहारी जाऊन धुळीस मिळाले होते. पिढ्यान पिढ्या लोक सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले होते.
गाडगेबाबा आपल्या भजन कीर्तनातून जनजागृती करत असत. कीर्तनाद्वारे लोकांना त्यांच्या दोषांची,अज्ञानाची जाणीव करून देत असत. गाडगेबाबांना मुळातच अस्वच्छता आवडत नसे. ते जिथे जिथे जात तिथे झाडू,खराटा मागवून परिसर स्वच्छ करीत होते. कष्टाशिवाय कुणाकडेही त्यांनी भाकरी खाल्ली नाही. निस्वार्थ भावनेने ते काम करीत.
नाशिक, पंढरपूर, देहू, आळंदी या ठिकाणी बाबांनी स्वतः कष्ट करून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. पाणी नसलेल्या गावात पाणपोया चालविल्या. अनाथ, वृद्ध, गरीब लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. नद्यांवर घाट बांधले. दुष्काळग्रस्तांसाठी अन्न, पाण्याची सोय केली. गरिबांची लग्ने लावून दिली. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा,महाविद्यालय,वसतिगृह उभे केले. हजारो लाखो लोकांना व्यसनमुक्त केले. त्यांचे उजाडलेले संसार पुन्हा मार्गास लावून दिले. देवाच्या नावाखाली होत असलेली पशुहत्या थांबवली. गुरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधले. देव देवळात नाही, तर तो माणसात आहे असे ते म्हणत.
संत गाडगेबाबांचे कीर्तन:-
गाडगेबाबा भजन- कीर्तन करत गावोगावी फिरू लागले तशी बाबांची कीर्तनेही रंगू लागली. संत तुकाराम महाराजांचा गाडगेबाबांवर प्रभाव होता.शेकडो हजारो लोकांमध्ये गाडगे बाबांचे किर्तन हा जादूचा शब्द झाला. ते ऐकता क्षणी लोकांची गर्दी कीर्तनाच्या दिशेने वळू लागली. लोक पाया पडायला धावत. कीर्तनकारांच्या पाया पडावे ही प्रथाच असे. लोकांनी आपल्या पाया पडणे बाबांना आवडत नसे. मग कीर्तनानंतर लोकांच्या गर्दीत ते कुठेतरी निघून जात किंवा लपून रहात. कुठेतरी अंधारात नाहीसे होत.
कीर्तनांचा कल्लोळ उसळवून त्यांनी सगळीकडे चैतन्य निर्माण केले. कीर्तनासाठी गाडगेबाबांना कोणत्याही साहित्याची गरज भासायची नाही. टाळ नको. वीणा नको. बाजाची पेटी नको. रस्त्यावरचे दोन दगड वेचून वाजवायला लागायचे.“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गाडगेबाबांचे आवडते भजन होते. आचार्य अत्र्यांनी गाडगेबाबांबद्दल काढलेले उद्गार म्हणजेच “सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात”. रोज नवनवीन गावे. रोज नवा अनुभव घ्यायचा. बऱ्याचदा लोकांच्या शिव्या शाप खाऊन मानहानी सोसावी लागायची. कोणाचे तरी दारी काम करून भाकरी मागून खात तीही फुकट खात नसत. कधी कधी तर दुप्पट श्रम करून श्रमाचा मोबदला न घेता निघून जात असत.
संत गाडगेबाबांचा संदेश:-
1. भुकेल्यांना अन्न द्या.
2. तहानलेल्याना पाणी द्या.
3. वस्त्रहीन लोकांना वस्त्र द्या.
4. बेघर लोकांना आसरा द्या.
5. अंध, आजारी, लुळेपांगळे यांना औषधोपचारासाठी मदत करा.
6. गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा.
7. बेरोजगारांना रोजगार द्या.
8. प्राणी, पक्षी आणि मूक प्राण्यांवर दया करा.
9. गरीब मुलामुलींच्या लग्नासाठी मदत करा.
10. दुःखी आणि निराश लोकांना हिम्मत द्या.
हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वर भक्ती आहे.
गाडगेबाबांचे संक्षिप्त चरित्र(Sant Gadge baba Jayanti in Marathi 2024) :-
•ऋणमोचन( विदर्भ) या गावातून गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे कार्य सुरू केले.
•1908 मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
•1917 रोजी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली.
•1921 मराठा धर्मशाळा पंढरपूर येथे सदावर्त उघडले.
• मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम करून एक धर्मशाळा व विद्यालय बांधले.
•1926 संत गाडगेबाबांची व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी एका कार्यक्रमात भेट.
•1931 वरवडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
•1932 ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
•1932 रोजी नाशिक येथे सदावर्त उघडले.
•27 नोव्हेंबर 1935 रोजी वर्धा येथे महात्मा गांधी व गाडगेबाबांची पहिली भेट.
•14 जुलै 1949 रोजी स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या संत चोखामेळा धर्मशाळेची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले.
•1952 रोजी ”श्री गाडगेबाबा मिशन”’ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या.
•1954 मध्ये गाडगेबाबांनी मुंबईत जे जे हॉस्पिटलच्या रोगांच्या नातेवाईकांना उतरण्यासाठी हॉस्पिटल जवळ धर्मशाळा बांधली.
•14 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबांचे पंढरपूर येथे झालेली कीर्तन हीच त्यांचे अखेरचे कीर्तन ठरले.
संत गाडगेबाबांचे देहावसान:-
20 डिसेंबर 1956 अमरावतीत वलगाव येथे पेढी नदीच्या काठावर गाडगेबाबांचे निधन झाले. बाबांची इच्छा होती की, त्यांना मरण हॉस्पिटलमध्ये न येता रस्त्यावर व्हावा. आणि तसेच झाले.असे मरण पुण्यवंतासच लाभते.गाडगे नगर अमरावती येथे गाडगे बाबांचे स्मारक आहे.त्यांची समाधी अमरावती येथे आहे.अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे.
गाडगे बाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी होय.जन्मभर गाडगेबाबा हाती जळता दीप घेऊन धावत राहिले. तो त्यांनी कधीही विझू दिला नाही की कधी त्यावर काजळी गोळा होऊ दिली नाही.
संत गाडगेबाबांची ही माहिती (Sant Gadge baba Jayanti in Marathi 2024) तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन कथा, माहितीपर लेख ,बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या व आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
लेखिका – आकांक्षा निरळकर, मुंबई.
वाह खुपच सुंदर माहिती दिलीत..शाळेत इतकी विस्तृत माहिती न्हवती मिळाली….
धन्यवाद!!
Thank you
फारच सुंदर लेख आहे
Thank you