६.स्कंदमाता
या देवी सर्वभूतेषु
मा स्कंदमाता रुपेण संस्थिता
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तसे नमो नमः !
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पवित्र दिवसांत, माता दुर्गेच्या नऊ अवतारांची, म्हणजेच नवदुर्गांची, उपासना करून तिचा आशीर्वाद आपण मागतो. मंडळी , हा भक्तीचा, उत्साहाचा व आनंदाचा पर्वकाळ आपण विविध पद्धतीने साजरा करतो. मातेची ,वेगवेगळ्या स्वरूपात पूजा, अर्चना करून आपण तिला प्रसन्न करण्यासाठी रात्रही जागवतो. भारतीय संस्कृतीत नवदुर्गांच्या अवतारा॑विषयी पुराणं काळापासून चालत आलेल्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. शक्तीचे स्वरूप असलेल्या ,माता पार्वतीने वेगवेगळ्या प्रसंगी हे अवतार धारण केले असल्याचे, त्यात सांगितले जाते. आज मी आपल्याला स्कंदमातेच्या अवताराविषयी माहिती या लेखात सांगणार आहे. .
स्कंदमाता स्वरूपाची अर्थ व वैशिष्ट्ये_
मंडळी, भगवान शंकरा॑चा पुत्र ‘कार्तिकेय’ ,यालाच ‘स्कंद’ असे म्हटले जाते. त्यामुळेच त्याची माता ‘पार्वती’लाच ‘स्कंदमाता’ असेही म्हटले जाते. ‘स्कंद’मातेचे स्वरूप अत्यंत विलोभनीय असे आहे. ती सिंहावर आरुढ असून, तिला चार हात आहेत. तिच्या दोन हातांमध्ये कमल पुष्पे असून, तिसऱ्या हाताने तिने तिचा पुत्र कार्तिकेय याला मांडीवर धरले आहे. तिचा चौथा हात अभयमुद्रेत असून, माता आपल्या भक्तजना॑ना आशीर्वाद देत आहे. स्कंदमातेच्या मुद्रेवर प्रसन्नता, ममता व स्नेहार्दता आहे. मातेच्या या अवताराची आख्यायिका ही खूप रोचक अशी आहे.
अवतार कथा _
देवीचा ‘सती ‘अवतार जेव्हा संपुष्टात आला, तेव्हा दुःखाने उद्विग्न झालेल्या भगवान शंकरांना, भौतिक जगाबद्दल विरक्ती उत्पन्न झाली .दुःखाने सर्व जगापासून दूर, घोर वनात ते तपश्चर्येसाठी निघून गेले. हजारो वर्षे ते ध्यानावस्थेतच राहिले. असे म्हटले जाते की, त्याच काळात ‘तारकासुर’ नावाच्या राक्षसाने तपश्चर्या करून भगवान ब्रम्हाला प्रसन्न केले. व असे वरदान मागितले की, त्याचा मृत्यू फक्त महादेवांच्या पुत्राच्या हातानेच होईल. हे होणे अशक्य असल्याने, तारकासुर मातला होता. त्याला कोणाची भीती उरली नव्हती. देवी देवता, ऋषीमुनी व संपूर्ण जीवसृष्टी त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाली होती. सर्व देवीदेवता मदतीसाठी भगवान विष्णूकडे गेल्यावर त्यांनी, हिमालयकन्या म्हणून ‘पार्वतीचा’ जन्म झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे, देवर्षी नारदांनी पार्वतीला तपश्चर्या करून भगवान शंकरांशी विवाह करावा असे सुचविले. कालांतराने शिवपार्वती विवाहानंतर, पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकरांनी, पंचमहाभूतांना शक्ती सोबत जोडून एक ‘शक्तीपुंज’ तयार केला. असे सांगितले जाते की, त्याला सरोवरापर्यंत वाहून नेत असताना अग्नीकडून तो खाली सांडला. सहा कृतिकांनी स्वतःच्या गर्भात त्याचे रक्षण केले. त्यानंतर त्या सहा भागांमधून (तुकड्यांमधून) जे बाळ जन्माला आले, त्यालाच आपण ‘कार्तिकेय’स्वामी असे म्हणतो. त्यांनाच ‘स्कंद’ असेही म्हटले जाते .दक्षिणेत स्वामी कार्तिकेय यांनाच मुरगन म्हटले जाते . त्यांची असंख्य मंदिरे दक्षिण भारतात बघावयास मिळतात.
अशा पद्धतीने स्कंदाच्या म्हणजेच कार्तिकेयाच्या जन्मानंतर , अत्यंत आनंदित होऊन , देवीदेवतांनी तारकासुराचा वध करण्यासाठी त्यांची प्रार्थना केली. असे म्हटले जाते की, स्कंदमातेनेच कार्तिकेय यांना युद्ध प्रशिक्षण दिले. तारकासुराचा वध करून स्वामी कार्तिकेय, ‘स्कंद’ म्हणून प्रसिद्ध झाले तर माता-पार्वती ‘स्कंदमाता’ म्हणून प्रसिद्धी पावली.
पूजा विधी व पूजेचे महत्व_
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ स्वरूपात देवीची पूजा,आराधना केली जाते. देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली जातात. केशरयुक्त खीर, पिवळ्या रंगाची मिठाई आणि केळांचा प्रसाद, मातेला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. असे म्हटले जाते की, संतानप्राप्तीसाठी ही स्कंदमातेची उपासना व प्रार्थना केली जाते. कुटुंबाच्या कल्याणासाठी ,सुखशांती ,आनंद व विजयप्राप्तीसाठी स्कंदमातेची उपासना केली जाते. सजीव सृष्टीला नवचैतन्य देणारी ,सांभाळणारी , कल्याणकारी माता म्हणून स्कंदमातेला पुजले जाते.
मंडळी, आपणा सर्वांवरही स्कंदमातेची अशीच कृपा सदैव राहो !
आजचा लेख तुम्हाला कसा वाटला , ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद!
लेखिका –प्रतिमा प्रमोद