रात्रभर झालेल्या झोपेतून आपण सकाळी उठलो की बहुतेक चयापचय क्रियेमुळे आपलं पोट रिकामं झालेलं असतं. झोपेतून उठलं की बहुतेक सगळेच जण भरपूर पाणी पितात. पाण्याची गरज तर शरीराला असतेच. पण त्याचबरोबर सकाळचा नाश्ता सुद्धा तेवढाच आवश्यक असतो. सकाळचा नाश्ता हा एखाद्या राजाप्रमाणेच हवा असे म्हटले जाते. कारण बहुतेक नोकरीदार लोक किंवा व्यावसायिक लोक सुद्धा घरून आठ ते नऊ च्या दरम्यान बाहेर पडतात. त्यानंतर दुपारच्या जेवणाला बराच वेळ असतो आपण जर भरपेट नाश्ता करून बाहेर पडलो, तर शरीराची शक्ती क्षीण होत नाही व काम करायला तजेला राहतो.
म्हणूनच सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान भिजवलेल्या सुक्या मेव्या बरोबर व्यवस्थित नाश्ता करणे शरीराला फार गरजेचे असते. स्त्री, पुरुष, लहान मुलं, म्हातारी माणसं, गरोदर स्त्रिया, तरुण मुलं, मुली सगळ्यांनाच भरपेट नाश्ता करण्याची गरज असते आणि तो नाश्ता सुद्धा फार तेलकट तुपकट असा असण्यापेक्षा पोटभरीचा तर असावा ,पण विविध प्रकारचे सत्व त्यातून पोटात गेले पाहिजे.

सकाळच्या नाश्त्या करता असलेल्या काही साध्या पाककृतीsome simple breakfast recipes in marathi या लेखांमध्ये आपण काही वैविध्यपूर्ण पण साध्याच आणि त्यांच्यात सर्व प्रकारचे सत्व असलेल्या नाश्त्याच्या पाककृती बघू.
१) ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी—-ज्वारीचे पीठ पचायला खूप हलके असते तसेच ग्लूटेन फ्री असल्यामुळे आजकाल बरेच लोक गव्हा ऐवजी ज्वारीचा वापर करतात.
कृती –फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करून त्यात मध्ये मोहरी कढीपत्ता व दोन हिरव्या मिरच्या कापून घालाव्या व दोन वाट्या ज्वारीचे पीठ खरपूस भाजून घ्यावे. तिखट हळद जिरेपूड आणि दोन कप गरम पाणी घालावे. हलवून घ्यावे एक वाफ द्यावी त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दही आणि थोडी साखर घालावी. अजून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर चविष्ट अशी ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तयार. त्यावर हिरवी कोथिंबीर भुरभुरावी. याची चव तर उत्तम असतेच याशिवाय भरपूर वेळ भुक पण लागत नाही. त्यामुळे पोटभरीची असते. पचायला पण हलकीच असते.
२) ताकातल्या ज्वारीच्या लाह्यांचे पीठ-आपल्याकडे ज्वारीच्या लाह्यांचे पीठ मिळते. साधारण दोन पेले ताक करून त्यामध्ये या लाह्या भिजवायच्या. त्यानंतर फोडणीच्या भांड्यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून मोहरी, हिंग ,कढीपत्ता हिरवी मिरचीचे तुकडे घालून थोडेसे शेंगदाणे घालून त्याला फोडणी द्यायची. चवीपुरते मीठ आणि थोडी साखर घालून व्यवस्थित कालवायचे आणि खायला द्यायचं अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा हा नाश्ता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर शरीर थंड राहतं.
३) नागलीची लापशी-नागलीचे पीठ अथवा रागी हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप नागलीचे पीठ पाण्यामध्ये विरघळवून घ्यावे. व त्यानंतर गॅसवर ठेवावे त्यामध्ये मीठ हिंग जिरेपूड आणि थोडे ताक घालावे साधारण, भांड्यात घेऊन खाऊ शकतो इतपत त्याला घट्ट करावे. थोडी मिरेपूड पण घालता येईल. शेवटी चवीपुरते मीठ घालावे. ही लापशी चविष्ट असतेच पण अत्यंत सात्विक असते. लहान मुले ते म्हातारे लोक या सगळ्यांना हा नाश्ता देता येतो. अगदी डायबिटीस व हृदयरोगी या सगळ्यांना हा नाश्ता खाता येतो, हे महत्त्वाचे.
