Simple tips to improve math skills of kids in Marathi:“गणित म्हटले की माझ्या पोटात गोळा येतो”. “गणिताचा अभ्यास करताना मला खूप झोप येते”. पूढल्या अभ्यासक्रमात गणित विषय मी सोडणार आहे”. असे संवाद साधारणतः शाळकरी मुलांमध्ये चालत असतात. शाळेत किंवा शाळेच्या बाहेर सुद्धा आपल्याला असे संवाद ऐकू येतात.काय कारण असावे याचे? आपल्यापैकी खूप जणांना असा अनुभव स्वतः करता देखील आहे.
गणित हा विषय तार्किक बुद्धिमत्तेशी निगडित आहे. लहानपणापासून जर ही बुद्धिमत्ता विकसित झाली नाही तर,गणित हा विषय कंटाळवाणा आणि रटाळ वाटू लागतो. त्यात गोडी वाटत नाही. यात अनेक अमूर्त संकल्पनांचा आपल्याला विचार करावा लागतो. यात बरीच विचार शक्ती खर्ची घालावी लागते. ज्या मुलांमध्ये लहानपणापासून विचारशक्ती तसेच संयम असतो आणि एखादी गोष्ट मी करून दाखवीनच असा निग्रह असतो. अशा मुलांना गणितं नक्कीच आवडते.
गणित या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. बहुतेक सगळ्याच विषयांचा पाया गणित हाच असतो. भारतात अनेक मोठे गणितज्ञ होऊन गेले आर्यभट्ट, रामानुजम यांनी बहुतेक गणितातले सिद्धांत शोधले आहेत.शुन्याचा शोध, वर्गमूळ काढणे इ.अनेक संशोधन भारतात लागले आहेत.
गणित या विषयाचे महत्त्व—
१) दैनंदिन जीवनात साधे हिशोब करायला गणिताशिवाय पर्याय नाही. आपण खरेदी करायला गेल्यावर बेरीज, वजाबाकी,गुणाकार, भागाकार याच्या वापराशिवाय आपण कुठलाही हिशोब करू शकत नाही.
२) गणित हा विषय अभियांत्रिकी, व्यवसाय,वाणिज्य, वैद्यकीय, भौतिकशास्त्र अनेक विषयांचा पाया आहे.
३) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इतर शास्त्रांचा अभ्यास बहुतेक गणितावरच अवलंबून असतो. त्यामध्ये अनेक बीजगणितीय आणि भूमितीय संकल्पनांचा वापर केला जातो.
४) सांख्यिकी शाखा जी आजच्या युगात अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये खेळ इतर अनेक व्यवसाय शिक्षण, लोकसंख्या यासारख्या अनेक गोष्टींमध्ये माहितीचे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरण करायचं असते. त्या माहितीचे वेगवेगळे आलेख काढायचे असतात. त्यावरून तुलनात्मक विचार करायचा असतो. उदाहरणार्थ दोन क्रिकेट खेळाडूंनी किती रन काढले याची तुलना करण्यासाठी सांख्यिकीशास्त्र वापरतात. याकरता गणित या विषयाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण कुठलीही गोष्ट संख्येशिवाय आपल्याला मांडताच येत नाही. सांख्यिकी शास्त्राद्वारे सामाजिक संशोधन करण्यामध्ये मदत होते. देशाची लोकसंख्या मोजण्यासाठी सांख्यिकीचा वापर होतो.
५) संगीत या विषयात सुद्धा गणिताचा उपयोग होतो. संगीत हे बऱ्यापैकी भौतिक शास्त्रावर अवलंबून आहे त्यातील वारंवारता तसेच त्यातील अनेक संज्ञा या गणिताशी निगडित असतात. ज्याला संगीत शिकायचे आहे. त्याला बऱ्यापैकी गणिताचे ज्ञान हवे.
६) माणसाला जेव्हा ‘किती?’ या प्रश्नाचे उत्तर द्यायचं असतं. .तेव्हाच गणिताचा उपयोग होतो.
