शेअर मार्केट हा आजकाल बऱ्याच लोकाना परिचयाचा शब्द झाला आहे . आजकाल बरीच तरुण मंडळी फावल्या वेळेत शेअर मार्केट कडे वळू लागलेत तसेच गंभीरपणे उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणून बघणारे मंडळी ही आजूबाजूला बघायला मिळतील. अजूनही अनेक लोकाना “शेअर मार्केट इज नॉट माय कप ऑफ टी ” असे म्हणताना एकतो पण म्हणूनच केवळ आवड म्हणून शिकण्याची हौस असणाऱ्यासाठी आज या लेखामधून शेअर मार्केट म्हणजे नेमके काय ? यात नफा कसा मिळवतात. या आणि अशा अगदी मूलभूत गोष्टीना जाणून घेऊया.चला तर मग सुरुवात करूया.
- कंपनी शेअर्स (Company Shares ):
कुठलाही व्यवसाय असो , छोटा-मोठा , भांडवल ही व्यवसायाची पहिली पायरी आहे . जसा जसा व्यवसाय वाढत जातो , त्याच्या विस्तारासाठी आणखी भांडवलाची आवश्यकता भासते . आता ही प्रक्रिया जशी लहान उद्योगासाठी आहे तशीच मोठ्या कंपनीसाठी सुद्धा आहे ! कंपनीचे कामकाज आणि भविष्यातल्या विस्तारासाठी जेव्हा कंपनीला अधिक पैशाची गरज असते तेव्हा कंपनी सामान्य लोकाना त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करायला संधी देते ,गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराला कंपनीचे समभाग म्हणजेच शेअर्स देते आणि गुंतवणुकीच्या मोबदल्यात कंपनीला झालेल्या नफ्यातून काही हिस्सा गुंतवणूकदारांना दिला जातो. हे सगळे होते कुठे ? तर अर्थात शेअर मार्केट अशी जागा आहे जिथे तुम्ही अशा अनेक कंपन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.
- स्टॉक मार्केट – stock market in Marathi :
भारतामध्ये BSE ( बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ) आणि NSE ( नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ) असे प्रमुख स्टॉक एक्स्चेंज आहे. इथेच वर नमूद केल्याप्रमाणे शेअर्स चे व्यवहार होतात. स्टॉक मार्केट मध्ये शेअर्स सोबतच सरकारी रोखे (bonds) ,खाजगी रोखे , विदेशी मुद्रा ( forex ) इत्यादि मध्ये व्यवहार होतात. तर या स्टॉक मार्केट मध्ये शेअर्स मध्ये खरेदी-विक्री चे व्यवहार केले जातात, त्याला शेअर मार्केट म्हणतात.
- BSE – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज :
- याची स्थापना मुंबई मध्ये 1875 साली झाली होती , तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हा आशियामधील सर्वात जून स्टॉक एक्स्चेंज म्हणून ओळखला जातो. फोटो मध्ये असलेली इमारत तुम्ही टीव्ही वरील बातमी मध्ये पहिली असेल.
- BSE चा निर्देशांक आपण SENSEX म्हणून ओळखतो.
- तर या BSE मध्ये जवळपास 5000 पेक्षा जास्त कंपन्याची नोंद आहे.
- या SENSEX मध्ये 30 सर्वात चांगल्या कामगिरी करणाऱ्या कंपनीचा मिळून बनलेला इंडेक्स आहे . ज्या वरुन सेंसेक्सचा चढ उतार ठरत असतो. .
- NSE – नॅशनल स्टॉक एक्स्चेंज :
- याची स्थापना मुंबई मध्ये 1992 साली झाली होती. NSE चा निर्देशांक आपण NIFTY म्हणून ओळखतो.
- तर या NSE मध्ये जवळपास 1900 कंपन्याची नोंद आहे.
- या NIFTY मध्ये 50 सर्वात चांगल्या कामगिरी करणाऱ्या कंपनीचा मिळून बनलेला इंडेक्स आहे . ज्या वरुन निफ्टीचा चढ उतार ठरत असतो.
- सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया- Securities And Exchange Board of India :
- सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी ) ची स्थापना 1992 मध्ये झाली . सेबी ही शेअर मार्केट च्या सर्व व्यवहारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचे काम करते तसेच रोखे बाजार आणि भांडवली बाजार या सर्वाचे नियमन करते.
- थोडक्यात गुंतवणूकदारांच्या हितासाठी ही संस्था काम करते.
आता या शेअर मार्केट मध्ये तुम्हाला व्यवहार करायचे असतील तर तुमच्या कडे डिमॅट अकाऊंट (demat account ) असणे गरजेचे असते. याबद्दल माहिती घेऊ.
बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी तुम्हाला जसे बँकेत अकाऊंट असणे गरजेचे आहे तसेच शेअर खरेदी विक्री करायला तुम्हाला डिमॅट अकाऊंट असणे गरजेचे आहे.
- ब्रोकर –
- ज्याप्रमाणे आपल्याला घर शोधण्यासाठी आपण एक ब्रोकर लावतो जो आपल्याला घर खरेदी विक्रीसाठी मदत करतो तसेच शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्रीसाठी आपल्याला मदत करणारा एक ब्रोकर असतो.
- या ब्रोकर कडेच आपण डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडू शकतो.
- सध्या बाजारात झिरोधा , एंजल वन, शेर खान, अपस्टॉक्स असे स्टॉक ब्रोकर उपलब्ध आहे.याशिवाय देखील बाजारात अनेक ब्रोकर उपलब्ध आहेत.
- या ब्रोकर तर्फे तुम्ही शेअर्सची खरेदी विक्री फोनवरून संपर्क साधून करू शकता, जिथे या ब्रोकर कडे तुमच्यासाठी एक मॅनेजर नेमलेला असतो.
- बऱ्याच लोकांना वेळेअभावी शेअर मार्केटच्या वेळेमध्ये स्वतः ला खरेदी विक्री करणे शक्य नसते, त्यामुळे ब्रोकरकडे असणारा मॅनेजर तुमच्यासाठी शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकतो.
- तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर देखील ब्रोकरचे ॲप डाऊनलोड करू शकता, जिथून तुम्हीस्वतः घरच्या घरी शेअर मार्केट मधील खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात.मात्र त्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटचे संपूर्ण ज्ञान आणि पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे.
- डिमॅट खाते – demat account :
- या खात्यामध्ये तुम्ही खरेदी विक्री केलेले शेअर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवले जातात. तुम्ही जे शेअर खरेदी करता ते इथे या अकाऊंट मध्ये येतात. जे आपण कधी पण विकू शकतो.
- शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने ते हरवण्याचे किंवा चोरी होण्याची भीती नसते.
- पूर्वी हेच शेअर फिजिकल स्वरूपात म्हणजे कागदी स्वरूपात असायचे ज्यामुळे ते हरवणे किंवा चोरी होणे या गोष्टी घडत असे.
- पण डीमटरियलाइजेशन मुळे हे शक्य होऊ शकले.म्हणजेच फिजिकल स्वरूपामधले शेअर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करून घेणे.
- तुमचे एकापेक्षा जास्त ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट असू शकते.
- ट्रेडिंग खाते -ट्रेडिंग अकाऊंट:
- ट्रेडिंग अकाऊंट मुळे तुम्ही शेअर्सची खरेदी विक्री करू शकता.
- ट्रेडिंग खात्याला बँक आणि डिमॅट खाते यांच्यामधील दुवा आहे असे म्हणू शकतो.
- तुमचे बँकेतील खाते या ट्रेडिंग खात्याशी सलग्न केलेले असते. त्यामुळे व्यवहारा नंतर पैसे बचत खात्यात वळते करू शकतात किंवा पुन्हा पैसे गुंतवू शकता.
- शेअर मार्केट वेळ – शेअर मार्केट टाइमिंग :
- शेअर मार्केट सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 9:15 ते दुपारी 3.30 यावेळेत सुरू असते.
- या वेळेमध्ये तुम्ही शेअर खरेदी करणे आणि विक्री करणे हे व्यवहार करू शकता. 3.30 नंतर मार्केट बंद होते.
- शेअर सेटलमेन्ट :
- तुम्ही घेतलेले शेअर तुमच्या अकाऊंट मध्ये यायला आणि शेअर विकल्यावर पैसे जमा होण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला आपण सेटलमेन्ट म्हणतो.
- सध्या ज्या दिवशी तुम्ही शेअर खरेदी करता त्याच दिवशी शेअर तुमच्या अकाऊंट मध्ये येतात.
- आणि ज्या दिवशी तुम्ही शेअर विकले त्या नंतर साधारणपणे 24 तासामध्ये पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. यालाच आपण T+1 सेटलमेन्ट म्हणतो.
- 23 जानेवारी 2023 पासून T+1 सेटलमेन्ट सुरू झाले. याआधी T+2 सेटलमेन्ट वर कामकाज चालायचे.
- T+1 सेटलमेन्ट मुळे पैसा जास्त प्रमाणात बाजारात उपलब्ध झाला त्यामुळे गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून हे सोयीचे झाले.
- आता तर 2024 मध्ये नवीन प्रणाली येणार असून यामध्ये इन्स्टंट सेटलमेन्ट वर भर देण्यात येणार असून , एका तास मध्ये ही सेटलमेन्ट होऊ शकणार आहे. ही T+0 किंवा सेमडे सेटलमेन्ट असणार आहे. यात दोन फेज मध्ये काम होणार आहे.
- या बद्दल आणखी माहिती पुढच्या काही भागामधून तुमच्या पर्यंत नक्की घेऊन येऊ.
अर्थात ही सगळी मूलभूत माहिती झाली. शेअर मार्केट मध्ये व्यवहार करण्यासाठी या सर्व गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहेच. परंतु या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या ब्रोकर कडे खाते उघडणार याची योग्य माहिती करून घेणे गरजेचे आहे. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करताना कुठले शेअर घेणे योग्य , तुम्ही जे शेअर विकत घेत आहे ते छोट्या की दीर्घ कालावधी साठी घेणार याचा अभ्यास करूनच मग पैशाची गुंतवणूक करा.आणखी असेच माहितीपर लेख घेऊन लवकर भेटू.
रोज “लेखकमित्र” वर लिहून येणाऱ्या लेख आणि कथा कशा वाटल्या याबद्दल नक्की कळवा आणि whatsapp ला नक्की जॉइन करा. Share Market basic Information in Marathi
धन्यवाद .
लेखिका – सौ.वैशाली जोशी पाठक ,पुणे