पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सोपे मार्ग l Simple ways to avoid water wastage

WhatsApp Group Join Now

Simple ways to avoid water wastage:मानवाच्या असलेल्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजांसोबतच “पाणी” ही देखील सर्वात महत्वाची अशी गरज आहे. आजच्या प्रगत काळातही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या विविध भागांत कित्येक अशी ठिकाणं आहेत जिथे पाण्याचा तुटवडा लोकांना सहन करावा लागतो. त्याचे परिणाम भोगावे लागतात. 

धरणांमध्ये असलेली पाण्याची पातळी ही पुरेशी दिसत असली तरी मुबलक म्हणता येणार नाही. सोबत कधी अनपेक्षित परिस्थिती मुळे पाणी प्रश्न निर्माण होत असतात. जसे नुकतेच, २६ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या पिसे जलउदंचन केंद्रातली यंत्रणा ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने बिघडली होती. त्यामुळे मुंबईसह भिवंडी, ठाणे शहर आणि नगरबाह्य विभागातील पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. दुरुस्ती नंतर पिसे केंद्रातील २० पंप आणि पांजरापुर जलशुद्धीकरण केंद्र ही सुरळीत चालू करण्यात आले आणि ६ मार्चपासून पाणी कपातही हटवण्यात आली. 

सध्याची ही स्थिती थोडीशी समाधानकारक असली तरी चिंताजनक सुद्धा आहे. काही भागात पाणी टंचाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये सद्या पाणीसाठा कमी होत असल्याची चर्चा आहे. कारण नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणी साठा हा ५०% च्या खाली आहे. 

उन्हाळा अजून पूर्णपणे सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणी साठयाची पातळी कमी होत आहे. केवळ ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला असलेली ही वस्तुस्थिती पाहता उन्हाळ्यात पाणी पुरवठा अपुरा पडण्याची शक्यता आहे. 

मुंबईतील धरणांच्या साठ्याची उपलब्ध टक्केवारी अशी आहे.- अप्पर वैतरणा -६८%, तानसा – ५२%, मोडक सागर – ३४%, मध्य वैतरणा – १२%, भातसा -४१%, तुळशी -५४%, विहार -५३% तसेच कोकणात एल-निनो च्या प्रभावामुळे पावसामुळे झालेल्या परिणामाने शिळ धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला नाही. शिवाय, उष्ण तापमानाने बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे रत्नागिरी मध्ये पालिकेने शिल्लक पाणीसाठा पुरवण्यासाठी १ मार्च २०२४ पासून आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार असे २ दिवस पाणी कपात लागू केली आहे आणि नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ २४.८१% पाणी साठा शिल्लक आहे. तेथील ४०० हून अधिक गावं जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. 

फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार पुण्यातील धरणांमध्ये एकूण ५५.५५ % पाणीसाठा असला तरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये काही गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. एकूणच राज्यातील पाणीसाठा हा थोडाफार चिंता करण्यासारखा आहे. ह्या वर्षी पावसाळा वेळेत सुरू झाला तर ही चिंता उरणार नाही. तरी फक्त चिंता करण्यापेक्षा अनेक गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. 

दिवसभरात आपण पाण्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक वेळा वापर करत असतो. त्यासोबत आपल्याकडून कळत नकळत बऱ्याचदा अतिरिक्त पाणी वाया जात असते ह्याची कल्पना ही नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष होते.  पाण्याचा अपव्यय (Wastage of Water) होऊ द्यायचा नसेल तर सुरुवात ही स्वतः पासूनच करायला हवी. त्यासाठी महत्त्वाचा मार्ग म्हणजे जलसंधारण किंवा पाण्याची बचत करणे (Save Water) आणि त्यासाठी प्रत्येकानेच साध्या सोप्या गोष्टींची सवय करून घ्यायलाच हवी. 

तहानलेल्या कावळ्याची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. वणवण भटकल्यावर त्याला एक पाण्याचा घडा दिसतो. पण त्यात पाणी एकदम तळाला असल्याने त्याची चोच तिथपर्यंत पोहोचतच नाही. तेव्हा तो युक्तीने अशी एक छोटी गोष्ट करतो ज्यामुळे ते पाणी पिऊन त्याची तहान तर भागतेच शिवाय आपल्याला ह्या गोष्टीतून ही शिकवण मिळते की, कुठलाही प्रश्न किंवा संकट कितीही मोठं असलं तरी अगदी साधे सोपे उपायांनीही ते प्रश्न सोडवता येतात. 

