10 सिद्धिदात्री देवी
ह्रीं क्लीम ऐ सिद्धये नम :
”या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रुपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”
विविध सण यांनी नटलेल्या हिंदू धर्मात नवरात्राचे विशेष महत्व आहे.महिषासुराचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळवून देणाऱ्या मा दुर्गेच्या सन्मानार्थ हा सण साजरा केला जातो.नुकत्याच झालेल्या गणपती व गौरी पूजनाचा उत्साह अजूनही मनातून ओसरला नाही, तर ओढ लागली आता नवदुर्गेच्या स्थापणेची.
नवरात्र पूजन :-
नवरात्र म्हणजे ‘नवरात्रीचा समूह’असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नवरात्री आणि दहा दिवस साजरा होतो. भक्तहो, आदिशक्ती म्हणजेच ब्रम्हा, विष्णू महेश या तिन्हींच्या शक्तींच्या संगम होय. नवरात्रात नऊ दिवस दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा अर्चना केली जाते.प्रत्येक रूपाची वैशिष्टे,त्यांची कथा,विशेष मंत्र,नैवेद्य व रंग अशी विविधता दिसून येते.
आजच्या या लेखमध्ये मी तुम्हाला नवदुर्गापैकी, देवीच्या ‘सिद्धिदात्री’ या नवव्या रूपाची माहिती सांगणार आहे.
नवमीचा रंग:- या दिवशीचा रंग ‘मोरपंखी’ हा रंग समृद्धी,ऊर्जा,महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीतील अखेरची माळ असल्या कारणामुळे सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्वाचे मानले आहे.
सिद्धिदात्री ‘ विशेषता :-
मित्रहो,माता सिद्धिदात्री देवी नावाप्रमाणेच सिद्धिची देवता आहे. नवरात्रीच्या अंतिम दिवशी म्हणजे नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. सिद्धिदात्री माता ही सर्व प्रकारच्या सिद्धि देणारी माता आहे.नवरात्त्रीच्या आठही दिवशी मनोभावे पूजा करणाऱ्या साधकांना अष्टसिद्धि देणारी माता म्हणजे सिद्धिदात्री माता होय.
मार्कंडेय पुराणानुसार अनिमा, महिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व व वशीत्व या आठ सर्व सिद्धि आहेत.पुराणात असे म्हणतात की भगवान शंकराने या सर्व सिद्धि आपल्या उपासनेने प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे शिवाचे अर्ध शरीर हे देवी सिद्धिदात्रीचे झाले होते यामुळेच त्यांना सर्वलोकी ‘अर्धनारी नटेश्वर’ या नावाने ओळखतात.
सिद्धिदात्री चे स्वरूप :-
सिद्धिदात्री चार भुजाधारी आहे. तिच्या हातात गदा,शंख,सुदर्शन चक्र व कमळ आहे. मातेचा उजवा हात वरमुद्रेचा आशीर्वाद देतो. सिद्धिदात्री देवीचे वाहन ‘सिंह’ असून ती कमळपुष्पा वर विराजमान आहे. असे म्हणतात की मा सिद्धिदात्री माता सरस्वतीचे देखील रूप आहे व सिद्धिदेवीच्या उपासनेने मोक्षाचा मार्ग देखील मोकळा होतो.
‘सिद्धिदात्री ‘ अवताराची कथा
माता ‘सिद्धीदात्री’ अवताराची कथा पुराणानुसार अशी आहे. कोणे एके काळी सर्व लोंकात असुरांचा अत्याचार पसरला होता. सर्व देवदेवता भयभीत झाले होते. जेव्हा असुर, देवतांवर व ऋषीमुनींच्या आश्रमावर हमला करून सर्व नष्ट करण्याच्या मार्गावर होते. तेव्हा देवलोक आपला जीव वाचवून ब्रम्हा, विष्णू महेश यांच्याकडे येतात. ब्रह्मा, विष्णू महेश देखील असुरांवर अतिशय क्रोधीत होतात. ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या एकत्रित तेजामुळे माता ‘सिद्धिदात्री’ अवतार घेते. सर्व देव देवतांचे शस्त्रे मिळून माता ‘महाशक्तिशाली’ बनते व असुरांचा संहार करते.
सिद्धी दात्री मातेची पूजा विधी :-
नवरात्रीच्या अंतिम दिवशी म्हणजे नवमीला सकाळी लवकर उठून मातेची षोडसोपचाराणे पूजा केली जाते. हंगामा नुसार नऊ प्रकारची फळे,नवरसू व नऊ प्रकारची फुले देवीला चढविली जातात. हलवा,खीर,पुरी, नारळ आणि घरात बनवलेले जेवण हे मातेला अतिशय प्रिय म्हणून या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्या जातो.या दिवशी नवमी माळ म्हणून कुंकूम अर्चन करतात.आठ दिवसाचे व्रत केल्यानंतर नवव्या दिवशी मातेला तीळ अर्पण करतात.पांढऱ्या रंगाचे कपडे दिले जातात. धार्मिक मान्यतेनुसार मातेला पांढरा रंग आवडतो.
कुमारीकांना या दिवशी देवी समान सन्मान देऊन त्यांचे पूजन केले जाते. त्यांना भोजन वाढून,ओढणी चढविली जाते आणि सर्व भक्तजणांना देवीचा प्रसाद वाटला जातो. अशा प्रकारे नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता यादिवशी केली जाते.
मित्रहो,नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते व नवव्या अथवा दहाव्या दिवशी दसऱ्याला घट उठवतात.अशा प्रकारे नवरात्री चा हा सण नऊ दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो. माता सिद्धिदात्रीची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो.
आजची माहिती कशी वाटली, ते कमेन्ट करून नक्की सांगा.आणखी कोणती माहिती तुम्हाला वाचायला आवडेल हेही सांगा. धन्यवाद.
लेखिका -विनीता रोठे