अनेक जण भटकंती करण्यासाठी जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतात. आता या ठिकाणाच्या यादीत एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे अंतराळ!! अंतराळ पर्यटनाची (स्पेस टूरिझम) कल्पनाच अतिशय रोमांचकारी आहे. अंतराळात प्रवास करण्याचे स्वप्न अनेकजणांनी बघितले असेल. पण एका भारतीयाने त्याचे हे स्वप्न नुकतेच साकार केले. त्याचे नाव आहे गोपी थोटाकुरा. ‘अमेझॉन’ या प्रसिद्ध कंपनीचे संस्थापक ‘जेफ बेझोस’च्या ब्लू ओरिजिनने १९ मे २०२४ रोजी त्यांचे सातवे मानवी अंतराळ उड्डाण, एनएस-२५ मिशन प्रक्षेपित केले. मूळचे आंध्र प्रदेशातील असलेले आणि सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले उद्योजक, वैमानिक गोपी थोटाकुरा या भारतीयासह सहा जणांच्या क्रूचे अंतराळ उड्डाण यशस्वीपणे करण्यात आले. हा प्रवास सुमारे १० मिनिटांचा होता.
अंतराळ प्रवासाबद्दल मानवाच्या मनात नेहमीच उत्सुकता आणि कुतूहल असते. अंतराळ प्रवास म्हणजे काय? तो कसा करतात? भविष्यात मानवाला अंतराळात रहाणे शक्य होईल का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ यात.
अंतराळ पर्यटन म्हणजे काय?
अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर केलेला प्रवास म्हणजे अंतराळ पर्यटन.
हे अंतर किती असते? म्हणजे पृथ्वीपासून नक्की किती अंतरावर अंतराळ ‘सुरू’ होते? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तर, समुद्रसपाटीपासून साधारण १०० किमी वर एक काल्पनिक रेषा मानली गेली आहे. तिला ‘कॅमरन रेषा’ असे म्हणतात. पृथ्वीचे वातावरण आणि अंतराळ यांना विभागणारी ही एक काल्पनिक रेषा आहे. म्हणजे या रेषेच्या पलीकडे प्रवास केल्यास तो ‘अंतराळ प्रवास’ गणला जातो आणि असा प्रवास करणारी व्यक्ती ‘अंतराळप्रवाशी’ होते. सध्या हा अंतराळ प्रवास पृथ्वीपासून १०० किमी ते ४०० किमी एवढ्या अंतरासाठी होतो. (तुलनेसाठी लक्षात घ्या: चंद्र पृथ्वीपासून साधारण ३ लाख ८४ हजार किमी अंतरावर आहे.)
अंतराळ प्रवासाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत.
१) उप-कक्षीय प्रवास : या प्रकारात पृथ्वीच्या वातावरणाच्या वर थोड्या वेळासाठी अंतराळात घेऊन जातात, परंतु कुठल्याही कक्षेत मात्र नेत नाहीत.
२) कक्षीय प्रवास : या प्रकारच्या अंतराळ पर्यटनात पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळयानातून पर्यटकांना नेले जाते. अशा अंतराळयानातून प्रवाशांना पृथ्वीचे विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद लुटता येतो.
अनेक कंपन्या सध्या या क्षेत्रात कार्यरत आहेत, तर अनेक कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. प्रसिद्ध उद्योगपती सर रिचर्ड ब्रॅन्सन यांचे व्हर्जिन गॅलेस्टिक हे या क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. त्यांचे अंतराळ पर्यटनाचे तिकीट दोन कोटी रुपयांपासून सुरु होते. वर उल्लेख केलेल्या ‘जेफ बेझोस’ यांच्या ब्लू ओरिजिनच्या तिकिटाची किंमत अद्याप निश्चित नाही. पण ती अंदाजे अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल. इलॉन मास्क यांची स्पेस एक्स ही कंपनीही अंतराळ पर्यटन क्षेत्रात आहे. या बाजारपेठेत भारतही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) २०३० पर्यंत अंतराळ प्रवास सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या तिकिटाची किंमत सहा कोटी रुपये असेल. नजीकच्या भविष्यात यात इतरही काही नावे पुढे येऊ शकतील. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात पैसे देऊन अनेकजण अंतराळ पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात.
अंतराळ प्रवासासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान:
अंतराळ प्रवासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. यात प्रामुख्याने खालील तंत्रज्ञानाचा समावेश होतो.