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काय करू शकतो? Simple ways to avoid water wastage in India

  • वापर नसताना नळ पूर्ण बंद ठेवा. Close the Tap when not in use. बऱ्याचदा काम झाले की आपण नळ बंद तर करतो पण तो पूर्ण बंद झाला आहे का हे पाहिलं जात नाही. नळ थोडा जरी उघडा राहिला तरी कित्येक लिटर पाणी न वापरता फुकट जाते. हे लक्षातही येत नाही. तेव्हा कुठलेही कामं झाले, कितीही घाईत असलो तरी नळ पूर्ण बंद झाला आहे का ह्याची खबरदारी प्रत्येकानेच घ्यायला हवी. 
  • प्रत्येक थेंबाचा वापर करा. Use each drop. पाणी हे जीवन आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. जिथे पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही किंवा 24 तास पाणी उपलब्ध असले तरी पाण्याचा अपव्यय टाळला गेला पाहिजे. कित्येक लोकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून जर आपल्याकडे मुबलक पाणी असेल तर त्याचा कसाही वापर करू नये. प्रत्येकाकडूनच पाण्याचा कायम आदर ठेवला गेला पाहिजे.
  • गळती रोखा. Prevent Leakage. आपल्या घरातील, कार्यालयातील, सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे नळ बिघडले असतील, सतत पाणी गळत असेल तर ते वेळीच दुरुस्त केले जायला हवे. दुरुस्त केल्यावरही गळती थांबत नसेल तर ते बदलून नवीन आणि चांगल्या प्रतीचे नळ लावून घ्या.
  • दात घासताना आणि दाढी करताना नळ बंद ठेवा. Keep the tap closed while brushing teeth. दात घासताना आणि दाढी करताना अनेकांना नळ सुरू ठेवायची सवय असते. तसे करणं बंद केले पाहीजे. वापर नसताना उगाचच नळ सुरू ठेवायची गरज नसते. अशा सवयीने पाणी वाया घालवू नये. 
  • आंघोळीच्या वेळेस पाण्याचा अपव्यय होऊ देऊ नका. Don’t waste water while bathing. बाथ टब आणि शॉवरचा वापर टाळल्याने किंवा कमी केल्याने पाण्याची बचत करता येते. तेव्हा ही गरजेपुरतेच पाणी वापरा.
  • भांडी धुताना नळ बंद ठेवा. Turn off the faucet while washing dishes. घरगुती कामांमध्ये भांडी धुताना अतिरिक्त पाणी वाया जाण्याची शक्यता जास्ती असते. भांड्यांना साबण लावत असताना नळ सुरू ठेवणे योग्य नाही. धुणी, भांडी करण्यासाठी येणाऱ्या मावशींना ही नळ सुरू ठेवून काम करण्यास रोखा. त्यांना हा मुद्दा पटवून द्या. शिवाय नळ हळू चालू ठेवा. Turn on the faucet slowly.
  • एकाच वेळी सगळे कपडे धुवा. Wash all clothes at a time. पाण्याच्या वापरात अतिरिक्त पाणी कपडे धुतानाही वाया जातं. दिवसभरात कपडे धुताना एकाच वेळी धुतले जाईल ह्याची काळजी घ्या. कपड्यांना साबण लावताना अनेकांना नळ सुरू ठेवण्याची सवय असते. बादली भरून वाहू लागली तरी नळ बंद केले जात नाहीत. तेव्हा ही सवय बदलून गरज असेल तेवढे पाणी वापरले पाहीजे. कपडे भिजवलेले साबणाचे पाणी बाथरूम फ्लोअर धुवायला वापरू शकता. 
  • वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर. Reuse of water. फळं, भाज्या, कोथिंबीर, तांदूळ, डाळी, कडधान्य इत्यादी वस्तू धुतलेले पाणी वेगळ्या भांड्यात काढा आणि ते झाडांना द्या. म्हणजे वापरलेले पाणीही वाया जाणार नाही आणि अतिरिक्त पाण्याची बचतही होईल.
  • साठवलेले पाणी फेकून देऊ नका. Do not throw away stored water. टाकीमध्ये, बाटलीत किंवा बादलीत / हंडा – कळशी मधलं पाणी कधी खराब होत नाही. उगाच फेकून देऊ नका. ग्रहणाच्या काळातही साठवलेले पाणी वापरू नये अशा अंधश्रद्धा मानून अनेक जण त्या काळात घरात साठवलेले पाणी फेकून देतात. असं अजिबात करू नका. ग्रहण काळातील पाण्याने काहीही नुकसान होत नसते. नद्या – तलाव – धरणांमध्येही ग्रहण काळात पाणी तसेच असतेच ना. तेच पाणी आपण नंतर वापरतोच; मग घरातलं पाणी फेकून काय फरक पडणार आहे ? ह्याचा नीट विचार करा.
  • पाहुण्यांना किंवा कामासाठी आलेल्या व्यक्तीला पाणी देताना पूर्वीची पद्धत वापरा. आधीच्या काळात कोणालाही पाणी देताना तांबा आणि पेला वापरला जाई. हल्लीच्या काळात शहारांसोबत हळूहळू गावागावातही ही पद्धत बदलत चालली आहे. तरी कित्येक गावांत आजही ह्याच पद्धतीने पाणी दिले जाते आणि हेच योग्य ही आहे. पूर्ण पेलाभरून पाणी देणं पूर्णपणे चुकीचे नाही पण समोरची व्यक्ती तेवढं सगळं पाणी पिणार आहे की नाही हे आपल्याला माहीत नसते. तेव्हा ते त्यांना हवे तेवढं पाणी पितात आणि उरलेलं पाणी उष्ट झाल्यामुळे ते फेकून दिले जाते. तेव्हा पूर्वीची तांब्या-पेल्याची पद्धत वापरा. म्हणजे समोरची व्यक्ती हवे तेवढंच पाणी घेतील आणि पाण्याचा अपव्यय टाळता येईल. हेच आपण स्वतः पाणी पितानाही केले पाहिजे.
