आता श्रावण साजरा करा या पौष्टिक, स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या हटके पाककृतींनी!
हिंदू धर्मात श्रावण महिना हा पवित्र व अध्यात्मिकरित्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात बहुतेक जण आपल्या अध्यात्मिकतेत उपवास,व्रत-वैकल्ये करून ईश्वरा प्रति भक्ती दर्शवितात. तथापि,उपवास म्हणजे पौष्टिकतेशी तडजोड करणे नव्हे. या काळात तुमच्या शरीराचे पोषण करण्यासाठी व ऊर्जा कायम ठेवण्यासाठी आजच्या या लेखात आपण पौष्टिक, स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या कोणत्या पाककृती आहेत हे जाणून घेणार आहोत.
1} वरी तांदळाचा शिरा
साहित्य :-
- 1 वाटी वरी तांदूळ
- 2 वाट्या पाणी
- दीड वाटी दूध
- पाऊण वाटी साखर
- एक चिमूट मीठ
- 2 टेबलस्पून तूप
- वेलची पूड
- ड्रायफ्रुट्स
कृती:-
1. दूध व पाणी एकत्र करून गरम करत ठेवावे.
2.कढईत तूप तापल्यावर कोरडे तांदूळ घालून गुलाबी रंगावर परतावे.
3.त्यात उकळते दूध व पाणी ओतावे.
4.एकत्र करून झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यावे.
5.पाणी सुटल्यावर त्यात साखर, मीठ,वेलचीपावडर, ड्रायफ्रुट्स घालून चांगले परतावे.
6.पुन्हा झाकण ठेवून तीन-चार मिनिटे शिजू द्यावे व गॅस बंद करून गरम सर्व्ह करावे.
2} उपवासाचे डोसे
साहित्य:-
- एक वाटी वरी तांदूळ
- एक वाटी साबुदाणा
- मीठ
कृती:-
1.वरी तांदूळ व साबुदाणा रात्री भिजत घालावेत.
2.सकाळी पाणी काढून एकत्र बारीक वाटावे.
3.बेताचे पातळ करून त्यात चवीनुसार मीठ घालून डोशाच्या तव्यावर नेहमीप्रमाणे डोसे करावेत.
4.ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खावयास द्यावेत.
3} उपवासाचे थालीपीठ
टीप
थालीपीठ करताना तव्यावर तुपाऐवजी तेल घातले तर जास्त खमंग होतात.
साहित्य:-
- 1 वाटी राजगिरा पीठ किंवा थालीपीठ भाजणी
- 2 टेबलस्पून शेंगदाणा कूट
- अर्धा टीस्पून मिरची पावडर किंवा मिरची
- पाव टीस्पून मीठ,तेल
कृती:-
1.पिठात तिखट, मीठ, शेंगदाणा कूट घालून पाणी घालून मळावे.
2.नंतर प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून त्यावर पिठाचा गोळा ठेवून तेलाच्या हाताने जाडसर थालीपीठ थापावे.
3.तव्यावर 1-2 टेबलस्पून तेल चांगले तापल्यावर सगळीकडे पसरावे.
4.व त्यावर थालीपीठ घालून मंद गॅसवर दोन्ही बाजूने कुरकुरीत गुलाबी रंगावर भाजावे.
5.दही किंवा नारळाच्या चटणी बरोबर खाण्यास द्यावे.
थालीपीठ भाजणी खालील प्रमाणे तयार करा
साहित्य:-
- 1 वाटी साबुदाणा
- 1 वाटी वरी तांदूळ
- 1वाटी राजगिरा
- 1टीस्पून जिरे
कृती:-
1.कढईमध्ये साबुदाणा घालून थोडा फुलेपर्यंत भाजावा.
2. नंतर वरी तांदूळ गुलाबी रंगावर भाजावेत.
3. राजगिरा थोडा कढईत घालून फडक्याने हलवून फुलू लागला की काढावा.
4. याप्रमाणे सर्व राजगिरा फुलवून घ्यावा.
5.नंतर जिरे थोडे भाजावे.
6.भाजलेला साबुदाणा, वरी तांदूळ, राजगिरा, जिरे एकत्र करून मिक्सरमधून कोरडेच जाडसर दळून घ्यावे की झाली तुमची भाजणी तयार!