१) वाहतूक प्रणाली: अंतराळात प्रवास करताना जी वाहतूक प्रणाली वापरली जाते तीत प्रामुख्याने दोन गोष्टींचा समावेश होतो.
i) अंतराळयान : पर्यटकांना अंतराळात घेऊन जाणारे वाहन म्हणजे अंतराळयान. सध्या विविध प्रकारची अंतराळयाने वापरली जात आहेत.
व्हर्जिन गॅलॅक्टिकचे स्पेसशिप टू :हे उप-कक्षीय अंतराळयान पर्यटकांना पृथ्वीच्या वातावरणाच्या वर १०० किमी पर्यंत नेण्यासाठी विकसित केले आहे.
ब्लू ओरिजिनचे न्यू शेफर्ड : हे ही एक उप-कक्षीय अंतराळयान आहे जे पर्यटकांना पृथ्वीच्या वातावरणाच्या वर १०० किमी पर्यंत नेण्यासाठी विकसित केले आहे.
स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन: या कक्षीय अंतराळयानाची रचना पर्यटकांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) नेऊन जाण्यासाठी केलेली आहे.
स्पेसएक्सचे स्टारशिप: हे एक मोठे कक्षीय अंतराळयान आहे ज्याची रचना पर्यटकांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी केलेली आहे.
ही अंतराळयाने सध्या वापरली जात आहेत किंवा नजीकच्या भविष्यकाळात वापरली जाणार आहेत. जसजसे तंत्रज्ञान विकसित होईल तसतशी अधिक प्रगत आणि सुरक्षित अंतराळयाने विकसित होतील.
ii) रॉकेट: अंतराळयानाला पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर काढण्यासाठी तसेच कक्षीय अंतराळयानाला त्याच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी रॉकेटचा वापर केला जातो. यात द्रव इंधनावर चालणारी पारंपरिक रॉकेट्स, द्रव व घन इंधनावर चालणारी हायब्रीड रॉकेट्स, आयन्स व प्लाझ्मा वापरणारी इलेक्ट्रिक रॉकेट्स समाविष्ट आहेत. हवेतील ऑक्सिजनचा वापर करुन इंधन जाळणारी रॉकेट्सही निर्मनाधीन आहेत. तसेच काही अंतराळयाने अशीही आहेत जी रॉकेट इंजिनशिवायही अंतराळात फिरू शकतात.
२) जीवन सहाय्यक प्रणाली: पर्यटकांना अंतराळात श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन, पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी तसेच अन्न यांची आवश्यकता असते. यासाठी दोन पर्याय असतात. एक तर ते पृथ्वीवरून घेऊन जाता येते किंवा अंतराळयानातच तयार केले जाऊ शकते. पर्यटकांना आरामदायक तापमानात ठेवण्यासाठी इन्सुलेटर्स, हिटर्स व एअर कंडिशनर्स वापरली जातात.
३) संवाद व नेव्हिगेशन: रेडिओचा वापर करून पर्यटक पृथ्वीवर असलेल्या नियंत्रण कक्षाशी संवाद साधू शकतात. तसेच यानाला अंतराळात नेव्हिगेट करण्यासाठी जीपीएस चा वापर केला जातो.
४) पर्यटकांची सुरक्षितता: अंतराळात पर्यटकांचे अति थंडी, अति उष्णता, विकिरणे तसेच निर्वात स्थिती यापासून संरक्षण करण्यासाठी स्पेससूट वापरतात. आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी विशेष प्रणाली असते.
अंतराळ पर्यटनाचे फायदे:
१) अंतराळ पर्यटनामुळे माणसाला आपल्या विश्वाबद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल.
२) तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये करियर करण्याची प्रेरणा मिळेल.
३) नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी ते उपयुक्त आहे.
४) अंतराळ पर्यटनामुळे अंतराळ संशोधनास निधी उपलब्ध होऊ शकेल.
५) आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यास ते उपयुक्त आहे.
अंतराळ पर्यटनातील संभाव्य धोके आणि जोखीमा:
१) अंतराळ प्रवास अत्यंत महाग आहे आणि तो फार कमी जणांना परवडू शकेल.
२) अंतराळ प्रवास धोकादायक असू शकतो. अंतराळयान किंवा प्रक्षेपक यांच्या अपघाताचा धोका नेहमीच असतो.
३) अंतराळ प्रवासामुळे मानवाच्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. खूप जास्त दिवसांचा प्रवास असल्यास अंतराळवीराला एकटेपणा वाटू शकतो व त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
४) अंतराळयानाच्या प्रक्षेपणाच्या वेळी हवा तसेच ध्वनी प्रदूषण होऊ शकते.
५) अंतराळ पर्यटनामुळे अंतराळ कचऱ्यात वाढ होऊ शकेल.