  • उपहारगृहांमध्ये गरज नसताना अतिरिक्त पाणी घेऊ नका. Don’t take extra water in canteens or restaurants unless needed. वाढपी / वेटर सारखे सारखे पाणी देत राहतात ते बंद केले पाहिजे, जर आपण अजून आणि पिणार नसू तर आपणही त्यांना पेल्यामध्ये पाणी ओतण्यापासून अडवले पाहिजे. काही ठिकाणी बाटली देतात तेव्हा ही आपण आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे. 
  • गृहनिर्माण संस्था किंवा सोसायट्यांनी ह्या कशी गोष्टींची काळजी घ्यायला हवी. इमारतींचे मजले स्वच्छ करण्यासाठी पाणी ओतून धुणे बंद केले पाहिजे. त्यामुळे भरपूर पाणी वाया जाते. त्याऐवजी बादली आणि कपड्याचा वापर करा. किंवा मॉप वापरू शकतो.
  • गाड्या स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा. Use a wet cloth to clean the cars. गाड्या मग त्या कोणत्याही असो; स्वच्छ करण्यासाठी भरपूर पाणी ओतून धुतल्या जातात. अशावेळी बादलीत पाणी घेऊन कपड्याने त्या पुसून पण स्वच्छ केल्या जाऊ शकतात. रोजच गाडी स्वच्छ केली जाते तर भरपूर पाणी ओतण्याची गरज नसते. आणि जर पाणी ओतून गाडी धुण्याची गरज असेल तर माती असलेल्या जमीनीवर धुवा किंवा ते पाणी मातीत जाईल ह्याची सोय करा. जेणेकरून ते पाणी माती मध्ये मुरेल. 
  • रंगपंचमी खेळा पण जरा जपून. Play Holi but be careful. रंगपंचमी जवळ आली आहे. तेव्हा पाण्याचा वापर जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न प्रत्येकाने कटाक्षाने करायला हवा. सण साजरा करायचा तर कोरड्या रंगाने खेळूनही साजरा करता येईल. तेव्हा नैसर्गिक रंगांचाच वापर करा, आणि असे  रंग वापरा जे लगेच साफ होतील. जे साफ करायला जास्ती पाणी वापरले जाणार नाही. 
  • लहान मुलांना पाण्याशी खेळण्यापासून रोखा. Prevent children from playing with water. लहान मुलं कित्येकदा पाण्याचा खेळ खेळत राहतात. त्यांच्या नकळत बरेच पाणी उपसले जाऊन वाया जाते. तेव्हा त्यांना नीट समजावून तसे करण्यापासून रोखा. पाण्याचे महत्त्व पटवून द्या. जेणेकरून ते पाणी कधीच वाया घालवणार नाहीत. 
  • पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करा. Rainwater harvesting. पावसाळा सुरू व्हायला अजून थोडा काळ आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्याची सोय करायला एवढा कालावधी नक्कीच पुरू शकतो. पावसाच्या पाण्याची साठवण करणारे प्रकल्प आपल्या परिसरात झाले पाहिजे त्या साठी सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. आणि अशा सुविधा प्रत्येकाने आपल्या परीने करायला हव्यात जेणेकरून पाण्याचा तोटा कधीच जाणवणार नाही. 
  • संस्थांना सहकार्य करा. Cooperate with organizations. पाणी संवर्धन आणि पाणी बचत करणाऱ्या अनेक लहान मोठ्या संस्था कार्यरत आहेत. अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात.  त्यांच्या कार्यात आपले योगदान देण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा. 

आपल्याकडे मुबलक पाणी २४ तास असते म्हणून मला ह्या सर्वाचा विचार करायची गरज नाही. ही मानसिकता आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ती बदलली तर खऱ्या अर्थाने पाण्याचा म्हणजेच जीवनाचा आपल्याकडून आदर ठेवला जाईल. समाजात राहताना आपल्यासोबत इतरांनाही पाण्याची तितकीच आवश्यकता असते हे कायम लक्षात ठेवून प्रत्येकानेच पाण्याची बचत करण्याचे मोलाचे काम करायलाच हवे. 

पाणी वाचवण्याचे सोपे मार्ग (Easy Ways to Save Water) सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला? पाणी वाचवण्यासाठी करण्यासाठी तुम्ही काय करता? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहे. 

आपल्या मित्र परिवाराला हा लेख नक्की पाठवा. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहितीपर लेखांसाठी, बातम्यांसाठी, नवनवीन कथांसाठी आपल्या ‘लेखकमित्र’ वेबसाईटला नेहमी नक्की भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप चॅनल ही फॉलो करा.

वाचक मित्रहो, खूप खूप धन्यवाद.  

2 thoughts on “पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सोपे मार्ग l Simple ways to avoid water wastage”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top