७) संगणक शास्त्राचा जेव्हा शोध लागला तेव्हा मुख्यतः त्याचा पाया गणितच होता. एक ते नऊ आकड्यांवरच गणिताचा सगळा खेळ चालतो.
८) गणितात तीन शाखा असतात. अंकगणित बीजगणित आणि भूमिती. भूमिती मधील अनेक आकार जसे कोन, त्रिकोण, गोल, चौकोन, आयात यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात तसेच इतर अनेक विषयांमध्ये करतो.बीज गणितामध्ये अज्ञात संकल्पना असतात. जसे की अ किंवा ब यांची किंमत आपल्याला काढायची असते. अशा प्रकारचे उदाहरण वय काढणे, वेळ माहिती करणे, या प्रकरणात मोडतात. अशा प्रकारच्या किमती गणितामध्ये काढल्या जातात.
९) आपण दररोज जे तंत्रज्ञान वापरतो. त्यापासून ते समाजातील अनेक समस्या सोडवण्या साठी ज्या प्रणाली वापरल्या जातात त्यामध्ये सगळीकडे गणिताचा वापर होतो.
१०) हवामान बदलाच्या अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा गणितीय संकल्पनांचा वापर केला जातो. गणितीय मॉडेल द्वारे शास्त्रज्ञ ग्लोबल वॉर्मिंगच्या संभाव्य परिणामांचा अंदाज लावू शकतात.
११) संसर्गजन्य रोग जेव्हा पसरलेले असतात तेव्हा त्यांच्या नियंत्रणासाठी धोरणे विकसित करण्यात गणिताची महत्त्वाची भूमिका असते.
१२) समाजकारण, राजकारण यातील अनेक समस्यांचा शोध घेऊन मिळालेल्या माहितीवरून गणितीय मॉडल्स द्वारे त्यांचे निरसन केले जाते.
१३) अगदी साधे उदाहरण म्हणजे स्वयंपाक घरात गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मोजमापासाठी दिला गणिताचा उपयोग करावा लागतो. लहान मुलं जेव्हा खेळत असतात अगदी सापशिडी किंवा लुडो सारखे खेळ यामध्ये सुद्धा संख्यांचा वापर केला जातो.
१४) गणित हे आपल्या मानवी संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. त्याला विसरून आपल्याला चालणार नाही.
तर अशा महत्त्वाच्या गणित या विषयाच्या संकल्पना सोप्या व्हाव्या व ते सोडवण्यासाठी जास्त कष्ट पडू नये म्हणून लहानपणापासूनच त्यामध्ये रुची निर्माण व्हायला पाहिजे. तर ही रुची कशी निर्माण व्हावी त्याकरता काय उपाय करायला पाहिजे ते आपण बघूया.“Simple tips to improve math skills of kids in Marathi”
मुलांना लहानपणापासून सकारात्मक विचारसरणी शिकवायला हवी. त्याकरता काही सकारात्मक वाक्य रोज त्यांना म्हणायला लावायला हवे. तसेच त्यांच्या खोलीमध्ये अथवा शाळेत एका बोर्डवर रोज चार ते पाच सकारात्मक वाक्य, जसे मला गणित खूप आवडतं, मला पाढे म्हणायला आवडतात. मी रोज गणिताची चार ते पाच उदाहरणे सोडवायला तयार आहे. अशासारखी वाक्यं जर लिहिली तर त्यांच्यामध्ये तार्किक बुद्धिमत्तेचा बीज रोवले जाऊ शकते.
१) दैनंदिन व्यवहारातले गणित—अगदी नेहमीच वही पेन्सिल घेऊन गणित शिकले पाहिजे असे नाही. तर मुलांना खेळीमेळीनी रोजच्या व्यवहारात गणित शिकवले पाहिजे. याकरता पालकांनी त्यांना भाजीच्या दुकानात किंवा मॉलमध्ये घेऊन जावे व दुकानात घेऊन गेल्यावर त्यांना पैशांची देव-देव शिकवली पाहिजे. यातून त्यांना हिशोब तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना शिकवल्या पाहिजे.
