“अरे आहेस कुठे तू? चार दिवस झाले काही फोन नाही, मेसेज नाही. माझ्या मेसेजला उत्तर नाही. समजायचं कसं तुला काय झाले ते.” स्वप्नाली काळजीने विचारत होती.
“अगं कुठे काय झाले मला. अगदी बरा आहे मी. बोल लवकर काय बोलायचं आहे ते. मला जायचं आहे. ऊशीर होत आहे. ” शिवांशने घाईत तिला उत्तर देत होता.
“अरे असा काय तू. तुला भेटायला, बघायला आले मी इथे. माझ्याबरोबर नीट बोलायचं सोडून काय घाई करतोस. बसून बोल माझ्याबरोबर. ” स्वप्नाली आता चिडून बोलत होती.
“अगं कुठे काय. तू पण ना. अगं आपल्या छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती आहे ना त्याचीच तयारी करत आहे. आमच्या मंडळाने ठरवलं आहे ह्यावर्षी जोरात जयंती साजरी करायची आहे. ” तिला चिडलेले पाहून शिवांश तिला शांत करण्यासाठी सांगत होता.
“अच्छा काय ठरवलं आहे तुम्ही. म्हणजे मी अजून काही त्यात मदत करू शकेन. ” स्वप्नाली मुद्दाम त्याला चिडवत म्हणाली.
“तुला कधीपासून ह्यामध्ये रस निर्माण झाला. तुला तर आम्ही करतो ते दिखावा वाटतो ना. मग आज कसं काय आम्ही बरोबर वाटतं आहोत.” शिवांशला स्वप्नालीच्या बोलण्याचे आश्चर्य वाटून त्याने तिला विचारले.
“आत्तासुद्धा माझं मत तेच आहे. एका दिवसाचा दिखावा मला पटत नाही. थोर व्यक्तिमत्त्वांचा एका दिवसाचा सोहळा करता आणि दुसर्याच दिवशी विसरून जातात. ह्यासाठीच मला सगळा दिखाऊपणा वाटतो आणि तो मला आवडत नाही. आता हेच बघ ना तुम्ही छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती साजरी करणार आणि नंतर दुसर मंडळ दुसर्या कधीतरी दिवशी. एक गट म्हणणार आम्ही करतो तीच खरी जयंती आणि दुसरा गट म्हणणार आम्ही करतो ती. म्हणजे महाराजांची जयंती खरी कोणती ह्यावरून वाद आणि भांडण. महाराजांना कधीच पटलं नसतं रे महाराष्ट्रातील त्यांची रयत अशी भांडलेली. ” स्वप्नालीने तिची नाराजी स्पष्ट केली.
“अगं असं काही नाही. कोणी तारखेप्रमाणे करतं तर कुणी तिथी प्रमाणे. कारण ह्याबद्दलची कुठलही प्रमाण, ठोस नोंद कुठेही नाही. म्हणून दोनदा साजरी केली जाते जयंती. पण म्हणून आमचं शिवरायांवर असलेलं प्रेम,असलेली श्रद्धा कमी तर होत नाही ना. उगाच कुठलाही मुद्दा काढू नकोस. ” शिवांशने तिची नाराजी खोटी ठरवत तिला प्रत्युत्तर दिले.
शिवांश पुढे बोलू लागला. “हल्ली बर्याच तरूणांना कळत आहेत आपले शिवराय. बरेच तरूण क्लब, पार्टी मध्ये जाण्याच्या काळात गडकिल्ल्यांवर येतात. आम्ही जातो ना सह्याद्रीत. बघतो आम्ही. आजची तरुणाई सजग होत आहे आपल्या संस्कृतीविषयी. आपल्या कामातून वेळ काढून, पैसे वाचवून गडकिल्ल्यांवर येतात. ह्यामध्ये तुला मावळे दिसत नाहीत का. कितीतरी ग्रुप गडसंवर्धनाचे काम करतात. गडकिल्ल्यांवर साफसफाईचे काम करतात. श्रमदान करतात आपला इतिहास जपण्यासाठी. “
स्वप्नाली आपला मुद्दा खरा ठरवण्यासाठी शिवांशला खरी परिस्थिती सांगू लागली,”हो बघते ना. हल्ली सोशल साईटवर हेच बघते. गडकिल्ल्यांवर झालेली गर्दी, फोटोज आणि रिल्स काढण्यासाठी चाललेली धडपड, गर्दीमुळे झालेला कचरा, किल्ल्यांच्या मजबूत बुरूजांवर केलेली नक्षी सगळेच पुरावे आहेत तरुणाई आपली संस्कृती किती जपते त्याचे. हे तरी मान्य कर.
मी असं नाही म्हणत की सगळेच तसं करतात. कित्येक जणांना मी सोशल मिडीयावर बघितलं आहे आवाहन करताना. पोटतिडिकीने ते सांगत असतात वारसा जपण्यासाठी. थिल्लरपणा खपवून घेणार नाही असंही सांगतात. पण तरीदेखील तो थिल्लरपणा चालतोच. गडकिल्ल्यांवर मद्य*प्रा*शन राजे ही करत होतेच ना मग आम्ही सुद्धा तेच करतो अशी ऊत्तर देणारे महाभाग सुद्धा आहेत. त्यांना समज कोण देणार.”
“तू म्हणतेस ते बरोबर आहे आणि आम्ही ते करतोच आहोत. वेळ लागेल ह्या गोष्टीसाठी. पण ते कार्य शेवटपर्यंत करत राहणार. ह्याच उद्देश्याने आम्ही महाराजांची जयंती साजरी करतो. पण म्हणून तू ह्याला दिखावा नाही म्हणू शकत. ” शिवांशही तिचा गैरसमज दूर करण्यासाठी समजावत होता.
“म्हणूच शकते. तुला माहित आहे शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात असं म्हणतात. ते बदलायला पाहिजे. प्रत्येक घरात शिवाजी जन्मला पाहिजे. अरे आत्ताची परिस्थिती बघितली की वाटतं कुठे गेली जिजाऊंची शिकवण, कुठे गेली महाराजांची मूल्य. महाराजांचे स्वराज्य वेगळे होते. कितीसे कळले आहेत महाराज त्यांची जयंती साजरी करणाऱ्यांना.
छत्रपती शिवाजीमहाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत. महाराज म्हणजे लाखोंचा पोशिंदा. पण आज त्यांच्या नावाचा वापर करून मतांचं आणि सत्तेचे राजकारण केलं जातं. आम्हाला महाराज जास्त कळले आणि आम्हीच त्यांना अंगीकारले आहे हे दाखवायची चढाओढ दिसते.
स्त्री चा अपमान करणाऱ्याचे हात छाटण्याची, डोळे फोडून काढण्याची सजा देऊन महाराजांनी स्त्री ला मातेसमान वागवण्याची दिलेली शिकवण लक्षात राहिली असती तर निर्भया, अंकिता, असिफा सारख्या कित्येक जणींना अमानुष घटनेला सामोरे जावे लागले नसते.
आपल्या महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांच्या कुटुंबाला आपले कुटुंब मानून त्यांची काळजी घेतली. प्रत्येक मावळ्याच्या पराक्रमाची, समर्पणाची, त्यागाची, बलिदानाची आठवण ठेवून प्रत्येक पराक्रम गौरविला. पण आता देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या वीरांच्या कुटुंबीयांना कित्येक संघर्ष करावे लागत आहेत.
शिवरायांच्या नितीमुल्यांचा आजकाल तरुणपिढी अवलंब करताना दिसत नाही. काहीजण त्यांच्यासारखी दाढी वाढवून, गळ्यात माळा घालून, भाळी चंद्रकोर लावून आणि गाडीवर महाराजांचे फोटो चिकटवून स्वतःला त्यांचे भक्त म्हणवून घेत आहेत; पण त्याने ते मावळे होत नाहीत. त्यासाठी आधी त्यांच्यासारखे वागायला शिकले पाहिजे.
शिवरायांच्या सैन्यात वेगवेगळ्या जातीचे मावळे होते. ते जातीभेद मान्य करत नव्हते. पण तरीही आज आपण त्यांना एका जातीत अडकवून ठेवले आहे. एका रंगात बांधले आहे. सगळंच खिन्न करणार आहे. ” स्वप्नालीने परखडपणे शिवांशला आपल्या खिन्नपणाचे कारण सांगितले.
“मान्य आहे तू म्हणतेस ते. पण बदल घडवायचा असेल तर सुरूवातही करावीच लागेल. अगं सगळेच नुसता दिखावा म्हणून जयंती साजरी करत नाही. काही जण ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करतात. त्यातून तरूण पिढीला तसेच लहान मुलांना महाराजांची वेगवेगळी मूल्य, गुण कळतात.
किल्ल्यांवर सुद्धा शिवभक्तांनी काही ऊपक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये दर शनिवार, रविवार काही मंडळी जमून तिथे येणार्या प्रत्येकाला गडसंवर्धनाविषयी आणि आपली संस्कृती जपण्याविषयी जागरूक करत आहेत. गडकिल्ल्यांवर गैर प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करत आहेत. ढासळत जाणारे बुरूज , कडे, दरवाजे ह्यांच्या दुरूस्तीसाठी अर्ज संबधित विभागाकडे करत आहेत.
