श्रावण महिन्यातील व्रतवैकल्ये: एक वेगळा दृष्टिकोन
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहिकडे
बालकवींनी असे समर्पक वर्णन ज्या महिन्याचे केले आहे तो श्रावण महिना म्हणजे निसर्गाने सर्वत्र मुक्तहस्ते केलेली विविध रंगांची, गंधांची आणि हिरवाईची उधळण अनुभवण्याचा महिना. हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार हा वर्षातला पाचवा महिना. या महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र श्रवण नक्षत्रात असल्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव दिले आहे. अध्यात्मिक दृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक सण, व्रतवैकल्ये या महिन्यात केली जातात. खरे तर आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा कालावधी चातुर्मासाचा मानला जातो. या संपूर्ण काळालाच अतिशय पवित्र मानले जाते. पण श्रावण महिना हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जातो.
अनेक सणसमारंभ, व्रते या महिन्याच्या काळात श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली जातात. अनेकदा सणांमागच्या धार्मिक अधिष्ठानाला नाके मुरडणारी तरुणाई त्या सणांच्या दिवशी पारंपारिक कपडे, दागिने घालून मिरवताना दिसते. कधी कधी परंपरावादी लोक या सणांना येऊ पाहत असलेल्या ‘इव्हेंट’च्या स्वरुपामुळे नाराज होताना दिसतात. पण हे दोन्ही दृष्टिकोन बाजूला ठेऊन हे सणवार, उपासतापास, व्रतवैकल्ये या सर्वांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे असे मला वाटते. हे सणवार साजरे करण्यामागे काय उद्देश आहे? आजच्या काळात ते साजरे करणे संयुक्तिक आहे का? कालसुसंगत पध्दतीने हे सण साजरे करताना कोणते बदल करणे आवश्यक आहेत? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे म्हणूनच आवश्यक ठरते.

श्रावण महिन्यात साजरे केले जाणारे सण आणि त्यामागील कारणे:
१) मंगळागौर: श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवीन लग्न झालेल्या नववधू मंगळागौरीची पूजा करतात आणि पारंपरिक खेळ खेळतात. ही शंकर आणि पार्वतीची पूजा असते. शंकर आणि पर्वती यांचे सहजीवन हे आदर्श सहजीवन मानले जाते. अशा सहजीवनाचा वस्तुपाठ या पूजेच्या निमित्ताने नवविवाहितांसमोर ठेवण्याचा उद्देश मंगळागौर साजरी करण्यामागे असतो. पूर्वीच्या काळी लहान वयात लग्ने होत. मंगळागौरीच्या निमित्ताने समवयस्क मुली एकत्र येऊन खेळ खेळत. गाणी म्हणत आणि त्या गाण्यांतून आपल्या भावना व्यक्त करत.
२) जिवती पूजन: संपूर्ण श्रावण महिना स्त्रिया जिवतीच्या कागदाची पूजा करतात. शुक्रवारी आपल्या मुलांना औक्षण करून त्यांच्या रक्षणासाठी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भक्त प्रल्हादाचे रक्षण करणारा नरसिंह, कलियमार्दन करुन बालगोपाळांचे रक्षण करणारा बाळकृष्ण, लहान मुलांना आरोग्य प्रदान करणाऱ्या जरा आणि जिवंतिका या देवता, बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असलेल्या बुध आणि बृहस्पती या देवतांचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते.
३) आदित्यपूजन: पृथीवरील जीवसृष्टी ज्याच्यामुळे आहे त्या सूर्याची पूजा दर रविवारी केली जाते.
४) नागपंचमी व बैलपोळा: या महिन्यात साजरे होणारे हे दोन सण म्हणजे पशू-पक्षांप्रती कृतज्ञता मानण्याच्या भारतीय परंपरेचा परिपाक म्हणावा लागेल. भारतीय/हिंदू संस्कृतीनुसार पूजा करणे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. हे दोन्ही प्राणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे आणि उपयुक्त आहेत. त्यांचे महत्त्व आजही अबाधित आहे. या अशा इतरही सणांच्या निमित्ताने आपल्याला उपयुक्त असलेल्या प्राण्यांच्या प्रति कृतज्ञता भाव ठेवणे महत्त्वाचे. नागपंचमीला न चिरलेले, तळलेले, भाजलेले अन्न खाण्यामागे पावसाळी हवेत सौम्य, सात्विक आणि आधुनिक भाषेत ‘मिनीमम प्रोसेस्ड’ अन्न खाण्याचा उद्देश आहे.
५) नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन: कोळी बांधवांच्या जीवनात समुद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आजही आहे. वर्षभर भरभरून देणाऱ्या ‘रत्नाकाराच्या’ प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. तसेच समुद्रही उफाळलेला असतो. म्हणून या काळात कोळी बांधव मासेमारी न करण्याचा नियम आजही कटाक्षाने पाळतात. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की त्यानंतर मासेमारीला सुरूवात करण्यात येते. बहीण भावांच्या पवित्र प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा करतात.
६) श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला: ज्याला ‘पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते त्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस या दिवशी सर्वजण मोठया आनंदाने साजरा करतात. भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ देणाऱ्या, अनेक गुणांची खाण असलेल्या श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सर्वांनी आदर्श म्हणून सामोर ठेवावे हा उद्देश त्यामागे आहे.
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी किंवा गोपालकाला उत्सव असतो. समाजातील सर्व वर्गातील बालगोपाळांचे सहाय्य घेऊन उंच शिंक्यावर ठेवलेले लोणी खाण्यासाठी बाळकृष्ण सवंगड्यांसह एकमेकांच्या खांद्यावर चढून दहीहंडी करत. ‘एकमेकां साह्य करू’ चा मंत्र या निमित्ताने आपल्या कृतीतून कृष्णाने दाखवून दिला. आपल्या बरोबरीचा कुणी जर आपल्या पुढे जात असेल, तर त्याचे पाय न खेचता, त्याला आधार द्यावा आणि त्यानेही ते लक्षात घेऊन लोण्याचा गोळा एकट्यानेच मटकावू नये. ‘मला मिळाले……माझ्या सात पिढ्यांची तरतूद करतोय’ ही वृत्ती नसावी, हे श्रीकृष्णांनी या दहीहंडीच्या खेळातून दाखवले. एकोप्याने, एकजुटीने आणि एकमेकांच्या सहकार्याने राहिल्यास आपण यशस्वी होणारच!!!
७) श्रावण अमावस्या (पिठोरी अमावस्या): हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लावलेल्या झाडांची वाढ चांगली होते असा समज आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या दिवशी वृक्षारोपण केले जाते. या दिवसापासून शेतीची कामेही सुरु केली जातात.
या सर्व सणांमध्ये महिला केंद्रस्थानी असतात. पूर्वी महिलांना घराबाहेर जावयास मिळत नसे. या सणाच्या निमित्ताने त्या घराबाहेर पडून सणांचा आनंद लुटत. लहान वयात लग्न झालेल्या विवाहितांना माहेरी जाण्याचे सुख मिळत असे. नटण्या-थटण्याची, दागदागीने घालून मिरवण्याची हौस या सणांच्या निमित्ताने पुरवली जात असे.
आपली व्रतवैकल्ये, उपास तापास सध्याच्या काळात संयुक्तिक आहे का?
श्रावण महिन्यात अनेक व्रते, उपासतापास केले जातात. काही जण तर हा संपूर्ण महिना उपवास करतात. प्रत्येक व्रताचे काही विशिष्ट नियम असतात आणि ते काटेकोरपणे पाळले जातात. उदाहरणार्थ नागपंचमीला चिरायचे- कापायचे नाही, श्रावणात कांदा-लसूण खायचा नाही, मांसाहार करायचा नाही असे अनेक नियम असतात. काही जणांना हे नियम म्हणजे जाचक बंधने वाटू शकतात. पण त्यामागील धार्मिक अधिष्ठान बाजूला ठेवले तरी ही व्रते, उपवास करण्यामागील अनेक फायदे सांगता येतील.
या प्रत्येक बंधनामागे नक्कीच काहीतरी अर्थ आहे. उदाहरणार्थ, पूर्वी घरात सणवार असले की नैवेद्य होईपर्यंत स्वयंपाकातले काहीही खायला मिळत नसे. पण त्यामुळे मुलांना “नाही” ऐकायची सवय लागली. खमंग भजी किंवा पुरणपोळीच्या वासाने जीभ कितीही चाळवली तरी नैवद्य होईपर्यंत तिच्यावर ताबा ठेवण्याची सवय मुलांना लागत असे. वडिलांनी महागडा मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी किशोरवयीन मुले पाहिली की या “नाही” म्हणण्याचे महत्त्व पटते. अर्थातच ही शिस्त लावताना तारतम्याने वागण्याची गरज आहे हे सांगणे न लगे…
भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंतांनी १२ प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. सर्वसाधारणपणे यज्ञ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते यज्ञकुंड, त्यातील अग्नी, हवन… इत्यादी.. पण भगवंतांनी वर्णन केलेले काही यज्ञ मानसिक यज्ञ आहेत. त्यापैकी एक आहे तपोयज्ञ. व्रतवैकल्ये, उपवास या गोष्टी “तपोयज्ञ” या प्रकारात येतात. जगातील सर्वच धर्मांमध्ये काही ना काही व्रते सांगितली आहेत. व्रतांच्या आचरणाने अनेक फायदे होतात, काही अध्यात्मिक आणि काही इतर.