२) संख्येचे ज्ञान करून देणे–गणित हा विषय मुख्यत्वे संख्यांवर अवलंबून असतो लहानपणापासून मुलांना पालकांनी किंवा शिक्षकांनी दैनंदिन व्यवहारात ज्या वस्तू आपल्यासमोर दिसत असतात, उदाहरणार्थ काही मणी,फळे, इतर वस्तू द्वारे त्यांना मोजणे शिकवले पाहिजे.
३) गणिताचा पाया असलेले पाढे पाठ करून घेणे—मुलांकडून रोजच पाढे म्हणून घेतले पाहिजे. त्याकरता हसत खेळत मुलांना कंटाळा येणार नाही अशा तऱ्हेने पाढे पाठ करून घ्यायला पाहिजे. तसेच ते रोज लिहून सुद्धा घेतले गेले पाहिजे. लहानपणापासून जसे जसे मुलं मोठे होत जातात तसे पाढे म्हणण्याची संख्या वाढत असते. अशावेळी लहान आकड्यांचे पाढे विसरून चालणार नाही, तर दोन पासून पुढचे पाढे रोजच म्हणून घेतले गेले पाहिजे. त्याकरता काही छोट्या छोट्या युक्ती असतात त्या मुलांना सांगितल्या पाहिजे.
४) विविध खेळांद्वारे गणित शिकवणे– बाजारातले अनेक गेम गणित शिकवायला उपयोगी पडतात.सापशिडी, ब्लॉक गेम यांच्या द्वारे गणित शिकवणे सोपे जाते. आपल्या घरातील जिन्याच्या पायऱ्यांवर आकडे लिहून त्यांना मोजणे शिकवता येते
अनेक बिजनेस गेम द्वारे हिशोब शिकवता येतो. सुडोकू ,क्रॉसवर्ड यासारखे अनेक संख्यांचे खेळ बाजारात मिळतात. त्यांचा वापर कसा करायचा हे शिकवून, त्याचा त्यांच्याकडून पालकांनी किंवा शिक्षकांनी सराव करून घेतला पाहिजे.
५) खाण्याच्या पदार्थांद्वारे अपूर्णांक शिकवणे–मुलांना जे पदार्थ खायला आवडतात, उदाहरणार्थ पिझ्झा, कुकीज, वेगवेगळे बिस्किट्स यांना अनेक भागांमध्ये कापून त्यांच्या द्वारा अपूर्णांक म्हणजे काय हे शिकवता येते. म्हणजेच एका पूर्ण भागातून त्यांनी किती तुकडे केले या संकल्पने द्वारा अपूर्णांक शिकवता येतो. एका कुकीचे पाच भाग केले असता प्रत्येकाला किती मिळणार? असे त्यांना या उदाहरणामार्फत शिकवता येते.
६) तक्ते तयार करणे—अगदी लहान मुले म्हणजे बालवर्ग ते सहावी ते सातवीच्या मुलांपर्यंत अनेक प्रकारचे तक्ते तयार करून शाळेत अथवा घरी लावणे हा गणितातील रुची वाढवण्याचा अत्यंत चांगला उपाय आहे. पाढे, संख्या वर्गमूळ, घनमूळ, भूमितीचे अनेक आकार, त्यांचे गुण इत्यादींचे तक्ते करून भिंतीवर लावल्यास मुलांचे त्याच्याकडे वारंवार लक्ष जाऊन त्यांच्या लक्षात राहण्याचे प्रमाण वाढू शकते.
७) मुलांची स्तुती करून त्यांचे मनोबल वाढवणे—लहान मुले अथवा वाढत्या वयातील मुले सुद्धा गणित करताना कधी कधी चुकत असतात. पण जेंव्हा ते गणित नीट सोडवतात, तेव्हा त्यांचे कौतुक केले पाहिजे व त्यांचे आत्मबल वाढवून त्या प्रकारची उदाहरणे परत परत सोडवण्यासाठी त्यांना उत्साहित केले गेले पाहिजे त्यामुळे त्यांची गणितातील रुची वाढते.
८) एकच उदाहरण पण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्यास प्रवृत्त करणे—झाडाच्या खाली दिलेले एखाद्या उदाहरण आपण त्यांना सोडवून दाखवल्यावर तेच उदाहरण परत त्यांना कुठल्या दुसऱ्या पद्धतीने सोडवता येते का? हे याचा सराव त्यांच्याकडून करून घेणे ही पद्धत अतिशय उत्तम आहे. या पद्धतीमुळे एकच उदाहरण ते खूप वेळा वाचतात व वेगळ्या वेगळ्या मितीं मधून त्याचा विचार करतात.त्यामुळे विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया सुद्धा खूप वाढते.
९) भूमितीतील आकार दैनंदिन जीवनातील वस्तूंमधून शिकवणे—विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आकाराची जाण आपण आपल्यासमोर असलेल्या वस्तूंमधून देऊ शकतो. आयात, चौकोन मैदानाची उदाहरणे दाखवू शकतो. आपल्याकडील एखादं टेबल किंवा गोलाकार खुर्ची यांचे आकार दाखवू शकतो. तसेच तीन मिती आपण भिंती द्वारे दाखवू शकतो. ज्याला लांबी रुंदी आणि उंची असते.
१०) शाळेत सोडवलेले उदाहरण पुन्हा घरी येऊन सोडवणे—
गणितात गती वाढवणे व रस वाढवणे याकरता एकदा सोडवलेले उदाहरण पुन्हा पुन्हा सोडवणे फार गरजेचे असते. शाळेत शिक्षकांनी सोडवलेली गणिते परत घरी येऊन एकदा किंवा समजेपर्यंत सोडवले तर, विद्यार्थ्यांना गणित हा विषय लवकर समजतो व त्याच प्रकारची उदाहरणे ते नीट सोडवू शकतात.
११) समवयस्क मुलांना गटचर्चा करण्यास तयार करणे—
एखादे उदाहरण सोडवण्याबाबत एकाच वयाच्या मुलांना चर्चा करण्यास सांगणे. त्यामुळे त्यांना एकमेकांचे विचार समजतात व उत्साह सुद्धा वाढतो.
१२) गणितातील सूत्रांचा सराव —-गणितामध्ये बरेचशी उदाहरणे गणितीय सूत्रांवर आधारित असतात. ही सूत्रे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावी लागतात. त्याकरता एका मोठ्या बोर्डवर किंवा चार्ट पेपरवर सूत्रे लिहून मुलांच्या खोलीमध्ये भिंतीवर लावली व रोज पाच वेळा त्याचा सराव केला तर ते निश्चितच चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतात. किंवा सोडवलेलं गणित बघून त्यात कुठल्या सूत्राचा वापर केला आहे हे ओळखण्यासाठी पालकांनी जर विद्यार्थ्यांना सराव दिला तर ती सूत्रे अधिकच चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील.
एकंदरीतच गणित हा विषय सरावाचा आहे. सरावाने गणित विषय सोडवायला सोपा जातो. जितका जास्त सराव करू तितका तो विषय सोपा होत जातो व त्यातून रूची निर्माण होते. .असा सराव पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला तर त्यात त्यांना अधिकाधिक गोडी वाटू लागेल. व त्यानंतर ते स्वतःच गणिताची उदाहरणे आपल्या मनाने सोडवू लागतील.
तुम्हाला ही माहिती (Simple tips to improve math skills of kids in Marathi )कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका –सौ वैशाली देव (पुणे)
छान लिखाण , खरच गणीता शिवाय पर्याय नाही. लहान मुलं साठ्ठी उपयोगी आणि त्यांच्या पलका साठी फारच उपयोगी माहिती. यांनी पाया पक्का करायला मदत होईल 🙏.
धन्यवाद 🙏
छान आणि विषयाला साजेसा to the point लेख.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏
Very informative! Lovely!
Thank you 👍
Very aptly written
Thank you 👍
Very well explained
Thank you 👍
Correct 💯, nicely explained
Thank you so much 😊
Very well written and informative article.
Thank you so much