असं नाही आहे की काही प्रयत्न सुरू नाहीत. फक्त वेळ लागेल. सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ते शक्य आहे. थोडी सकारात्मक तुमच्या आमच्यात निर्माण व्हायला पाहिजे. शिवरायांच्या नीतीचा, कौशल्याचा वापर करून लढाई जिंकण्याची अनेक उदाहरणे आहेत. मग तीच शिवनीती वापरून आपण ही लढाई जिंकू.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराजांच्या देशात जर आम्ही जन्म घेतला असता, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. आपल्याला तो सुर्य लाभला आहे. मग आपल्या सूर्याची प्रखरता, तेजोमयता सगळ्यांना ज्ञात करून देण्याचे कार्य आपलेच आहे. तेच आम्ही ह्या कार्यक्रमातून करतो. आपल्याला अशा सकारात्मक गोष्टी तुझ्यासारख्या खिन्न झालेल्यांना दाखवण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे एकदा का सकारात्मक विचार झाला की प्रत्येक घरात शिवरायांचा मावळा तयार होईल.
छत्रपती शिवाजीमहाराजांचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एक धुरंपर योद्धा, विविध स्तरातील, अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करणारा राजा, अनेक शतके स्फूर्ति देणारे महाराज, युगपुरुषोत्तम होते. ते आदर्श नीतिवंत राजा होते.
‘निश्चयाचा महामेरू ! अखंड स्थितीचा निर्धारू ! ‘
वाढता भ्रष्टाचार, लाचलुचपत, जाती जातीमधील दंगली, दह*शत*द, चुकीचे राजकारण ह्यांचा उपद्रव समाजाला होत आहे आणि नीतीमूल्य ढासळत आहेत. अशा वेळेस महाराजांची मूल्य, जिजाऊंचे संस्कार, स्वराज्यातील प्रत्येक सरदारांची, मावळ्यांची प्रामाणिक निष्ठा आजच्या पिढीने मनामनात रुजवणे गरजेचे आहे.
शिवाजी महाराज त्यांचे काम करून गेले. आता आपली वेळ आहे. जरी आज ते नाही तरी त्यांच्या तत्वांवर आपण चालले पाहिजे.” शिवांश तळमळीने बोलत होता.
त्याचे ते तळमळीचे बोलणे ऐकून स्वप्नालीचे मत बदलले आणि शिवांशजवळ कबूल करत ती म्हणाली, ” खरंच माझी चूक मी कबूल करते. सगळेच दिखावा नाही करत. तुझ्यासारखे शिवरायांची मनापासून भक्ती करणारे मावळे, जन्मोत्सवानिमित्तचा सोहळा अगदी मनापासून साजरा करतात हे मान्य करते. तुमच्यासारखे मावळे पुढे येऊन अजून शिवभक्त निर्माण करतील, जे खरे शिवभक्त असतील.
आपला जाज्वल्य इतिहास, संघर्ष आत्मसात करणे काळाची गरज आहे. प्रत्येक घरात शिवाजी होण्यासाठी प्रत्येक घरी जिजाऊं असणे गरजेचे आहे. सगळ्यांविषयी प्रेम व महिलांचा आदर हवा. शिवाजी महाराज कुठल्याही जात व धर्मासाठी लढले नाही. तर त्यांचा संघर्ष स्वराज्यासाठी होता. महाराज हे सर्व जाती, धर्माचे पुरस्कर्ते होते.
आजच्या युवा वर्गाने ह्या गोष्टींचे चिंतन करावयास हवे. आज गरज आहे हे समजून घेण्याची कि मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझे आहे आणि ह्याची सुरवात मी माझ्यापासून करत आहे, अगदी आज आत्तापासूनच. “
स्वप्नालीच्या ह्या सकारात्मक बोलण्याने शिवांशला एक शिवभक्त तयार झाल्याचा आनंद झाला. शिवांशने हात पुढे करत स्वप्नालीला विचारले. “येतेस ना छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती साजरी करायला. आमच्या कार्यक्रमात हजेरी लावणार का? महाराजांच्या स्वराज्याचे सुराज्य बनवण्यासाठी आम्ही एक पाऊल चाललो आहे. आमच्या सोबत अजून बरीच पाऊले चालायची आहेत, सुराज्य स्वप्न साकारण्यासाठी. “
उगवला सुर्य सांगत स्वातंत्र्याची नांदी
जन्मला आज राजा छत्रपती शिवाजी
वाहे शूर शहाजीराजांचे रक्त ज्याचे अंगी
संस्कार संघर्षाचे देई ती जिजाऊ माऊली
गुरू लाभले हरहुन्नरी कोंडदेव दादाजी
साथही मिळाली अठरापगड मावळ्यांची
शिवबा ने घेतली शपथ श्री शिवशंभूची
केली स्थापना रयतेसाठी सुस्वराज्याची
एकच नाद घुमला सह्याद्रीच्या कडेकपारी
जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.
धन्यवाद !
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
__पुजा सारंग, मुंबई.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)