१) ब-याचदा व्रतांमधे आहारविहाराची बंधने आणि नियम असतात. भारतीय परंपरेत ही बंधने आयुर्वेदिक नियमांनुसार असतात. उदाहरणार्थ चातुर्मासात करण्यात येणारे उपवास. या चार महिन्यांत हवा पावसाळी असते. पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणून कमी खावे, उपवास करावा. कांदा, लसूण इत्यादी वातकारक पदार्थ खाऊ नयेत तसेच मांसाहार करू नये. आधुनिक विज्ञानानेही हे आता मान्य केले आहे.
२) उपवास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहे टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीर निरोगी बनते. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मन आणि बुद्धीवरही होतो.
३) आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या परीणाम फक्त शरीरावरच होतो असे नाही तर आपल्या मनावरही मोठा परीणाम होत असतो. अन्नाचे तीन प्रकार आयुर्वेदात सांगितले आहे. सात्त्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार. सात्त्विक आहार घेतल्याने आपल्या चित्तवृत्ती सात्त्विक होतात.उपवास आणि व्रते करताना आपण सात्त्विक आहार घेतो. त्यामुळे चित्तशुद्धी होण्यास मदत होते.
४) आपला मनोनिग्रह वाढतो. व्रत करताना जर समोर एखादा खूप आवडता पण व्रतामधे निषिद्ध असणारा पदार्थ आला तरी आपण मनोनिग्रह करून जीभेवर ताबा ठेवू शकतो. याचा आपल्याला फक्त अध्यात्मिकच नाही तर इतर क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पण फायदा होतो.
५) जवळपास प्रत्येक व्रतामधे आचारविचारांचेही नियम सांगितले आहेत. उदाहरणार्थ, सत्य बोलणे, क्रोधावर ताबा ठेवणे, नीतीनियमाने वागणे इत्यादी. असे नियम तर सर्वकालिक आहेत. ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले पाहिजे.
६) अध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर या व्रतांमुळे इंद्रिय संयमन करण्यास मदत होते. त्यामुळे आत्मोन्नती होते.
७) आज स्त्रिया शिक्षण घेऊन घराबाहेर पडू लागल्या आहेत. पण तरीही हे सर्व सण त्या उत्साहाने साजरे करतात. कारण या निमित्ताने त्यांना त्यांची पारंपरिक कपडे, दागिने घालून नटण्याची हौस पुरवता येते. नोकरी-व्यवसायातील ताण, घर-नोकरी सांभाळताना आलेला दुहेरी ताण विसरण्यास यामुळे मदत होते. आजच्या भाषेत सांगावायचे तर हे सर्व सण फक्त स्त्रियांसाठीच नाही तर सर्वांसाठीच ‘स्ट्रेस बर्स्टर्स’ आहेत. सणांच्या आनंदामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात.
८) आपल्या मुलांच्या रक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या आणि त्यासाठी काहीही कष्ट करण्यास तयार असलेल्या अनेक स्त्रिया आपण आजूबाजूला पाहतो. या आधुनिक काळातील जिवात्याच होत.
९) एरवी आपापल्या कामात व्यग्र असलेली मंडळी या सणांच्या निमित्ताने एकत्र येतात. एकमेकांची विचारपूस करून सुखसंवाद साधतात. समाजाच्या निकोप वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मनातील भावना व्यक्त करण्यास या सणांच्या निमित्ताने व्यासपीठ मिळते. व्यक्तिमत्त्व विकास हा आजकालचा परावलीचा शब्द झाला आहे. समाजात एकत्र वावरताना तो सहजतेने होत असतो.
१०) केवळ प्राणी, पक्षी, साप, जलचर, झाडे इत्यादी सजीव सृष्टीच नव्हे, तर सूर्य, सागर यासारख्या निर्जीव घटकांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करणारी आपली संस्कृती जाणणे, जपणे आणि अंगीकारणे संयुक्तिक नाही का? ‘ग्रॅटीट्यूड’ किंवा ‘कृतज्ञता’ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तो जतन केला पाहिजे.
या सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर हे सण साजरे करणे आजच्या काळातही अत्यंत संयुक्तिक आहे.
सणाच्या स्वरूपातील आवश्यक बदल:
१) आजकाल सण साजरे करणे म्हणजे एक ‘इव्हेंट’ झाला आहे. डीजेच्या ढणढणाणात, अचकट विचकत नृत्य करत सण साजरे केले जात असल्याने सणामागील मूळ उद्देश लुप्त होत चालला आहे. हे नक्कीच टाळले पाहिजे. सन हे आनंदासाठी साजरे केले जातात. ते साजरे करताना रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
२) शाळांमधून, घराघरांतून, सार्वजनिक व्यासपीठांवरुन सणांमागील मूळ उद्देश नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. केवळ पारंपरिक कपडे आणि दागिने घालणे म्हणजे सण साजरे करणे हा गैरसमज दूर केला पाहिजे.
३) सण साजरे करताना नवीन दृष्टिकोन आत्मसात करणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ पर्यावरणाचे रक्षण, प्रदूषण याबद्दल जनजागृती करण्यासाठी या सणांचा उपयोग करता येईल.
४) अध्यात्मिक दृष्टिकोनातून ही व्रते करताना अजून एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. ते म्हणजे प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो. आपल्याला पचतील, पटतील आणि झेपतील अशीच व्रते करावीत. त्यात सातत्य असावे. धरसोड वृत्ती नसावी. मी दोन वर्षे हे व्रत केले पण काही फायदा झाला नाही (म्हणजे अपेक्षित भौतिक यश मिळाले नाही). असे म्हणून सोडून देऊ नये. व्रताचे फळ मिळण्यास लागणारा वेळ हा प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार आणि प्रारब्धानुसार वेगवेगळा असू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती पूर्ण श्रद्धेने करावी तसेच वय, तब्बेत आणि कालमानानुसारही त्यात बदल न करण्याचा अट्टाहास नसावा.
श्रावणातील बंधने, उपास तापास, व्रतवैकल्ये करण्यामागेही अध्यात्माव्यतिरीक्त अनेक वेगळे उद्देश असू शकतात. त्यांच्यावर सरसकट टीका करण्याऐवजी त्यावर विचार करून, अभ्यास करुन, तसेच जाणकारांना विचारून ते उद्देश शोधून काढले पाहिजेत. थोडक्यात, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ‘अभ्यसोन प्रगटावे’ आणि मग जर वाटले की एखादी गोष्ट टाकावू, निरूपयोगी आहे तर मग तसेही केले पाहिजे किंवा त्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत. आपला धर्म सनातन आहे. सनातन म्हणजे नित्य नवीन. अनेक चुकीच्या रूढी आणि परंपरा आपण काळाच्या ओघात नष्ट केल्या, या पुढेही होतील. ‘जुने ते सोने’ हा दृष्टिकोन जसा चुकीचा आहे तसेच ‘जुने ते सर्व टाकाऊ’ हा दृष्टिकोनही घातक आहे.
चला तर मग. श्रावणातील सणांचा आनंद लुटण्यास तयार होऊ यात.
तुम्हाला श्रावणातील सण आणि व्रतवैकल्यांबाबत हा नवीन दृष्टिकोन कसा वाटला, ते नक्की कळवा. याबाबत तुमचा काय दृष्टिकोन आहे हे कमेंट बॉक्स मधे लिहा. हा लेख आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे
सुंदर लेख आहे, वाचून आनंद झाला 👏⚘🙏
सुंदर लेख आहे,
वाचून आनंद झाला 👏⚘🙏
खूपच छान विचार आणि लेख. खूप शुभेच्छा. धन्यवाद.
श्रावण महिन्याची योग्य माहिती लेखात दिली आहे , लेख वाचनीय आहे
Very much informative article…young generation should read it…our great Indian culture which makes our life joyfull and healthy also…
अप्रतिम लेख
खूप छान माहीती उदाहरणासहित आणि आता त्याकडे कसे बघावे हा दृष्टिकोन छान लिहिलंस.
Nice
अप्रतिम लेखन . प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असताना पुराव्या सहित सादर केले आहे त्या वरून अभ्यास दिसून येतो . दिलेली सर्व माहिती ही शास्त्रीय पद्धतीने सांगितल्या असल्या मुळे आगामी पिढीला पटणारी आहे आणि हिंदू संस्कृती वैज्ञानिक दृष्टीने किती पुढारलेली आहे ह्याचा दृष्टांत झाला.
Excellent for this what you have written kshitija. I m always proud of you
Superb
लेख खूपच छान लिहिला आहे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहे