२.शैलपुत्री देवी
पितृपक्षाची सांगता होताना शारदीय नवरात्राची चाहूल लागते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा आणि अर्चना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन देवीपुढे अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, सप्तशतीचा पाठ आणि उपवास करून हे नऊ दिवस साजरे केले जातात. वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. नवरात्रातील प्रत्येक दिवस हा देवीच्या नऊ अवतारांना समर्पित आहे.
आज या लेखामध्ये तुम्हाला नवरात्रातील देवीच्या पहिल्या अवतारा विषयी माहिती आम्ही सांगणार आहोत.
या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।।
वरील श्लोकामध्ये सांगितल्यानुसार नवरात्राची पहिली माळ
देवीच्या शैलपुत्री या अवताराशी संबंधित आहे.
या संदर्भात कथा सांगितली जाते की एकदा प्रजापती दक्ष राजाने मोठा यज्ञ केला आणि त्यात सर्व देवी देवतांना आमंत्रित केले परंतु महादेव शंकर आणि देवी पार्वती(सती) यांना आमंत्रण दिले नाही. देवी सतीने आपल्याला त्या यज्ञासाठी जाण्याची इच्छा असल्याचे शंकरांना सांगितले. तेव्हा शंकर तिला म्हणाले,”देवी सती ,काही कारणामुळे दक्ष प्रजापती माझ्यावर नाराज आहेत म्हणूनच त्यांनी मला यज्ञाचे आमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही”. सतीला आपल्या परिवाराला भेटण्याची इच्छा होती म्हणून तिच्या हट्टाखातर भगवान शिवाने तिला जाण्याची परवानगी दिली. परंतु तिथे तिच्याशी कोणीच आदराने , प्रेमाने वागले नाही. सतीच्या इतर बहिणींनी तिच्या संसाराची थट्टा केली, तिचे पती भगवान शंकर यांचाही तिरस्कार केला. एवढेच नव्हे तर राजा दक्ष यांनीही शिवाचा अपमान करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे माता सती खूपच दुःखी झाली. स्वतःचा व भगवान शंकरांचा अपमान सहन न झाल्यामुळे रागाच्या भरात त्याच यज्ञकुंडामध्ये तिने आत्मसमर्पण केले. हे कळल्यावर चिडलेल्या शंकराने दक्ष राजाचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. याच देवी सतीने पुढील जन्मात शैल (हिमालय)राजाची कन्या म्हणून जन्म घेतला आणि ती शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
शैलपुत्री देवीचे रूप
माता शैलपुत्री ही नंदीवर आरूढ आहे म्हणून तिला ‘वृषभारुढा’ असेही म्हटले जाते. देवीच्या ललाटावर अर्धा चंद्र स्थापित आहे.तिच्या उजव्या हातात त्रिशूल जो धर्म, अर्थ, मोक्ष याद्वारे संतुलन दर्शवितो तर डाव्या हातामध्ये उमललेले कमळ आहे. शैलपुत्री मातेला वन्य प्राण्यांची रक्षक म्हणूनही संबोधले जाते.शैलपुत्री देवी समृद्धीची देवता असून भाग्य प्रदान करते. नवरात्राच्या पहिल्या दिवसाचा रंग केशरी असतो जो शक्ती उत्साह आणि आरोग्य दर्शवितो. शैलपुत्री देवी चंद्रावर राज्य करते आणि हिच्या पूजनाने चंद्रदोष नाहीसे होतात असे मानले जाते. ही मूळ चक्राची देवी आहे त्यामुळे नवरात्रीच्या पूजेमध्ये पहिल्या दिवशी योगी आपले मन मुलाधारावर केंद्रित करतात. योगिक दृष्टिकोनातून नवरात्रीचा हा पहिला दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
पूजा विधी
शैलपुत्री देवीची षोडशोपचाराने पूजा केली जाते . १६ चरण पूजा ज्यामध्ये पवित्र नद्या, पवित्र तीर्थक्षेत्रे आणि दिशानिर्देश यांचा समावेश आहे अशी पूजा करून देवीला कुंकू ,अक्षता वाहिल्या जातात. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला पांढरा रंग प्रिय आहे. त्यामुळे देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते तसेच देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानलेले आहे. शुद्ध गाईचे तूप, पांढऱ्या रंगाची मिठाई यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. देवीची आरती करून ‘ओम् देवी शैलपुत्र्यै नमः ‘ या मंत्राचा जप १०८ वेळा केला जातो. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असे मानले जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुमारीकांचे पूजन करणे शुभ मानले जाते.
शैलपुत्री मातेची पुरातन मंदिरे काशी नगरी वाराणसी, जम्मू कश्मीर येथे आहेत.
अशा या शैलपुत्री देवीची कृपा आपल्या सर्वांवर सतत राहो हीच आमची देवी चरणी प्रार्थना! उद्या आपण ब्रह्मचारिणी देवी बद्दल माहिती करून घेणार आहोत.त्यामुळें पहायला विसरू नका.
लेखिका -सौ प्रज्ञा देवेन पुरंदरे