४) मिक्स्ड डाळीचे धिरडे–प्रथिनांनी युक्त असा हा नाश्ता आहे. ज्या दिवशी धिरडे करायचे त्याच्या आदल्या दिवशी मुगडाळ एक वाटी, तूर डाळ अर्धी वाटी, हरभरा डाळ अर्धी वाटी, मसूर डाळ पाव वाटी, एक मूठभर मटकी भिजत घालावी. तीन तास भिजल्यावर त्याला वाटावे. वाटताना थोडी मेथी पूड घालावी. अगदी बारीक मिश्रण तयार करावे व चिमूटभर सोडा घालून रात्रभर ठेवावे सकाळी त्यामध्ये थोडा बारीक रवा घालावा व एकत्र करून घ्यावे आणि त्याचे डोसे किंवा धिरडे करावे हिरव्या चटणी बरोबर अथवा सॉस बरोबर खायला द्यावे. अतिशय पोटभरीचा आणि चविष्ट नाश्ता आहे.
५) ओव्हर नाईट ओट्स–-एका बोलमध्ये ओट्स दूध आणि चिया सीड्स रात्री भिजत घालून फ्रिजमध्ये ठेवावे. आपल्या कुटुंबातील किती व्यक्ती खाणार आहेत ,त्याच्याप्रमाणे वेगवेगळे बाउल्स ठेवावे. सकाळी उठलं की त्या भिजवलेल्या ओट्स मध्ये थोडे मध घालून केळं, सफरचंद, स्ट्रॉबेरी असेल तर स्ट्रॉबेरी किंवा इतरही काही फळे कापून कापलेले बदाम ,काजू ,अक्रोड घालून एकत्र करून घ्यावे. अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार. लहान मुलं ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत हा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो आणि अनेक सत्वांचा स्त्रोत देखील आहे
६) राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा–राजगिऱ्याच्या पिठामध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असते. तसेच राजगिऱ्याचे पीठ उपवासा करता सुद्धा चालते. त्यामुळे राजगिऱ्याचा उपमा हा उपवासाच्या दिवशी सुद्धा चालू शकेल.
कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तूप गरम करून त्यामध्ये जिरे टाकावे. जिरे तडतडले की हिरवी मिरचीचे साधारण सात ते आठ तुकडे टाकावे व राजगिऱ्याचे एक ते दोन वाटी पीठ टाकावे. तुपामध्ये हे पीठ खरपूस भाजून घ्यावे त्यामध्ये चवीनुसार मीठ व साखर घालावी . भाजून घेतले की गरम पाणी टाकावे आणि वाफ येऊ द्यावी. वाफ येऊ देण्यापूर्वी त्याला व्यवस्थित ढवळत राहावे, शक्यतो पिठाच्या गुठळ्या होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. वाफ आली की वरून थोडा लिंबू पिळावा किंवा आमचूर पावडर पण टाकता येते. तर चविष्ट असा राजगिऱ्याचा उपमा तयार.
७) मेथीचे धपाटे–तयार करण्यास सोपा पण अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे.
साधारण दोन वाट्या चिरलेली मेथी, तीन वाट्या कणिक व पाव वाटी बेसन यामध्ये घालावे. तिखट, हळद, मीठ, थोडा तीळ, ओवा, जिरेपूड घालून घट्टसर मळून घ्यावे. लहान लहान गोळै करून लाटून तव्यावर त्याला तेल टाकून परतून घ्यावे. तेला ऐवजी तूप सुद्धा वापरता येतं. हे धपाटे दोन-तीन दिवस सुद्धा टिकतात. पाण्याऐवजी पीठ हे ताकाने मळून घेतले तर तीन ते चार दिवस सुद्धा टिकतात. हिरवी मिरचीची चटणी अथवा सॉस किंवा दह्याबरोबर हे धपाटे खूप छान लागतात. लहान मुलांना तर खूप आवडतात.
८) कणकेचा शिरा–याकरता साधारणतः जाडसर कणिक वापरावी. कढईमध्ये साधारण चार ते पाच चमचे तूप गरम करून घ्यावे. त्यामध्ये दोन वाट्या जाडसर कणिक घालून भरपूर भाजून घ्यावे. लालसर पीठ झाले की त्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र गरम करून घेतलेले असावे ते टाकावे आणि हे अंदाजाने टाकावे. भरपूर परतून घ्यावे आणि वाफ द्यावी. साधारण सैलसर असा शिरा तयार होईल. त्यामध्ये साखर घालावी किंवा गूळ घालावा गुळ घातला तर फारच पौष्टिक असा शिरा तयार होतो व पूर्णपणे गुळ पिठामध्ये विरघळला की शिरा तयार होतो. त्यावर वेलची पूड, बदाम, काजू ,अक्रोड, किसमिस यांचे काप घालावे. हा शिरा लहान मुलांना देखील आवडतो. तसेच म्हातारी माणसं, तरुण मुले यांना सुद्धा आवडतो. अतिशय पौष्टिक अशी ही पाककृती आहे.
९) विविध पीठ एकत्र करून थालीपीठ-या प्रकारात आपण वेगवेगळ्या प्रकारचे पीठ एकत्र करून त्याचे थालीपीठ बनवू शकतो. उदाहरणार्थ एक वाटी कणिक, पाव वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचे पीठ, तीन चमचे मुगाच्या डाळीचे पीठ, दोन चमचे नागलीचे पीठ, दोन चमचे ज्वारीचे पीठ, ही सगळी पिठे एकत्र करून भाजून घ्यावी भाजल्यावर यामध्ये हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडा किसलेला गाजर पण टाकू शकतो. आपण हवे तसे वैविध्य यात आणू शकतो. चवीला मीठ एक चमचा तीळ घालून भिजवून घ्यावे. यानंतर लहान लहान गोळे करून त्याचे थालीपीठ थापावे. किती लोकांसाठी हवे आहे त्याप्रमाणे अंदाजाने पीठ मळावे. अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट असे थालीपीठ तयार होतात. चटणी सॉस दही कशाही बरोबर आपण थालीपीठ खाऊ शकतो.
१०) भाज्यांचे पॅटीस—याकरता चार ते पाच उकडलेले बटाटे तीन चार फ्रेंच बीन्स, बारीक कापलेली सिमला मिरची, मटर अर्धा गाजर अर्धा वाटी मक्याचे दाणे या सगळ्या भाज्या बारीक चिरून वाफवून घ्याव्या आणि थंड झाल्या की बटाट्याबरोबर एकत्र करून घ्याव्या
घट्टपणा येण्यासाठी थोडे कॉर्नफ्लोर टाकावे.
या मिश्रणामध्ये तिखट, जिरेपूड, बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडी मिरेपूड ,चाट मसाला व चवीपुरतं मीठ टाकून एक घट्टसा गोळा करून घ्यावा. थोडं तेल लावून मिश्रण दहा मिनिटे ठेवावे. नंतर तव्यावर थोडं तेल टाकून, हातावर छोटी छोटी टिक्की करून तव्यावरच्या तेलात भाजून घ्यावे. साधारण लालसर झाले की काढून घ्यावे. मिश्र भाज्यांची टिक्की तयार सॉस बरोबर खूप छान लागते. पौष्टिक आहे. तशीच पोटभरीची सुद्धा आहे व सगळ्यांनाच आवडते.
तर सकाळच्या नाश्त्या करता असलेल्या काही साध्या पाककृती some simple breakfast recipes in marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला लेखक मित्र या वेबसाईटला भेट देऊन नक्की कळवा. इतर कथा आणि लेख सुद्धा वाचा व प्रतिक्रिया द्या. आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा तसेच आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद!
लेखिका -सौ वैशाली देव, पुणे
छान आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद.
खूप छान,👌👍👍
👏👏
very nice