अंतराळ पर्यटनाचे भविष्य: अंतराळ पर्यटन सध्या अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. अनेक आव्हाने समोर असतानाही भविष्यकाळात ते वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात विकसित तंत्रज्ञानाचा साहाय्याने कमी खर्चात अधिकाधिक लोकांसाठी अंतराळ पर्यटन उपलब्ध होऊ शकेल. तसेच तो अधिक सुरक्षीत होईल. भविष्यकाळात अंतराळ पर्यटनाच्या क्षेत्रात खालील गोष्टी समाविष्ट होऊ शकतात.
i) कमर्शियल अंतराळ स्थानके: अनेक खाजगी कंपन्या कमर्शियल म्हणजे व्यापारी तत्त्वावर अंतराळ स्थानके बांधण्याच्या योजना आखत आहेत. या स्थानकांमुळे पर्यटकांना कक्षेत राहण्यासाठी तसेच अंतराळाचा अनुभव घेण्यासाठी जागा उपलब्ध होईल.
ii) चंद्र आणि मंगळावरील प्रवास: काही कंपन्या चंद्र आणि मंगळावर मानवी प्रवासी पाठवण्यासाठी काम करत आहेत. अर्थात, हे प्रवास खूप महाग असतील. परंतु कालांतराने ते अधिक परवडणारे होऊ शकतील.
iii) पॉइंट-टू-पॉइंट अंतराळ प्रवास: सध्या, अंतराळ प्रवास म्हणजे पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाणे आणि पुन्हा परतून येणे अशी कल्पना आहे. तथापि, काही कंपन्या रॉकेट किंवा अंतराळयानाच्या सहाय्याने पृथ्वीवरील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी (पॉइंट-टू-पॉइंट) अंतराळ प्रवास विकसित करण्यासाठी काम करत आहेत, ज्यामुळे लोकांना जगभरात जलद गतीने प्रवास करता येईल.
iv) अंतराळ हॉटेल्स: काही कंपन्या अंतराळ हॉटेल्स बांधण्याच्या योजना आखत आहेत. त्यामुळे पर्यटक अंतराळात दीर्घकाळ राहू शकतील व अंतराळाचा अनुभव घेऊ शकतील.
अंतराळ पर्यटन आणि भारत:
- भारतातून अंतराळ प्रवास करणारे ‘राकेश शर्मा’ हे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. ४० वर्षांपूर्वी एप्रिल १९८४ मधे भारत (इसरो) आणि सोव्हिएट रशिया यांच्या संयुक्त मोहिमेत त्यांची निवड झाली. दोन रशियन अंतराळवीरांबरोबर ते सोयुझ-११ या अंतराळयानातून अंतराळात (त्यावेळेच्या स्पेसस्टेशनमध्ये) गेले आणि एकूण २१ दिवस आणि ४०मिनिटं राहिले.
- त्यानंतर २०२४ मधे गोपी थोटाकुरा ‘जेफ बेझोस’च्या ब्लू ओरिजिनने प्रक्षेपित केलेल्या या दहा मिनिटांसाठी अंतराळ उड्डाण केले.
- २०२५ मधे भारताच्या गगनयान मोहिमेअंतर्गत ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला या चार अंतराळवीरांची (व्योमनॉट्स) निवड झाली आहे.
- भारतात जन्मलेले पण इतर स्पेस एजन्सीसाठी (प्रामुख्याने नासा) काम केलेले अंतराळवीर असे आहेत-
१) कल्पना चावला – यांचा नासाने प्रक्षेपित केलेल्या कोलंबिया या स्पेस शटलच्या अप*घा*तात दुर्दैवी मृ*त्यू झाला.
२) सुनीता विल्यम्स: अंतराळात जास्तीत जास्त वेळा जाणारी महिला अंतराळवीर असा विक्रम सुनिता विल्यम्स यांच्या नावावर आहे.
३) राजा चारी: हे नासातर्फे निवड झालेले भारतीय वंशाचे पहिले अंतराळवीर आहेत.
४) शिरीषा बांदला: व्हर्जीन गॅलॅक्टिकच्या उप-कक्षीय अंतराळ सफरीवर जाणाऱ्या या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर आहेत.
जगातील सर्व भटकंतीप्रिय लोकांसाठी अंतराळ पर्यटन(स्पेस टूरिझम) हे पर्यटनाचे हे नवीन आकर्षण लवकरच निर्माण होणार आहे. तेव्हा तयार व्हा अंतराळ पर्यटनाला……..
तुम्हाला अंतराळ पर्यटन(स्पेस टूरिझम) बद्दलची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे
खूप छान माहिती