चित्रपट रिव्ह्यू :- “शैतान”
लेखक :- आमिल कीयान खान
दिग्दर्शक :- विकास बहल
कलाकार :- आर माधवन, अजय देवगण, ज्योतिका,जानकी बोधीवाला,अंगद राज
निर्माता :- अजय देवगन,ज्योति देशपांडे,कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक
रेटिंग :- २.५/ ५
लहानपणी आपण कुठे बाहेर जात असलो तर आपली आई ,आपल्या घरातील मोठी माणसं अगदी आवर्जून सांगायचे किंवा आजही सांगतात की अनोळखी माणसांशी बोलू नका. त्यांनी काही खायला दिलं तर खाऊ नका. पण ते असं सांगतात ते किती खरं आहे याची परत एकदा जाणीव झाली “शैतान” हा चित्रपट पाहील्यावर. साधीसुधी जाणीव नाही बरं! कारण त्यांचं ऐकलं नाही तर आपल्यासोबत सुद्धा काय घडू शकतं हे बघून घाबरून बोबडी वळेल इतपत जाणीव तुम्हाला सुद्धा होईल. आणि त्यातही तुमचा जर काळी जादू, वशीकरण वैगरे या सगळ्यावर विश्वास असेल तर जास्तच. Shaitan Movie full Review in Marathi
८ मार्च रोजी प्रदर्शित झालेला आर माधवन आणि अजय देवगण यांचा शैतान हा चित्रपट काळी जादू, वशीकरण यावर आधारित असला तरी तो हॉ*रर म्हणू शकत नाही. कारण यात तुम्हाला कुठे भू*त दिसत नाही किंवा वर्षानुवर्षे हिंदी हॉ*रर चित्रपटात पाहिलेले उलट्या पावलांनी भिंतीवर चढणारे भुताचे सीन्स वैगरे पहायला मिळत नाही. हा एक तुमच्या मेंदूसोबत खेळणारा सायकोलॉजिकल, सुपरनॅचरल थ्रि*लर चित्रपट आहे. आजकाल हे मांत्रिक- तांत्रिक, जादूटोणा, वशीकरण वैगरे असल्या गोष्टींवर फारसा लोकांचा विश्वास नसतो त्यामुळे काही गोष्टी खटकतात सुद्धा. परंतु आजकाल प्रेक्षकांना हलक्याफुलक्या चित्रपटांपेक्षा असे स*स्पेन्स थ्रि*लर चित्रपट जास्त आवडतात. त्यामुळे ट्रेलर आल्यापासून हा चित्रपट चर्चेत होता. तर चर्चेत असलेला आणि प्रेक्षक सुद्धा वाट बघत असलेला हा शैतान चित्रपट कसा आहे हे या रिव्ह्यू मध्ये बघुया.
चित्रपटाची कथा ही एक चौकोनी सुखी कुटुंब आणि त्यांच्या घरी न बोलावता आलेल्या माणसाच्या रूपातील एक शैतान याच्यावर बेतलेली आहे. कबीरचं कुटुंब (अजय देवगण), त्याची बायको ज्योती(ज्योतिका), त्याची मुलगी जान्हवी (जानकी बोधीवाला) आणि मुलगा ध्रुव(अंगद राज) सुट्टी घालवण्यासाठी आपल्या फार्म हाऊसवर जात असतं. त्यांना जातानाच आधी प्रवासात एके ठिकाणी वनराज(आर माधवन) भेटतो. जो काही न काही बोलून त्यांच्यासोबत ओळख काढतो. कबीर आणि बाकीच्यांना सुद्धा तो चांगला वाटतो. इतका की तो त्यांच्यासोबत जेवायला बसतो. आणि काहीच वेळात हाच वनराज यांच्या मागोमाग फार्महाऊस वर जाऊन पोहचतो. चार्जरच्या निमित्ताने त्यांच्या घरात घुसतो, अर्थात सुरूवातीला कबीरच्या फॅमिली ला हे कळत नाही आणि काही खटकतही नाही. परंतु याच वनराजने आपल्या मुलीला जान्हवी ला काहीतरी खायला देऊन तिला वश करून घेतलं आहे हे कळल्यावर कबीर आणि ज्योती यांचा खरा संघर्ष सुरू होतो आणि तेव्हाच खरा चित्रपट सुरू होतो.