4} मखाना खीर
साहित्य:-
- 1 कप मखाना
- 1 टेबलस्पून साजूक तूप
- अर्धा लिटर दूध
- चवीनुसार साखर
- वेलची पावडर
- ड्रायफ्रूट्स
कृती:-
1.प्रथम पॅनमध्ये तूप टाकून तुपावर मखाने हलकेसे तीन चार मिनिटे परतून घ्या.
2.भाजलेले मखाने थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडे जाडसर फिरवून घ्या. आणि दूध उकळत ठेवा.
3.दूध उकळून थोडेसे आटत आल्यावर त्यात मिक्सरमध्ये जाडसर वाटलेला मखाना, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स घालून तीन ते चार मिनिटे उकळून घ्या.
4.गरम किंवा थंड सर्व्ह करा.
5} रताळ्याचा हलवा
साहित्य:-
- अर्धा किलो रताळी
- 4 टेबलस्पून साजूक तूप
- 1 वाटी साखर
- 1 कप दूध
- वेलची पूड
- ड्रायफ्रुट्स (आवडीनुसार)
कृती:-
1.रताळी स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्या.
2.एका कढईमध्ये तूप टाकून त्यावर रताळ्याचा कीस परतून घ्या.
3.किस थोडा शिजला की त्यात दूध, वेलचीपूड, साखर, ड्रायफ्रूट्स टाकून चांगला मऊ शिजवून घ्या व गॅस बंद करा.
4.गरम किंवा थंड सर्व्ह करा.
6} फराळी (उपवासाची) मिसळ
साहित्य:-
- अर्धा किलो रताळी
- 1वाटी साबुदाणे
- 2-3टीस्पून साखर
- 3 टेबलस्पून ओले खोबरे
- अर्धी वाटी शेंगदाणे
- 3 टेबलस्पून तूप
- 100 ग्रॅम बटाट्याचा तळलेला किस
- 6-7ओल्या मिरच्या
- अर्धा टीस्पून जिरे
- चिंच
कृती:-
1.साबुदाणे कोरडेच भाजून थंड झाल्यावर धुवावेत. (दोन-तीन तास अगोदर धुऊन ठेवावेत)
2.रताळी स्वच्छ धुऊन साले काढून पातळ चौकोनी काचऱ्या कापाव्यात.
3.ओल्या मिरच्या व जिरे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे.
4.कढईत तूप तापल्यावर वाटलेले जिरे व मिरची घालून गुलाबी रंगावर परतून त्यावर शेंगदाणे घालून चांगले परतावे.
5.त्यावर रताळ्याच्या काचऱ्या घालून रंग बदलेपर्यंत परताव्यात.
6.नंतर त्यात दोन-तीन वाट्या पाणी, मीठ, साखर, चिंच,खोबरे घालून शिजू द्यावे रताळी शिजली की दाटसर रस तयार झाला की गॅस बंद करावा.
असे सर्व्ह करा
डिशमध्ये प्रथम एक-दोन टेबलस्पून भिजलेला साबुदाणा घालावा व त्यावर दोन-तीन टेबलस्पून भाजी घालून वरून तळलेला बटाट्याचा कीस घालून एकत्र करावे.
7} उपवासाची इडली
साहित्य:-
- एक वाटी वरी तांदूळ
- पाव वाटी साबुदाणा
- अर्धा कप दही
- चवीनुसार मीठ
- अर्धा टीस्पून इनो
कृती:-
1.वरी तांदूळ व साबुदाणा धुवून एकत्र चार ते पाच तास भिजत ठेवावे.
2.नंतर त्यातील सर्व पाणी काढून मिक्सरमध्ये काढून त्यात दही देखील एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.
3.नंतर हे मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून त्यात मीठ व इनो घालून सर्व काही पटकन एकत्र मिसळावे.
4.इडलीपात्राला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण घालावे.
5.मध्यम आचेवर 12-15 मिनिटे वाफवून घ्यावे मग गॅस बंद करावा.
6.इडल्या थंड झाल्यावर काढून घ्याव्यात व उपवासाच्या चटणी सोबत सर्व्ह कराव्यात.
8} वरी तांदळाचे वडे
साहित्य:-
- दोन वाट्या वरी तांदूळ
- 2-3 उकडलेले बटाटे
- पाव वाटी शेंगदाणा कूट
- दोन टीस्पून साखर
- एक टीस्पून मीठ
- 6-7 हिरव्या मिरच्या
- अर्धा टीस्पून जिरे
- लिंबू व तेल
कृती:-
1.वरी तांदळाचा भात करून घ्यावा.
