शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे.!
काजू बदाम पेक्षाही जास्त फायदेशीर असलेला शेवगा तुम्ही आहारात खाता का.? Benefits of Drumsticks.
निसर्गाने इतक्या बहुमूल्य गोष्टी आपल्याला मोफत दिल्या आहेत परंतु आपल्याला फुकट मिळालेल्या गोष्टींचं महत्त्व नसतं तेच खरं. आपण नेहमी हातचं सोडून पळत्याच्या मागे धावत असतो. आता हेच बघा, भरपूर जीवनसत्त्व आणि भरपूर खनिजांचा साठा असलेल्या कितीतरी भाज्या, वनस्पती, फळं आपल्याकडे उपलब्ध असताना आपण मल्टि व्हिटॅमिन टॅबलेट्स खाणं पसंत करतो. असंच मल्टिपल फायदे असणाऱ्या शेवग्याच्या शेंगा फार महाग नसतानाही आपण फारशा आहारात खात नाही. फार फार तर सांबार किंवा क्वचित वरणात, आमटीत टाकून खातो. भरपूर लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन, कर्बोदके आणि प्रोटीनयुक्त अशा या शेवग्याच्या शेंगा खरं तर दहा औषधांना मागे काढतील इतक्या फायदेशीर असतात. आजच्या या लेखात याच शेवग्याच्या शेंगाचे नक्की काय काय फायदे आहेत हे बघणार आहोत.
शेवग्याचं अख्खं झाड आपल्याला अगणित फायदे देतं. आयुर्वेदानुसार सुद्धा हे झाड अतिशय औषधी असं आहे. या झाडाची पाने, फुलं, शेंगा प्रत्येक गोष्ट तुम्ही आहारात सामाविष्ट करून घेऊ शकता. पानांची किंवा फुलांची भाजी करून खाता येते. शेंगा भाजी, सांबार किंवा आमटीत टाकू शकता. किंवा मग सूप करून पिऊ शकता. या शेंगा आपल्या डोळ्यांसाठी, रक्त वाढीसाठी, केसांसाठी थोडक्यात संपूर्ण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
शेवग्याच्या शेंगांचे फायदे / Health benefits of drumsticks
१. व्हिटॅमिन सी आणि भरपूर ॲंटीऑक्सीडंट्सने युक्त अशा शेवग्याच्या शेंगा किंवा पानांची भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
२. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास शेवग्याच्या शेंगांचे सूप किंवा भाजी वरचेवर खाल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते त्यामुळे रक्त शुद्ध राहते.
३. कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचा भांडार असलेल्या या शेंगांमुळे हाडे मजबूत राहतात. लहान मुलांना सुद्धा या शेंगांचे सूप बनवून दिल्याने खूप फायदे मिळतात.
४. केसगळती कमी करण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगा, पानांची पावडर अत्यंत फायदेशीर ठरते.
५. या शेंगाचा आहारात समावेश केल्यास घसा संबंधित आजार, श्वसनाचे आजार लवकर बरे होण्यासाठी तसेच दम्याचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते.
६. नुकतीच प्रसुती झालेल्या मातेचे दुध वाढण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगा उपयुक्त आहेत.
७. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा या शेंगा फायदेशीर आहेत.
८. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्याने फायदा होतो.
९. शेवग्याच्या शेंगांचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. पचनाच्या किंवा पोटाच्या विकारांवर या शेंगा अतिशय गुणकारी असतात. अगदी पोटात कृमी जंत झाले असतील तरीही त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी या शेंगा फायदेशीर
१०. शेवग्याची पानं म्हणजे मधुमेह असणाऱ्यांना अतिशय उपयुक्त. या पानांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
११. संधीवाताचा त्रास असणाऱ्यांनी सुद्धा या शेंगाची किंवा पानांची भाजी खाल्ल्याने फरक पडतो.
१२. डोळ्यांच्या आरोग्यासाठी साठी सुद्धा या शेवग्याच्या शेंगा चांगल्या असतात.
१३. शेवग्याच्या शेंगा किंवा पानं ही नैसर्गिक ॲंटीबायोटिक म्हणायला हरकत नाही कारण यांचे गुणधर्म तसेच आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचा विकारांवर सुद्धा या शेंगा किंवा पानं उपयुक्त ठरतात.
१४. पोटदुखी, गॅसेस चा त्रास, बद्धकोष्ठता या सारख्या समस्या दूर करण्यासाठी या शेंगाची भाजी खाणे हा उत्तम उपाय आहे.
१५. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेल्या या शेंगा आपल्या हृदयासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहेत. यांचा नियमित आहारात समावेश केल्यास आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
१६. मुळव्याध सारख्या समस्येसाठी सुद्धा या शेंगाची भाजी खाल्ल्याने आराम पडतो कारण या शेंगा मध्ये फायबर चं प्रमाण जास्त असते.
१७. सगळ्यात महत्त्वाचा किंवा सध्या बऱ्याच जणांना ज्याची गरज आहे तो फायदा म्हणजे या शेंगामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या डाएट मध्ये तुम्ही या शेंगांचं सूप ॲड करू शकता.
आता या शेंगा अतिशय गुणकारी आणि भरपूर फायदे देणाऱ्या असल्या तरी त्यांचं अतिसेवन सुद्धा करू नये. ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी या शेंगा जास्त खाऊ नयेत. त्याचप्रमाणे या शेंगा गरम पडू शकतात त्यामुळे गर्भवती महिलांनी या शेंगा किंवा पानांची भाजी खाणे टाळावे.
तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवग्याच्या शेंगांचे अजून काही फायदे तुम्हाला माहीत असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा. असे अजून माहितीपूर्ण लेख, वेगवेगळ्या कथा, रेसिपीज असे सगळ्या प्रकारचे लेख एकाच ठिकाणी वाचायचे असतील तर आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला जरूर भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.!
धन्यवाद.!
-आकांक्षा कोलते.
छान माहिती
खूप उपयुक्त माहिती👌👌
छान उपयुक्त माहिती