हा वनराज त्या जान्हवीला आपल्या वश मध्ये करून तिला त्याच्या म्हणण्यानुसार वागायला लावतो. जे सांगेल ते ती सगळं करत असते. थोडक्यात तिच्या शरीराचा कंट्रोल आता वनराज कडे असतो. वनराज हा एक मांत्रिक असून त्याला तिला आपल्यासोबत घेऊन जायचं असतं परंतु तिच्या आईवडिलांच्या मर्जीने. आणि कोणते आईवडील आपल्या मुलीला शैताना बरोबर पाठवतील बर.? परंतु त्यांनी तिला पाठवावं म्हणून वनराज तिला अतिशय किळसवाणे (जे खरं तर काही फार किळसवाणे नाहीत) प्रकार करायला लावतो. तिच्याकडून तिच्याच भावाचा छळ करून त्याला मारहाण करायला लावतो. जेणेकरून आपल्या मुलांचा होणारा छळ बघून कबीर आणि ज्योती जान्हवीला पाठवायला तयार होतील. आता ते तयार होतात की नाही, की तिला त्याच्या तावडीतून सोडवतात, किंवा हा सगळा वशीकरणाचा खेळ कशासाठी, वनराज हे सगळं कशासाठी करत असतो, त्याला काय साध्य करायचं असतं हे मात्र तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
हा चित्रपट म्हणजे मुळ गुजराती भाषेतील “वश” या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. वश या चित्रपटाची कथा कृष्णदेव यागनिक यांनी लिहीली होती. ज्यामध्ये थोडा बदल करून शैतानची निर्मिती केली आहे. अर्थात हा बदल म्हणजे सिनेमाचा स्क्रीन प्ले म्हणावा तेवढा परिणामकारक नाही. चित्रपटात बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात, जसं की कबीर म्हणजे अजय देवगण जो फार उशिरा ॲक्शन मोड मध्ये येतो जो सुरूवातीला फारच हतबल झालेला असतो आणि ते काही पटत नाही. आणि महत्वाचं म्हणजे जी भीती अनुभवायला मिळेल असं वाटतं ती भीती कोणताच सीन बघताना वाटत नाही. Shaitan Movie full Review in Marathi
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात खतरनाक अभिनय केला आहे जानकी बोधीवाला हिने. तुम्हाला वाटेल सगळे तर तारीफ आर माधवन ची करत आहेत. त्याने तर अभिनय उत्तम केलाच आहे परंतु काही सीन्स मध्ये त्याचा मुळचा गोंडसपणा लपत नाही. तरी एक शांत डोक्याने विकृत वागणारा शैतान आर माधवन ने सुंदर साकारला आहे. बऱ्याच वेळा त्याला बघून भीतीने काटा उभा राहतो हेही खरंय. पण तेवढ्याच ताकदीचा अभिनय केला आहे जानकी ने. मुळ चित्रपट वश मध्ये सुद्धा तिनेच ही भूमिका साकारली असल्याचा हा फायदा असू शकतो. परंतु एक वश झालेली मुलगी जी स्वतःला, स्वतःच्या भावाला इजा करताना आतमध्ये काहीतरी तुटतंय हे तिच्या अभिनयातून तिने इतक्या सहजपणे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे की त्याला तोड नाही. अजय देवगणने सुद्धा एक चांगला बाप साकारला आहे परंतु त्याच्या या भुमिकेत दृश्यम मधला विजय साळगांवकर डोकावल्याचा भास होतो. बाकी त्याच्या भुमिकेबद्दल बोलण्यासारखं फार काही नाही. त्याच्या वाट्याला आलेला शेवटचा मोनोलॉग सुद्धा तेवढा परिणामकारक वाटत नाही.
दिग्दर्शन म्हणाल तर विकास बहल यांचं दिग्दर्शन ठिकठाक आहे. त्यामुळे कलाकारांनी अभिनय उत्तम केला असला तरी ठिकठाक असलेली पटकथा आणि दिग्दर्शन यामुळे चित्रपट मागे पडतो. क्वीन सारख्या दर्जेदार चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शकाचं गणित यावेळी जरा चुकलंच. व्हॉईस डबिंग सुद्धा काही ठिकाणी गडबडलेलं जाणवतं विशेषतः आर माधवन चे डायलॉग ऐकताना ते जास्त जाणवतं. अमित त्रिवेदी यांनी दिलेलं चित्रपटाचं संगीत इतकंस प्रभावी नाही. त्यातल्या त्यात पार्श्वसंगीत बरं आहे म्हणू शकतो.
चित्रपटात सिनेमॅटोग्राफी मात्र छान आहे. कला दिग्दर्शन उत्तम आहे. कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. कथा चांगली आहे, पण या सगळ्या सोबत पटकथा सुद्धा तेवढ्याच ताकदीची असती तर मजा आली असती. आर माधवन आणि जानकी यांच्या अभिनयासाठी नक्कीच चित्रपट बघू शकता. तुम्ही अगदीच अजय देवगण आणि आर माधवन यांचे फॅन असाल तर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा नाहीतर ओटीटी वर येण्याची वाट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी अडीच स्टार.
तुम्हाला हा रिव्ह्यू Shaitan Movie full Review in Marathi कसा वाटला आणि चित्रपट पाहिल्यानंतर तो आवडला की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच अनेक नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यू वाचण्यासाठी आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा सुद्धा जॉईन व्हा.!
धन्यवाद..!
-आकांक्षा