2.हिरव्या मिरच्या व जिरे बारीक वाटून घ्यावे.
3.भात थंड झाल्यावर परातीत काढून कुस्करावा त्यात उकडलेले बटाटेही कुस्करून घ्यावेत.
4.नंतर त्यात वाटलेली मिरची,जिरे,मीठ, साखर शेंगदाणा कूट,लिंबूरस घालून हाताने चांगले मळावे.
5.त्याचे छोटे छोटे गोळे करून हाताने दाबून चपटे करावेत.
6.मंद गॅसवर तेलात तळावेत व चटणी बरोबर खावयास द्यावेत.
9} साबुदाणा खिचडी
टीप
1)खिचडीसाठी शक्यतो जुना साबुदाणा वापरावा. साबुदाणा नवीन असल्यास तो धुताना विरघळतो व त्याची खिचडी चिकट व गोळा होते.
2) साबुदाणा धुतल्यावर साबुदाण्यात जास्त पाणी ठेवल्यास खिचडी चिकट होते व जास्त ढवळल्यावर खिचडीचा गोळा होतो.
साहित्य:-
- 2 वाट्या साबुदाणे
- पाव वाटी शेंगदाणा कूट
- अर्धा टीस्पून मीठ
- 2-3 टीस्पून साखर
- 2-3 टेबलस्पून तूप किंवा तेल
- 2 टेबलस्पून ओले खोबरे
- 1 बटाटा
- 4-5 हिरव्या मिरच्या
- पाव टीस्पून जिरे
कृती:-
1.खिचडी करण्यापूर्वी 3-4 तास आधी साबुदाणे धुऊन ठेवावेत.
2.बटाटा पातळ चिरावा.
3.पातेलीत तूप तापल्यावर जिरे,मिरची घालून त्यावर बटाटा घालून मऊ होईपर्यंत परतावा.
4.त्यावर शेंगदाणा कूट घालून त्याला तेल सुटेपर्यंत परतावे.
5.त्यावर भिजलेला साबुदाणा, मीठ, साखर घालून मंद गॅसवर खिचडी चांगली मऊ व गरम होईपर्यंत परतत राहावे व गॅस बंद करून ओले खोबरे घालून सर्व्ह करावी.
10} साबुदाणा वडे
टीप
1)साबुदाणा वडे करताना बटाट्याऐवजी वरी तांदळाचे पीठ घातले तर वडे छान कुरकुरीत होतात. बटाट्यामुळे साबुदाणे वडे आतून चिकट होतात.
साहित्य:-
- 2 वाट्या साबुदाणे
- 1 बटाटा
- पाव वाटी वरी तांदळाचे पीठ
- पाव वाटी शेंगदाणा कूट
- 1 टीस्पून मीठ
- 2 टीस्पून साखर
- 6-7 ओल्या मिरच्या
- पाव टी स्पून जिरे
- तळण्यासाठी तेल
कृती:-
1.साबुदाणे तीन-चार तास आधी धुऊन ठेवावेत.
2.वरी तांदूळ कोरडेच मिक्सरमधून वाटून त्याचे पीठ करावे.
3.मिरच्या,जिरे,साखर थोडे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
4.भिजलेल्या साबुदाण्यात वाटलेले जिरे,मिरची,साखर, वरीचे पीठ, शेंगदाणा कूट, मीठ घालून हाताने चांगले मळावे व त्याचे लाडवासारखे गोळे करावेत.
5.तेल चांगले तापल्यावर मंद गॅसवर वडे तळावेत व ओल्या नारळाच्या चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.
निष्कर्ष:-
चवदार पदार्थांपासून गोड पदार्थांपर्यंत या पाककृती बनवायला सोप्या आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या भक्तीशी तडजोड न करता तुमच्या जेवणाचा आनंद घेऊ शकता. श्रावण उपवासाच्या भक्तिमय शुभेच्छा!
तुम्ही उपवासाचे कोणते पदार्थ बनवता व तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा.तसेच या पाककृती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’या वेबसाईटला नक्की भेट द्या तसेच व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
आकांक्षा निरळकर ,मुंबई
Very useful information to celebrate shravan with tasty and healthy food.
information to celebrate shravan with tasty and healthy food.
celebrate shravan with tasty and healthy food.
खूप छान रेसिपी.